विश्वजित चौधरी -

कोणत्याही व्यक्तीला जातीच्या नावाने छळणे, तिला जातपंचायत बसवून वाळीत टाकणे, विविध कारणांनुसार तिचा मानसिक व शारीरिक छळ करून जातपंचायतींनी तिला त्रास देणे, याकरिता ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2017’अंतर्गत जातपंचायतींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा होऊ शकते. जळगाव शहरात शिक्षण घेत असलेल्या आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगविणार्या मानसी ऊर्फ मुस्कान आनंद बागडे या 19 वर्षीय युवतीला अशाच जातपंचायतीच्या जाचामुळे गळफास घेत आत्महत्या करावी लागल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे 24 जानेवारी रोजी, मंत्रालयात सरकारी अधिकारी असलेले कृष्णा इंद्रेकर यांनी लेखी तक्रार पाठवली. जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष डी. एस. कट्यारे आणि विश्वजित चौधरी यांना ती मिळाली. विश्वजित चौधरी यांनी तक्रारीत 12 वाजता अंत्यसंस्कार होणार, हे वाचताच एमआयडीसी पोलीस स्थानकात फोन करून आत्महत्येविषयी काय दाखल आहे, याची माहिती घेतली. मात्र तेथे मानसीच्या आत्महत्येला 24 तास होत असतानाही काहीही दाखल नव्हते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता 10 मिनिटांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांना तत्काळ संपर्क करून याबाबतची माहिती दिली. त्यांनी लगेच दखल घेत एमआयडीसी पोलिसांना घटनास्थळी रवाना केले. तेथे पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यास कंजरभाट समाजातील नागरिकांनी व पंचांनी विरोध केला. मात्र पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह नेला. तेथे मानसीचे शवविच्छेदन झाले. अंनिसने मानसीला न्याय देण्यासाठीचे उचललेले पहिले पाऊल यशस्वी झाले होते.
दुपारी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली व घडला प्रकार सांगून कारवाईची मागणी केली. त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. दुपारी मानसीच्या अंत्ययात्रेवेळी विश्वजित चौधरी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत मानसीच्या आईचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र त्या पूर्ण बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. मानसीचा रविवारी म्हणजेच 26 जानेवारीला साखरपुडा कोल्हापूर येथील एका प्राध्यापक तरुणाशी होणार होता. तिला 10 हजारांचा शालू हवा होता, तिला खूप शिकायचे होते, तिला मुलगा पसंत होता, ती खूप खूष होती, असे तिच्या आईने सांगितले.
त्याचवेळी डॉ. रोहन यांच्याकडून शवविच्छेदन अहवालाविषयी माहिती मिळाली. मानसीचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला आहे. त्यामुळे बागडे कुटुंबीय आणि कंजरभाट समाजाच्या लोकांनी आत्महत्या लपविल्याचे स्पष्ट दिसून आले. दुसर्या दिवशी संध्याकाळी मानसीच्या आईने बानो आनंद बागडे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, त्यांचा आणि आनंद बागडे यांचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे. त्यातून त्यांना दोन मुली आहेत. तसेच लग्नाच्या तीनच महिन्यांनंतर आनंदचे वडील दिनकर बागडे यांनी लग्नाला नापसंती दाखवीत जातीतल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. त्यामुळे कविता इंद्रेकर या मुलीशी त्यावेळी बानो यांचे पती आनंद यांनी लग्न केले. दुसर्या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत. पती आनंद बागडे हे भडगाव येथे एमएसईबी येथे नोकरीस आहेत. त्यांनी प्रापंचिक वाद घातल्यामुळे तीन महिन्यांपासून दीर विजय बागडे यांच्याकडे दोन्ही मुलींसह बानो राहत आहेत.
