कॉ. अजित अभ्यंकर -
डोळसपणासाठी अंधत्वाचा चष्मा काढायला लावणारे डॉ. शरद अभ्यंकर
–कॉ. अजित अभ्यंकर
ज्ञान हाच एकमेव सद्गुण असल्याचे तत्त्व ठासून मांडणार्या प्रख्यात ग्रीक विचारवंत सॉक्रेटिसवर असा खटला भरला गेला की, तो तरुणांच्या मनात प्रस्थापित देवतांबाबत शंका निर्माण करतो. त्यांची मने संशयग्रस्त करतो. त्या खटल्यामध्ये स्वतःचा बचाव करताना सॉक्रेटिस म्हणाला, मला फक्त इतकेच कळते की, मला काहीच कळत नाही. माझा गुन्हा इतकाच की, ज्यांनी त्यांना स्वतःला खूप ज्ञान असल्याचा दावा केला, त्यांना काही प्रश्न विचारत गेलो. आणि ते निरूत्तर झाले. त्यांचे ज्ञान खरे नसल्याचे त्यांना मान्य करावे लागले. असे असूनदेखील सॉक्रेटिसला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. माफीची संधी असूनदेखील कोणतीही माफी न मागता, सुरक्षितपणे पळून जाण्याची संधी असतानादेखील त्याने माफी मागितली नाही. अथवा तो पळूनदेखील गेला नाही. त्यांनी शांतपणे धीरोदात्तपणे हेमलॉक विषाचा प्याला रिचवला आणि प्राण सोडला. पण त्याच्या मृत्यूमध्येच वैज्ञानिक पद्धतीचा जन्म झाला. सॉक्रेटिसचा मृत्यू हे एक महाकाव्य ठरले.
सॉक्रेटिसचे हे प्रश्नोपनिषद ही आधुनिक वैज्ञानिक पद्धतीची गुरूकिल्ली आहे. सामाजिक व्यवहारात, विचारविश्वात ही सॉक्रेटिअन या लेखनातून प्रत्यक्षात आणणारे जे काही थोडे संवेदनशील नागरिक आणि लेखन आपल्यामध्ये आहे, त्यापैकी एक म्हणजे वाईचे डॉ. शरद अभ्यंकर आणि त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘जरा डोळस होऊ’ हे त्यांच्या संग्रहित लेखांचे संकलन. हीच प्रश्न विचारण्याची सॉक्रेटिसची परंपरा चालविणार्यांपैकी एक हे पुस्तक.
या पुस्तकात हाताळलेले विषय हे महाभारत-रामायणातील कथांच्या विश्लेषणापासून ते देहदान, जीवनेच्छापत्र (ङर्ळींळपस थळश्रश्र) या सर्वांपर्यंत पोचणारे आहेत. पण विषय अनेक असले, तरी त्यामध्ये एकच विचारसूत्र आहे. ते म्हणजे डोळस, खरे तर वैज्ञानिक, विचारपद्धतीचा अवलंब करण्याविषयीची लेखकाची तळमळ, त्यास अनुलक्षून केलेले विश्लेषण आणि निष्कर्ष. पुस्तकातील पानांची संख्या ही केवळ १२७ असली तरी लेखांची संख्या २६ आहे.
पुस्तकात देव, देवालये, धर्म, पूनर्जन्म, धर्म आणि विज्ञान, डार्विन-उत्क्रांतीसिद्धांत, विनोबांचा धर्मविचार, गौरवर्णाचा वृथाभिमान असे बहुविध विषय हाताळलेले आहेत. मला या सर्व लेखनात आवडलेल्या बाबी म्हणजे, त्यातील सुलभ भाषा, मुद्द्याचा थेटपणा आणि विचाराचे सातत्य. त्याची काही उदाहरणे इथे देणे उचित होईल.
पुस्तकाची सुरुवातच होते ती बुद्धिप्रामाण्यवादावर सर्वसामान्य जनतेवर घेतल्या जाणार्या आक्षेपांपासून.
बुद्धिप्रामाण्यवादी बना म्हंटल्यावर लगेच लोक फिस्कारून अंगावर येतात. ‘म्हणजे? आम्ही काय बुद्धी न वापरता जगतो काय?’ ‘कुणाची बुद्धी? तुमची? आणि ती का?’ ‘तुम्हीच तेवढे बुद्धिमान ? आणि आम्ही निर्बुद्ध?’ असे प्रश्न लगेच फेकले जातात.
