विज्ञानातील नोबेल शलाका

अनिल चव्हाण -

डॉक्टर तेजस्विनी देसाई यांचे विज्ञानातील नोबेल शलाका पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्या पदार्थ विज्ञान विषयात पीएच.डी. असून आपली प्राध्यापकी सांभाळत त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पदार्थ विज्ञान विषयाच्या पुस्तकांचे लेखन केले आहे! महिला सबलीकरण, भारतीय महिला शास्त्रज्ञ, मूल्य शिक्षण अशा विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत; लेख लिहिले आहेत. या पुस्तकात त्यांनी नोबेल पारितोषिक मिळवलेल्या महिला शास्त्रज्ञांची ओळख करून दिली आहे.

नोबेल पारितोषिक म्हणजे जागतिक मानांक असलेला आणि अत्यंत उच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार! तो दरवर्षी १० डिसेंबर रोजी दिला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यक शास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रात, वैशिष्ट्यपूर्ण अशा अतुलनीय संशोधनासाठी किंवा कामगिरीसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते.

सर अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद करून ठेवली. ते स्वीडिश रसायन शास्त्रज्ञ, अभियंता आणि डायनामाइटच्या शोधाचे जनक होते. त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ पाच वर्षांनी म्हणजे सन १९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. १९०१ ते २०२१ या कालावधीत रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र या सर्व शाखांमध्ये ६२९ शास्त्रज्ञ नोबेल विजेते आहेत. त्यापैकी फक्त २३ शास्त्रज्ञ महिला आहेत. विशेष म्हणजे, मॅडम मेरी क्युरी या महिला शास्त्रज्ञाने हा सन्मान दोन वेळा पटकावला आहे. मेरी क्युरीच्या किरणोत्सारिता या संशोधनाने भौतिक, रासायनिक व वैद्यकीय क्षेत्रात नवे युग जन्माला आले. शिवाय नोबेल पारितोषिकाने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत.

नोबेल पारितोषिक दोन वेळा मिळूनही त्यांनी आपल्या संशोधनाचे कुठलेही पेटंट घेतलेले नाही. संशोधन सर्वांसाठी खुले ठेवले आहे. लेखिकेला हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांचे शिक्षक, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील सर यांनी प्रेरणा दिली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.

शास्त्रज्ञांच्या जीवनावर पुस्तक लिहायचे म्हटल्यावर लेखिकेने शोध सुरू केला. त्यांच्या लक्षात आले की, पुरुष शास्त्रज्ञांबाबत मराठीत बरेच लिखाण प्रकाशित झाले आहे. पण नोबेल विजेत्या महिला शास्त्रज्ञांना मात्र मराठी लेखकांनी तितकासा न्याय दिलेला नाही. त्यांच्या जीवनावर अत्यंत त्रोटक साहित्य उपलब्ध आहे.

लेखिका पदार्थ विज्ञानाच्या अभ्यासक आहेत. त्यांनी रसायन आणि वैद्यकीय शास्त्रातील संकल्पना प्रयत्नपूर्वक समजून घेतल्या आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे!

महिला शास्त्रज्ञांचा जीवन प्रवास खाचखळग्यांनी आणि अनेक संकटांच्या काट्याकुट्यांनी भरलेला आहे. त्यांच्या अडचणी केवळ वैज्ञानिकाला येणार्‍या अडचणी नसून, एक स्त्री म्हणून संधी नाकारण्यापासून, प्रापंचिक जबाबदार्‍या पार पाडताना त्यांना करावी लागणारी कसरत, असा दुहेरी सामना त्यांना करावा लागला. पण जिद्द, अमाप कष्ट करण्याची तयारी, प्रचंड आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हा खडतर प्रवास त्यांनी सहजपणे पार केला आहे.

‘चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे विश्व’ असं मानून सोनेरी पिंजर्‍यात तिला कैद करणारी संस्कृती, केवळ भारतासारख्या विकसनशील देशाचीच नाही, तर स्वतःला प्रगत आणि प्रगल्भ समजणार्‍या तथाकथित विकसित देशातील स्त्रियांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.

