सायकलींचे आगळे-वेगळे ‘विश्व’

प्रभाकर नानावटी - 9503334895

गरिबातील गरीब देशापासून अतिश्रीमंत देशापर्यंत सायकली वापरल्या जातात. पूर्वी बहुतेक शहरांत व निमशहरांत सायकलविक्रीची दुकानं असायची. गल्लीबोळात सायकलींची दुरुस्ती करणारे सायकलचे ‘दवाखाने’ असायचे. त्यासमोर सायकल आडवी टाकून पंक्चर काढण्याचे दृश्य शहरातील मुलंमुलींच्या कुतुहलाचा व टाइमपासचा विषय होता. स्वतःची सायकल नसणार्‍यांना दर ताशी/दिवशी नाममात्र भाड्याने सायकली घेण्याची सोय असायची. कदाचित बहुतेक जणांनी भाड्याच्या सायकली घेऊनच सायकल चालविणे शिकले असेल. पोहणे व सायकल चालविणे या गोष्टी शिकल्याच पाहिजेत, असा दंडक असल्याप्रमाणे बालपणी या गोष्टी शिकविल्या जात होत्या. मात्र सगळ्यांच्या आवडत्या या वाहनाला कधीच ओहोटी लागणार नाही, असेच त्या काळी वाटत होते.

आपल्यातील बहुतेकांना सायकल चालवायला शिकताना दोन चाकीच्या या वाहनावर पेडलिंग करत-करत कसे बसायचे, बसून बॅलन्स कसा साधायचा, कुणीही मागून न ढकलता पेडलिंग करत हवेत तरंगल्यासारखे कसे जायचे, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणींना डबल सीट घेऊन या रोमांचकारी अनुभवात कसे सामील करून घ्यायचे, न धडपडता कसे उतरायचे इ. इ. गोष्टींची नक्कीच मजा आली असेल. हा रोमांचकारी अनुभव फक्त तुम्हालाच नव्हे, तर जगभरातील बहुतेकांना गेली शंभरेक वर्षे तरी आला असेल. मुलांच्यापेक्षा मुलींचा अनुभव नक्कीच वेगळा असेल. घरात ‘हे करू नको, ते करू नको,’ ‘मान वर करून बोलू नको’, ‘सातच्या आत घरात’ अशा चित्र-विचित्र अटी-नियमांच्या जोखडातून मुक्त होत आपण सायकल चालवू शकतो, सायकलीवर बसून मुक्त स्वातंत्र्य भोगू शकतो, हा अंगावर शहारे आणणारा अनुभव घेतलेल्या मुलींसाठी सायकल ही एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठीचे फक्त एक साधन न राहता वेगळेच काहीतरी आहे, याची जाणीव झाली असेल.

गरिबातील गरीब देशापासून अतिश्रीमंत देशापर्यंत सायकली वापरल्या जातात. बहुतेक शहरांत व निमशहरांत सायकलविक्रीची दुकानं असायची. गल्ली-बोळात सायकलींची दुरुस्ती करणारे सायकलचे ‘दवाखाने’ असायचे. त्यासमोर सायकल आडवी टाकून पंक्चर काढण्याचे दृश्य शहरातील मुलं-मुलींच्या कुतुहलाचा व टाइमपासचा विषय होता. स्वतःची सायकल नसणार्‍यांना दर ताशी/दिवशी नाममात्र भाड्याने सायकली घेण्याची सोय असायची. कदाचित बहुतेक जणांनी भाड्याच्या सायकली घेऊनच सायकल चालविणे शिकले असेल. पोहणे व सायकल चालविणे या गोष्टी शिकल्याच पाहिजेत, असा दंडक असल्याप्रमाणे बालपणी या गोष्टी शिकविल्या जात होत्या. मात्र सगळ्यांच्या आवडत्या या वाहनाला कधीच ओहोटी लागणार नाही, असेच त्या काळी वाटत होते.

सायकलचा शोध

आता आपण वापरत असलेल्या सायकलीचा इतिहाससुद्धा मजेशीर आहे. हाडं खिळखिळे करणारे ‘बोनशेकर्स’ (boneshakers) आणि एक लहान व दुसरे मोठे चाक असलेले ‘पेनी-फार्दिंग’ सायकली एके काळी प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. सायकलींना केव्हाही आडवे पाडून हाडं खिळखिळे करणारे वाहन (बोनशेकर्स), असे म्हटले तरी त्या काळीसुद्धा सायकली भविष्यासाठीचे वाहन म्हणून मिरवत होत्या.