याला कारण म्हणजे बुद्धी याचा अर्थ बहुतेक लोक अक्कल हुशारी, मार्क मिळवण्याची क्षमता असा घेतात. पण इथे थोड्या वेगळ्या अर्थाने आपण हा शब्द वापरणार आहोत. बुद्धी म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता……
……..‘कोणत्याही विधानावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्याबद्दल योग्य ते प्रश्न उभे करण्याची आणि त्याची तर्कशुद्ध उत्तरे शोधून काढण्याची क्षमता म्हणजे बुद्धी’. यात ‘योग्य ते प्रश्न’ आणि ‘तर्कशुद्ध उत्तरे’ हे कळीचे शब्द आहेत….
डॉ. शरद अभ्यंकर यांची दृष्टी आणि हेतू हा धार्मिक व्यक्ती किंवा देव इत्यादींची टिंगल करण्याचा नाही. त्यांना सर्वसामान्य माणसाला काहीतरी समजावून सांगायचे आहे. त्यांच्यासमोर एखादा सुशिक्षित मध्यमवर्गीय माणूस आहे. तो धार्मिक आहे. त्याच्यावर विज्ञानाचा उपयोग करणारे परंतु त्याची पद्धतीला मात्र नाकारणार्या विचारांचा पगडा आहे. त्या जागी त्यांना वैज्ञानिक तर्क आणि बुद्धिप्रामाण्यवादाची स्थापना करायची आहे. त्यांच्या मांडणीमध्ये तर्कशुद्धता आहे, मात्र त्यांची पद्धती सौम्य आहे आणि भाषा सर्वसामान्य माणसाच्या वापरातील आहे. शब्दजंजाळपणा, तर्ककठोरता यांचा स्पर्शदेखील त्या भाषेला नाही. ह्याची विशेष नोंद घ्यायला हवी.
त्यांच्या सर्वच लेखात त्यांची भूमिका संवादाची आहे. भारतीय परंपरेत ज्याला वादपद्धती म्हणतात, त्याच अंगाने अनेक लेख लिहलेले आहेत. उदाहरणार्थ- त्यांनी देव या लेखात तर सरळ सरळ देवाबाबतचे दावे, आणि त्यावरील उत्तरे हे एकसंगतपणे लिहिले आहेत.
धर्म आणि विज्ञान या लेखामध्ये त्यांनी धर्म हा प्राचीन असून विज्ञान हे गेल्या ४०० वर्षांत उदयाला आले आहे, यासहित कित्येक आक्षेपांना अत्यंत पद्धतशीरपणे उत्तरे दिलेली आहेत. ती खूपच उद्वबोधक आहेत. विज्ञानाचा एक स्वतंत्र ज्ञान शाखा म्हणून उदय गेल्या काही शतकांमधील असला, तरी भौतिक जगाचे निरिक्षणे करून त्या आधारे तर्कशुद्ध पद्धतीने साधने बनविणे, त्यात सातत्याने सुधारणा करत आपले जीवन सुलभ बनविणे ही मानवी प्रज्ञा, माणूस म्हणजे होमो सेपिअन अस्तित्वात आल्यापासूनच असल्याचे स्पष्ट दिसते. उलट धर्म नावाची संस्था हीच या तुलनेत अगदीच अलीकडची आहे. हे सांगण्यासाठी ते म्हणतात, बुद्धिच्या आधारावर त्याने (माणसाने) अग्नी माणसाळवला, चाकाचा शोध लावला, वार्याच्या शक्तीचा वापर करून जहाजे हाकारली, पवचक्क्या चालवल्या, खनिजे वितळवून धातू वेगळे केले, काच बनविली, विटा तयार केल्या, इमारती बांधल्या, औषधी विकसित केल्या, वस्त्रे विणली, अन्न शिजविण्याचा शोध लावला, पाणचक्क्या चालविल्या, कागद आणि लेखणीचा शोध लावला, काय आणि काय! अहो हे सर्व विज्ञानच होते. गॅलिलिओ आणि न्यूटनने त्यातील नियमपद्धती सिद्ध केली. म्हणून फार तर वैज्ञानिक सत्याचे नियम सिद्ध करणार्या पद्धती ३०० वर्षांच्या मानता येतील. मूळ विज्ञान हे मानवाइतकेच प्राचीन आहे… खऱे तर धर्म आणि अध्यात्म शास्त्रच त्या तुलनेने नवीन आहे. जुन्यात जुना वैदिक धर्म फार तर ५ हजार वर्षे, ज्यू धर्म साधारण तेवढाच, त्यानंतर जैन आणि बौद्ध, दोन हजार वर्षे जुना ख्रिस्ती, इस्लाम आणि त्याचे उपपंथ, सगळ्यात तरुण शीख धर्म म्हणता येईल. तत्पूर्वी कोणी ईश्वर आत्मा वगैरे चिंतन करीतही असतील, पण त्याला आधार सापडणे अशक्य आहे.
