डॉ. नितीन अण्णा - 8956445357
सत्यशोधक चळवळीत क्रियाशील असणार्या स्त्रियांबाबत फारच कमी लिहिले गेले आहे. त्या स्त्रियांचे ‘कार्य व व्यक्तित्व’ वाचकांपर्यंत पोचवावे, या उद्देशाने मागील वर्षी ‘सत्यशोधक स्त्रिया’ हे सदर कोल्हापूरच्या सत्यशोधक चळवळीच्या संशोधक डॉ. छायाताई पवार यांनी लिहिले. या सत्यशोधक स्त्रियांप्रमाणेच विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशी स्त्रियांबाबतही फारच कमी माहिती असते. त्यामुळेच यावर्षी आम्ही अशा वैज्ञानिक स्त्रियांचे कार्य आणि कर्तृत्वाची माहिती देणारे सदर चालू करीत आहोत. सदर लिहीत आहेत, ‘महाराष्ट्र अंनिस’चे कार्यकर्ते आणि लेखक डॉ. नितीन अण्णा.
कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिक; मात्र त्यांचं नाव अगदी विज्ञानाच्या शिक्षकांना देखील ठाऊक असेल, असं खात्रीनं सांगता येत नाही. संशोधन क्षेत्रामध्ये महिलांना प्रवेश दिला जात नव्हता, अशा काळात त्या जन्मल्या; मात्र संशोधनाची संधी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता; तोदेखील नोबेलविजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्याविरुद्ध. केवळ प्रवेश मिळवला नाही, तर भविष्यकाळात स्वतःला सिध्ददेखील करून दाखवले आणि सी. व्ही. रामन यांना स्वतःची चूक मान्य करायला लावली.
खरं तर त्यांची गोष्ट हा नक्कीच एक सिनेमाचा विषय होऊ शकतो. केवळ गणिताचे जादुई खेळ दाखवणे आणि भविष्याचा धंदा करणार्या शकुंतलादेवींपेक्षा कमला सोहोनी यांचं काम लाखपटीनं मोठं आहे, महत्त्वाचं आहे; ज्यातून विज्ञानात महत्त्वाची भर पडली आहे. फ्रान्समध्ये मादाम मेरी क्युरी यांनी सर्वप्रथम संशोधनामध्ये स्त्रीचा ठसा उमटवला. नंतर लिझ माईटनरचे काम पाहून कौतुक करताना अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणायचा की, ही आमची (जर्मनीची) मेरी क्युरी. त्याच आशयाने बोलायचं तर कमला सोहोनी म्हणजे भारताची मेरी क्युरी… आपली मेरी क्युरी…
कमला यांचा जन्म मध्य प्रदेशात इंदोर शहरात 18 जुलै, 1911 रोजी झाला. कमला सोहोनी हे त्यांचे लग्नानंतरचे नाव. आधी त्या होत्या कमला भागवत. भागवत कुटुंब हे अतिशय पुढारलेले. राजारामशास्त्री भागवत हे विचारवंतांमधील खूप मोठे नाव. कमला यांची आजी ही त्यांची बहीण. मॅट्रिक पास अन् इंग्रजी बोलणारी होती. कमलाचे वडील नारायणराव आणि चुलते माधवराव हे दोघेही बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पासआऊट. इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध परखडपणे आवाज उठवणार्या प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत आणि कमला या सख्ख्या बहिणी.
1933 मध्ये कमला विज्ञानाच्या पदवीधर झाल्या. विज्ञानाची पदवी मिळवणार्या भारतातील पहिल्या महिला. नुसती पदवी मिळवली नाही, तर विद्यापीठात पहिल्या आल्या. पुढील शिक्षणासाठी त्यांना सत्यवती लल्लुभाई श्यामलदास स्कॉलरशिप मिळाली. कमला यांनी एम.एस्सी.साठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू इथं अर्ज केला. या संस्थेत स्त्री उमेदवाराकडून आलेला हा पहिला अर्ज; साहजिकच फेटाळला गेला, पण हार मानेल त्या कमला कसल्या? त्यांनी वडिलांना सोबत घेऊन बंगळुरूची ट्रेन पकडली.