१९२० पर्यंत युरोपमध्ये हायस्कूलपर्यंत शिक्षण हे मुलीसाठी अंतिम मानले जात असे. ऑस्ट्रियामध्ये तर वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच मुलींना शिकवले जाई. मुलींनी शिकणे म्हणजे गृहिणी पदासाठी आवश्यक कौशल्य म्हणजे पाककला, शिवणकाम, विणकाम, बालसंगोपन आत्मसात करणे, असे मानले जात असे. १९२७ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात मुलींचे प्रमाण दर पाच मुलामागे एक मुलगी; तर केंब्रिज विद्यापीठात आठ ते नऊ मुलांमागे एक मुलगी असे होते. तरीही ऑक्सफर्ड विद्यापीठातील पुरुषांनी या विरोधात आवाज उठवला आणि मुलींच्या संख्येवर बंधन घालणारा नियम बनवला. खर्‍या अर्थाने तेथे सहशिक्षण सुरू व्हायला १९७० साल उजाडावे लागले. मुलीसाठी आणि मुलांसाठी असणारा शालेय अभ्यासक्रम तेव्हा वेगळा असायचा. उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे शास्त्र, गणित, ग्रीक, लॅटिन हे विषय मुलीसाठी वर्ज्य मानले जात. ज्या मुलीला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तिला या विषयाची वेगळी शिकवणी लावावी लागे.

गर्टी कोरीने एका वर्षात, आठ वर्षांचा लॅटिन आणि पाच वर्षांचा गणित आणि विज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. रिटा लेविने वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक ग्रीक, लॅटिन, विज्ञान, गणित या विषयांचे अभ्यासक्रम आठ महिन्यात पूर्ण केले.

मेरी क्युरीने मुलीसाठी असणार्‍या फ्लाईंग विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे विद्यार्थी व शास्त्रज्ञांच्या गुप्तपणे चर्चा चालत. बर्लिनमधील रसायनशास्त्र संस्थेमध्ये लीज व्हाईटनरला ‘तळघरातील छोटी खोली सोडून इमारतीत दुसरीकडे कुठेही प्रवेश करायचा नाही’, या अटीवर प्रवेश मिळाला. साफसफाई करणार्‍या महिलेव्यतिरिक्त इतर कोणत्याही महिलेला येथे प्रवेश निषिद्ध होता. लीज माईटनरला व्याख्याने सुद्धा लपून-छपून ऐकावी लागत. लीज आणि ऑटोहान यांनी मिळून बरेच निबंध लिहिले होते. तेव्हा एका विश्वकोशाच्या संपादकाने श्री. माईकनर यांना आणखीन निबंध लिहिण्याविषयी सुचवले; पण जेव्हा त्याला श्री. माईकनर श्री. नसून कु. माईकनर आहे, हे समजले, तेव्हा त्याला धकाच बसला. एखाद्या स्त्रीचे लिखाण प्रसिद्ध करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही, असे सांगून त्यांनी पुढील लेखन छापण्यास नकार दिला.

या शास्त्रज्ञ महिलेला पुरुषी मानसिकतेबरोबर लढा द्यावा लागलाच. पण आर्थिक, धर्म, वर्ण, राष्ट्रभेद या सर्वच आघाड्यांवर त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला. उच्च शिक्षणाचा खर्च मेरी क्युरी, रोझालिनी यालो, एलियन यांना परवडणारा नव्हता. न्यूयॉर्कमधील हंटर कॉलेजसारख्या काही संस्था शैक्षणिक फी आकारत नव्हत्या; म्हणून गर्टड एलियन, रोझालियन यालो, यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले.

