जनमानस, तज्ज्ञ आणि विवेकी आहार

डॉ. विनायक हिंगणे -

आहाराच्या माहितीत काय खावे व ते का खावे असा कार्यकारणभाव सुद्धा सांगितलेला असतो. तो तपासून बघावा. काही वेळा सल्ले किंवा त्यामागील तर्क आपल्याला सुसंगत वाटतो, अगदीच विसंगत वाटत असेल तर आपण अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकतो. जे सल्ले आपल्याला तार्किक वाटतात त्यांना आपण प्रयोगाद्वारे तपासून बघू शकतो. काही बाबतीत इतरांचे अनुभव काय आहेत ह्याचा कानोसा घेऊ शकतो. कुठलाही सल्ला तपासून बघताना मोजमाप करणे महत्त्वाचे असते. वजन कमी करणे असो का शुगर, बीपी नियंत्रण असो, मोजमाप मदत करते. शेवटचा मुद्दा म्हणजे आहार हा व्यक्ती, स्थळकाळसापेक्ष आहे. आपल्यासाठी काय योग्य त्याची शहानिशा करायला आपण शिकायला हवे हे नक्की.

आरोग्याच्या आधारस्तंभांपैकी आहार हा एक आहे. योग्य आहाराचे महत्त्व कोणालाही वेगळे सांगायला नको. चुकीचा आहार म्हणजे आजाराला निमंत्रण हे सर्वमान्य आहे. असे असूनही आहार हा मुद्दा खूप वादग्रस्त आहे. योग्य आहार म्हणजे नेमके काय, ह्याचे उत्तर शोधताना दमछाक होते. काय खावे व काय खाऊ नये ह्याविषयी वादंग रंगतात. एखादा पदार्थ आरोग्यास चांगला की वाईट हे ठरवायचे तरी कसे? अनेक परस्परविरोधी वक्तव्ये आपण ऐकत असतो. सोशल मिडियावर तर माहितीचा महापूर आहे. कधी कधी तर डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ यांचे सल्ले सुद्धा विसंगत वाटतात. आहाराच्या बाबतीत प्रमाण कशाला मानावे कळतच नाही. संभ्रम कमी होण्याऐवजी वाढतच जातो. अशा सगळ्या गोंधळात आहाराशी निगडीत आजारांची संख्या वाढतच चालली आहे. शहरी विभागासोबतच ग्रामीण भागातही डायबेटीस व लठ्ठपणाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्यामुळे आहार ह्या विषयाला महत्व देणे अनिवार्य झाले आहे. एखादी वस्तू विकत घेताना आपण चार ठिकाणी चौकशी करतो. भाव आणि गुणवत्ता तपासून घेतो. इतरांचा अनुभव कसा आहे ह्याचा कल घेतो. असा चौकस दृष्टिकोन ठेवून आपण खरेदी करतो. आहाराच्या बाबतीत अशीच सतर्कता आपल्याला ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सतर्कतेला जोड हवी ती विवेकवादी विचारसरणीची. कुठलाही निर्णय घेताना विवेकवादी विचारसरणी आपल्याला मोठी मदत करते. आहाराबद्दल आपली वागणूक विवेकपूर्ण कशी असावी ह्या अनुषंगाने ह्या लेखमालिकेत आपण चर्चा करणार आहोत. आहाराचे अनेक पैलू आहेत. आहाराची शास्त्रीय माहिती, आहाराचा आरोग्यावरील परिणाम आणि आपल्या वातावरणाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम ह्या सगळ्यांबद्दल चर्चा होण्याची आज गरज आहे. या चर्चेतून आपल्याला वैयक्तिक निर्णय घेणे सोपे होईल अशी मला आशा आहे.

