मिड ब्रेन अ‍ॅक्टिवेशन आणि वीरा द विनर!

अनिल चव्हाण -

शाळेचे सभागृह खचाखच भरले. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही बोलावलेले होते. स्पर्धेच्या युगात आपले मूल मागे राहू नये, म्हणून अनेक उपाय योजणारे उत्साही पालक वेळेपूर्वीच येऊन बसलेले.

“बदाम खा, हळद घालून दूध प्या,” इथपासून ते “संस्कृत शिका आणि गायत्री मंत्र म्हणा,” असे विविध उपाय करून मुलांची बुद्धिमत्ता वाढवणार्‍या (!) पालकांना आज नवा मार्ग दिसणार होता.

बरोबर चार वाजले आणि स्टेजवर प्रथम सुटाबुटातले गृहस्थ आले. “वेलकम एव्हरीबडी, आय एम मिस्टर धनंजय, धनंजय फ्रॉम पुणे; डायरेक्टर ऑफ रनिंग ब्रेन इन्स्टिट्यूट!” असे म्हणत त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. “आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, मानवी बुद्धीचा चमत्कार; माणसाच्या मेंदूची कमाल!” पुढे ते म्हणाले, “आपल्या मेंदूचा फक्त पंधरा टक्के भाग आपण वापरत असतो, ८५ टक्के भाग पडूनच राहतो! मेंदूचे दोन भाग आहेत, एक उजवा मेंदू, दुसरा डावा मेंदू! राईट अँड लेफ्ट ब्रेन! त्या दोघांच्या मध्ये एक छोटा भाग आहे, त्याला म्हणतात मिड ब्रेन, जो आपण कधीच वापरत नाही. त्याला कार्यान्वित केले तर काय चमत्कार होतात पाहा, लेट अस अ‍ॅक्टिव्हेट ब्रेन!”

“हे आपल्या शाळेतील विद्यार्थी आहेत. आजच्या कार्यशाळेत भाग घेऊन ते तयार झालेत. प्रथम डेमो होऊ दे, नंतर त्यांच्याशी संवाद साधा, शंका-समाधान करून घ्या. मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतोय, पहिला आहे सुहास!”

एक तरतरीत मुलगा स्टेजवर येऊन बसला.

“दुसरी आहे वीरा!”

पण वीरा कुठे होती? ती प्रेक्षकांत जाऊन आदित्यराज आणि स्वरा या भावंडांना हळू आवाजात काहीतरी सांगत होती. नाव पुकारताच ती मागे वळली.

प्रेक्षकांच्यात कुजबूज चालू होती. “कोण वीरा?”

कोणीतरी म्हणाले, “ती काय!”

“ती वीरा द विनर असणार!”

“अरे होय की, वीरा द विनर!”

पुन्हा नाव पुकारले जाण्यापूर्वीच वीरा त्वरेने स्टेजवरील खुर्चीवर बसलीसुद्धा!

“मी आता तिसरे काँटेस्टंट शोएब यांना विनंती करेन, की त्यांनी स्टेजवर यावे!”

तीन विद्यार्थी स्टेजवरील खुर्चीवर बसले. त्यांच्या शेजारी यापूर्वी शाळेचे प्रिन्सिपल आणि प्रमुख पाहुणे येऊन बसले होते. प्रमुख पाहुण्यांच्या समोर टेबल होता. विद्यार्थ्यांच्या समोर मात्र काहीही नव्हते. ते सर्वांना दिसावेत म्हणून ही योजना होती.

“आज दिवसभर या विद्यार्थ्यांनी ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनचा सराव केला आहे. पाहूया त्यांच्यात काय बदल झाला आहे! मी प्रथम या तिघांचे डोळे बांधायला सांगेन,” असे म्हणताच विराज, वेदांत आणि इरा असे तीन स्वयंसेवक विद्यार्थी हातात काळ्या कापडाच्या जाड रिबन घेऊन आले. त्यांनी तिघांचे डोळे बांधले आणि मागे जाऊन थांबले.

