सुभाष थोरात - 7218534593
“एक काळा मुलगा
हात धरून उभा आहे
बर्फ वर्षावात
गोरा होईपर्यंत”
एका अमेरिकन कवीची ही कविता अमेरिकेतील वर्णभेदावर नेमकं बोट ठेवणारी आणि भेदक भाष्य करणारी आहे. आफ्रिकेच्या जंगलात मुक्तजीवन जगणार्या काळ्या जनतेला खाणी, शेतमळ्यांमध्ये काम करण्यासाठी साखळदंडाने जखडून अमेरिकेत आणले गेले आणि अमानुष स्वरुपाची गुलामगिरी त्यांच्यावर लादली गेली.
अमेरिकेचा शोध लावणार्या कोलंबसच्या धाडसाचे आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून कौतुक करतो; पण कोलंबसने अमेरिकन भूमीवर पाऊल ठेवले, तेव्हा विस्मयचकित झालेल्या रेड इंडियन जनतेने त्याला अभिवादन केले; पण त्या बदल्यात कोलंबसाने मात्र त्यांची कत्तल आरंभली. अमेरिकेतील रेड इंडियन जनतेने बाहेरून आलेल्या वसाहतवाद्यांचे वर्चस्व कधीच मान्य केले नाही. आपल्या मायभूमीवर आक्रमण करणार्या या वसाहतवाद्यांच्या विरोधात ते सातत्याने लढत राहिले आणि जवळजवळ संपून गेले. आज जे काही थोडे रेड इंडियन उरले आहेत, त्यांच्यासाठी ‘राखीव प्रांत’ करून त्यांची पर्यटनस्थळे बनवली आहेत, त्यांचे वारसदार आपले पूर्वज कसे राहत होते, याची पर्यटकांना माहिती देऊन पोट भरतात.
त्यामुळे अमेरिकेतील खाणी आणि शेतमळ्यांवर काम करण्यासाठी काळ्या जनतेला जबरदस्तीने आणले गेले. गुलाम बनविले, गुलामगिरीच्या समर्थनार्थ रंगभेदाचे तत्त्वज्ञान जन्माला घातले. अमेरिकेचा गेल्या चारशे वर्षांचा इतिहास काळ्या जनतेच्या आणि साम्राज्यवादाच्या माध्यमातून तिसर्या जगातील जनतेच्या शोषणाने, रक्ताने बरबटलेला आहे. रंगभेद, वंशभेद, जातिभेद वा धर्मभेद अशी माणसामाणसांत भेदभाव निर्माण करणारी सर्व तत्त्वज्ञाने अखेर एका आर्थिक शोषणाच्या प्रक्रियेला शाबूत ठेवण्यासाठीच सत्ताधारी वर्गाकडून जन्माला घातली जातात. कष्टकरी जनतेचे शोषण विनासायास करता यावे, तिच्या श्रमाचा कायम उपभोग घेता यावा, यासाठी दमनशक्तीबरोबरच अशा तत्त्वज्ञानांना जन्म दिला जातो.
त्यांच्या संस्कारातून जनतेचे माणूसपण नष्ट केले जाते. ते नष्ट करण्यासाठी वाट्टेल ते अमानुष हातखंडे वापरले जातात. उदाहरणार्थ – दक्षिण अमेरिकेत गोर्या जमीनदारांनी जे कुत्रे पाळले होते, त्या कुत्र्यांना काळ्या जनतेचा द्वेष करायला शिकवले होते. या कुत्र्यांना ‘गोरा कुत्रा’ असेच संबोधित. काळा माणूस पाहिला की, हे कुत्रे हिंस्त्र होऊन त्याच्यावर तुटून पडत असे. अशा पद्धतीने काळ्या जनतेवर दहशत बसवली जात असे.
अमेरिकेतील काळ्या जनतेच्या शोषणाचा इतिहास आणि भारतातील दलित जनतेच्या शोेषणाचा इतिहास (जो आजही सुरू आहे) हे मानवी इतिहासातील पराकोटीच्या अमानवीपणाचे धगधगते उदाहरण आहे.
अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सुप्रसिद्ध अमेरिकन यादवी युद्धामुळे रंगभेदाचा प्रश्न खर्या अर्थाने जागतिक पातळीवर चर्चेला आला. दक्षिण अमेरिकेतील जमीनदारांच्या जमिनीवर गुलाम म्हणून राबणार्या काळ्या जनतेची उत्तर अमेरिकेतील भांडवलदारांना मजूर म्हणून गरज होती. या गरजेतून जरी हे यादवी युद्ध खेळले गेले असले, तरी त्यातूनच पुढे अमेरिकेत वर्णभेदविरोधी कायदा अस्तित्वात आला. रंगभेदाविरुद्धच्या चळवळी वाढल्या आणि मुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले. जरी कायद्यामुळे अशा गोष्टी लगेच नष्ट होत नाहीत, (अस्पृश्यताविरोधी कायद्याचा आपल्याला अनुभव आहे) तरी कायद्याच्या पातळीवर समानता प्रस्थापित झाली, ही प्रगतिकारक गोष्ट होती. फक्त दक्षिण अमेरिकेतील गोर्यांनी आपला वंशवादी रानटीपणा तसाच चालू ठेवला आहे आणि आजही ब्रिटन, अमेरिकेत रंगभेदाचा उघड पुरस्कार करणारे वंशवादी अस्तित्वात आहेत; किंबहुना गेल्या काही वर्षांत त्यांच्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
बिघडत जाणार्या आर्थिक स्थितीच्या परिणामी ज्या भावना इतिहासात मौजूद असतात, त्या भावना पुन्हा उफाळून येतात. आपण आपल्या देशात पाहू शकतो की, आरक्षणाच्या विरोधात जे आज आवाज उठत आहेत, ते बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या परिणामी आहेत. त्यामुळे जातीबद्दलच्या जुन्या भावना पुन्हा उफाळून येत आहेत. जातिद्वेष उघडपणे व्यक्त होत आहे.
कायद्याने सर्व प्रश्न सुटतात, असे नाही; परंतु प्रश्न सोडवण्यास मदत होते. प्रश्नांची तीव्रता कमी करता येते; शिवाय अत्याचारित जनतेला एक प्रकारे व्यवस्थेकडून दिलासा मिळतो. आपल्याकडील अॅट्रॉसिटीचा कायदा अशाच स्वरुपाचा आहे. त्यामुळे अत्याचार थांबले नाहीत; पण उघडपणे, सर्रासपणे ते केले जायचे, त्याची तीव्रता कमी झाली आहे. या कायद्याने काहीएक धाक निर्माण केला आहे. त्याच पद्धतीने अमेरिकेत काळ्या जनतेबद्दल बोलता येईल. त्यांच्यावरील अत्याचार आजही सुरूच आहेत आणि शुल्लक कारणाने त्यांना ठार मारले जाते आणि यामध्ये पोलीस यंत्रणाच कायद्याला पायदळी तुडवते. न्याय यंत्रणा गोर्यांच्या बाजूने उभी राहते, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये यासंदर्भात भीषण परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकन अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांची निवड झाली होती. त्यावेळी आता वंशभेद नष्ट होणार, ओबामा निवडून येणे, हे त्याचेच प्रतीक आहे. अशा स्वरुपाच्या भाबड्या आशा निर्माण झाल्या होत्या; पण नंतरच्या घटनांनी या आशा खोट्या ठरवलेल्या आहेत.
आजही जेव्हा जॉर्ज फ्लॉइडच्या संदर्भात जी अमानुष घटना घडली आहे, या घटनेच्या विरोधात अवघी अमेरिकन जनता एकवटली आहे. गोरी जनता मोठ्या प्रमाणात निदर्शनात सामील झाली आहे. त्यामुळे पुन्हा भाबडी आशा निर्माण झाली आहे; पण या संदर्भात फार भाबड्या पद्धतीने पाहिले जाऊ नये.
खुद्द अमेरिकेत सोशल मीडियावर ‘जॉर्ज फ्लॉइड चॅलेंज’सारखे ग्रुप एकमेकांच्या मानेवर गुडघे दाबून या हत्येचे विडंबन करीत आपली वंशवादी मानसिकता उघडपणे दाखवत आहेत; तर इंग्लंडमध्ये गोर्या वंशवादी लोकांनी या हत्येच्या विरोधात काढलेल्या मोर्चाविरुद्ध मोर्चा काढला आहे. यावरून त्यांना कसला खेद, ना कसली लाजलज्जा. पूर्वग्रह आणि द्वेषाने ते ओतप्रोत भरलेले आहेत. जसे आपल्याकडे अजूनही ब्राह्मण्यवादी विचारसरणीला चिकटून असणारे, मोठमोठी ब्राह्मण संमेलने भरवून आपण ब्राह्मण असल्याचा डंका पिटणारे आपल्याला दिसून येतात; तसेच अमेरिकेतील वंशभेदाने पछाडलेले अनेक सनातनी गट अस्तित्वात आहेत. त्यांनीच लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग, केनेडी यांची हत्या केली आहे.