अदा योनॅथने पैसे कमावण्यासाठी गणिताची शिकवणी घेणे, मुलांचे संगोपन, साफसफाई अशी कामे केली. गर्टडने खाजगी सचिव सारखी अनेक छोटी-मोठी कामे केली. गर्टी आणि कार्ल कोरी यांच्या विवाहाला कार्लच्या घरच्यांचा विरोध होता. गर्टीचे ज्यू असणं कार्लच्या प्रगतीला मारक ठरेल असं त्यांचं म्हणणं. दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान ज्यू लोकांच्या सार्वजनिक जीवनावर बंदी आणणारा जाहीरनामा इटलीमध्ये मुसोलिनीने प्रसिद्ध केला. तेव्हा रिटा लेवीला आपले संशोधन लपून-छपून करावे लागले. घराच्या बेडरूममध्ये तिने आपली प्रयोगशाळा थाटली. तिचे संशोधन प्रसिद्ध करण्याची इटलीत बंदी होती. कितीतरी दिवस तिच्या परिवाराला भूमिगत राहावे लागले.

अशा सर्व अडचणींवर मात करून या सर्व संशोधक महिला आपल्या ध्येय मार्गावरून चालत राहिल्या. पण तरीही यश त्यांच्यापासून कोसो दूर होते. त्यांची शैक्षणिक कारकिर्द श्रेष्ठ असूनही विद्यापीठ संशोधन संस्थांमध्ये त्यांना कायमस्वरूपी पद मिळणे कठीण होते. पदोन्नती तर फारच दूर! मेरी क्युरी, माईकनर यांनी कित्येक वर्षे विनावेतन काम केले. अमेरिकेतील परिस्थितीही फार वेगळी नव्हती. तेथे विद्यापीठात मुलींना विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळायचा, पण संशोधक म्हणून नाही. मारिया गोपर्ट मेयरने अमेरिकन विद्यापीठात कुठल्याही पदाविना काम केले. पिष्टमय पदार्थांचे चयापचय क्रियेच्या संशोधनात कार्ले इतकाच गर्टीचा वाटा असूनही अनेक विद्यापीठाने कार्लला संधी दिली, पण गर्टीला नाकारले. तसेच त्याला एकामागून एक अनेक सन्मान मिळाले. वॉशिंग्टन विद्यापीठात कुलगुरू डॉ. अर्थर कॉम्पटन यांनी गर्टीसाठी खास पद निर्माण केले. पण तिचे वेतन कार्लच्या फक्त दहा टके इतके होते. गर्टीला नोबेल सन्मान मिळाल्यानंतर प्राध्यापक पद मिळाले. गर्टीला एका मुलाखतीदरम्यान मुलीमुळे इतरांचे लक्ष विचलित होऊ शकते, असे सांगण्यात आले.

दुसर्‍या महायुद्धाने एकूणच मानवजातीचे अतोनात नुकसान केले, पण याच महायुद्धाने अनेक बुद्धिमान स्त्रियांसाठी संधीची कवाडे खुली केली, असे खेदाने म्हणावे लागते. गर्टी कोरी, रोजालनी यालो यांना सहयोगी प्राध्यापक पद मिळाले, तर गर्टडला एका प्रयोगशाळेत काम मिळाले.

बर्‍याचदा विभागातील संशोधकांच्या सभेला महिला संशोधकांना बोलावले जात नसे. निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग नसे. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर सुद्धा फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सच्या सभासदपदी मेरी आणि आयरिनची वर्णी लागली नाही.

असा सर्वत्र काळोख पसरला असताना सुद्धा या महिला शास्त्रज्ञ त्यातून वाट काढत राहिल्या. या वेळी त्यांना त्यांच्या घरच्यांचा, जोडीदाराचा भकम पाठिंबा मिळाल्याचे दिसते.

मेरी क्युरी, मारिया मेयर, गर्टी कोरी, डोरोथी हाजकिंन, रोझालिनी यालो या महिला संशोधकांना जोडीदाराचा भकम पाठिंबा मिळाला. त्यांनी प्रसंगी प्रापंचिक जबाबदारीही स्वतःच्या शिरावर घेतली. संशोधनासाठी योग्य सुविधा दिल्या. आणि शोधनिबंधावर त्यांचे नाव येईल असे पाहिले!

