दवा-दुवा प्रकल्प सैलानीबाबा दर्गा परिसरासाठी पथदर्शी

-

दवा-दुवा प्रकल्प सैलानीबाबा दर्गा परिसरासाठी पथदर्शी – जिल्हाधिकारी आर. राममूर्ती

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन आणि मातृभूमी फौंडेशन यांनी सुरू केलेला मानसिक आरोग्य क्षेत्रातील ‘दवा-दुवा प्रकल्प’ सैलानी बाबा परिसरात येणार्‍या मानसिक रुग्णांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या परिसरासाठी तो पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास बुलढाण्याचे जिल्हाधिकारी श्री. आर. राममूर्ती यांनी दवा-दुवा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

सैलानी बाबा ट्रस्टच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ होते. या वेळी माजी आमदार राहुल बोंद्रे, सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष समद चाँद, अ‍ॅड. वानखेडे, दर्ग्यावरील मुजावर समुदायाचे प्रतिनिधी चाँद मुजावर आणि गार्गी सपकाळ उपस्थित होत्या.

कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी राममूर्ती पुढे म्हणाले की, सैलानी बाबा दर्गा परिसारत देशभरातून मानसिक आजारी रुग्ण येतात. त्यांच्या उपचारांच्यासाठी सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्यामार्फत याला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. स्थानिक मनोविकारतज्ज्ञ आणि मानसिक आजारांच्यावर औषधे उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक राहील.

स्थानिक माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दर्गा परिसरात मानसिक उपचार चालू व्हावेत, यासाठी आपण गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर प्रयत्नशील होतो, असे नमूद करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाला सदिच्छा दिल्या.

सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष समद चाँद आणि दर्ग्याचे मुजावर चाँद मुजावर यांनी दवा-दुवा प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकल्प सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगताना मानसोपचारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्तेडॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, आपल्या देशात खूप मोठ्या लोकसंख्येसाठी फार थोडे मनोविकारतज्ज्ञ उपलब्ध आहेत. समुपदेशन आणि समाजात पुन्हा मानसिक आजारी रुग्णाला पुनर्वसन करण्याच्या सुविधा अत्यंत कमी आहेत. त्यामधून मग दर्ग्यासारख्या ठिकाणी लोक उपचार घ्यायला येतात. त्यांच्या श्रद्धेचा सन्मान ठेवून रुग्ण आणि नातेवाईक यांना मानसिक आजाराचे शास्त्रीय उपचार उपलब्ध करून दिले तर त्याच्या परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होते आणि ते परत आपापल्या गावी जाऊन सन्मानाने आयुष्य जगू शकतात.

या प्रकल्पासाठी पंचवीस मानसमित्र आणि मैत्रिणींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्याच्या माध्यमातून आणि शासनाच्या मदतीने सैलानी बाबा दर्गा परिसरात या सुविधा आपण सुरू करत आहोत. या केंद्रावर मनोरुग्णांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी जाहीर केले.

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी अध्यक्षीय समारोप करताना दवा-दुवा प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचा नाही, तर देशाचा पथदर्शी प्रकल्प होईल, अशी आशा व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्वप्नातील एक प्रकल्प मार्गी लागत असल्याचे एक समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार सकपाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रील संत आणि सुधारकांच्या खांद्यावर उभे राहून या स्वरुपाचे उपक्रम आपण करत आहोत, याचे नम्र भान आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे, असे देखील त्यांनी नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध हा कुठल्याही देवा आणि धर्माला नसून ती सर्व धर्मांतील अंधश्रद्धांविरोधात जोमाने काम करते, हे या प्रकल्पातून अधोरेखित होते, असे देखील माजी आमदार सकपाळ यांनी नमूद केले.

प्रास्ताविक प्रकल्प समन्वय गार्गी सपकाळ यांनी केले, तर आभार मैत्रियी लांजेवार हिने मानले. दर्गा परिसरातील अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, तसेच नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दर्गा परिसरात मानसिक उपचार सुविधा उपलब्ध असणे फायद्याचे होईल, असे मत व्यक्त केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]