सासरे दिनकर बागडे हे नेहमी बानो या दुसर्या समाजाच्या असल्याने त्यांचा व त्यांच्या मुलींचा तिरस्कार करीत असायचे. बानो यांच्या मोठ्या मुलीला – मानसीला – लग्न करायचे होते. त्यासाठी कोल्हापूर येथील एका तरुणाचे स्थळ आले होते. त्यानुसार मानसीचा विवाह ठरला होता. मात्र मानसीचे आजोबा दिनकर बागडे यांनी ‘मानसीचे लग्न होऊ देणार नाही व तुम्हीही तिचे लग्न करू नका,’ म्हणून तगादा लावला होता.
दिनकर बागडे हे समाजात देखील मानसीचे लग्न होऊ देणार नाही, असे सांगायचे. त्याचा धसका घेत मानसीने गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घराच्या तिसर्या मजल्यावर जाऊन ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी घरात मानसीची आई आणि आणखी दोघे होते. त्याचा त्यांना प्रचंड धक्का बसला. मात्र घरच्या मंडळींनी आणि एरियातील नागरिकांनी जातपंचांच्या धाकाखाली तिची आत्महत्या झाल्याचे सर्वांपासून लपविले. ‘मानसी आजारी होती, त्यामुळे तिचे निधन झाले,’ असेच ते सांगत होते. यानंतरचा घटनाक्रम वर नमूद केल्याप्रमाणे घडला. कृष्णा इंद्रेकर यांनी लेखी तक्रार ‘अंनिस’ला दिली आणि तेथून जातपंचांचे भांडे फुटले.
मानसीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी बानो बागडे यांच्या फिर्यादीवरून मानसीचे आजोबा दिनकर बागडे यांना अटक केली. त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र संघर्ष थांबलेला नव्हता. उर्वरित जातपंचांविरुध्द कुठलाही गुन्हा नोंद नव्हता. अखेर मंत्रालयीन पातळीवर राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि कृष्णा चांदगुडे यांनी गृह विभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर प्रशासनाला आदेश आले. त्यानुसार बानो बागडे यांचा पुरवणी जबाब पोलिसांना नोंदविता आला. तेव्हा मला व माझ्या मुलीला जातीत घेतले नसल्याने मानसीचे लग्न होऊ शकत नाही,’ असे सांगून ‘तुम्हाला कंजारभाट समाजातील मुलाशी लग्न करता येणार नाही,’ असे सांगत सावन गागडे, बिरजू नेतलेकर, दीपक माचरे आणि इतर पंचांनी जातीत घेण्यास नकार दिला होता, असे सांगितले आहे. तसेच मानसीच्या मृतदेहावर कंजरभाट समाजाच्या रीतीनुसार अंत्यसंस्कार करायचे असल्यास तिला जातीत घेण्याचा ‘जातगंगा’ कार्यक्रम करावा लागेल म्हणून सांगितले. त्यापोटी 20 हजार रुपये मागितले होते. मात्र तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. मानसीचे वडील आनंद यांच्याकडून पंचमंडळींनी 15 हजार रुपये घेऊन ‘जातगंगा’ दिली, हे देखील पुरवणी जबाबात मांडले.
यानंतर मानसीच्या परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे, यासाठीचा अर्ज पोलीस अधीक्षकांना ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी दिला. मात्र त्यावेळी पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा घेत समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही बंटी नेतलेकर आणि इतरांनी गोंधळ घालत पोलिसांना अडथळा आणला. मानसी प्रकरणात सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. गुरुवारी, 6 फेब्रुवारी रोजी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि ‘जातपंचायत मूठमाती अभियान’ प्रमुख कृष्णा चांदगुडे यांची पत्रकार परिषद झाली. त्याआधी सकाळी मानसीचे काका विजय बागडे यांची कृष्णा चांदगुडे आणि विश्वजित चौधरी यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करत ‘तुमच्या पाठीशी ‘अंनिस’ आहे, तुम्ही काळजी करू नका,’ म्हणून धीर देत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील जातपंच शुक्रवारी दबाव टाकायला येणार आहेत, म्हणून सांगितले. तत्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दुसर्या दिवशी देखील सातारा येथील सोहन नवले, राजेश नवले आणि पुणे येथील मुकेश मिणेकर हे जातपंचायतीतील सदस्य जळगावात आले. मात्र त्यांची बागडे परिवाराच्या घरी जाण्याची हिंमत ‘अंनिस’मुळे झाली नाही. ते संशयित आरोपी जातपंचांच्या घरी जाऊन आले. त्यांचे नाव, फोन नंबर आणि वाहन क्रमांक पोलीस अधिकार्यांना देण्यात आले होते.
