अण्णा कडलासकर -
दिवाळी सुट्टीपूर्वी कोणत्याही शाळेत जा, मुलांना प्रश्न विचारा! “मुलांनो, तुम्हाला लवकरच कोणत्या सणाची सुट्टी मिळणार आहे!”
मुलांचा प्रतिसाद असतो “दिवाळी!”
दुसरा प्रश्न विचारा, “दिवाळीत तुम्ही काय करणार?, एकसुरात उत्तर येते, “फटाके!!!”
तिसरा प्रश्न विचारा, “फटाके वाजवण्याचा, फोडण्याचा फायदा काय?” तर मुले “जोरदार कल्ला.”
नववर्षाच्या मध्यान्हीपासून फटाके फोडण्याची सुरुवात जगभर होते. आपल्याकडे निवडणुकीचा जल्लोष! क्रिकेट मॅच जिंकली! नेताजींचे स्वागत असो की, घरच्या बाळाचा वाढदिवस. लवंगी फटाक्यांपासून ते धडामधूम आवाज आणि धूर करत आकाशात रंगीबेरंगी ठिणग्यांची नक्षी तयार करणारे फटाके, सुतळी बॉम्ब, अनार अथवा भुईनळे यांचा वापर आजकाल नवी संस्कृती म्हणून रुजू झाला आहे. देशभर मात्र दिवाळी सण आला की कपडे, खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू यांच्या दुकानांबरोबरच फटाक्यांची दुकाने गावोगावी सजू लागली आहेत.
दरवर्षी ६००० कोटी ते १०,००० कोटी रुपयांची उलाढाल फटाक्यांच्या बाजारात होते, असे आर्थिक सर्वेक्षण सांगते.
फटाके म्हणजे परदेशी संस्कृतीचे आक्रमण आणि आपल्या संस्कृतीचे शोषण! :
फटाक्यांचा इतिहास तपासला तर भारतीय सण आणि उत्सव यांच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये दिवाळीचा उल्लेख आनंद आणि प्रकाशाचा सण म्हणून आहे, पण मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा उल्लेख नाही.
मुघलकालीन राजांनी, बंगाली उमरावांनी आपल्या हौसेखातर आणलेला हा शौकीन खेळ.
२५०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या दिवाळी या सणामध्ये फटाके वाजतच नव्हते. हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथात दिवाळीला फटाके फोडा, असे लिहिलेले नाही. पण आज दिवाळी धडामधूम!! ठ्या, ठो ऽऽऽ! या आवाजाची झाली आहे. धन, आरोग्य, शांती मिळविण्यासाठी प्रकाशदेवतेची पूजा करण्याचा हा सण! पण आज फटाके जाळून आपण धन जाळतोय, आरोग्य घालवून बसलोय आणि शांतीचा भंग केलाय.
दिवाळी व्यतिरिक्त लग्नात, निवडणुकीत, क्रिकेटची मॅच जिंकल्यावर, गणेशोत्सवात, दुर्गा विसर्जनात, धार्मिक यात्रांत, वाढदिवसाला, पास झाल्यावर (मुलांनी सांगितलेलं) आपण फटाके उडवतो. मुंबईत दिवाळीत १०० ते ५०० कोटींचे फटाके उडविले जातात. तर भारतात ६००० कोटींचे. लग्ने, निवडणुकांत अकलेचा धूर आणि पैशांची राख!’ करणारा हा आनंद (!) = क्षणिक आनंदासाठी करोडोंची उधळण आणि प्रदूषण!
फटाके आनंददायी आहेत की, घातक हे आपण समजून घेतले तर समाजाला समजावून सांगणे सोपे होते.
फटाक्यांचा एक फायदा सांगा असं कोणालाही विचारा. उत्तर फक्त ‘मज्जा येते’ यापेक्षा वेगळं नसतेच. या उलट फटाक्यांमुळे पुढील अनर्थकारी गोष्टींची चर्चा करायला हवी.
१. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू, जल जमीन प्रदूषण
२. फटाके म्हणजे अल्प काळासाठी करोडो रुपयांची नासाडी.
३. फटाके आणि ते तयार करताना, हाताळताना होणारे अपघात.
१. प्रदूषण : फटाके तयार करताना वापरली जाणारी रसायने ही फटाक्यांच्या ज्वलनानंतर हवेत, पाण्यात तसेच जमिनीवरील मातीत मिसळली जातात. आवाजाचे फटाके आणि रोषणाई निर्माण करणारे फटाके यातील रसायनांतही मोठा फरक आहेच. सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बमध्ये गंधक आणि पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम पर क्लोरेट, अॅल्युमिनियम पावडर हे आवाजासाठी वापरतात, जी तुलनेने कमी घातक असतात, तर स्ट्रॉन्सियम, निकेल, क्रोमियम, मर्क्युरी, बेरियम, सोडियम, कॅल्शियम कार्बोनेट, क्लोरेट ही रसायने फुलबाज्या, अनार, भुईचक्र, रॉकेट, तोफा अशा रंगीत ठिणग्या निर्माण करून नेत्रदीपक रोषणाई निर्माण करणार्या फटाक्यांत वापरतात. ही विविधरंगी ठिणग्यावाली रसायने आवाजाच्या फटाक्यातील रसायनांपेक्षा जास्त घातक असतात. एका साप गोळीतून ४६० सिगारेट इतका धूर निर्माण होतो.