डॉ. सी. व्ही. रामन हे तेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक होते. कमलांच्या वडिलांनी रामन यांना समजावयाचा प्रयत्न केला; मात्र केवळ स्त्री असल्यामुळे कमला प्रवेश घेऊ शकणार नाहीत, यावर रामन ठाम होते. कमला शांतपणे हे सर्व पाहत होत्या. घरी त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव कधीच अनुभवला नव्हता. त्यामुळे समोर सुरू प्रकाराची त्यांना चीड आली. नोबेलविजेत्या रामन यांच्यापुढे 22 वर्षांची, चपचपीत दोन वेण्या घातलेली, नऊवारी लुगड्यातील मुलगी ताठ उभी राहिली आणि गर्जली, “केवळ स्त्री असल्यामुळे तुम्ही मला डावलता आहात, हे मला मान्य नाही. हा केवळ माझ्यावर नाही तर संपूर्ण स्त्री जातीवर अन्याय आहे, हा अन्याय मी सहन करणार नाही. मी वडिलांसोबत परत मुंबईला जाणार नाही. जोपर्यंत मला प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत मी तुमच्या दारात बसणार आहे.”
अशा पेचप्रसंगी कुशल प्रशासक करतो, तेच काम रामन यांनी देखील केले. चेंडू दुसर्याच्या कोर्टामध्ये टोलावला, रसायनशास्त्राचे विभागप्रमुख श्रीनिवासय्या यांच्याकडे. त्यांनी तीन अटींवर कमला यांना संस्थेत प्रवेश दिला. या अटींचे एक वर्ष काटेकोर पालन करावं लागेल, तरच त्यांना नियमित विद्यार्थिनी म्हणून समजण्यात येईल.
1) रोज सकाळी पाच ते संध्याकाळी दहा एवढा वेळ संशोधनासाठी द्यावा लागेल.
2) इतर पुरुष संशोधकांपासून दूर राहावं लागेल. संस्थेची शिस्त बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
3) श्रीनिवासय्या सांगतील ती कामं वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत.
या अटी कमला यांना जाचक वाटल्या नाहीत; पण सकाळी पाच ते संध्याकाळी दहा कमला काम करणार असतील तर त्यांच्या जेवणाचं काय? तो प्रश्न श्रीनिवासय्या यांनी सोडवला. रोज त्यांच्या घरून कमलांसाठी देखील डबा येणार होता. गंमत म्हणजे कमलांनी देखील एक अट घातली – रोज दुपारी चार ते सहा यावेळेत टेनिस खेळण्यासाठी सुट्टी मागून घेतली. संस्थेत कोणी बायका नाहीत, पुरुषांशी तर बोलायचे पण नाही; मात्र आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जतन करण्यासाठी त्या भिंतीसोबत टेनिस खेळत राहिल्या.
अशा रीतीने अटी-शर्ती फायनल करत कमलांचा ‘प्रोबेशन’ कालावधी चालू झाला. श्रीनिवासय्या यांनी दिलेली कामं त्या अतिशय सुंदररित्या पार पाडत होत्या. ते पाहून श्रीनिवासय्या यांनी त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची मुभा दिली. श्रीनिवासय्या हे उत्कृष्ट मार्गदर्शक आणि चांगले व्यक्ती होते. त्यांनी कमलांच्या प्रयोगांना, रिसर्च पेपर लिखाणाला योग्य मार्गदर्शन केलं. त्यांनी प्रथिनांवर संशोधन केलं. दूध आणि कडधान्य यावर त्यांचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ताठ मानेने ही स्वाभिमानी मुलगी रामन यांच्यापुढे उभी राहिली. रामन यांना वर्षभरात त्यांची तळमळ, धडपड दिसली होती. मोठ्या मनाने चूक कबूल करत ते म्हणाले, “मी मागच्या वर्षी केलेली चूक यावर्षी सुधारणार आहे आणि दोन मुलींना या वर्षी प्रवेश देणार आहे.”
1936 मध्ये कमला सोहोनी यांनी प्रबंध पूर्ण करून मुंबई विद्यापीठाकडून एम. एस्सी.ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी अर्ज केले. आंधळा मागतो डोळा आणि देव देतो दोन. ‘स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या मुंबई विद्यापीठातील दोन्ही शिष्यवृत्त्या मिळाल्या. जैवरसायनशास्त्राचे जनक, नोबेल पुरस्कार विजेते सर फ्रेडरिक गॉलंड हॉपकिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.साठी 1937 मध्ये त्यांना केंब्रिजमध्ये प्रवेश मिळाला.