1810 च्या सुमारास इंडोनेशियातील माउंट तंबोरा येथील ज्वालामुखी गंधकाची धूर ओकत होता. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, युरोप खंडातील पिकं जळून खाक झाली. दुष्काळी परिस्थितीत अन्न-पाण्याविना घोडे मरू लागले. सर्व जनजीवन ठप्प झाले. कारण त्या काळी घोडेच वाहतुकीचे प्रमुख साधन होते. जर्मनी येथील कार्ल फॉन ड्राइसला घोड्याऐवजी घास-पाणी यांची अपेक्षा न करणार्‍या दुसर्‍या कुठल्या तरी साधनाचे स्वप्न दिसू लागले. त्याच्याच या कल्पनाविलासातून सायकलचा जन्म झाला. 1817 च्या सुमारास कार्ल फॉन ड्राइसने तयार केलेला घोड्याच्या आकारात असलेले हे ओबड-धोबड स्वरुपातील सायकलीचे (dandy horse) प्रारूप. आताच्या सायकलीत असल्याप्रमाणे पेडल्स, चेन-स्प्रॉकेट, ब्रेक यांसारख्या गोष्टी नव्हत्या. या दोन-चाकी ‘डँडी हॉर्स’च्या सांगाड्याला पायाने सरकवत-सरकवत पुढे नेले जात होते. जरी हे अल्पजीवी असले, तरी त्या काळच्या युरोपमधील संशोधक-उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्यातून प्रेरणा मिळाली. अनेक नवे उद्योजक त्या ‘डँडी हॉर्स’मध्येच सुधारणा करत त्याला आधुनिकतेचे साज चढवू लागले. 1860 च्या सुमारास या ‘डँडी हॉर्स’ला बॉल-बेअरिंग्स, स्पोक्स असलेली रिम व रिमभोवती पोकळ नसलेले भरीव रबराचे चाक, तरफाचा वापर करून गीअर बदलण्याची यंत्रणा अशा अनेक सुधारणा करण्यात आल्या. आशिया व आफ्रिका खंडातील देशांच्या सायकलींना मागच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी कॅरिअरची सुविधा देण्यात आली. भारतीय महिलांच्यासाठी खास ‘लेडीज’ सायकली बनविण्यात आल्या. काही काळानंतर खेळाडूंसाठी स्पोर्टस् सायकलींची भर पडली.

21 व्या शतकाच्या अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान युगातसुद्धा संगणक व कार्सच्यापेक्षा जास्त पटीने सायकलींचे उत्पादन होत आहे. प्रदूषणाची होत असलेली वाढ व आकाशाला भिडत असलेल्या इंधनाच्या किमतीमुळे सायकल हे यानंतरच्या जगाचे वाहतुकीचे एकमेव पर्यायी साधन ठरले जाणार आहे. त्याची लवचिकता हाच त्याचा गुणविशेष ठरत आहे.

सायकलचे डिझाईन

मुळात सायकलचे डिझाईन फारच सोपे व सुटसुटीत आहे आणि त्याची जोडणीसुद्धा तितकीशी किचकट नाही. सायकलीत काही मोजकेच सुटे भाग असल्यामुळे तिची जोडणी एखादा अर्धप्रशिक्षित कामगारही सहजपणे करू शकतो. सर्व सुटे भाग एकाच शेडमध्ये बनवून जोडणी करण्याचे कारण नाही. त्यामुळे सायकलीचे महत्त्वाचे सुटे भागच मोठ-मोठ्या काऱखान्यात तयार केले जातात व जोडणी नंतर केली जाते. कमीत कमी मजुरीवर काम करणारे कामगार ज्या देशात मिळतात, तेथेच 80-90 टक्के सुटे भाग तयार होतात.

सायकलीचे सुटे भाग बनविण्यासाठी स्टील, अ‍ॅल्युमिनियम व अलिकडे कार्बन फायबर अशा गोष्टी वापरून भरपूर दणकट, वजनात कमी व भरपूर दिवस टिकणार्‍या सायकलींचे उत्पादन करण्याकडे कल वाढू लागला. स्टील, अ‍ॅल्युमिनिम वा कार्बन फायबरपासून स्पेअर पार्ट बनविणे हे युरोप-अमेरिकेसारख्या श्रीमंत राष्ट्रांना अतिखर्चिक (वा तंत्रज्ञानाच्या खालच्या पायरीवरचे) वाटत असल्यामुळे सायकलीच्या सुट्या भागांचे उत्पादन करणारे तेथील कारखाने केव्हाच बंद पडले आहेत. आता सायकलींचे बहुतेक पार्ट तैवान, चीन, भारत या देशात तयार होतात व हे सुटे भाग युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील व अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांना पाठवून त्या-त्या देशात जोडणी करून विकले जातात. खर्‍या अर्थाने जागतिकीकरणाचे प्रारूप सायकलीत मिळू शकते. रिम तैवान/भारतातून, स्टील अलॉय/ अ‍ॅल्युमिनियम/ कार्बन फायबर चीन-जपानमधून, हब-गीअर अमेरिकेतून, ट्यूब-टायर आणखी एखाद्या देशातून असे करत-करत सायकलीचे विक्री व्यवस्थापन होत आहे. अशा प्रकारे उत्पादनाच्या व्यवस्थापनामुळे कळत न कळत सायकलींच्या पार्टचे प्रमाणिकरण होत असून ग्राहकाला याचा फार मोठा फायदा होत आहे. मोठ-मोठ्या कॉर्पोरेट्सची मक्तेदारी मोडून स्थानिक उत्पादकांचा सहभाग वाढविणे यातून शक्य होत आहे.

