योगेंद्र यादव -

साथीयो नमस्कार!
आदरणीय प्रतापराव पवारजी आणि या दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून ऐकणार्या सर्व कार्यकर्ता मित्रांनो…
तुमच्यासारखे मलाही वाटत होते की, प्रत्यक्ष पुण्याला येऊन व्याख्यान द्यावे. कारण पुणे हे माझ्या आवडत्या शहरांपैकी एक आहे. माझे खूप मित्र पुण्यात आहेत आणि पुणे मला छोट्या शहराचे समाधान व मोठ्या शहराचे मोकळेपण देते; पण पुन्हा केव्हातरी यायची संधी मिळेल.
आपण मला ही विशेष संधी दिली, हा गौरव दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान देणे माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे. मागील वर्षी एन. राम यांनी व्याख्यान दिले. त्यांच्यानंतर व्याख्यान देणे माझ्यासाठी मानाचे आहेच; पण त्याचबरोबर खूप जबाबदारीचे कामही आहे.
मी डॉ. दाभोलकरांविषयी ऐकले, वाचले. त्यांना जवळून बघितले; मात्र माझे दुर्दैव हे की, मी त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलेलो नाही. कदाचित ती कमी भरून काढण्यासाठी आपण मला ही संधी दिली आहे.
आत्ताच मुक्ताताई म्हणाल्या की, डॉ. दाभोलकर, पानसरेजी, कलबुर्गीजी, गौरी लंकेशजी हे आपल्या इतिहासाचे चार स्तंभ आहेत, ज्यांनी आपल्यासमोर आर्दश ठेवला! आपण विचारांसाठी बलिदान द्यायला तयार आहोत का? ही कोणत्याही विचाराची अंतिम परीक्षा असते. या चारही जणांनी विचारांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या सर्वांसाठी ते प्रेरणास्थान बनले. गौरी लंकेशजी यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. त्यांना मी मोठी बहीण मानायचो. त्यामुळे त्यांचे निधन माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या दुःखाचे होते.
माझ्यासाठी आजचा दिवस दुसर्या कारणानेही विशेष आहे. आपण जाणताच की आज सर्वोच्च न्यायालय प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावण्याची कार्यवाही करणार होते. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची वेळ बदलावी लागली, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आज आम्ही आमच्या दिल्लीतील कार्यक्रमाचा आरंभ डॉ. दाभोलकर यांचे स्मरण करून केला. त्यानंतर कार्यकर्ता साथी प्रशांत भूषण केसविषयी बोलले. जो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, तो आवाज सबंध देशभर पसरतो, हे या प्रसंगाने पुन्हा एकवार दाखवून दिले.
मला प्रशांत भूषण यांच्यात जो Rationalism आणि जे साहस दिसते, तेच मला डॉ. दाभोलकर यांच्यात दिसते. कोणत्याही सत्तेसमोर संयतपणे सत्य मांडण्याचे साहस मला प्रशांत भूषण यांच्यात दिसते, तेच साहस मला डॉ. दाभोलकर यांच्यात दिसते.
मला डॉ. दाभोलकरांचे मराठी लेखन विशेष आकर्षित करते. माझे अनेक विवेकवादी, सेक्युलर, तर्कशील मित्र इंग्रजीमध्ये लिहितात. माझे त्यांना पुन्हा-पुन्हा सांगणे असते की, आपण त्याच त्या व्यक्तींना पुन्हा बदलावत आहोत का? आपण जोपर्यंत सामन्यजनांच्या भाषेत बोलत, लिहित नाही, तोपर्यंत या देशात परिवर्तन होऊ शकत नाही. डॉ. दाभोलकरांनी लेखनासाठी मराठी भाषा निवडली, ही माझ्यासाठी आदरणीय बाब आहे. आज देशात धर्मनिरपेक्षतेवर चर्चा होत आहेत; पण जोपर्यंत आपल्या भाषेत ही चर्चा होत नाही, तोपर्यंत आपण धर्मनिरपेक्षतेला वाचवू शकत नाही.