धार्मिक असहिष्णुता या अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा विषयालादेखील त्यांनी स्पर्श केला आहे. २०१० मध्ये केरळमधील टी. जे. जोसेफ या प्राध्यापकांची त्यांनी प्रेषित मोहम्मदाचा अवमान करणारे लेखन केले अशा समजूतीमधून त्यांचा हात तोडण्यात आला. त्यांची अत्यंत हृदयद्रावक अशी कथा त्यांनी टाईम्स ऑफ इंडियामधील जोसेफ यांच्या मुलाखतीमधून समोर आली. त्याचे भाषांतरच पुस्तकात एका लेखरूपात आले आहे.
एका विशेष लेखाचा उल्लेख केला नाही, तर हा पुस्तक परिचय अपूर्ण राहील. ते म्हणजे डॉ. शरद अभ्यंकर यांनी कोकणातील दापोली येथे एक पर्यायी जीवनपद्धतीचा वस्तुपाठ निर्माण करणारे आणि गतिमान संतुलन या नियतकालिकाचे संस्थापक-चालक-संपादक दिलीप कुलकर्णी यांच्या लेखन-विचाराबाबत दिलेली प्रतिक्रिया. त्यामध्ये शरद अभ्यंकर यांनी कुलकर्णी यांची पुस्तके वाचून प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रथम दिलीप कुलकर्णी यांच्याशी असणारी काही मुद्यांवरील सहमती व्यक्त केली आहे. परंतु नंतर असहमतीचे मुद्दे लिहिताना त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की, कोणत्याही भौतिक साधनांशिवाय जवळपास निसर्गशरण अवस्थेत जवळपास स्वतः प्रदूषणमुक्त अवस्थेत जगणारे समूह आपल्यासमोर दिसतात. त्यात बायकांना मारणे, दारू पिणे, हे सर्व दुर्गुणदेखील दिसतात. पण त्यांचा आनंदी जीवनाचा समाधानपट्टीवर खूप वरचा क्रमांक असू शकेल. हे जीवन प्रदूषणमुक्त असू शकेल, म्हणून ते आपले ध्येय मानायचे काय? ते म्हणतात, संसाधने संपणार आहेत, म्हणून वापरायचीच नाहीत काय? कितीही जपून वापरली तरीही ती कधीतरी संपणारच आहेत. नवीन शोध लागतील, लागत आहेत… अमेरिकेत शेल वायूचा उपयोग होऊ लागला आहे. भारतात नैसर्गिक वायू शोधला जात आहे. ते संपेपर्यंत निर्धोक अणुशक्ती निश्चित विकसित होईल. ती संपेपर्यंत सौरशक्ती परवडणार्या दरात उपलब्ध होईल. पुन्हा निसर्गाकडे चला, हे केवळ टॉलस्टॉय, गांधी, विनोबा किंवा दिलीप कुलकर्णी यांना जमू शकेल. सर्वांना नाही.
