अनिल वेल्हाळ -
१२ मे हा आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस होय. त्यांनी आपल्या कामातून नर्सिंग व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणून १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरात ‘परिचारिका दिन’ म्हणून विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो.
परिचारिकांचे काम हे अत्यंत कष्टाचे व महत्त्वपूर्ण असे असते. त्या केवळ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णाला औषधे देत नाहीत, तर त्याबरोबरच रुग्णाची स्वच्छता त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळाही त्या सांभाळत असतात. त्यांच्या या कामाप्रति आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या पाच वर्षांपासून पुणे शहरातील विविध रुग्णालयांत काम करणार्या परिचारिकांचे वैचारिक पुस्तके भेट देऊन सत्कार करीत असते.
त्यानुसार, या वर्षी सदर सत्काराचा कार्यक्रम एस. एम. फाउंडेशन सभागृह, नवी पेठ येथे पार पडला. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मेट्रन विमल केदारी या प्रमुख पाहुण्या, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी बोलताना विमल केदारी म्हणाल्या की, डॉक्टर हे रुग्णालयाचा मेंदू आहे, असे समजले तर नर्स ही रुग्णालयाचे हृदय आहे. कोरोनानंतर सर्व परिचारिकांवर कामाचा अति भार आला आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. परिचारिकांच्या कामाचे स्वरूप पाहिले, तर त्या नेहमी वैज्ञानिक पुराव्यावर आधारित काम करीत असतात. परिचारिका प्रशिक्षणात सकस आहार, मानसिक आधार, पर्यावरणीय आणि परिसराची स्वच्छता याचे महत्त्व सांगितलेले असते.
परिचारिकांच्या वतीने येरवडा मनोरुग्णालयातील सिल्व्हीना शिंदे म्हणाल्या, “बर्याच वेळा मनोरुग्णाचे नातेवाईक सांगतात की, रुग्णावर करणी केली आहे, जादूटोणा केला आहे, पण आम्ही त्यांना सांगत असतो की, असे काही नसते. रुग्णाला मानसिक आजार झाला आहे आणि तो नियमित औषधोपचाराने बरा होऊ शकतो. मनोरुग्ण हे घरात आणि समाजात दुर्लक्षित आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानसिक आजारावर करीत असलेले काम खूप महत्त्वाचे ठरते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अरुण बुरांडे यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेमध्ये परिचारिकांच्या सेवेचे, रुग्णांचे आलेले अनुभव सांगितले. त्यांनी परिचारिकांच्या कामात असलेले कारुण्य, ममता, काळजी यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच वैद्यकीय सेवेत फ्लॉरेंस नाईटिंगेल इफेक्ट कुठे कुठे पसरला आहे, याची अनेक उदाहरणे देऊन विस्तृत विवेचन केले.
रुग्णाची करुणायुक्त काळजी घेणे यावर फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा अधिक भर होता. परिचारिकेने तिच्या नोकरीत नियुक्ती झाल्यानंतर घ्यायची प्रतिज्ञा त्यांनी तयार केली. त्याचा सारांश असा : “मी स्वतः कोणताही मादक पदार्थ घेणार नाही आणि तो रुग्णालाही देणार नाही. मी माझ्या रुग्णांना आनंदाने सेवा देईन आणि त्या कामात आरोग्यपूर्ण व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करेन.”
फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ जागतिक पातळीवर दरवर्षी फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी श्रीपाल ललवाणी, मेघना हांडे व अन्य परिचारिकांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिलिंद देशमुख यांनी अनोख्या पद्धतीने डॉ. अरुण बुरांडे यांचेकडून पाणी भरलेला व वात नसलेल्या दिव्याचे प्रज्वलन करून घेतले. अनिल वेल्हाळ यांनी संतांचे विचार अंधश्रद्धा निर्मूलनाला कसे पूरक होते, ते उदाहरणासह सांगितले.
या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपरोक्त पदाधिकार्यांसह अॅड. राम धुमाळ, नंदिनी जाधव, राहुल माने, महाराष्ट्र अंनिस ग्रंथ दिंडीचे विश्वास पेंडसे, भारत विठ्ठलदास, प्रकाश शिरसाट, सुरेश बावणकर, बाळकृष्ण लोंढे, प्रकाश सोनवणे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे शहरातील विविध रुग्णालयांतील खालील परिचारिकांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित पुस्तक व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा अंक देऊन सत्कार करण्यात आला.
ससून हॉस्पिटल : जयश्री शशिकांत पाटील, सुनंदा रावसाहेब शिरसाट, जयश्री एडवर्ड आढाव, ट्रेसा अल्बर्ट भोसले, अनिकेत विलास दातार केईएम हॉस्पिटल : आरती पाथरकर, रुपाली अमोलिक ससून हॉस्पिटल : पुष्पा रावसाहेब येठेकर, मंगला बबनराव काळे संजीवन हॉस्पिटल : स्वाती अमोल कानडे, मेघमाला विनायक वाघमारे बुधरानी हॉस्पिटल : पूजा कचरे जयाबाई सुतारकाम दवाखाना, कोथरूड : स्वाती ढमाले परिमंडळ क्रमांक १ हॉस्पिटल : सपना गुलाब शिंदे दळवी हॉस्पिटल : वर्षा गवई कमला नेहरू हॉस्पिटल : अर्चना न्हावकर मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह : सविता माने जहांगीर नर्सिंग होम : कौसर शेख, जया चोपडे प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा : राखी दौंड, मनोरुग्ण तज्ज्ञ वसुंधरा मठपती, अधिपरिचारिका सूर्या सह्याद्री हॉस्पिटल : प्रीती पिंपळेकर, रश्मी कुडले
-अनिल वेल्हाळ, पुणे
पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (मो. ९४३१६०५८४८)