आधुनिक सायकली

परंतु अलिकडील काही वर्षांत सायकलींचा वापर पूर्वीसारखा न राहता श्रीमंतांच्या व्यायामाचे व/वा छंदपूर्तीचे साधन म्हणून होत आहे. त्याचप्रमाणे सायकलीच्या वेगावर जास्त लक्ष दिले जात आहे. कमी वजन हा महत्त्वाचा घटक असून सायकलीच्या वायुगतिकीला जास्त महत्त्व प्राप्त होत आहे. जागतिक स्तरावर सायकलींचे मानक ठरविणार्‍या संस्थेने तिचे वजन 6.8 किलो ठरविल्यामुळे बहुतेक उत्पादक हे उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. या कमी वजनामुळे जास्तीत जास्त वेग मिळू शकेल, याची खात्री वाटू लागली आहे. त्याचबरोबर खडकाळ व कच्च्या रस्त्यावरून वेगाने धावू शकणार्‍या ट्यूब-टायरसाठीसुद्धा शोध चालू आहे. नवीन प्रकारच्या आताच्या या दणकट सायकली जगभरातील कुठल्याही प्रदेशात हजारो किलोमीटर्सचे अंतर एकही पार्ट न बदलता सहजपणे पार करू शकतील, असा उत्पादकांचा दावा आहे.

सायकलिंगची आवड

पर्यावरणरक्षण व आधुनिक समाजाच्या गरजा यात मोठी दरी आहे. या गरजा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या प्रदूषणात भर घालत आहेत. त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे व त्यातून होत असलेला हवामानबदल मानवी जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत आहे. ही दरी मिटविण्याचा एक मार्ग सायकलींच्या पुनरुज्जीवनात आहे. समाजात सायकलिंगची आवड निर्माण झाल्यास काही प्रमाणात प्रदूषण कमी करण्यास शक्य होईल, असे तज्ज्ञांना वाटत आहे. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी 5-10 अश्वशक्तीच्या गाड्या वापरून वायू व ध्वनी प्रदूषणात भर घालण्यापेक्षा सायकलींचा वापर करणे ईष्ट ठरेल. सायकलींच्या वापरासाठी पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची गरज नाही. त्यामुळे प्रदूषण शून्य; परंतु जनसामान्यांत पर्यावरणरक्षणाची मानसिकता विकसित न झाल्यामुळे गेल्या 30-40 वर्षांपासून सायकली हद्दपार होत आहेत. एके काळचा घराघरांतील हा सोबती आता सायकलिंगचे छंद जपणारा म्हणून वा वजन कमी-जास्त करण्याचे व्यायामाचे साधन एवढ्यापुरताच सीमित राहिला आहे.

सायकलींचे उत्पादन वा तिची उपलब्धता या गोष्टी फार महत्त्वाच्या नसून जनसामान्यांत पुन्हा एकदा सायकलींची आवड निर्माण करण्याची गरज आहे. ‘सायकल संस्कृती’ रुजविण्याची गरज आहे. शहरी वस्तीतील जनसामान्यांमध्ये पर्यावरणरक्षणासाठी सायकलिंगबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी अनुकुलता उपलब्ध करून द्यावी लागणार आहे व हे काम फक्त जागृत नागरिकच करू शकतील.

काही तज्ज्ञांच्या मते, आताच्या सायकलीच्या डिझाइनमध्ये बदल केल्यास शहरातल्या शहरात सायकलींचा वापर वाढविणे शक्य होईल. सायकलीचे डिझाइन शंभर वर्षांपूर्वीचे असून काही क्षुल्लक अपवाद वगळता त्यात फार मोठा बदल झालेला नाही. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ‘लूक’मध्ये फार वेगळी दिसत असली तरी मूळ ढांचा तसाच आहे. काही सायकलींची सीट जास्त उंचावलेली असेल, काहीतील हब-गीअर उच्च प्रतीचे असू शकेल, काहींच्यात ट्यूबलेस टायर्स असतील; परंतु डिझाइनमध्ये फार बदल नाहीत.