येथे मात्र असे जाणवते की, शरद अभ्यंकरांनी संसाधने संपतील म्हणून ती वापरायचीच नाहीत का? किंवा कातकरी समाजाच्या पद्धतीनुसारच जगायचे काय? असे द्वी पर्यायी प्रश्न उभे करून, प्रदूषणाच्या प्रश्न हा आता वातावरण बदलाच्या प्रश्नात रूपांतरित झाला आहे, हे गांभीर्यच नाकारल्यासारखे वाटते. त्यांचा औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळातील अनंत आणि एकदिशा विज्ञानप्रगती वरील विश्वास हा या ठिकाणी अवास्तव होताना दिसतो. विज्ञान-तंत्रज्ञान यांच्यामुळे झालेले भौतिक बदल आणि प्रगती स्वीकारताना पर्यावरण आणि माणूस यांच्यातील द्वंद्व हे एकदिश नाही. त्याचे परिणाम हे आपल्यावर येणारच. किंबहुना वातावरण बदलाचे अपरिवर्तनीय संकट काही दशकांवर आलेले असताना, मानवी जीवनविषयक सखोल अशा विवेकी आणि सर्वांगीण-परिपूर्ण (हेश्रळीींळल) दृष्टीची गरज आहे. अर्थव्यवस्थेपासून ते सांस्कृतिक जीवनापर्यंत, समाजव्यवस्थेपासून ते मूल्यांपर्यंत मूलभूत बदलाची गरज आहे. त्याची गरज डॉ. शरद अभ्यंकर यांनी काहीशी नाकारली आहे, हे पटण्यासारखे नाही. आजच्या जीवनपद्धतीला, विकासनीतीला नेमके उत्तर किंवा पर्याय कोणता? तो न देता केवळ प्रदूषणाबद्दल बोलणे किंवा नकारात्मक मांडणी करणे योग्य नाही, असे त्यांना वाटत असावे. ते योग्य आहे. परंतु त्या पर्यायाचा शोध घेण्याचा प्रयत्नांची दाद डॉ. शरद अभ्यंकर यांच्यासारख्या विज्ञाननिष्ठ लेखकाकडून अपेक्षित आहे. त्यामध्ये दिलीप कुलकर्णी यांचे योगदान किंवा मर्यादा यांचा विचार केला पाहिजे. याची नोंद मुद्दाम करत आहे.
अखेरीस एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक मुद्द्याबाबत. तो म्हणजे धर्म-धर्मश्रद्धा इत्यादींच्या नावाखाली समाजात जी असहिष्णुता, हिंसाचार सुरू आहे, त्याबाबत डॉ. शरद अभ्यंकर यांनी घेतलेली स्पष्ट आणि निखालस भूमिका. लेखसंग्रहात ती सर्वत्र दिसते.
विशेषतः सुशिक्षित दहशतवादी या शीर्षकाखाली आलेली एक चौकट आपले लक्ष वेधून घेते. त्यात डॉ. शरद अभ्यंकर म्हणतात, ‘शंबुकाचा वध करणारा श्रीराम, येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवणारे यहुदी, चेटकी ठरवून निरपराध स्त्रियांना जिवंत जाळणारे ख्रिस्ती, विधवांना जबरदस्तीने सती पाठवणारे हिंदू, हजारो ज्यूंचा बळी घेणारे जर्मन, गांधींचा खून करणारा नथुराम, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी अन्य धर्मियांच्या कत्तली करणारे धर्मांध, बाबरी मशीद पाडणारे अतिरेकी, केवळ संशयापोटी प्राण घेणारे गोरक्षक, अल कैदा, तालिबान, लष्कर ए तोएबा, इस्लामिक राज्य, आणि दाभोलकर ते गौरी लंकेश यांचे मारेकरी हे सर्वजण धर्मासाठीच ही अधम कृत्ये करत होते. धर्म या संकल्पनेमुळे मानवाची लाभापेक्षा हानीच जास्त झाली आहे हे मान्य करून आता तरी सुजाण लोक कालबाह्य धर्मांचे ओझे फेकून देऊन मानवतावाद आणि विज्ञाननिष्ठा हाच नव्या युगाचा धर्म स्वीकारतील काय?
समाजाने स्वतःच डोळ्यांवर चढविलेला अंधत्वाचा चष्मा काढावा यासाठी, कोणत्याही प्रसिद्धी-पद यांच्या निरपेक्षपणे गेली ५० वर्षांहून अधिक काळ वाईसारख्या तालुक्याच्या ठिकाणी सातत्याने प्रयत्नशील असणारे डॉ. शरद अभ्यंकर यांचे या पुस्तकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. कारण ते बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार सतत रोजच्या जीवनात जगतात. जीवनात आलेल्या अत्यंत कठीण प्रसंगात, आजारपणात त्यांची ही दृष्टी तितकीच स्पष्ट राहते. या पुस्तकाची वाचकांसाठी भरघोस शिफारस. अधिक लेखनाच्या अपेक्षेमध्ये.
पुस्तकाचे नावः जरा डोळस होऊ!
लेखक : डॉ. शरद अभ्यंकर, वाई
प्रकाशक : महाजन पब्लिशिंग हाऊस,
२२७, सदाशिव पेठ, पुणे.
फोन : ०२०-२४३३३६६६
किंमत : २५५ रुपये