शरीर आणि मनाने कोरोनासोबत जगायला शिकलो

परेश काठे - 8286414764

मी मुंबईतील एका केंद्रशासित रुग्णालयात नर्सिंग ऑफिसर पदावर कार्यरत आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढीस लागली आणि शेवटी लॉकडाऊन होऊन मुंबईची जीवनवाहिनी आणि माझं ऑफीस दोन्ही बंद झालं. पुढे दोनच दिवसांत हॉस्पिटलमध्ये बदली झाल्याची ऑर्डर आली आणि लगेचच सेवेत रुजू झालो. सुरुवातीचे काही दिवस तसे फक्त बसूनच गेले. कारण रुग्ण मुख्यतः दक्षिण मुंबईतील रुग्णालयात अ‍ॅॅडमिट होते आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये फक्त संशयित क्वारंटाईन करण्यात आलेले रुग्ण होते. त्यानंतर साधी लक्षणे असणारे कोरोनाबाधित रुग्ण आले; पण तरीही विशेष असे काही वाटले नाही; तसेच पुरावा तेवढा विश्वास, अशी वृत्ती असल्यामुळे क्लोरोक्वीन आणि इतर होमिओपॅथी (आयुर्वेदिक) औषधांपासून दूरच राहिलो. आधी ‘स्वाईन फ्लू’च्या रुग्णांसोबत काम केलेले असल्यामुळे तशी विशेष कोणतीच भीती मनामध्ये नव्हती. पीपीई किट सुद्धा जास्त वापरण्याची गरज त्या काळात पडली नाही. कारण रुग्णांना विशेष अशा कोणत्याच काळजीची किंवा निरीक्षणांची गरज नव्हती. याच काळात रोज घर- हॉस्पिटल-घर असे एकूण अंदाजे 120 किलोमीटरचे ड्रायव्हिंग होत होते. पण लॉकडाऊनमुळे मोकळे, रुंद रस्ते असल्याने गाडी चालवण्याची तशी मजाच येत होती.

मे महिना येता-येता संकटाचे ढग गडद होऊ लागले होते. प्राणवायूची गरज असणार्‍या रुग्णांची संख्या वाढत होती. नवीन व्हेंटिलेटर्स हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्याक्षणी मनाला सांगितले, ‘बाबा, तुझे आराम करायचे दिवस आता संपले. असली लडाई तो अब शुरू होगी।’ जवळपास 70 रुग्ण असणार्‍या वॉर्डमध्ये तुटपुंज्या मनुष्यबळासहित आता आमच्या टीमची खरी लढाई सुरू झाली होती. सुरुवातीच्या काळात अर्धा-एक तास पीपीई किट घालणारे आम्ही आता संपूर्ण शिफ्ट पीपीई किट घालून रुग्णासोबत घालवत होतो. सोबतच अचानक खूप मोठ्या प्रमाणावर रुग्ण मृत्युमुखी पडू लागले; अगदी दोन दिवसांपूर्वी चांगला बोलणारा तरुण काल व्हेंटिलेटरवर जाऊन आज गेला, हे ऐकताना मन हेलावून निघत होते अचानक सर्वच सिस्टिमवर लोड आल्याने शव नेण्यासाठी शववाहिन्या आणि जाळण्यासाठी दाहिन्यांमध्ये ‘वेटिंग’ सुरू झाली आणि तासन्तास शव तिथंच पडून राहू लागले; त्यातच कोणीतरी सायन रुग्णालयातील अशाच एका पॅक करून ठेवलेल्या मृतदेहाचा व्हिडिओ बनवून समाजमाध्यमावर ‘व्हायरल’ केला आणि ज्यांना आमच्या क्षेत्राशी आम्हाला रोजच्या होत असलेल्या त्रासाची, आम्ही एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची कोणतीही जाणीव नसते, असे लोक घरात बसून तुफान टीका करत होते. हे सर्व त्रासदायक वाटत होते. त्यातच सरकारी व्यवस्थेचा भाग असल्यामुळे अनेकदा अत्यावश्यक गोष्टींचा थेट पुरवठा होण्यात अडचणी निर्माण होत होत्या आणि अधिकारी वर्ग हा नॉन-मेडिकल असल्यामुळे त्यांची ठरलेली ‘सरकारी’ उत्तरे ऐकून वीट आला होता. मनावर ताण वाढत चालला होता. घरी सुद्धा रुग्ण आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काय चुकले, काय करता येईल, या विचारांचे थैमान सतत सुरू असायचे.

या काळात सुद्धा ‘अंनिस’चे काम जोमाने सुरू होते आणि एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा त्यात सहभागी होतो. ‘ऑनलाईन’ माध्यमातून होणार्‍या मीटिंग्स; तसेच ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण शिबिरे यामुळे घरबसल्या दिग्गज वक्त्यांचे विचार ऐकायला मिळत होते. डोंबिवली शाखेने आपल्या कल्पकतेतून साकार केलेली व्याख्यनामाला ‘तयारी वक्ते घडवण्याची’ यामध्ये मात्र दिगग्ज वक्ते न बोलावता नवख्या कार्यकर्त्यांना उद्यासाठी तयार करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात मी ‘मन व मनाचे आजार’ आणि ‘फलज्योतिष’ हे विषय मांडले. यामुळे दर सात दिवसांनंतर येणार ‘बॅकअप्’चा काळ तयारी करताना आणि व्याख्याने ऐकताना कसा जात होता, हे कळले सुद्धा नाही आणि त्यामुळे मनावरचा ताण बराच हलका होण्यात मदत झाली.

माझे शेजारी, कुटुंबीय यांनी मी कोरोना रुग्णालयात काम करतो, म्हणून माझ्यासोबत कोणताही भेदभाव केला नाही किंवा संशयाच्या नजरेने पाहिले नाही, ही त्यातल्या त्यात माझ्यासाठी समाधानाची गोष्ट होती.

आता जून महिना सुरू होऊन अर्धा संपला आहे. माझ्या हॉस्पिटलमधील परिस्थिती बर्‍यापैकी सुधारली आहे. कित्येक दिवसांत अनपेक्षित मृत्यू नाही, हे सांगताना समाधान वाटते. सुरुवातीला अर्धा तास पीपीई किट घालायला जो त्रास झाला, तो आता एवढा जाणवत नाही. हळूहळू शरीर आणि मन दोन्हीही कोरोनासोबत जगायला शिकत आहोत. पण त्याचबरोबर आज रस्त्यावर, बाजारात होणारी गर्दी बघून सहज विचार येतो, यामध्ये चुकून एखादा पॉझिटिव्ह असेल तर… आणि या विचारानेच काळजात चर्रर्र होते…

परेश काठे प्रशिक्षण विभाग कार्यवाह, अं.नि.स. डोंबिवली शाखा संपर्क : 82864 14764