मार्टिन ल्यूथर किंग यांच्या चिरंजीवाने ओबामांच्या निवडीनंतर लेख लिहून या ऐतिहासिक घटनेबद्दल भावनिक न होता वास्तववादी भूमिका घेतली. त्यांनी म्हटले होते, “रंगभेद संपुष्टात येण्याच्या दिशेने मिळालेली संधी,” असे ओबामांच्या निवडीवर भाष्य केले होते. त्याची सत्यता आज पटते आहे.
एखादी समाजव्यवस्था जी भावना, जी मूल्ये, विचार रुजविते त्या भावनांचे, विचारांचे अनेक वर्षे व्यक्तींवर, जातींवर, समूहांवर संस्कार होत राहतात. त्यातून एक मानसिकता आकार घेते. ज्या व्यवस्थेत मानसिकता घडते ती व्यवस्था नष्ट झाल्यानंतर ही मानसिकता टिकून राहते. ती मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. ही मानसिकता बदलण्यासाठी भौतिक परिस्थितीत बदल घडवून आणणे, ही एक पूर्वअट असते, म्हणजे मानसिकतेचे भौतिक आधार नष्ट करणे, ही प्राथमिक गरज असते; पण त्यानंतरही सातत्याने ही भावना नष्ट करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असते.
या पार्श्वभूमीवर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणे किंवा मायावती भारताच्या पंतप्रधान होणे, या घटना स्वागतार्ह आहेत, प्रगतीच्या दिशेने जाणार्या आहेत; परंतु त्यामुळे अमेरिकेतील रंगभेद आणि भारतातील जातिभेद नष्ट होतील, असे समजणे हा वेडेपणा आहे. यासाठी क्यूबामध्ये जशी समाजवादी क्रांती झाली, तशी क्रांती होणे गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेतील गोर्या फॅसिस्ट राजवटीविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केलेल्या थोर गायिका मरियम मकेबा आपल्या चार वर्षांच्या नातवाला घेऊन क्यूबामध्ये क्रांती झाल्यानंतर फिडेल कॅस्ट्रो यांना भेटायला गेल्या होत्या. नातवाचे नाव त्यांनी लुमुम्बा ठेवलंय. तो फिडेल कॅस्ट्रो यांना प्रश्न विचारतो, ‘तुम्ही क्रांतिकारक आहात?’ फिडेल उत्तर देतात ‘हो.’ मग लुमुम्बा गोंधळात पडतो, चिंताक्रांत होतो. तो फिडेलकडे पाहत पुटपुटतो, ‘तू गोरा आहेस ना?’ बिचार्या लुमुम्बाला वाटतं, फक्त काळी माणसंच क्रांतिकारी असू शकतात. नंतर फिडेल त्याला उचलून घेतात आणि सांगतात, ‘हे बघ बाळा, क्यूबामध्ये आफ्रिकेतून आलेले लोक आहेत; आम्ही काळे देखील आहोत, तसेच गोरे देखील आहोत; परंतु आम्ही सारे क्यूबन आहोत आणि आम्ही सर्व क्रांतिकारक आहोत.’ या ठिकाणी क्यूबन समाजवादी क्रांतीचा उल्लेख यासाठी केला की, असे प्रश्न जे मालमत्तेच्या अधिकारातून निर्माण होतात, ते प्रश्न मालमत्ता निर्माण करणारी उत्पादनाची साधने सर्व जनतेच्या मालकीची असतील आणि माणसाकडून माणसाचे होणारे शोषण बंद असेल, तरच असले प्रश्न पूर्णपणे सुटू शकतात. उत्पादनाची साधने गोर्या लोकांच्या आणि भारतात उच्च जातियांच्या हातात जोपर्यंत राहतील, तोपर्यंत ना काळ्या जनतेची मुक्तता होऊ शकते, ना भारतात दलित जनतेची मुक्तता होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक समतेचा आग्रह त्यासाठीच होता.