लोकप्रतिनिधींकडून उत्तेजन

जगभरातील काही शहरांत यासंबंधीचे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यात त्या-त्या शहरातील लोकप्रतिनिधींचा वाटा जास्त आहे. सायकलिंगची आवड असणारे लोकप्रतिनिधी जीवाचे रान करून ‘सायकल संस्कृती’ला जिवंत ठेवण्याचे प्रयत्नही करत आहेत. जगभरातील सायकलींचे छंदिष्ट यासाठी पुढाकार घेत आहेत. काही नगरपालिका सायकलीसाठी स्वतंत्र ट्रॅकची सोय करत आहेत. काही शहरांत नगरपालिका नागरिकांना सायकल वापरण्यास उत्तेजन देण्यासाठी एखाद्या कंत्राटदाराला नेमून शहरभर सायकलींची सेवा देत आहेत. सायकलिंगची आवड निर्माण करण्यासाठी सायकल विकत घेणे, पार्किंगसाठी जागा शोधणे, तिची देखभाल करणे वा चोरीस जाऊ नये, यासाठी उपाय शोधणे या गोष्टींना फाटा देत मोबाइलवर पैसे भरून व ‘क्यूआर कोड’च्या सहाय्याने ‘लॉक-अनलॉक’ची सुविधा व कुठेही सायकली सोडून आपापल्या कामासाठी जाण्यास योग्य अशी यंत्रणा काही नगरपालिका राबवित आहेत.

लोकांचा सायकलीचा वापर शासनांच्या ध्येय-धोरणावर पूर्णपणे अवलंबून आहे, असे म्हणता येईल. सायकलींचा वापर सार्वजनिक रस्ते व इतर भागांत होत असल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक निर्णयावर विसंबून राहावे लागते. लोकांच्या दबावाविना सायकलींच्या रस्त्यावरील वावरावर मर्यादा येऊ शकतात. सायकली चालविण्यासाठी सुरक्षित रस्ते हवेत. जेथे कार्स/बसेससारखी वेगवान वाहने धावत असतात, त्या रस्त्यांच्या कडेकडेनेसुद्धा सायकली चालविणे असुरक्षित ठरते. कुठल्याही क्षणी अपघात होऊन सायकलस्वार मरण्याची शक्यता असते. खड्डे, खाच-खळगे असलेल्या वा निसरड्या रस्त्यावर सायकल चालविणे कसरतीच्या खेळासारखे वाटेल व छोट्यातला छोटा अपघातसुद्धा सायकलीच्या वापराला परावृत्त करू शकेल. कार्स व मोटाराइज्ड बाइकच्या गर्दीत सायकल चालविणे जिवावर बेतू शकेल. 21 व्या शतकातील रस्ते व रस्त्यांची देखभाल ‘सायकल-फ्रेंडली’ नाही, असे म्हणावेसे वाटते. त्यामुळे सायकलींना उत्तेजन देण्यासाठी नगरपालिका व नगरपरिषदांचा सकारात्मक दृष्टिकोनच हवा. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास स्थानिक प्रशासन सायकली वापरण्यास अनुकूल नीति-नियम करू शकेल. खरे पाहता, सार्वजनिक वाहनव्यवस्थेच्या ठिकाणापासून घरापर्यंत सायकली वापरण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे सहज शक्य आहे. तसे केल्यास जनसामान्यसुद्धा काही प्रमाणात सायकली वापरतील.

बायसिकल मेयर

नेदरलँड्स येथील बीवायसीएस (BYCS) ही स्वयंसेवी संस्था निरनिराळ्या शहरातील सायकलिंगचा छंद असलेल्या गटांशी संपर्क साधून सायकलींचा प्रचार व प्रसार करण्याचा विडा उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शहरातील या सायकलिस्ट्सच्या म्होरक्यांना ‘बायसिकल मेयर’ म्हणून निवडले जात आहे. त्यांचा उद्देश ‘50/30.’ म्हणजे 2030 पर्यंत त्या-त्या शहरातील लोकांनी किमान 50 टक्के तरी त्यांच्या मोटराईज्ड वाहनांचा वापर कमी करणे. मुंबईकरांसाठी फिरोजा सुरेश यांची पहिले ‘बायसिकल मेयर’ म्हणून निवड झाली आहे. तिला सायकलिंगचे अक्षरशः वेड आहे. लहानपणापासून तिने हा छंद जोपासला आहे. कॉलेजमध्ये शिकताना कॉलेजच्या आवारात सायकलीचे स्टँड नसल्यामुळे संघर्ष करून स्टँडची सुविधा उपलब्ध करून घेतली. 50 टक्के मुंबईकरांनी कामासाठी सायकलीवरून जावे, हा तिचा आग्रह आहे. तिला तर मुंबई सायकलींची राजधानी व्हावे, असे वाटते. अशाच प्रकारचे अनेक गट पुणे, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली येथेही कार्यरत आहेत.

