डॉ. शंतनु अभ्यंकर - 9822010349
‘विज्ञान म्हणजे काय,’
या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच आहे की.
समजा, मी तुमच्या वर्गात येऊन हा प्रश्न विचारला तर एकसाथ सारे ओरडून सांगाल, ‘विज्ञान म्हणजे शाळेत आपल्याला शिकवतात ते.’ रसायन, भौतिक, जीव अशी त्यांची नावंही सांगाल. पुढे मेडिकल म्हणजेही विज्ञानवाला आणि इंजिनिअर म्हणजेही विज्ञानवालाच. या विज्ञानाबरोबर गणित म्हणूनही एक विषय असतो. विज्ञान आणि गणित; बापरे! हुश्शार, चस्मिस, सिन्सीयर, स्कॉलर मुलांची कामं ही; असंही वाटत असेल तुम्हाला. शिवाय शाळेच्या पुस्तकात, प्रयोगशाळेत, महान वैज्ञानिकांची चित्रे असतात. वयस्कर, दाढीवाले आणि बहुतेक सगळे परदेशी. तेव्हा महान शास्त्र आणि महान शास्त्रज्ञ ही गोष्ट इंग्लंड-अमेरिकेत पिकते, असंही वाटत असेल तुम्हाला. शिवाय या ओळींनी लावलेल्या चित्रांत बाई नसतेच. असलीच तर एकच. ती प्रसिद्ध मारी क्युरी. रेडियमचा शोध लावणारी. तेव्हा तुमच्या वर्गातल्या काही मुली स्कॉलर जरी असल्या, तरी विज्ञानातलं मुलींना विशेष कळत नसेल, असंही तुम्हाला वाटू शकतं. काही मुलं-मुली असंही सांगतील की मोबाईल म्हणजे विज्ञान, इंटरनेट म्हणजे विज्ञान, कोविडवर लस शोधणे म्हणजे विज्ञान… अशी मोठीच्या मोठी यादी करता येईल.
तुम्ही दिलेली सगळी उत्तरं बरोबर आहेत आणि सगळीच्या सगळी चूक आहेत! ‘रसायन’पासून लसीपर्यंत सगळं काही विज्ञान आहे खास, पण या सगळ्याला मिळून ‘विज्ञान’ असं एकच बिरुद का बरं लावलं आहे?
सार्याला एकच बिरुद लावलं आहे, याचं कारण ही शास्त्रे काय सांगतात, कशी उपयोगी पडतात, यात नाहीये. ही शास्त्रे जे ज्ञान सांगतात, या ज्ञानाचा जे उपयोग करून दाखवतात ते ज्ञान आणि त्याचा उपयोग करण्यामागे विचार करण्याची विशिष्ट पद्धत आहे. या विचार करण्याच्या खाशा युक्तीला विज्ञान असं म्हणतात.
जेमतेम चारशे वर्षांपूर्वी या युक्तीचा शोध लागला. माणसाला आपल्या आसपासच्या जगाबद्दलचे कुतूहल उपजतच आहे. पाऊस का पडतो? दिवस-रात्र का होतात? माणूस मरतो म्हणजे काय? त्यानंतर काय होतं? हे विश्व कसं निर्माण झालं? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
आपल्या पूर्वजांनाही असेच प्रश्न पडले होते. त्यांनी त्यांची उत्तरेही तयार केली. पण त्यांच्याकडे ‘विज्ञान’ नावाची युक्ती नव्हती. मग त्यांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या, निरनिराळ्या कथा रचल्या आणि आसपास जे-जे घडत होतं, त्याची कारणं द्यायला सुरुवात केली.
हे विश्व कसं निर्माण झालं, या प्रश्नाचं उत्तर देणारी एक चिनी कथा आहे. पान-गु नावाचा प्राणी होता. माणसाचं केसाळ धड आणि कुत्र्याचं डोकं असणारा. पृथ्वी आणि स्वर्गाचं एकजीव, दाट मिश्रण होतं त्याकाळी. एका काळ्या अंड्याभोवती हे सगळं लपेटलेलं होतं. त्या अंड्यात होता पान-गु. 18 हजार वर्षं तो त्या अंड्यात निद्रिस्त होता. त्याला जाग आली आणि कुर्हाडीने अंडं फोडून तो बाहेर आला. अंडं फुटताच त्यातलं जड ते सर्व तळाशी पडलं. त्यालाच आपण म्हणतो पृथ्वी. त्यातलं हलकं ते सर्व गेलं उंच. त्यालाच आपण म्हणतो आकाश. पण या कामाने पान-गु पार दमला आणि मेला. त्याचे अंश म्हणजे सृष्टी सारी. त्याचा श्वास झाला वारा, त्याचा आवाज झाला गडगडाट आणि डोळे झाले सूर्य-चंद्राच्या ज्योती. त्याच्या स्नायूंची झाली शेतं आणि रक्तवाहिन्यांचे झाले रस्ते, त्याच्या घामाचा झाला पाऊस आणि केसांचे झाले तारे. त्याच्या अंगावरच्या उवा आणि पिसवांची आजची पिल्लावळ म्हणजेच…तुम्ही, आम्ही; मानवी प्रजा!!!
आहे की नाही मजा? मजा आहेच; पण या गोष्टीवर तुमचा विश्वास बसतोय? नाही ना? पण ही गोष्ट खर्रीखुर्री मानणारे चिनी आहेतच की. कदाचित ही कथा ऐकून तुम्ही त्या चिन्यांना फिदीफिदी हसत असाल. पण विश्वनिर्मितीच्या अशा इतरही अनेक कथा आहेत. प्रत्येक देशाची आणि संस्कृतीची आपापली कथा. अशा इतर कथांना आणि त्यावर विश्वास ठेवणार्या लोकांना, ती चिनी मुलं फिदीफिदी हसत असतील!!
तेव्हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर काल्पनिक कथा हा काही फारसा उपयुक्त मार्ग नाही. कथा छानच असतात, रंजक असतात; विनोदीही असतात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर नीट कळत नाही त्यातून. नीट आणि नीटस उत्तरे शोधायची युक्ती म्हणजे विज्ञान. त्या युक्तीबद्दल आपण शिकणार आहोत, या सदरात दर महिन्याला.
लेखक संपर्क : 98220 10349