आहाराबद्दल जनमानस :

आहाराविषयी कुठलीही चर्चा करत असताना समाजात त्याबद्दल काय भावना सध्या रूढ आहे ह्याला महत्त्व देणे आवश्यक आहे. रोजच्या जीवनातील चालीरीती, परंपरा, ट्रेंड किंवा फॅशन ह्यांचा परिणाम लोकांच्या खाण्यावर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आपल्या आहारावर सगळ्यात जास्त परिणाम करणार्‍या दोन महत्त्वाच्या कुठल्या बाबी असतील तर त्या म्हणजे आपली शरीरक्रिया आणि आपले सामाजिक वातावरण. शरीराच्या आत काय घडतंय त्याचा सरळ सरळ प्रभाव आपल्या आहारावर होत असतो. शरीरातील ऊर्जा, रासायनिक बदल, मेंदूची जडणघडण, आतडीतील उपयुक्त जीवाणू, शरीरातील चरबीचे साठे, लठ्ठपणा, झोप इत्यादी अनेक शारीरिक गोष्टींचा सरळ सरळ परिणाम आपल्या खाण्यापिण्यावर होतो. यापैकी प्रत्येक मुद्यावर आपण पुढील भागात चर्चा नकीच करू या. आजचा आपला भर असणार आहे तो म्हणजे सामाजिक वातावरणाचा आपल्या आहारावर असणारा पगडा ह्यावर.

आपला परिवार, नातेवाईक व समाज आहाराबद्दल काय बोलतो, कसे वागतो यातूनच सर्वसाधारण व्यक्ती शिकत असतो. फार कमी लोक शास्त्रीय माहितीचा अभ्यास करू शकतात. आहारासंबंधी विज्ञान सुद्धा बरेच गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे लोकांचे आहारासंबंधी ज्ञान हे ऐकीव आणि रूढ मतांवर अवलंबून असते. ह्या ज्ञानात बरेचदा त्रुटी असतात. पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणून लोक याकडे वळतात. अमुकतमुक व्यक्तीने मला सांगितले म्हणून मी हे खायला सुरुवात केली असे सांगणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. त्याची शहानिशा न करता आपणही तो पदार्थ ट्राय करून बघतो. न आवडल्यास तो पदार्थ मागे पडतो आणि आवडल्यास आपणही इतरांना तो सुचवतो. यात खरे तर त्या पदार्थाची शहानिशा न करताच तो पदार्थ सुचवला जात असतो. त्यातून एक फूड फॅड निर्माण होते. याचे एक उदाहरण आपण बघू या. सध्या गुळाबद्दल एक क्रेझ निर्माण झाली आहे. साखरेपेक्षा गूळ जास्त आरोग्यदायी आहे व गूळ खाल्याने शुगर वाढत नाही असा समज सध्या पसरला आहे. डायबेटीसच्या रुग्णांमध्ये हा समज जास्त रुळला आहे. अनेक रुग्ण गुळाचा चहा प्यायला लागल्यावर शुगर वाढली म्हणून मला दाखवायला येतात. गुळामुळे रक्तातील शुगर वाढू शकते हे कळल्यावर त्यांना मोठा धका बसतो. खरेतर ह्यात धका बसण्यासारखे काहीच नाही. गुळात ९० ते ९५ टके शर्कराच असते. साखरेऐवजी गूळ खाऊन आरोग्याला वेगळा काही फायदा होण्याचा शास्त्रीय पुरावा सुद्धा नाही. त्यामुळे शहानिशा न करता गुळाला आरोग्यदायी म्हणणे चुकीचे आहे. लोक अशा फॅडकडे सहज आकर्षित होतात. लोक रक्तातील शुगर कमी व्हावी यासाठी साखरेऐवजी गूळ खातात, पण शुगर खरोखर कमी झाली का हे साधे तपासून सुद्धा बघत नाहीत. साखर व गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा गुळाचा पर्याय सोयीस्कर वाटतो. ह्या दृष्टिकोनामुळे गुळाची क्रेझ सुरूच राहते.