फोल्डेबल सायकल

तरुणाईत सायकलिंगची आवड निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारच्या कल्पना लढविल्या जात आहेत. 15-20 किलोमीटर्सची सायकल सहल, शहरातील रस्त्यावरील स्वयंचलित वाहनांची गर्दी कमी असलेल्या वेळी सायकलींच्या मॅराथॉन/ट्रायथलॉन अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. शहराबाहेरच्या महामार्गावर सायकल शर्यतींचे आयोजन केले जात आहे. तरीसुद्धा हे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे सायकलिंगला आपल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

एके काळी शहरामध्ये सायकल पार्किंगसाठी भरपूर जागा होती. परंतु गेल्या 50-60 वर्षांत जमिनींच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे गोरगरिबांच्या या वाहनाच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. काही उद्योजक त्यासाठी फोल्डेबल सायकलीचे उत्पादन करून पार्किंगचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपमधील ‘ब्रॉम्पटन’ कंपनी ‘स्वीस नाइफ’प्रमाणे फोल्डेबल सायकलींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. 20-25 सेकंदांत घडी उघडून सायकल वापरता येते. अर्ध्या मिनिटांत पार्किंग स्प़ॉटमध्ये सायकल लावता येते. कारमध्ये, घराच्या कोपर्‍यात वा ऑफिसच्या टेबलाखाली ठेवता येण्याजोग्य या पोर्टेबल सायकली असून त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

बाइक

आधुनिक समाजाला वेगाचे अक्षरशः वेड लागलेले आहे व त्याला फार महत्त्वही दिले जात आहे. पूर्वीची संथ गती बिनकामाची ठरत आहे. वाहतुकीच्या साधनांत जास्तीत जास्त वेग असणे व या वेगाला साजेसे बुलेट ट्रेन्स, एक्सप्रेस हायवे, 6-8 पदरी रस्ते, शहरांतर्गत एकेरी मार्ग, फ्लाय ओव्हर्स, भुयारी मार्ग तयार करणे व त्यांची देखभाल करणे, एवढेच काम जगभरातील कल्याणकारी राज्यसंस्था करत आहेत व त्यासाठी पैसे मोजण्याला समाजाची पूर्ण तयारी असते. त्यामुळे या ‘रॅट रेस’मध्ये सायकलींचे उत्पादकांनीही उडी न घेतल्यास नवल वाटेल. त्यासाठी ‘ई-बाइक’ची संकल्पना राबविली जात आहे.

‘ई-बाइक’ इंधनावरून चालणार्‍या व किक् स्टार्ट वा स्टार्टिंगसाठी बटन दाबल्यावर गती घेणार्‍या स्कूटर-मोटारसायकल्ससारख्या दुचाकीपेक्षा वेगळी असून सायकलिंगच्या आनंदाबरोबरच काही प्रमाणात मानवी श्रमाची बचत करत वेगाची भूक पण मिटवणारी आहे, असा दावा उत्पादकांकडून केला जात आहे. जर्मनीत याचे यशस्वी प्रयोग झाले असून या ‘ई-बाइक’ लोकप्रिय होत आहेत. सायकलीला बॅटरीच्या ऊर्जेवर चालणारी मोटार व दीर्घकाळ ऊर्जा पुरविणारी बॅटरी यांची योग्य प्रकारे सांगड घालून ई-सायकल तयार केली जाते.

‘ई-बाइक’ची संकल्पना तशी फार जुनी आहे. 1895 मध्ये या सायकलचे पेटंट घेण्यात आले होते. त्या सुमारास काही उद्योजकांनी सायकलीच्या मागच्या चाकाजवळ डीसी मोटर जोडली व त्यासाठी 100 अ‍ॅम्पियर – 10 व्होल्ट बॅटरीची सोय केली. परंतु बोजड मोटर व त्यासाठीची बॅटरी यांचे वजन, त्याची देखभाल, वारंवार करावी लागणारी दुरुस्ती इत्यादीमुळे अशा प्रकारच्या सायकलींची विक्री अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. नंतरच्या काळात मोटर्स व बॅटरीत फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या. मोटर्सचे गात्र आकुंचित झाले. बॅटरींचे आयुष्य वाढले. देखभालीचा खर्च कमी झाला. याच गोष्टींचा वापर नंतरच्या काळात करून ‘ई-बाइक’चे पुनरुज्जीवन होत गेले. 1990 मध्ये ‘टॉर्क सेन्सार्स’ व ‘पॉवर कंट्रोल’ वापरून ‘ई-बाइक’ला आधुनिक स्वरूप दिले. निकेल-कॅडिमयमची बॅटरी वापरल्यामुळे सायकलीचे वजन कमी करणे शक्य झाले. जपानची ‘यामाहा’ कंपनी 1995 ते 2004 पर्यंत अशा प्रकारच्या ‘ई-बाइक’ – तिला ‘झाइक’ असेही म्हटले जाते, उत्पादन करून विक्री करू लागली, तरी या प्रकारच्या सायकलींना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 2007 नंतर मात्र चीन येथील प्रमुख शहरांच्या रस्त्यावर या प्रकारच्या ‘ई-बाइक’ दिसू लागल्या. याची बॅटरी चार्ज करण्यासाठी 8 तास लागत होते. एकदा चार्ज केल्यानंतर ताशी 20 किलोमीटर वेगाने 40-50 किलोमीटर्स अंतर पार करू शकते. पेडलिंग करून सायकलीला एकदा वेग दिल्यानंतर विनाश्रम ती सायकल चालते. नंतरच्या ‘हायब्रीड ई-बाइक’ मध्ये मानवी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत परिवर्तन करून व जास्त ऊर्जा बॅटरीद्वारे घेण्याची सोय केली गेली. अशा प्रकारे स्नायुऊर्जा व बॅटरीची ऊर्जा यांचा संयोग करून सायकली विकसित करण्यात येत आहेत.