आज व्याख्यानाचा विषय आहे, ‘कोरोना के बाद स्वराज का अर्थ.’ तुम्हाला ऐकून थोडे विचित्र वाटले असेल. कारण की आपण मागील तीन-चार महिन्यांपासून कोरोनासंदर्भात चर्चा करत आहोत. शीर्षकात ‘कोरोना’ हे नाव असल्याने तुम्ही कदाचित असाही विचार करत असाल की, अर्थनीती किंवा आरोग्यनीती, याबद्दल हे व्याख्यान असेल; मात्र मी या विषयांचा तज्ज्ञ नाही. आपल्या देशातील राजकारणी प्रत्येक विषयावर काही ना काही बोलत असतो; तसेच मी या विषयावरही काहीतरी बोललो आहे. पण मी ते ऐकवून तुम्हाला बोअर करू इच्छित नाही. अर्थशास्त्रावर बोलणारे अनेक अर्थशास्त्री देशात आहेत, खुद्द पुणे शहरात मोठे अर्थशास्त्री आहेत. त्यामुळे मी अर्थनीतीवर बोलणार नाही. कोरोनामुळे जी तात्कालीन परिस्थिती उद्भवली आहे, त्याबद्दलदेखील मी बोलू इच्छित नाही. डॉ. दाभोलकर स्मृती व्याख्यानात बोलण्याची संधी मी एका मोठ्या कामासाठी वापरू इच्छितो.
कधी अचानक सर्व कामे थांबतात, तेव्हा आपण दोन गोष्टी करतो. त्यापैकी पहिले काम म्हणजे, आपण मागे वळून पाहतो. आपण म्हणतो, हे काम करायचे होते, ते करायचे राहून गेले! अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या मनासमोर येतात. दुसरे काम म्हणजे आपण या संधीचा उपयोग दीर्घ काळाचा विचार करण्यासाठी करू शकतो. मी आपणा सर्वांना आवाहन करतो की, या ‘कोरोना’थांब्याचा विचार आपण मागे पाहण्यासाठी न करता पुढचा, दीर्घकालीन विचार करण्याकरिता केला पाहिजे. माझ्या मनात हे प्रश्न आहेत की, हा ‘कोरोना’काळ आपल्याला आधुनिक संस्कृतीविषयी काय सांगतो? आणि आपल्याला दीर्घकालीन भविष्याचे चित्र कसे दिसते? तर मी कोरोनावर काही बोलणार नाही. माझ्यासाठी कोरोना केवळ निमित्त आहे, एका दीर्घकालीन भविष्यात डोकावून पाहण्याचे निमित्त!
आधुनिक संस्कृतीचे एक लक्षण आहे की, ती थांबत नाही, ती चंचल आहे; मात्र कोरोनाने आपली एक सेवा केली आहे, त्याने थांबा दिला आहे. त्याद्वारे आपण आधुनिक संस्कृतीला आरशात पाहू शकतो.
आपण जेव्हा आरशात बघतो, तेव्हा दिसते ते हे की, एक प्रकारे ही कोरोना महामारी काही नवीन गोष्ट नाही. जगात अनेक महामार्या आल्यात आणि गेल्यात. त्यामध्ये माणसांचा मृत्यू होणे देखील काही नवीन नाही. तसे पाहिल्यास ही महामारी इतर महामारींच्या तुलनेत खूप सौम्य आहे. मात्र यावेळी माणसाला मानवजातीच्या भवितव्याविषयी वाटणारा अविश्वास नवीन आहे. अमिताभ घोष यांनी यासंदर्भात असे म्हटले आहे की, आपण आपल्याच खेळण्याने इतके भारवून गेलेले आहोत की, ते खेळणे हरू शकते, हेच आपण कबूल करत नाही आहोत. आपल्याला या महामारीसमोर झुकावे लागत आहे, हा विचारच मुळी आपल्याला मान्य नाही. हे संकट आपल्याला आधुनिक संस्कृतीतील पोकळपणा दाखवते. सर्वांना आनंद देण्याचा तिचा दावा किती कमकुवत आहे, हे दाखवते.