लोकप्रियतेची लाट वर येते तशी ओसरते सुद्धा. पण काही समज हे सवयींमध्ये किंवा परंपरांमध्ये रूपांतरीत होतात. खानपानाची एखादी पद्धत एवढी रूढ झालेली असते की काळानुसार ती चुकीची ठरली, तरी ते समाजमन मान्य करत नाही. हा प्रकार सुद्धा आपल्याला उदाहरणातून समजून घ्यावा लागेल. मागे मी डायबेटीस आणि आहाराचा अभ्यास करत असताना डॉ. नीता फोरुही, डॉ. अनुप मिश्रा आणि डॉ. रॉय टेलर ह्यांचा जून २०१८ मधील बी एम जे जर्नल मधील एक शोधनिबंध वाचत होतो. त्यात त्यांनी भारत, चीन व दक्षिण आशियातील खाद्य परंपरेबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. भारतातील आहार हा मुख्यत्वे कर्बोदके (भात, पोळी, भाकरी इत्यादी) वर आधारित आहे. धान्यांचे प्रमाण आपल्या आहारात इतरांपेक्षा नेहमीच जास्त राहात आले आहे. परंतु गेल्या दोन दशकात आर्थिक भरभराट व विदेशी कंपन्या (खास करून फास्टफूड कंपन्या व चेन रेस्टॉरंट) ह्यामुळे आहारात तेल, तूप, ऊर्जा व प्रथिनांचे प्रमाण वाढत गेले आहेत. पेये व शीतपेये ह्यातून साखरेचे प्रमाण वाढले आहे. ह्या अभ्यासात धान्याचा वापर हा रिफाइंड धान्याच्या (मैदा, प्रक्रिया केलेले इत्यादी) स्वरूपात जास्त होण्याकडे कल असण्याचे सुद्धा नमूद केले आहे. शिवाय, आहारातील भाजीपाला, कडधान्य व फळे ह्यांचा वापर हळूहळू कमी होण्याचा कल नमूद केला आहे. आहारातील पाम तेलाचा समावेश व तेल वारंवार गरम करण्याची पद्धत ह्यातून सुद्धा काही हानिकारक बदल घडतात. त्यांचा प्रभाव वाढतो आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याकडे लठ्ठपणा व डायबेटीस वाढतो आहे. या अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे गेल्या दोन दशकातील बदल हे हळूहळू घडत आहेत. आपल्याला ते फूड फॅड वाटत नसून आपल्या परंपरेचा भाग वाटतात. पण ह्या बदलांना लक्षात ठेवून आपल्याला आहारातील धान्यांचे (पोळी भात किंवा भाकरी) तसेच तेल, तूप कमी करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. अशावेळी बर्‍याच लोकांना हा सल्ला चुकीचा वाटतो. पोळी, भात, भाकरी तर आमचा पारंपरिक आहार आहे. तेल, तूप खाल्ल्याने तर आमच्या पूर्वजांना काही त्रास झाला नाही मग आम्हाला कसा होईल असा सवाल केला जातो. इथे सुद्धा आपण शहानिशा करायला अपुरे पडतो. माझ्या आजीला इडली काय असते किंवा पंजाबी डिशेस म्हणजे काय हे माहीत सुद्धा नव्हते. माझ्या आईने सुद्धा तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात हे पदार्थ खाल्ले. पण मला लहानपणापासून हे पदार्थ जवळचे वाटतात. दोन ते तीन दशकातील हा फरक जाणीवपूर्वक बघितल्यास तुम्हालाही जाणवेल. शास्त्रीय अभ्यासात तर आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनाला बाजूला ठेवून तटस्थपणे निरीक्षण केले जाते. तेलाची व अन्नधान्याची उपलब्धता आणि खप ह्यांचे आकडे सुद्धा उपलब्ध असतात. वाढती मुबलकता आपल्याला हानिकारक ठरते आहे हे सामान्य लोकांना कळतच नाही कारण हे बदल सूक्ष्म व हळूहळू घडत असतात. ते अंगवळणी पडतात. अशावेळी आपल्याला विषयाच्या खोलात जाऊन बघावे लागते व सवयी बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