“आता मी प्रत्येकाला एक-एक रंगीत बॉल देईन!”

स्वयंसेवक पुढे आले. त्यांनी प्रत्येकाच्या हातात एकेक रंगीत चेंडू दिला. हातात चेंडू घेताच विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा चेंडू मनगटावर घासला, नाकाला लावून वास घेतला, कपाळाला लावला. अशा रीतीने शरीरात पाच ठिकाणी स्पर्श केल्यानंतर चेंडू खाली ठेवला आणि प्रत्येकाने रंग ओळखला.

“तांबडा”, “काळा”, “निळा”, एकेकाची उत्तरे घेण्यात आली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला.

त्यानंतर पुस्तके देण्यात आली. पुस्तक घेताच विद्यार्थ्यांनी त्यावरून हात फिरवला, पुस्तक मनगटावर घासले, नाकाला लावले. कपाळावर, डोके, टाळू, अशा पाच ठिकाणी स्पर्श झाल्यावर पुस्तकाची नावे ओळखण्यात आली. पुन्हा टाळ्यांचा गजर झाला!!

आश्चर्यचकित झालेल्या प्रेक्षकांच्या पुढे मास्टर ट्रेनरचे व्याख्यान सुरू झाले, “आपल्या मुलांनीही उद्याच्या कॅम्पमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांची बुद्धी ‘शार्प’ करूया. त्यांचा मिड ब्रेन अ‍ॅॅक्टिव्हेट करू या, जीनियस बनवू!” हे त्यांच्या भाषणाचे सार होते.

भाषण संपवून पालकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये फी भरून घेण्यासाठी दोन स्वयंसेवक पावती बुक घेऊन पुढे आले.

तोपर्यंत एक आवाज आला, “सर, शंका विचारली तर चालेल ना?”

सरांनी समोर पाहिले, पुढच्या बेंचवरचा छोटा मुलगा हात वर करून उभा होता. हा होता आदित्यराज!

“हो! का नाही? विचारा?”

“सर, डोळे बंद केल्यावर हात फिरवून, बोटाने स्पर्श करून यांनी रंग ओळखला, अक्षरे वाचली; मग त्यांच्या बोटांना डोळे फुटले आहेत काय?”आदित्यराजचा प्रश्न.

सभागृहात एकच हशा पिकला.

“वाऽऽ वा! किती छान प्रश्न आहे! काय नाव तुझं?”

“आदित्यराज! मी वीराचा भाऊ.”

“पाहा, या मुलाने प्रश्न विचारलाय! आपला डोळा कसा काम करतो, ते समजून घेऊया. समोरच्या वस्तूवर पडलेले प्रकाश किरण डोळ्यात शिरतात! नेत्रभिंगातून गेल्यावर नेत्रपटलावर एकत्र होतात. तिथे वस्तूची प्रतिमा तयार होते. नेत्रपटलावरील लंबवर्तुळाकार पेशींना काळा आणि पांढरा रंग समजतो, तर शंक्वाकृती पेशींना सप्तरंग समजतात. ही सर्व माहिती ज्ञानतंतू मेंदूला कळवतात. मेंदू त्याचा अर्थ लावतो. मात्र इथे हेच काम बोटांची त्वचा करते. मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेट केल्यामुळे हे शक्य होते.”

टाळ्यांचा गजर झाला.

“सर हे शक्य नाही. त्वचेच्या पेशींची रचना वेगळी आहे! त्या रंग ओळखू शकत नाहीत; शिवाय दृष्टीचे ज्ञान होणारा मेंदूचा भाग मध्यावर नाही, तो बाजूला आहे.” स्वराने माहिती दिली.

“या रंगांच्या लहरी आणि अक्षरांच्या लहरी बोटांना समजतात. ही तर ‘जीनियस’ बाब आहे!”

उत्तर मिळाले.