मला असे वाटते की, जो विचार माणसाला मृत्यूचा सामना करण्याची हिंमत देतो, तो खूपच प्रगल्भ व महत्त्वपूर्ण असतो. पण या मुद्द्यापाशी आधुनिक सभ्यता थिटी पडली आहे. सगळीकडे पसरलेली भीतीची भावना आपल्या ज्ञानाच्या अहंकारासमोर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. आपल्या विकासविषयक धारणेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत आहे. विश्व ग्राम (Global village) या आपल्या संकल्पनेसमोर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
मात्र ‘प्रत्येक आपत्तीत एक संधी असते,’ हे मी नाही, आपले प्रधानमंत्री सांगतात. त्यांचे काही म्हणणे मला पटते. मलाही वाटते की, प्रत्येक आपत्तीत एक संधी असते. तर आपण या कोरोना आपत्तीच्या काळात दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे, या थांब्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊन पूर्वी जे चालू होते तेथे पुन्हा कसे जाता येईल, याचा चिंतित होऊन विचार करणे. व्हॅक्सिन कधी येईल? बाजार कधी सुरू होईल? किंवा राष्ट्राच्या सीमा कधी उघडल्या जातील, याचा विचार आपण करू शकू. दुसरी गोष्ट आपण करू शकू ती ही की, एका नवीन विचार-व्यवहाराची आपण सुरुवात करू. मला असे वाटते की, कोरोना संकट ही आपल्यासाठी एक नवीन विचार-व्यवहार सुरू करण्याची संधी असली पाहिजे. अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही. थांबून, कोणत्या दिशेला जायचे आहे, त्याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
मला असे वाटते की, मानवी संस्कृतीची पाच तत्त्वे आहेत, जी कोरोना काळातदेखील आपल्या समोर आली आहेत. त्या पाचही तत्त्वांसंदर्भात काही पुनर्विचार गरजेचा आहे. मी आताच म्हणालो की, मानवसभ्यतेवर आपल्याला संकट दिसत आहे. त्या संकटाच्या मुळाशी पाच गोष्टी आहेत. आपण बर्याच विज्ञान काल्पनिकांमध्ये वाचतो की, एका शास्त्रज्ञाने एक यंत्रमानव बनवला. तो इतका शक्तिशाली झाला की, तो शेवटी शास्त्रज्ञांवर नियंत्रण करू लागला. त्यांना तो भारी पडू लागला. आपण बनवलेले खेळणे आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली होऊन आपल्यावर नियंत्रण करते, असे आपण कथा- कादंबर्यांतून वाचतो; मात्र मला वाटते या कथा नाहीत, हे वास्तव आपण अनुभवत आहोत. आपण पाच खेळणी बनवली, जी आजघडीला आपल्या उरावर बसून राज्य करीत आहेत. ज्या कामांसाठी त्यांना बनवले, ती कामे आता मागे पडली आहेत. ती खेळणी कोणती आहेत?
मानवाच्या पाच नैसर्गिक इच्छा आहेत. त्या आदिम काळापासून चालत आलेल्या आहेत. मानवाच्या ‘त्या’ पाच मूळ नैसर्गिक इच्छा म्हणजे – 1) स्वशासन 2) स्नेह 3) खुशाली 4) सत्य 5) सुख. या पाचही इच्छांच्या पूर्ततेसाठी आपण पाच मोठी खेळणी तयार केली, तुम्ही त्याला यंत्रणाही (system) म्हणू शकता. कोणत्या आहेत त्या पाच यंत्रणा?
स्वशासनाच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आपण लोकशाही बनवली. ‘स्नेह’ या इच्छेच्या पूर्ततेसाठी आपण राष्ट्र-राज्य-देश बनवले. खुशालीसाठी आपण नवउदारमतवादी भांडवलशाही घडवली. सत्याच्या शोधासाठी आपण आधुनिक विज्ञान निर्मिले. सुखाच्या शोधासाठी आपण संस्थागत धर्मांची निर्मिती केली. आता असे झाले आहे की, या पाचही यंत्रणा मानवावर नियंत्रण करू लागल्या आहेत, त्याला भारी पडू लागल्या आहेत. त्या ज्या उद्देशाने बनवल्या गेल्या होत्या, त्यापासून त्या दूर गेलेल्या आहेत आणि हेच या समयीचे संकट आहे.