२०१५ साली तू युयु या चिनी संशोधिकेला वैद्यकशास्त्रातले नोबेल पारितोषिक जाहीर झाले. तिची माहिती सांगताना लेखिका म्हणते “तो चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता. त्यामुळे बर्‍याचशा विचारवंत, बुद्धिवंत आणि संशोधकांवर बंदी होती. तसेच उदारमतवादी धोरण नसलेने बहुतांशी शोधनिबंध फक्त चिनी संशोधन पत्रिकेतच प्रकाशित केले जात. त्या वेळी १९६४ मध्ये व्हिएतनामने चीनचे अध्यक्ष माओ यांना मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती मान्यही केली.

परदेशातून भारतात येणारी माहिती साम्राज्यवादी देशांतून संस्करण होऊन येते. त्यामुळे साम्राज्यवादी देशात लोकशाही असून त्यांचे कट्टर शत्रू असलेल्या साम्यवादी देशात हुकूमशाही आहे; पोलादी पडदा आहे असा समज घट्ट झालेला आहे. याचे प्रत्यंतर लेखांमध्ये येते.

भांडवलदारी देशात शिक्षण आणि आरोग्य या सेवाभावी कार्याला बाजारी स्वरूप आले आहे. शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशावेळी चीनमध्ये

‘बेअर फूट डॉक्टर’ ही कल्पना राबवण्यात आली. खेड्यापाड्यापर्यंत मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. आपल्याकडील ‘आशा वर्कर’ ही कल्पना त्यावरूनच घेण्यात आली.

अमेरिकेने व्हिएतनामवर साम्राज्यवादी युद्ध लादले त्या काळात मलेरियाचा मोठा उद्भव झाला. लाखो अमेरिकन सैनिक आणि तसेच व्हिएतनामी सैनिक मलेरियाला बळी पडले.

तेव्हा चीन मदतीला धावला. पाचशे डॉक्टरांचे वैद्यकीय पथक त्यांनी व्हिएतनामला पाठवले. त्याच्या प्रमुख होत्या तू युयु. त्यांनी प्राचीन चिनी वैद्यकशास्त्राची सांगड आधुनिक शास्त्राशी घालून औषध शोधून काढले. १७०० वर्षांपूर्वीच्या ग्रंथामध्ये त्यांना एक वाक्य सापडले, “ओंजळभर विंग हाऊ दोन लिटर पाण्यात भिजवून त्याचा रस प्राशन केल्याने मलेरियाच्या तापाला उतार पडतो.”

तापमान वाढवल्याने औषधी गुणधर्म नष्ट होतात म्हणून केवळ भिजवून कमी तापमानाला रस काढला पाहिजे, या निष्कर्षानुसार त्यांनी प्रयत्न केले आणि मलेरियावरचे औषध शोधले.

१९७३ मध्ये मलेरियावर औषध शोधूनही पारितोषिक मिळाले २०१५ साली. यामागे जागतिक राजकारणातील संघर्ष आणि एकीचा संदर्भ आहे. याचाही अभ्यास या निमित्ताने करता येईल!

या संशोधकांचे विज्ञानावर अतीव प्रेम होते. प्रखर ज्ञान निष्ठा होती. त्याचबरोबर संगीत, प्रवास, गिर्यारोहण, वाचन, पाककला अशा विविध गोष्टींमध्ये त्यांना रस होता. सगळ्याच जणी आपले आयुष्य स्वच्छंदीपणे जगल्या. आयुष्याचा मनमुराद आनंद घेतला.

या पुस्तकात लेखिकेने महिला संशोधकांनी केलेल्या संशोधनाची शास्त्रीय माहिती, महिला संशोधकांचे थोडक्यात चरित्र आणि त्यांचे सामाजिक विचार यांचा आढावा घेतला आहे. अशाच शास्त्रीय पुस्तकांची लेखिकेकडून अपेक्षा आहे.

२०० पानांच्या या पुस्तकाची किंमत ३२५/- असून, अनुबंध प्रकाशन, पुणे यांनी ते प्रसिद्ध केले आहे.

पुस्तकासाठी संपर्क : ९३७३७ १८६६६

अनिल चव्हाण


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]