इथे अजून एक गंमत घडली होती. मुंबईत असताना कमला यांनी अमेरिकेच्या महिला विद्यापीठात शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता; पण त्या वर्षी अर्ज करायची अंतिम मुदत संपली होती. ‘पुढच्या वर्षी अर्ज करा,’ असे स्मरणपत्र विद्यापीठाकडून कमला यांना मिळालं, तेव्हा “मी दोन स्कॉलरशिप मिळवून केम्ब्रिजमध्ये संशोधन करत आहे,” असा निरोप पाठवला. ‘पुअर हंग्री इंडियन’ उमेदवाराकडून असं उत्तर अमेरिकन लोकांना धक्कादायक होतं. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात चौकशी केली, त्या वेळेस सर हॉपकिन्स यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक करणारं पत्र पाठवलं. अमेरिकन महिला विद्यापीठात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली आणि कमला सोहोनी यांना प्रवासी शिष्यवृत्ती ऑफर केली गेली. अशी शिष्यवृत्ती तोवर पीएच.डी. पूर्ण केलेल्या प्राध्यापक मंडळींनाच देण्यात आली होती.
त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता ‘सायटोक्रोम’ आणि मार्गदर्शक होते डॉ. रॉबिन. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाचा घटक असतो ‘सायटोक्रोम.’ बटाट्यातील सायट्रोक्रोम ‘सी’चा शोध त्यांनी लावला. डिसेंबर 1937 मध्ये त्यांनी पीएच. डी.साठी नोंदणी केली होती आणि मार्च 1939 मध्ये पीएच.डी. मिळाली सुद्धा. केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच. डी. मिळवलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने तामिळनाडूमध्ये कुन्नूर शहरात नव्याने सुरू केलेल्या, आहारशास्त्रात संशोधन करणार्या प्रयोगशाळेत डॉ. कमलांची वर्णी लागली. तिथं त्यांनी भारतीय आहार आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचे प्रयत्न केले. हरभर्यातील जीवनसत्त्वं शोधून काढली. याशिवाय शेंगदाणा पेंड लहान मुलांचे कुपोषण कमी करायला उपयोगी पडते, हे शोधून त्या पेंडेला छान खाऊचे रूप दिले. तसेच यीस्टचा वापर करून दुसर्या महायुध्दात लढणार्या सैनिकांसाठी गोळ्या बनवल्या.
या काळात एक स्त्री म्हणून त्यांच्यापुढे आव्हाने होतीच. स्त्री एकटी आहे, याचा अर्थ उपलब्ध आहे, अशी सहकारी आणि अधिकारी पुरुषांची मानसिकता बुरसटलेली; मात्र त्याबाबत प्रतिसाद मिळत नाही, तर इतर मार्गाने त्यांची अडवणूक सुरू झाली. संस्थेत कोणतीही कर्मकांडे करायला कमला यांचा विरोध असायचा. अशा वेळी इतर अंधश्रद्ध लोक त्यांच्याकडे, ‘आलीय मोठी शहाणी,’ या नजरेने देखील पाहायचे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गटबाजी सुरू झाली. डॉ. कमलांएवढा शैक्षणिक; तसेच प्रात्यक्षिकांचा अनुभव इतर कोणाकडे नसतानादेखील त्यांना डावललं गेलं. त्यामुळे त्यांचं मन तिथं रमेना, राजीनाम्याचे विचार सुरू असतानाच जीवनात अजून एक धक्का बसला; मात्र तो सुखद होता.
जीवन विमा कंपनीत काम करणार्या माधवराव सोहोनी यांनी कमला यांना ‘प्रपोज’ केलं. आपण जी विमा उत्पादने खरेदी करतो, ती तयार करत असताना भविष्यातील जोखमीचा अंदाज घेण्याचं काम माधवराव सोहोनी करत असत. साहजिक माधवरावांनी या जोखमीचा देखील विचार केला असेलच. भाऊ खूप दिवस ‘फिल्डिंग’ लावून बसले होते; पण हिम्मत झाली नव्हती. ज्या दिवशी हिम्मत झाली, त्या दिवशी ‘विकेट’ पडली. डॉ. कमला यांनी त्यांचा प्रस्ताव एका अटीवर स्वीकारला, “मी आयुष्यभर संशोधन करणार आहे, त्यात तुमचं पूर्ण सहकार्य अपेक्षित असेल.”
मुंबईमधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत 1949 मध्ये नव्याने सुरू झालेल्या जैवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक झाली. इथेच संस्थेच्या संचालक म्हणून त्या 1969 मध्ये सेवानिवृत्त झाल्या. इथे त्यांनी कडधान्यांतील प्रथिनांवर काम करून त्यातील अ-पाचक घटक वेगळा केला. भाताच्या तुसावर संशोधन करून त्याचं खाण्यायोग्य पीठ बनवले; मात्र त्यांनी केलेलं सर्वांत महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि होमी भाभा यांनी सुचवल्याप्रमाणे नीराविषयक केलेलं संशोधन…
आपण विक्री केंद्रावर नीरेचे फायदे लिहिलेले बोर्ड वाचले असतील. ते फायदे डॉ. कमला यांनी शोधून काढले आहेत. भारतभर सर्वत्र उपलब्ध असलेले हे पेय ‘ब’, ‘क’ जीवनसत्त्वे, लोह, फॉलिक आम्ल आणि फॉस्फरससारखे क्षार असे संपूर्ण कुपोषणविरोधी पॅकेज असतं. नीरेवर त्यांनी पुढे 10 वर्षे संशोधन केलं आहे बरं का. त्यांच्या टीममध्ये 42 विद्यार्थी असले, तरी खादी ग्रामोद्योग मंडळाने पाठवलेली नीरा पहाटे तीन वाजता घ्यायला स्वत: डॉ. कमला प्रयोगशाळेत जात असत; तेही दोन-चार दिवस नाही, तर तब्बल दहा वर्षे सलग! मला वाटतं, कामावर निष्ठा असण्याचे यापेक्षा भारी उदाहरण तुम्ही वाचले नसेल. नीरेबद्दल केलेल्या या महत्त्वपूर्ण संशोधनकार्याबद्दल त्यांना सर्वोत्तम शास्त्रीय संशोधनाचं राष्ट्रपतिपदक देऊन 1960 मध्ये गौरविण्यात आलं.
त्या 18 जून, 1969 रोजी निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर देखील सामाजिक काम करत कार्यरत राहिल्या. विज्ञानाचा वापर करून अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याची प्रात्यक्षिके दाखवली. यावर अनेक लेख लिहिले. ग्राहक संरक्षणविषयक ‘कीमत’ हे नियतकालिक चालवलं. स्वयंपाक करताना काय काळजी घ्यावी, यावर त्यांनी ‘आहार-गाथा’ (आहार व आरोग्यविचार) हे पुस्तक लिहिलं.
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेतर्फे कमला सोहोनी यांचा जीवनगौरव प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्याचं ठरवलं. याच कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना कमला सोहोनी कोसळल्या… आणि त्यानंतर लवकरच, 28 जून, 1998 रोजी त्यांचा मृत्यू झाला. एक निरामय आयुष्य संपवून त्यांचा देह अनंतात विलीन झाला.
डॉ. कमला यांनी विज्ञानाचा रस्ता स्त्रियांसाठी खुला केला. त्याचा फायदा घेणार्या हजारो स्त्री-शास्त्रज्ञांना त्यांचा संघर्ष माहिती असेल-नसेल, काय माहीत; मात्र त्यांचा संघर्ष अभूतपूर्व आहेच. त्यांचा जन्म तथाकथित उच्च जातीत; त्यातही पुढारलेल्या घरात झाला, त्यांना घरातील कोणत्याही संघर्षाला सामोरे जावे लागले नाही की समाजात जातिभेदाचे चटके सोसावे लागले नाहीत. लिंगभेदाच्या चक्रव्यूहात त्यांच्यावर हल्ले झाले, तरी त्यातून त्या यशस्वी बाहेर पडल्या; पण कित्येक जणींना तो व्यूह भेदता आला नसेल. कितीतरी प्रतिभा वंश, लिंग, जाती, धर्म, रुढी, अंधश्रद्धा यांच्या कुंपणात कैद होत असतील? हे कुंपण तोडण्याची गरज आहे.
अजून एकाही भारतीय स्त्री संशोधकाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही. त्याचप्रमाणे अजून एकाही महिलेचे पाय चंद्रावर पडले नाही. भारताप्रमाणे संपूर्ण जगात स्त्रियांना संशोधनात डावलण्यात आलं आहे; मात्र तरीही त्यांनी आपल्या चिकाटीच्या जोरावर विज्ञान क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांची ओळख आपण पुढील काही भागात घेत राहू.
लेखक संपर्क : 89564 45357