त्यामुळे आपल्याला कोरोना काळात या पाच व्यवस्था किंवा खेळण्यांचा विचार केला पाहिजे. या पाचही व्यवस्थांचा जन्म जगाच्या एका कोपर्यात झाला. त्या देश-कालसापेक्ष होत्या. जसे की, राष्ट्र राज्य या संकल्पनेचा जन्म युरोपात सोळाव्या- सतराव्या शतकात झाला. मात्र नंतर या व्यवस्था जागतिक झाल्या. सबंध जगाला सांगू लागल्या की, त्या यंत्रणा हेच सर्व समस्यांवरचे समाधान आहे. ज्या काळासाठी-ठिकाणासाठी ही खेळणी बनवली गेली, त्या काळ-ठिकाणासाठी चांगली होती; पण जेव्हा या खेळण्यांना शाश्वत, सार्वभौम बनवले गेले, तेथूनच समस्या सुरू झाल्या. आज ही खेळणी माणसाने ज्या कामासाठी बनवली गेली होती, त्याच्या विपरीत काम करीत आहेत. या व्यवस्था आतून सडल्यामुळे किंवा नवे विचार जगात-देशात येत असल्यामुळे नवे पर्याय दिसू लागले आहेत. आपण याचा साकल्याने विचार करणार आहोत.
या काय व्यवस्था आहेत? त्यांच्यात काय कमी आहे? त्यांना कोणता पर्याय असू शकतो? याविषयी मी ओळीने थोडे विवेचन करेन. सामान्यपणे आपण या पाचांपैकी फक्त भांडवलशाहीचे गुण-दोष शोधतो; उर्वरित चार व्यवस्थांची आपण पूजा करतो, धर्माची तर पूजा करतोच करतो. आपण लोकतंत्र, राष्ट्र, राज्य यांना चांगल्या गोष्टी मानतो. यात मी विज्ञानाचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे विवेकवादी मित्रांना विचित्र वाटले असेल.
आता पहिला मुद्दा लोकशाही घेऊ. लोकशाहीच्या मुळाशी ‘स्वशासन’ ही नैसर्गिक इच्छा आहे. कोणत्याही बाहेरच्या नियंत्रणापासून मुक्तीची इच्छा आहे, जी खूप सुंदर आहे. यामध्ये जनताजनार्दन आपले प्रतिनिधी निवडेल, ते लोकांच्या इच्छेची पूर्तता करतील, चांगले शासन देतील, अशी रचना आहे. ही व्यवस्था मागील पाच दशकांत सर्वमान्य म्हणून स्वीकारली गेली आहे; मात्र याचे नेमके परिणाम काय झाले आहेत? कोणत्याही मोठ्या व्यवस्थेचे हे वैशिष्ट्य असते की, तिच्याकडे कसे पाहावे, याचा चष्मादेखील हीच व्यवस्था देते. पण आपण हा चष्मा काढून बघतो, तेव्हा काय दिसते? यात कोणतीही शंका नाही की, या व्यवस्थेने लोकांना ताकद दिली आहे. हुकूमशाहीच्या विरोधात लढण्याची हिंमत दिली आहे. मात्र जगातील अनेक भागांत औपचारिकरित्या लोकशाही अस्तित्वात आली, म्हणून जनतेचे कल्याण झालेले नाही, तर लोकशाहीचे केंद्रीकरण झालेले आहे. या केंद्रीकरणाचा तीन घटकांना फायदा झाला आहे. एक, राजकीय पक्षांवर वर्चस्व असलेले लोक. दोन, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते लोक. तीन, प्रसारमाध्यमांवर वर्चस्व असलेले लोक. या तिन्ही ताकदींचे मिश्रण लोकशाहीला भारी पडत आहे. याचे उदाहरण शोधायला दूर जायला नको. आपण सध्या ते अनुभवत आहोत. लोकशाही पद्धतीने निवडणुका होणे आणि व्यवहारात हुकूमशाही असणे या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. आपल्यासमोर पेरू, हंगेरी, तुर्की ही उदाहरणे आहेत. अमेरिकेत जवळजवळ असेच घडत आहे. आपल्याला वाईट वाटणार नसेल तर मी सांगू इच्छितो की, आपल्या देशातही हेच घडत आहे. ‘निवडणुकीय हुकूमशाही येत आहे,’ हे विधान जस्टिस ए. पी. शहा यांनी केले; म्हणजे निवडणुका होतील, लोक मतदान करतील, मतांची मोजणी व्यवस्थित होईल; मात्र