-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पालघर जिल्हा आयोजित सोशल मीडिया प्रशिक्षण डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळेच्या चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडले. हे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक वाघेश साळुंखे सर, (राज्य कार्यकारिणी सदस्य, अंनिस) व बाळू माळी सर, (तंत्रस्नेही अंनिस कार्यकर्ता, कोल्हापूर) उपस्थित होते. तसेच, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक भाते, संदेश घोलप, अंनिस सफाळे शाखा अध्यक्षा स्वाती भोईर, प्रधान सचिव जतिन कदम व मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी मॅडम उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू व वसई या शाखेतून सुमारे ३७ प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आजच्या काळात सर्वांनी तंत्रस्नेही बनून संघटनेच्या कामांना प्रसिद्धी देण्यासाठी सोशल मीडिया वापरणे आवश्यक आहे व हे करताना विवेकनिष्ठ विचार समाजात रुजवले पाहिजेत, असे जिल्हाध्यक्ष दीपक भाते यांनी म्हटले.
या प्रशिक्षणात सोशल मिडिया अॅप्सची ओळख व माहिती, सोशल मिडियाचा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रभावी वापर कसा करावा, फेक पोस्ट कशा ओळखाव्या, त्यांचे फॅक्ट चेक कसे करावे, गुगल लेन्सचा वापर, मोबाईल व कॅमेराविषयक तांत्रिक माहिती, इमेज आणि व्हिडीओ एडिटिंग, इ. विषयांची प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. शेवटी, प्रश्नोत्तरे घेण्यात आली.