जाहिराती आणि बाजाराचा आपल्या आहारावर खूपच मोठा परिणाम होत असतो. समाजमन घडवणे हे कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. खाद्यव्यवसाय तर यात अग्रेसर आहे. लोक जेवढे जास्त खातील तेवढा फायदा जास्त. ह्यामुळेच लोकांचे खाणे कसे वाढवता येईल ह्याचा प्रयत्न खाद्य व्यवसाय करतात. जाहिराती आपल्याला आकर्षित करतात. खाद्य सगळीकडे कसे उपलब्ध असेल ह्यावर भर दिला जातो. खाद्यपदार्थ अधिकाधिक हवेहवेसे कसे करता येतील यासाठी प्रयत्न करण्यात येतात. अर्थातच त्यांचा व्यवसाय वाढवणे हे त्यांचे कामच आहे. ते काही चुकीचे करतात असे म्हणता येणार नाही. पण याचा फटका सामान्य जनतेच्या आरोग्याला बसतो आहे. खाद्य उद्योग व जाहिराती कसा परिणाम करतात ह्याची सुद्धा काही बोलकी उदाहरणे आहेत. ब्रेकफास्ट किंवा न्याहरी हे दिवसातील सगळ्यात महत्त्वाचे खाणे आहे असे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यातही ब्रेकफास्ट सेरियल (कॉर्नफ्लेक वगैरे) खूपच लोकप्रिय आहेत. पण ह्याला मोठा शास्त्रीय आधार नाही. ब्रेकफास्ट सेरियल व्यवसायाने केलेल्या जाहिरातबाजीमुळे जनमानस बदलला. त्यातच व्हिटॅमिनचा शोध लागल्यावर सेरियल मध्ये व्हिटॅमिन मिसळून ते खूप आरोग्यदायी आहे असा प्रचार सुरू झाला. २० व्या शतकात अमेरिकेत हलका नाश्ता घेण्याची पद्धत होती. एडवर्ड बेर्ने नावाच्या उद्योजकाने त्याचा कंपनीच्या डॉक्टरचे वैयक्तिक मत लिहून घेतले की भकम ब्रेकफास्ट हा आरोग्यास जास्त चांगला आहे व त्यावर ४५०० डॉक्टरांच्या सह्या घेण्यात आल्या. आता अमेरिकेतील साडेचार हजार डॉक्टरांच्या मते, हेवी ब्रेकफास्ट आरोग्यासाठी उत्तम असतो ह्याची पेपरबाजी सुरू झाली. खरेतर कुठलाही शास्त्रीय अभ्यास पाठीशी नसताना सुद्धा लोकांच्या गळी हेवी ब्रेकफास्ट उतरवण्यात ते यशस्वी ठरले. आजही पाश्चात्त्य देशात बेकन नाश्त्यात खाणे आरोग्यदायी समजले जाते त्यामागे ही जाहिरातबाजी आहे. पूर्वी तर धूम्रपानाच्या जाहिरातीसाठीसुद्धा डॉक्टरांचा उपयोग करण्यात आला होता. समाजमन एकदा वळवले की त्याचा फायदा कंपन्यांना मोठ्या काळासाठी होतो. आज प्रोटीन म्हणजे प्रथिनांची गरज आपल्याला वाढवून चढवून सांगितली जात आहे. निरोगी व्यक्तीला प्रोटीन पावडरची खरेतर काहीच गरज नसते. संतुलित आहारातून लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पुरेसे प्रोटीन मिळू शकते. पण प्रोटीन्सच्या कमतरतेचा एवढा बाऊ करण्यात आला आहे की निरोगी मुलांच्या आया गरज नसताना सुद्धा ‘हेल्दी’ म्हणून प्रोटीन शेक्स मुलांना पाजत आहेत. प्रोटीन पावडर खाल्ल्याने वजन कमी होते हा सुद्धा एक गैरसमजच आहे. बाजार व खाद्य व्यवसायाच्या ह्या कचाट्यातून बाहेर पडणे हे खरे तर सामान्य लोकांसाठी खूप कठीण आहे. आहाराचा अभ्यास करणे व निरोगी आहाराची मूलभूत माहिती अभ्यासक्रमात असणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर बंधने आणणे शिवाय मैदाने, शाळांसारख्या ठिकाणी खाद्य व्यवसायाचा शिरकाव टाळणे हे सुद्धा शासन पातळीवर करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांची भूमिका कितपत महत्त्वाची?