यामुळे आता जगभरात खालील प्रकारच्या सायकली रस्त्यावर आहेत ः

केवळ स्नायुऊर्जेवर चालणार्‍या सायकली

केवळ विद्युत ऊर्जेवर चालणार्‍या सायकली

स्नायू ऊर्जा व विद्युत ऊर्जा या दोन्हींचा वापर करून चालणार्‍या हायब्रीड सायकली इंधनावर चालणार्‍या 50-80 सी. सी. मोपेड्समध्येसुद्धा पेडलिंग वापरत असले तरी त्या प्रदूषणमुक्त नाहीत. ‘हायब्रीड ई-बाइक’मध्ये गरजेनुसार विद्युत ऊर्जा वापरली जाते व या प्रकारच्या बाइकमध्ये वेग हा गौण समजला जातो. पारंपरिक सायकली व ‘हायब्रीड ई-बाइक’ची तुलना साधा मोबाइल व स्मार्ट फोनशी करता येईल. कदाचित अशा प्रकारच्या ‘ई-बाइक’च पुढील काळातील शहरांतर्गत वाहन ठरण्याची शक्यता आहे. या ‘ई-बाइक’ ताशी 45 किलोमीटर धावण्याची शक्यता असल्यामुळे इंधनांचा वापर करून धावणार्‍या दुचाकी-चारचाकी गाड्यांचा वापर कमी-कमी होत जाणार आहे. तरुणाई अशा गाड्या वापरण्यास उत्सुक आहे. जर्मनी व नेदरलँड्समध्ये या बाइक चांगलेच बस्तान बसवत आहेत.

सायकलिंगचा धोका

आजच्या प्रदूषणदूषित जगात मानवी स्नायुबलावर धावणार्‍या सायकलींसारखा दुसरा योग्य पर्याय सापडणार नाही, तरीसुद्धा पर्यावरणस्नेही असलेल्या या वाहनाचा वापर फार कमी देशात होत आहे. अति असुरक्षित व धोकादायक वाहन म्हणून सायकलीवर न पुसणारा शिक्का बसलेला आहे. थंडी-ऊन-पावसाच्या काळात तिला घरात ठेवून दुसरा पर्याय शोधावा लागतो. ब्रिटन, अमेरिका व आस्ट्रेलिया या देशात फक्त 1 टक्के लोकच तिचा नियमित वापर करतात. यालाही अपवाद आहेतच. नेदरलँड्स येथे तिचा 27 टक्के वापर होतो. कोपनहेगन या डेन्मार्कच्या राजधानीच्या शहरात 50 टक्के लोक नियमितपणे सायकलींचा वापर करतात. सायकलींचा वापर कमी होतो, म्हणून मृत्युदर काही कमी होत नाही. अमेरिकेत दर 100 मिलियन किलोमीटर सायकलिंगमागे 5.8 मृत्युदर आहे. ब्रिटनमध्ये 3.6; परंतु सायकलीचा छंद जोपासणार्‍या जर्मनीत हाच मृत्युदर फक्त 1.7 आहे व डेन्मार्कमध्ये 1.5 आहे. या आकडेवारीवरून जास्त प्रमाणात सायकलींचा वापर होत असल्यास मृत्युदर कमी होऊ शकतो व सायकलिंग जास्त सुरक्षित असू शकते, असा निष्कर्ष काढता येईल.

वेगमर्यादा

मुळात वेगाच्या बाबतीत सायकलिंग मोटरिंगशी स्पर्धा करू शकत नाही, हे लक्षात ठेवावे लागेल; शिवाय गेल्या शंभर वर्षांत शहर नियोजन व/वा शहर सुधारणा मोटराइज्ड वाहनांना डोळ्यांपुढे ठेवून केली आहे. शहरातील रस्ते, पार्किंग व्यवस्था, गल्ली-बोळातील घरांपर्यंत जाणारे रस्ते, पदपथ, चौकांची रचना इत्यादीत कार्सच्या अनुकुलतेकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे पायी चालणार्‍यांनासुद्धा घाबरत, अडखळत चालावे लागते, रस्ते क्रॉस करावे लागतात. कित्येक शहरांत सायकलींसाठी स्वतंत्र रस्ते नाहीत, जेथे आहेत तेथे बिनधास्तपणे दुचाकी पार्किंगसाठी वापरले जात आहेत. पदपथावर चालायचे असल्यास झाडं, विद्युत वितरण यंत्रणा (व पथारीवाले) हे अडथळे पार करत जावे लागते.