पत्रकार परिषदेत अविनाश पाटील, कृष्णा चांदगुडे, विश्वजित चौधरी यांनी मांडलेल्या प्रभावी आणि आक्रमक मुद्द्यांमुळे दुसर्या दिवशी प्रशासनासह कंजारभाट समाजातील पंच खडबडून जागे झाले. मात्र पोलीस फरारी पंचांना अटक करण्याच्या मूडमध्ये अजिबात दिसले नाहीत. परिणामी फरारी पंचांची हिम्मत वाढतही होती. पंचकमिटीचा सदस्य असलेला दशरथ माचरे याचा मुलगा गोपाल ऊर्फ सन्नाटा याने परिसरातील लग्नसमारंभात रविवारी, दि. 9 रोजी विजय बागडे यांचा मुलगा कुणाल बागडे यांना ‘तुम्हाला जातीबाहेर काढले आहे, तुम्ही लग्नात कसे आले,’ असा जाब विचारीत धक्काबुक्की केली. त्यामुळे गोपाल माचरेविरुद्ध विजय बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानसी ऊर्फ मुस्कान हिला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष डी. एस. कट्यारे यांच्यासह अॅड. भरत गुजर, अशफाक पिंजारी, जितेंद्र धनगर, आर. एस. चौधरी व इतर कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
काय होती कृष्णा इंद्रेकर यांची तक्रार?
जातपंचायत समाजाचे वरिष्ठ सरपंच दिनकर बागडे (सेवानिवृत्त अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जळगाव) यांचा मोठा मुलगा आनंद बागडे यांनी 20 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला आहे. त्यांना दोन मुली झाल्या आहेत. असे असताना देखील आनंद बागडे यांच्या वडिलांनी आनंदचे जातीतील मुलीशी लग्न लावून दिले आहे व त्यापासून देखील त्याला अपत्ये आहेत. पहिल्या पत्नीपासून झालेली मोठी मुलगी मानसी ऊर्फ मुस्कान हिने 12 वीमध्ये शिकत असताना आजोबा दिनकर बागडे यांच्याकडे अनेकदा विनंती करून तुम्ही म्हणाल त्या कंजरभाट समाजातील मुलाशी लग्न करेन; पण मला जातीत घेऊन ‘जातगंगा’ द्या,’ असे म्हटले होते. मात्र वेळोवेळी आजोबा दिनकर बागडे, जातपंचायत सदस्य सावन गागडे, दीपक माछरे, बिरजू नेतले, मंगल गुमाने, संतोष गारुंगे आदींनी त्या मुलीला व तिच्या आईला जातीत घेण्यास नकार दिला. आजोबाने देखील ‘समाजात माझी इज्जत आहे, मी बाहेरच्या बाईला नात देणार नाही,’ असे सांगून सून व नातींचा छळ केला आहे. शेवटी मुलीचे काका विजय बागडे यांनी पुढाकार घेत मुलीचे लग्न कोल्हापूर येथे करण्याचा निश्चय केला. मानसीचे लग्न देखील ठरणार होते. मात्र आजोबा व जातपंचायतीच्या नकारामुळे दि. 23 रोजी सुमारे 11.30 वाजता काकाच्या घरात आजोबा दिनकर बागडे व जातपंचायतीच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येनंतर मुलीच्या आई-वडिलांकडून 15 हजार रुपये दंड घेत अग्निसंस्कार समाजाच्या पद्धतीने करता यावा, यासाठी तिला ‘जातगंगा‘ दिली.