जर आपण आहार-ज्ञानाबद्दल समाजातील रूढ मत, लोकांचे सल्ले किंवा सोशल मीडियावर अवलंबून राहू शकत नसू तर मग आपण कुणाकडे बघावे हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे रामबाण उत्तर उपलब्ध नाही, तरी एक बरा मार्ग म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणे. यात डॉक्टर, आहारतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर काही लोक येतात. डॉक्टरांना व आहार तज्ज्ञांना आहारशास्त्राचे शिक्षण मिळालेले असते व त्याचा उपयोग ते रुग्णांचे प्रश्न सोडवण्यासाठी करत असतात. सामान्य जनतेपेक्षा ह्या लोकांचा आहाराविषयी अभ्यास आणि अनुभव निश्चितच जास्त असतो. शिवाय, डॉक्टर व आहारतज्ज्ञ हे सहज उपलब्ध होऊ शकतात. आपल्या ठराविक प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकतात. काही शंका असल्यास सोडवू शकतात. त्यांचा सल्ला आपल्याला कितपत उपयोगी पडतो ते सुद्धा आपण पडताळून बघू शकतो. उदा. एखादी व्यक्ती शुगर कमी करण्यासाठी एखादा आहार सल्ला घेत असेल तर त्याने खरेच शुगर कमी झाली का आपण मोजून बघू शकतो. काही डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि संस्था लोकशिक्षणासाठी माहिती पुरवतात. पुस्तके, लेख, व्हिडिओ, रेडिओ किंवा पॉडकास्ट इत्यादी अनेक स्वरूपात ही माहिती उपलब्ध असते. यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून माहिती घेणे. कारण काही ठिकाणी माहिती ही दिशाभूल करणारी असते.

तज्ज्ञांकडून मिळालेला सल्ला हा नेहमीच आपल्या उपयोगाचा असेलच असे नाही. सल्ला जेवढा नेमका व वैयतिक पातळीचा असेल तेवढा जास्त उपयोगी ठरतो. आहाराबद्दल एका ठराविक प्रश्नाचे वैयक्तिक उत्तर शोधणे सोपे असते. जेवढा सल्ला सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करू तेवढा तो कमी फायद्याचा ठरतो. मांसाहार किंवा दूध हे आरोग्यासाठी चांगले का वाईट असा मोघम प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तरच देता येणार नाही. कारण मांसाहार किंवा दूध हे सगळ्यांसाठी सारखेच त्रासदायक किंवा गुणकारक ठरू शकत नाही. एखाद्या गाउट (युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होणारा त्रास) रुग्णाला लाल मांस खाणे बंद केल्यास फायदा होईल तर लॅक्टोज सहन न होणार्‍या रुग्णाला दूध व दुधाचे पदार्थ टाळल्यास त्रासापासून सुटका होईल. आहारासंबंधी अशा अनेक आजारांमध्ये डॉक्टर व आहारतज्ज्ञांची आमूलाग्र मदत होते. काय टाळायचे ते टाळण्यासाठी सखोल टिप्स, त्याऐवजी काय खाता येईल, इ. अनेक उपाय ते सुचवतात व रुग्णांचे आयुष्य सोपे करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जेवढे मोघम किंवा सार्वत्रिक सल्ल्यांचा विचार करतो तेव्हा तज्ज्ञांना सुद्धा आहार सल्ला देताना अडचणी येतात. म्हणून सार्वत्रिक सल्ले सुद्धा कुठल्या एका अनुषंगाने दिलेले असतात.

आहाराला विविध पैलू आहेत आणि त्यातील काही पैलूंवर तज्ज्ञांचे एकमत असते तर काही बाबतीत मतभेद. जंक फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ याबद्दल जवळपास सगळ्या तज्ज्ञांचे एकमत आहे की ते आरोग्यास हानिकारक आहेत. रोज जंक फूड खा व निरोगी रहा असे सांगणारा आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर मला अजूनतरी भेटलेला नाही. परंतु संतुलित आहारात कर्बोदकांचे (कॅर्बोहायड्रेट) चे प्रमाण किती असावे ह्यात तज्ज्ञांचे अजूनही एकमत नाही. किंवा दिवसभरात किती वेळा खावे ह्यात वेगवेगळी मते असू शकतात. याशिवाय ठरावीक पदार्थ किंवा आहार घटकाचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे ठरवणे शास्त्रीयदृष्ट्या खूप कठीण असते. आहाराला स्थळ काळ सापेक्षता असल्याने शात्रज्ञ आणि संस्थांना मार्गदर्शक तत्त्वे ठरवताना अनेक अडचणी येतात. तज्ज्ञांच्या ह्या मर्यादा समजून घेणे फार आवश्यक आहे. आरोग्याचा इतर क्षेत्रांपेक्षा आहाराच्या क्षेत्रात कदाचित जास्तच मर्यादा तज्ज्ञांना येतात. गेल्या काही वर्षांत आहार क्षेत्रात अनेक संशोधनात्मक आमूलाग्र अभ्यास घडत आहेत. डॉक्टर व आहार तज्ज्ञांना त्या सगळ्यांचा मागोवा ठेवणे कठीण असते. त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींचे सल्ले वेगळे भासू शकतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे तज्ज्ञांच्या मर्यादा मुख्यत्वे मोघम/जनरल प्रश्न किंवा सार्वत्रिक माहितीच्या बाबतीत येतात. वैयक्तिक पातळीवर बरेच प्रश्न तुमचे डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ सोडवू शकतात.