प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी व नंतर हुकूमशाही असेल. या प्रकारचा धोका उद्भवू शकतो, हे लोकशाहीच्या संरचनेत अंर्तभूत आहे. या प्रश्नाविषयी मी अनेकदा बोललो आहे, लिहिले आहे. हल्ली मी या प्रश्नाचा खूप विचार करीत आहे. जितका खोल विचार करतो, तितके माझे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने झुकत आहे. सामान्यपणे बाबासाहेबांकडे जातिनिर्मूलन करणारे, सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडणारे या रुपात पाहिले जाते. मला असे वाटते की, बाबासाहेबांना मुख्यत्वेकरून लोकशाहीच्या भाष्यकाराच्या रुपात पाहिले पाहिजे. लोकशाहीचे भाष्यकार म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याकडे अद्याप विद्वानांचे लक्ष गेलेले नाही. बाबासाहेब जोतिबा फुलेंच्या विचार परंपरेतून येतात, ज्यात लोकांची भूमिका मध्यवर्ती आहे. जेव्हा आपण उदारमतवादी लोकशाहीच्या पर्यायांच्या बाबतीत विचार करतो, तेव्हा लोक कसे शक्तिशाली होतील, याचा विचार केला पाहिजे. ‘लोकतंत्र’ केवळ तंत्रापासून बनत नाही; आपल्या लोकतंत्राच्या अनुभवामध्ये केवळ ‘तंत्र’ महत्त्वाचे बनत आहे आणि लोक दाबले जात आहेत. बाबासाहेबांच्या विचारांतून लक्षात येते की, लोक कसे मजबूत करता येतील. आपण बाबासाहेबांच्या विचारांच्या खोल तपशिलात गेलो तर येणार्या पिढीसाठी लोकशाहीची नवी व्याख्या तयार करू शकू.
दुसरा मुद्दा राष्ट्र-राज्य हा आहे. मागील काही वर्षांपासून देशात राष्ट्रवादावर जोरदार चर्चा होताहेत. प्रत्येक गोष्टीला राष्ट्रवादाशी जोडले जात आहे. असो. राष्ट्राच्या मुळाशी ‘स्नेह’ हा विचार आहे. मी एकटा राहू शकत नाही. परिवार, समाज यांच्या माध्यमातून मी लोकांशी जोडला जाऊ इच्छितो आणि राष्ट्र हे याचेच मोठे स्वरूप आहे. युरोपातून आलेला राष्ट्रवाद सांगतो की, सांस्कृतिक सीमा आणि राजकीय सीमा एकमेकांशी जोडल्या पाहिजेत; म्हणजेच एक भाषा, एक वेशभूषा, एक धर्म यांच्या आधारावर ‘राष्ट्र -राज्य’ असले पाहिजे. हा युरोपातील विचार आहे; भारतातील नाही. या संकीर्ण राष्ट्रवादाने जगाला जोडण्याऐवजी तोडले आहे. केवळ देशांनाच एकमेकांपासून तोडले नाही, तर देशाच्या आतील मतभिन्नता असलेल्या लोकांना एकमेकांपासून तोडले आहे. विचारवंत आशिष नंदी यांच्या मते, जगात जितकी हिंसा राष्ट्रवादाच्या नावे झाली, तितकी अन्य कोणत्याच कारणाने झालेली नाही. मात्र राष्ट्रवादाचा दुसराही विचार आहे, जो युरोपातून आलेला नाही, तर तो विचार वसाहतवादविरोधी संघर्षातून आलेला आहे. आपल्या देशात महात्मा गांधी हे त्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. त्याचा अर्थ रवींद्रनाथ टागोरांनी ‘राष्ट्रवाद’ शब्दाचा उल्लेख न करता सांगितला आहे. तो युरोपातील नकारात्मक राष्ट्रवाद नसून भारतातील सकारात्मक राष्ट्रवादी विचार आहे. युरोपातील राष्ट्रवादाचा संकीर्ण विचार मानवजातीच्या दृष्टीने भीतिदायक आहे. दुर्दैवाने आज आपल्या देशात युरोपातील संकीर्ण विचार सांगितला जात आहे. टागोरांनी ‘जन गण मन’मध्येे उल्लेखलेला राष्ट्रवादाचा विचार खरा भारतीय राष्ट्रवादाचा विचार आहे, ज्यात विविधतेला स्थान आहे.