“मी त्यांना वस्तू दाखवू का?” आदित्यराज पुढे झाला. मदतीला स्वरा होतीच! काही कळायच्या आत दोघे स्टेजवर पोचलेसुद्धा! आणि सुरू झाला पुन्हा मागचाच खेळ!

स्वराने एक चेंडू घेतला आणि सुहासच्या चेहर्‍यासमोर धरला. प्रेक्षक श्वास रोखून पाहू लागले. सुहासने मान वर केली तसा स्वराने चेंडूही वर केला. चेंडू नाकाच्या खालच्या बाजूला यावा, म्हणून सुहासची धडपड सुरू झाली. मात्र स्वराने तेच होऊ दिले नाही.

आदिने शोएबच्या समोर पुस्तक धरले. ते नाकाखाली येऊ दिले नाही. शोएब मुखपृष्ठावर बोटे फिरवून थकला; मात्र त्याला नाव सांगता आले नाही. आता काय करावे, असा प्रश्न संयोजकांपुढे उत्पन्न झाला. मास्टर धनंजय पुढे झाले. त्यांनी वस्तू नाकाला लावून वास घेण्यासाठी हातात देण्याचा आग्रह धरला.

मग मात्र वीरा उभी राहिली. तिने डोळ्यांवरील पट्टी काढली. आणि म्हणाली, “थांबा, मी सांगते सर्व काही!”

“मी सकाळपासून मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या वर्गात उपस्थित आहे. सुरुवातीला आम्ही हात जोडले आणि बोटांचे व्यायाम केले. त्याला नाव होते, ‘ब्रेन जिम.’ मात्र त्याचा संबंध ब्रेनशी नव्हता. नंतर फिजिकल व्यायाम झाले. तारस्वरात एकच रटाळ संगीत ऐकून मेंदू थकला, मग सुरू झाल्या सूचना.

“मेंदू अ‍ॅक्टिव्हेट झाला आहे.”

“डोळे मिटून वाचता येत आहे… रंग समजतो आहे!”

“अशा वेळी डोळे बांधल्यावर मी पाहिलं, तर प्रत्यक्षात बोटाच्या स्पर्शाने काही कळत नव्हतं! पण डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फट तयार झाली होती. डोळे किलकिले करून त्या फटीतून आम्ही पाहत होतो. आम्ही योग्य उत्तर दिले की शाबासकी मिळायची, ब्रेन अ‍ॅक्टिव्हेट झालाय असे म्हणायचे आणि आमचे कौतुक होत होते. आम्ही त्यांना फसवत होतो; आणि स्वतःलाही! ते फसवत आहेत तुम्हाला!”

“खालच्या बाजूची फट बंद करून डोळे बांधले किंवा वस्तू खालच्या बाजूला येऊ दिली नाही, तर काहीही ओळखता येत नाही. ही केवळ एक हातचलाखी आहे.”

वीराच्या प्रभावी आणि दमदार भाषणापुढे सगळी सभा अवाक् झाली. त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली. कुजबूज वाढली. गोंगाट सुरू झाला. संयोजकांची घालमेल सुरू होतीच.

तेव्हा प्रिन्सिपल स्वतः उभे राहिले. पुन्हा सभा शांत झाली. कानात प्राण आणून ऐकू लागली. “मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनमध्ये काही सत्य नाही,” त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ” वीरा माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन ही केवळ हातचलाखी आहे! त्याने काही बुद्धी वगैरे वाढत नाही. हे आपण दाखवून देऊ!’ असे वीराने सांगितले म्हणून बिंग फोडण्यासाठी मी तिला या वर्गात प्रवेश मिळवून दिला. तिने आपल्या सर्वांची होणारी फसवणूक थांबवली आहे.”

प्रिन्सिपॉलच्या वक्तव्यानंतर एकच प्रतिक्रिया आली, “वीरा द विनर!”

आणि सगळे विद्यार्थी घोष करू लागले, “वीरा द विनर! वीरा द विनर!!”

– अनिल चव्हाण, कोल्हापूर संपर्क : ९७६४१४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]