सायकलिंग करत असताना वेगाने जाणार्‍या कार्स/मोबाइककडे संपूर्ण लक्ष ठेवूनच पुढे जावे लागते. चुकून जरी थोडेसे दुर्लक्ष झाल्यास अपघाताला निमंत्रणच! कार्सचे तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी कार चालविणारी माणसंच असल्यामुळे थोडीशी चूक झाली तरी जिवावर बेतू शकते. बाइकस्वार तर कुठल्या तरी युद्धाला तातडीने पोचावे, यासाठी वाटेतील सर्व अडथळ्यांवर हल्ला चढवत, वाकडे-तिकडे, मिळेल त्या जागेत बाइक घुसवत जात असतात. त्यामुळे सायकलस्वारांना यांच्यापासून चार हात दूर असावे, असे वाटत असेल. कार्समधील व्यक्ती मोबाइलवर किंवा कारमधील इतर प्रवाशांशी बोलत असल्यास शेजारून धावत असलेल्या सायकलीला धक्का लागण्याची शक्यता जास्त. लंडनसारख्या शहराप्रमाणे सायकलीसाठीचे स्वतंत्र रस्ते अरुंद असल्यामुळे अपघात होण्याचा संभव जास्त.

या सर्व अपघाती अवस्थेतून जात असलेल्या सायकलींना पुनरुज्जीवित करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रदूषणातील वाढ व हवामानबदल यांच्यात अन्योन्य संबंध आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. शहरांतर्गत प्रदूषण पातळी सर्व दैनंदिन जनजीवनावर विपरीत परिणाम करत आहे. हे सर्व टाळण्यासाठी सायकल वाहन म्हणून उपयोगात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. हे एकदा लक्षात घेतल्यास तातडीचे काही उपाय नक्कीच सुचतील. उदाहरणार्थ, शहरी वस्तीतील कुठल्याही खाजगी वाहनाची वेगमर्यादा कमाल ताशी 25-30 किलोमीटर इतकी नियंत्रित केल्यास प्रदूषण कमी होईल, वाहतुकीची कोंडी टाळता येईल व सायकलिंग सुरक्षित होईल. एकदा हे वास्तव समजून घेतल्यास काही अपवाद वगळता सायकलीचे फायदे लोकांच्या अंगवळणी पडतील व पुन्हा एकदा सायकलींना चांगले दिवस येतील.

सायकलीसाठी प्रगत तंत्रज्ञान

डच वा डेनिश नागरिकांच्या मनातील कल्पनाविश्वाचे प्रारूप सगळीकडे राबविणे शक्य आहे का? प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या, घातक धूर ओकणार्‍या चारचाकी वाहनांऐवजी सर्व देशात सायकली वापरल्या जातील का? विशेषकरून पावसाळ्यातील निसरड्या रस्त्यावरून सायकल प्रवास सुरक्षित राहील का?

प्रगत तंत्रज्ञान सायकलिंगला ‘स्मार्ट’ करू शकेल का?

तीन-चार-पाच रस्ते मिळत असलेल्या चौकातून सायकलीवरून जाताना सायकलस्वारांची भरपूर तारांबळ उडते. हे चौकच सायकलिंगला सर्वांत मोठे अडथळे ठरतात. कार्सचालकांना चौक ओलांडण्याची घाई. मोबाइकस्वारांना आपल्या बाइकच्या इंजिनाच्या प्रचंड क्षमतेचे/त्यांच्या ड्रायव्हिंग कौशल्याचे प्रदर्शन करण्याची घाई. त्यामुळे सायकलस्वार मेटाकुटीला येतो व भांबावलेल्या अवस्थेत सायकल चालविण्याचा प्रयत्न करतो. यातून मार्ग काढण्याचे ठरविल्यास चौकातील सिग्नल यंत्रणेत सुधारणा करावी लागेल. पादचारी व सायकलींना चौक ओलांडताना गाड्यांचा अडथळा येऊ नये, यासाठी हिरव्या दिव्यातील काही वेळ फक्त यांच्यासाठी ठेवणे वा सायकलींसाठी राखीव ठेवलेल्या रस्त्यावर वेगळे हिरवे सिग्नल ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लाल सिग्नलच्या वेळी सायकलस्वारांना पाय टेकण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे हिरवा सिग्नल लागल्यानंतर तत्परतेने ते पुढे जाऊ शकतील. जास्त चढ असलेल्या रस्त्यावरून जाताना सायकलस्वारांसाठी मदत करणारी Trampe bicycle lift सारखी यंत्रणा असल्यास सायकलस्वाराचे श्रम वाचतील. ही यंत्रणा असल्यास सायकलस्वार संतुलन सांभाळत एकच पेडल वापरत पुढे-पुढे जाऊ शकतो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सायकलस्वारांना कारचालकांनी प्रयत्नपूर्वकपणे अवकाश देण्याची आवश्यकता आहे. पार्किंग स्पेस वा रस्त्यावर सायकलींना योग्य प्रमाणात स्पेस दिल्यास सायकलिंग करण्यास उत्तेजन मिळेल. ‘सायकल प्रथम’ हे धोरण राबविल्यास सायकल चालविण्यात आत्मविश्वास वाढेल. पालकांना सायकलीवरून जाणार्‍या आपली मुलं-मुली धडधाकट परत येतील, याची खात्री वाटेल. पार्किंग स्पेसमध्ये ‘सायकल प्रथम’ हे धोरण राबविताना कार पार्किंगसाठी कारचालकांना नक्कीच भुर्दंड बसेल. त्यापायी तरी कार्सच्या बेधुंद वापरण्याला आळा बसू शकेल.

आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे सायकलिंगला पोचविणे सहज शक्य आहे. मोबाइल अ‍ॅप्सद्वारे सायकलिंगच्या वेळी एकमेकांच्या संपर्कात राहून सायकलिंग करता येईल. जवळचा रस्ता शोधण्यास मदत होईल. गर्दीचे रस्ते टाळता येईल. अडचणीच्या प्रसंगी एकमेकांना मदत करता येईल. सायकलची चोरी होऊ नये, यासाठी पूर्वसूचना देता येईल. रस्त्यावरील खड्ड्यांबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण होईल.

सायकलिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा केवळ मोबाइलपुरता सीमित न ठेवता इतर ठिकाणीसुद्धा पोचवता येणे शक्य आहे. कार्समधील एअरबॅगचे तंत्रज्ञान वापरून सायकलस्वारांच्या हेल्मेटची रचना करणे शक्य आहे. कार्समध्ये कार्सच्या अगदी जवळून जाणार्‍या सायकलींचा वेध घेणारे सेन्सर्स कारमध्ये बसविल्यास संभाव्य अपघात टाळता येईल.

चीन येथील एक विश्वविद्यालय कारमधील डॅशबोर्डसारखे सायकलीसाठीच्या डॅशबोर्डचे संशोधन करत आहे. सायकलीवर विविध प्रकारचे सेन्सर्स बसवून पेडल्सचा वेग, त्याची वारंवारता, सायकलस्वाराच्या हृदयाचे ठोके इत्यादीबद्दलची माहिती प्रदर्शित करण्याची सुविधा हँडलच्या जवळपास बसविलेल्या डॅशबोर्डवर असेल. GPS जोडलेले असल्यामुळे कार्समधील डॅशबोर्डप्रमाणे सायकलीच्या मार्गक्रमणाची माहिती त्यात असेल. स्मार्ट फोनशी जोडल्यास आणखी अनेक प्रकारची माहिती त्यात प्रदर्शित करता येईल. अल्ट्रासॉनिक सेन्सर्स बसविलेले असल्यामुळे वाटेवरील खड्ड्यांची माहिती मिळेल व त्याप्रमाणे सायकलीची गती व दिशा बदलता येईल. अशा प्रकारच्या स्मार्ट सायकली एके दिवशी जवळपासच्या कार्स/मोबाइकशी परस्पर संवाद साधून अपघातांचे प्रमाण शून्यावर आणू शकतील. ही स्मार्ट सायकल अत्यंत सुरक्षित व सायकलिंगचे आनंद देणारी असेल.

पुढील काळात अशा प्रकारे सर्व सोयींनीयुक्त स्मार्ट ‘ई-बाइक’ रस्त्यावर आणणे सहज शक्य आहे. हे सर्व करूनसुद्धा कार्स/मोबाइक वाहक सायकलीवर स्वार करण्यास तयार होतील का, हा प्रश्न अनुत्तरितच राहील. काही तज्ज्ञांच्या मते सुरक्षिततेची हमी असल्यास 10-60 वयोगटातील शहरवासीय शहरांतर्गत 10-15 किलोमीटरच्या प्रवासासाठी नक्कीच सायकली वापरतील; मात्र यासाठी त्यांच्या सायकलीविषयीच्या व पर्यावरण रक्षणाविषयीच्या मानसिकतेत फार मोठा बदल झाल्यास हे शक्य होईल.

सायकल मेयर फिरोजा सुरेशच्या स्वप्नातील मुंबई सायकलींच्या राजधानीऐवजी ‘ई-बाइक’ची राजधानी होण्याची शक्यता जास्त असून ते दिवस फार दूर नाहीत.

प्रभाकर नानावटी संपर्क : 95033 34895


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]