तर राष्ट्रवादाला पर्याय काय असेल? ‘आंतरराष्ट्रीयतावाद’ याला पर्याय असू शकत नाही. आपल्याकडे आंतरराष्ट्रीयतावादाचा खूप त्रोटक अर्थ लावला जातो. जी व्यक्ती तीन-चारदा युरोपात जाऊन आली आहे, युरोपीय भाषा युरोपीय उच्चारशैलीप्रमाणे बोलते, ती व्यक्ती स्वतःला आंतरराष्ट्रीय म्हणवून घेते. मात्र खरा आंतरराष्ट्रीयतावाद तो असेल, ज्यात गावाप्रती, समुदायाप्रती, राज्याप्रती, राष्ट्राप्रती आणि जगाप्रती बांधिलकी असेल. ही सारी बांधिलकी एक-दुसरीशी जोडू शकेल, तो राष्ट्रवाद आपल्याला हवा आहे, जो नव्या जगासाठी मोठा विचार ठरेल. तिसरा मुद्दा भांडवलशाही. भांडवलशाहीचे काम आहे खुशाली देणे. अभावापासून मुक्ती देऊ, हे स्वप्न भांडवलशाही दाखवते. त्याकरिता खासगी मालमत्तेचा अधिकार, उत्तराधिकार दिला पाहिजे. मुक्त बाजार व्यवस्था असली पाहिजे, हेही भांडवलशाही सांगते; पण या स्वप्नाचे वास्तव काय आहे? ‘मुक्त बाजार’ हा लूट करणारा बनला आहे.
जग दोन हिश्श्यामध्ये वाटले गेले आहे. एकीकडे, अभावाचा सागर; तर दुसरीकडे संपन्नतेची बेटे आहेत. युरोप, अमेरिका संपन्नतेची बेटे, तर आफ्रिका, आशिया अभावाचे सागर आहेत. हेच चित्र आपल्याला देशाच्या अंतर्गत भागातही दिसते. जगाला दोन हिश्श्यामध्ये वाटणे ही भांडवलशाहीची मूलप्रवृत्ती आहे. भांडवलशाहीने जितका विकास केला आहे, तितका विनाशही केला आहे. आज आपण पर्यावरणाच्या बाबतीत थोडे सजग झालो आहोत. हे खरे आहे की, संपूर्ण जगाचे राहणीमान हे अमेरिकेप्रमाणे कधीच होऊ शकत नाही. तेवढी संसाधने उपलब्ध करायची, असे म्हटल्यास आपल्याला सात पृथ्वीगोल लागतील, जे अशक्य आहे.
तर याचे पर्याय काय असतील? जुना साम्यवाद वा जुना समाजवाद याचे पर्याय असू शकत नाहीत. त्याचे प्रयोग या आधीही झाले आहेत, जे असफल ठरले. सहकार, संसाधनांचा यथायोग्य वापर व पर्यावरणाला अनुकूल ठरेल, असा विकास हे याचे पर्याय असू शकतात. मुक्त असीमित विकास हे आपले स्वप्न असू शकत नाही. मुक्त असीमित उपभोगाचा अर्थ आहे, दुसर्याला मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणे. त्यामुळे पर्यायांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. यास काय पर्याय असू शकतील, याचा शोध घेणे जगात सुरू झाले आहे. आपण त्या दिशेने विचार करणे जरुरीचे आहे.