आवाजाच्या फटाक्यांमधून जड धातूचे कण आणि विविध ऑक्साईड हवेत, जमिनीत, पाण्यात मिसळतात. ज्यामुळे त्वचा विकार, दमा आणि फुफ्फुस रोगांना थेट आमंत्रण मिळतेच. फटाक्यांचा धूर फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो.
रंगीत फटाक्यांतून बाहेर पडलेला धूर आणि कण जास्त विषारी असतात. स्ट्रॉन्सियम, बेरियम, निकेल, क्रोमियम कॉपर, लीड ऑक्साईड, कार्बोनेटसह सल्फर ऑक्साईड, नायट्राईड ही रसायने अत्यंत घातक असतात. यातील काही रसायने लरीलळपेसशपी म्हणजे कर्करोगांना आमंत्रण देणारी असतात. पाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात तर जमिनीतून भाज्या, फळे यांना विषारी बनवतात. एकंदर आपण स्वतःचे पैसे खर्च करून हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण करतो.
ध्वनिप्रदूषण : फटाक्यांमधून कानठळ्या बसवणारे आवाज! मराठी मुलखात तर पहाटेच्या नीरव शांततेत धडामधूम आवाज करत फटाके फोडून पहाटे तीनपासून दिवाळीची सुरुवात केली जाते. लहान बालक, वृद्ध माणसांची झोपमोड करतो. तोच उत्साह नववर्ष स्वागत करताना रात्री बारा ते पहाट असा गलका असतो.
फटाक्यांच्या आवाजाने अनेकांचे कान बधिर होतात. रक्तदाब वाढतो. दिवाळीनंतर श्वसन विकारांचे, फुफ्फुसासंबंधी विकार दुप्पटीने वाढतात. लहान मुलांना डोळ्यांची जळजळ, अस्वस्थ वाटणे हे प्रमुख लक्षणही जोडीला भेट म्हणून मिळते.
२. फाटके म्हणजे करोडो रुपयांची होळी
आपण सहज कुणाही मुलांना आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट फेकून द्यायला सांगा. एकजणही तयार होणार नाही. कारण विचारताच, मुले म्हणतात, “मनाला पटत नाही.” मात्र दिवाळी, नववर्ष, विविध धर्मियांचे सण, निवडणूक जिंकली, नेताजींचे स्वागत, क्रिकेट मॅच जिंकली, जत्रा यामध्ये ६००० ते १०,००० कोटींची उलाढाल केवळ फटाक्यांच्या बाजारात होते. हा आपल्या अल्प समाधानासाठी संपत्तीचा चुराडा स्वतःहून ठरवून करण्यासारखे आहे.
३. फटाक्यांचा अपघाती फटका! :
गेल्या सहा महिन्यांत आंध्र, राजस्थान आणि तमिळनाडू येथील फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात ४०हून जास्त लोक मरण पावले तर १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. दरवर्षीचा हा आकडा शेकड्यांनी असतो. अनेक ठिकाणी लहान मुले बालमजुरासारखे या कारखान्यात काम करतात. आपल्या आनंदासाठी असे अपघात, बालमजुरी यांना हातभार लावणे किती भयानक आहे?
गेल्या १३ वर्षांत १८००हून जास्त लोक फटाके फोडताना मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. जखमींची गणना आणखी जास्त आहे. अनेकांना आपली दृष्टी फटाके फोडताना गमवावी लागल्याच्या बातम्या दरवर्षी येतात. असे एकूणच घातक फटाके वापराला प्रतिबंध करण्याचा उपाय म्हणजे, शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी सतत प्रबोधन, फटाके विक्रीवर आणि वापरावर कायद्याचे कडक निर्बंध.
महाराष्ट्र अंनिसने २००६ साली फटाकेमुक्त सण उत्सव, नववर्ष स्वागत हा उपक्रम सतत २० वर्षे चालवला आहे. शाळाशाळांत मुलांना फटाक्यांऐवजी मिठाई, खेळणी घ्या, पिकनिक करा, भेटवस्तू घ्या, असे प्रबोधन परिणामकारक ठरले. मुलांनी स्वतःहून आम्ही फटाके फोडणार नाही, अशा शपथा घेतल्या. बालमनावर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही सकारात्मक संदेश दिले. मात्र, फटाके विक्रीचे मुक्तहस्ताने परवाने देणे, साठवणुकीचे नियम, आगीबाबत सुरक्षेचे नियम याबाबत प्रशासनाची भूमिका आजही सकारात्मक नाही. पर्यावरण रक्षण, पर्यावरणस्नेही सण, समारंभ, सार्वजनिक आरोग्य ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे भान सर्व नागरिकांना आले तर फटायांचा कडकडाट नक्की कमी होऊ शकतो. चला, सुरुवात किमान आपल्या घरापासून करू या. येणारे दसरा, दिवाळी आणि नववर्ष स्वागत फटाकेमुक्त पद्धतीने करू या.
– अण्णा कडलासकर
संपर्क – ९२७००२०६२१