विवेकी आहार घेणे आपल्याला शक्य आहे का?

तज्ज्ञांच्या सल्ल्याला सुद्धा अनेक मर्यादा येतात. मग करायचे तरी काय? आपल्या आहाराविषयी किंवा एखाद्या आहार घटकाविषयी शंका तुमच्या मनात असू शकतात. त्याचे उत्तर स्वतः शोधताना थोडा गोंधळ निश्चितच उडू शकतो. पण काही युक्त्या आपल्याला मदत करू शकतात. पहिली पायरी ही नेहमीच अभ्यासाची असते. आहार किंवा आहार घटक याविषयी जेवढी माहिती आपण घेऊ तेवढे उपयुक्त. सुरुवातीला विरोधाभास किंवा गोंधळ वाटू शकतो. विषय कठीण वाटतो. पण जेवढी जास्त माहिती मिळवू तेवढी स्पष्टता वाढत जाते. विषय सोपा होत जातो. यातही खात्रीलायक व अधिकृत ठिकाणांहून माहिती मिळवावी. वादातीत ठिकाणे/स्रोत सुरुवातीस टाळावेत. आरोग्यविषयक मासिके, पुस्तके इत्यादी नियमित वाचणे फायद्याचे ठरते असा माझा अनुभव आहे. नियमित वैद्यकीय किंवा आहाराविषयी माहिती घेणारे रुग्ण जास्त जागरूक असतात.

आहाराच्या माहितीत काय खावे व ते का खावे असा कार्यकारणभाव सुद्धा सांगितलेला असतो. तो तपासून बघावा. काही वेळा सल्ले किंवा त्यामागील तर्क आपल्याला सुसंगत वाटतो. अगदीच विसंगत वाटत असेल तर आपण अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकतो. जे सल्ले आपल्याला तार्किक वाटतात त्यांना आपण प्रयोगाद्वारे तपासून बघू शकतो. काही बाबतीत इतरांचे अनुभव काय आहेत ह्याचा कानोसा घेऊ शकतो. कुठलाही सल्ला तपासून बघताना मोजमाप करणे महत्त्वाचे असते. वजन कमी करणे असो का शुगर, बीपी नियंत्रण असो, मोजमाप मदत करते. शेवटचा मुद्दा म्हणजे आहार हा व्यक्ती, स्थळ-काळसापेक्ष आहे. आपल्यासाठी काय योग्य त्याची शहानिशा करायला आपण शिकायला हवे हे नकी.

(डॉ. विनायक हिंगणे एमबीबीएस, डीएनबी (मेडिसिन) आहेत. बुलढाणा येथे हिंगणे हॉस्पिटलमध्ये ते फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. ते अंनिसचे हितचिंतक आहेत. त्यांनी युनायटेड किंगडममध्येही काम केले आहे. एक दशकाहून अधिक काळ आरोग्य शिक्षणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

डायबेटिसचा जीवनशैलीद्वारे उपचार व डायबेटिस रिव्हर्सल यांतील संशोधनात डॉ. हिंगणे यांना विशेष रस आहे. ते नियमितपणे आरोग्य शिक्षण व आरोग्य विषयक लेखन करत असतात. जीवनशैलीत बदल करण्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याबरोबरच ते त्यांच्या पुस्तके आणि लेखांद्वारे आरोग्य जागृती निर्माण करत आहेत.

आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी ‘आहार विवेक’ या सदरातून ते आपल्या नियमित भेटीस येणार आहेत.)

-डॉ.विनायक हिंगणे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]