चौथा मुद्दा विज्ञानाचा. मी जाणतो की, हे ऐकताना अनेक साथींना वाईट वाटेल. माझे अनेक विवेकवादी मित्र आहेत. त्यातील काहींच्या मनात एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील विज्ञान व विवेकवाद आहे. आज आपल्याला एकविसाव्या शतकातील विवेकवाद हवा आहे, जो संकुचित असणार नाही; व्यापक असेल. मी या विषयावर डॉ. दाभोलकरांसोबत चर्चा करू शकलो नाही, याची माझ्या मनाला खंत आहे. कारण त्यांच्या लिखाणातून माझ्या लक्षात येते की, त्यांच्याजवळ एकविसाव्या शतकातील विवेकवादाची व्याख्या करण्याची क्षमता होती आणि मला खात्री आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील कोणी ना कोणी साथी हे कार्य पूर्ण करेल. सर्वजण सामान्यपणे मानतात की, आधुनिक विज्ञान मानवासाठी मुक्तीचे साधन बनले आहे. हे खरे आहे की, आपल्याला आधुनिक विज्ञानाने अनेक अंधश्रद्धांपासून मुक्ती दिली, अनेक तर्हेच्या शोषणापासून मुक्ती दिली, अज्ञान, अंधकारापासून मुक्ती दिली; मात्र त्यासोबत हेही खरे आहे की, जेव्हा विज्ञान हे प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनते, तेव्हा ते दोन कामे करते. एक, ज्ञान देण्याचे. दोन, ज्ञान दाबण्याचे. जर ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर उतरत असेल तरच ते ज्ञान आहे; अन्यथा ते अज्ञान आहे. हा वैज्ञानिक विचार नाही आहे. वैज्ञानिक विचार हा होईल, जो कोणत्याही ज्ञानाला खुलेपणाने बघायला तयार असेल आणि आपल्यापाशी परंपरागत ज्ञान आहे त्याकडे त्याच्या कसोटीवर बघायला तयार असेल. मला वाटते, विवेकवादाच्या समर्थकांसमोर हे आव्हान आहे. मागील पाच दशकांत अनेक इतिहासकारांनी विज्ञानाचा इतिहास लिहिला आहे. हा इतिहास आपल्याला हे सांगतो की, विज्ञानाने बरंच काही मिळवलं आहे; पण त्याचबरोबर बरंच दाबलंसुद्धा आहे. आधुनिक विज्ञान स्वतः शोषणकर्तेबनले आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला अशा विज्ञानाची गरज आहे, जे अनेक ज्ञानपरंपरांना जोडू शकेल.
पाचवा मुद्दा म्हणजे संस्थागत धर्म. धर्म माणसाची नैसर्गिक गरज आहे. धर्म मानवाला सुख देतो, दुःखापासून मुक्ती देतो, अंतःकरणाशी जोडतो. या गरजांच्या पूर्तीसाठी आपण संस्थागत धर्माची व्यवस्था निर्माण केली. मी संस्थागत धर्म आणि धर्म यात फरक करतो. धर्म ही माणसाला अंतःकरणाशी जोडणारी चांगली संकल्पना आहे; मात्र संस्थागत धर्म – हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन माणसाला दुःखाऐवजी सुखापासून मुक्ती देत आहेत. अंतःकरणाशी जोडण्याऐवजी तोडत आहेत. तुम्हाला अंतःकरणाशी जोडले जाण्याची गरज नाही, तुम्ही केवळ आमच्या प्रार्थनास्थळात या, असे संस्थागत धर्म सांगताहेत. आज याची जागा महागड्या आश्रम, मठांनी घेतली आहे. यास काही पर्याय असू शकतो का, याचा विचार आपण केला पाहिजे.
आतापर्यंत मी पाच नैसर्गिक इच्छांविषयी बोललो. त्यांच्या पूर्तीसाठी बनवलेल्या पाच व्यवस्थांविषयी बोललो. त्या ज्या उद्देशाने बनवल्या गेल्या होत्या, त्यापासून दूर गेल्या आहेत, याविषयीही मी बोललो. त्या मूळ उद्देशापासून दूर गेल्यामुळे आपल्याला त्यातील दोषांवर मात करून, सुधारणा घडवून आणायच्या आहेत. लोकशाही, राष्ट्र-राज्य, मुक्त बाजार स्वीकारून आपल्याला नवा पर्याय उभा करायचा आहे, ज्याला मी ‘स्वराज्य’ असे म्हणतो. ‘स्वराज’ शब्दाचा उल्लेख केल्यावर आपल्याला बाळ गंगाधर टिळकांच्या ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच,’ या घोषणेचे स्मरण होते. टिळकांच्या स्वराज्याचा अर्थ आहे, विदेशी राज्यापासून मुक्ती. जो खूप सीमित अर्थ आहे. मी टिळकांच्या स्वराज्याला ‘स्वराज्य 1.0’ असे म्हणतो. आज एकविसाव्या शतकात आपल्याला ‘स्वराज्य 2.0’ ची आवश्यकता आहे, ज्याचा मूळ विचार महात्मा गांधींनी दिला आहे. गांधीजींनी खूप स्पष्ट शब्दांत सांगितले की, विदेशी राज्यापासून मुक्ती हा केवळ स्वराज्याचा अर्थ नाही, तर स्वतःचे स्वतःवर राज्य असणे हा स्वराज्याचा अर्थ आहे. स्वराज्य हा सकारात्मक विचार आहे. विसाव्या शतकात जितक्या विचारधारा आहेत – गांधीवाद, विवेकवाद, मार्क्सवाद, राष्ट्रवाद त्यांचा एकत्रित विचार म्हणजे ‘स्वराज्य’ आहे, जो आपल्याला नव्या संस्कृतीचा मार्ग दाखवेल.
स्वराज्य कसे येईल? माझ्या मते, स्वराज्य प्राप्त करण्याचा मार्ग आहे राजकारण. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटले असेल. कारण की आपण राजकारणाला विचित्र गोष्ट मानतो. माझ्या मते, केवळ निवडणुका लढवणे, सत्ता स्थापन करणे म्हणजे राजकारण नाही, तर राजकारण एक पंचांग धर्म आहे. पंचांग कर्मयोग आहे. पंचांग कर्मयोग म्हणजे काय? यात पाच कर्मे आहेत. एक, सत्तायोग, म्हणजे निवडणुका लढणे, सरकार स्थापन करणे/ पाडणे. दोन, क्रांतियोग. संघर्ष करणे, आंदोलन करणे, जो डॉ. दाभोलकरांनी केला. तीन, सहयोग म्हणजे रचनात्मक काम. चार, ज्ञानयोग म्हणजे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे. पाच, ध्यानयोग म्हणजे आपल्या अंतःकरणाशी जोडले जाणे. या पाचही कर्मांचा एकत्रित अर्थ राजकारण हा आहे.
मी व्याख्यानाची सुरुवात कोरोना काळापासून केली आणि म्हणालो होतो, मी अर्थव्यवस्था वा आरोग्यनीतीवर बोलणार नाही. मी कोरोना संकटावरही फारसे बोललो नाही. कोरोनामुळे आपल्याला विचार करण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. त्याचा उपयोग मागे पाहण्यासाठी न करता भविष्याचा एक दीर्घकालीन विचार करण्याकरिता केला पाहिजे. जो विचार नव्या सभ्यतेकडे घेऊन जाईल आणि ती डॉ. दाभोलकरांना ‘विचारांजली’ ठरेल. मी डॉ. दाभोलकरांना पुन्हा एकदा अभिवादन करून व्याख्यान संपवतो.”
‘अंनिस’ महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित करणार्या डॉ. दाभोलकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आहोत. डॉ. दाभोलकरांच्या प्रेरणेने हजारो लोक एकत्र आले आहेत आणि या एकतेमधूनच परिवर्तन शक्य आहे, असा संदेश डॉ. दाभोलकरांचे कार्यकर्ते त्यांच्या कामातून देत आहेत.
मराठी अनुवाद व शब्दांकन : सौरभ बागडे