सण – उत्सवांचे बाजारीकरण

-

गेल्या दोन अडीच दशकात सगळ्याच सण, उत्सव, समारंभांचे स्वरूप गोंगाटी, दणदणाटी झालेले आहे. इतके की डीजे, लाऊडस्पीकर, फटाके यांचा दणदणाट म्हणजेच उत्सव अशी मानसिकताच बनून गेली आहे. कोणीही त्याविरोधात तक्रार केली तर तो धर्मविरोधी, उत्सवविरोधी! त्याविरोधात काहीही तक्रार करण्याची सोयच राहिलेली नव्हती. अशा पार्श्वभूमीवर ज्या पुण्यात गणेश उत्सव पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या साजरा झाला त्या पुण्यातीलच नारायण पेठेतील एक सर्वसामान्य नागरिक विद्यानंद बापट यांनी डीजे, ढोलताशे यांच्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवला आणि धमक्या, टिंगल, अवहेलना, मारहाण यांना निर्भयपणे तोंड देत अतिशय तर्कशुद्धपणे आपले म्हणणे मांडत आपला विरोध लावून धरला. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. या सण उत्सवांच्या गोंगाटीला प्रचंड त्रासलेल्या जनतेनेही मग त्यांना समाजमाध्यमांवर आणि प्रत्यक्षातही प्रचंड पाठिंबा दिला आणि वेगळे घडायला लागले. लोक ठिकठिकाणी त्या उद्दाम धुडगुसपणाला  जाब विचारायला लागले. गेले महिनाभर त्यावर प्रचंड चर्चा झडल्या, प्रशासन, न्यायालये यांनी दखल घेतली. रस्त्यावर फटाके फोडण्यास न्यायालयाने बंदी घातली. लाउडस्पीकर, डीजे, लेझरबीम मिरवणुकीत अनावश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने ध्वनी आणि वायु प्रदुषण करून जनतेच्या आरोग्याशी खेळ करता येणार नाही, असा दमही भरला. प्रशासनाने न्यायालयाचे आदेश मोडणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.  हे प्रत्यक्षात अमलात येईलच याची काहीही खात्री नाही. पण या निमित्ताने सण, उत्सव आणि धर्म-परंपरा यांचा संबंध, वायु-ध्वनी प्रदूषण आपल्या दैनंदिन आरोग्याशी किती निगडित आहे याची जाणीव तरी लोकांना झाली. हा लढा केवळ डीजेपुरता मर्यादित राहिला नाही तो नागरिकांच्या जगण्याच्या आणि आरोग्याच्या हक्काचा बनला. पण यामुळे सण उत्सवांच्या स्वरुपात लगेच काही बदल होईल, असेही नाही.   आज आपल्या जीवनाशी निगडित असणार्‍या शिक्षण,आरोग्य यासारख्या गोष्टींबरोबर प्रत्येक प्रश्नांचे, भावनेचे जसे बाजारीकरण झाले आहे, तसेच सण, समारंभ, उत्सवांचेही झालेले आहे. त्याचे परिणाम आपल्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, आरोग्य, शैक्षणिक व्यवस्थांवर होत आहेत. आजची सगळी उत्सवव्यवस्था बाजारकेंद्री आहे. या उत्सवांचे हितसंबंध बाजाराशी निगडित झाले आहेत. त्यामुळे मग एकदा का बाजार सण, समारंभ, उत्सवात घुसला की बाजाराचा विचार केवळ नफ्याचा….  ना पर्यावरणाचा,  ना विवेकाचा, ना माणसाचा, ना माणुसकीचा, ना त्याच्या सामाजिक परिस्थितीचा! ही बाजारू संस्कृती स्पर्धा, द्वेष, मत्सर, चैन, अभिलाषा, भपका, दिखाऊपणा या मूल्यांवर आधारित आहे. ही मूल्येच बाजाराची आधारस्तंभ आहेत आणि सण, उत्सवांच्या या बाजारीकरणामुळे त्या मूल्याचेच वर्चस्व आजच्या सण, उत्सवावर दिसत आहे. त्यामुळे सण, उत्सवातील निखळ आनंदाचा, कृतज्ञतेचा, नवनिर्मितीचा, सर्वांना सामावून, सहभागी करून  घेण्याचा भागच संपलेला आहे. उलट दुसर्‍या धर्मांविरोधात या सण, उत्सवांचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. सण केवळ धार्मिक कर्मकांडी बनलेले आहेत. त्यामुळे हा लढा केवळ डीजेपुरता मर्यादित नाही, तर आज ज्या बाजारू मूल्यांचा जबरदस्त  प्रभाव आजच्या समाजव्यवस्थेवर आहे. त्या मूल्यांच्या विरोधातील हा लढा आहे आणि हा लढा समाजाशी संवाद साधत, पर्याय देत, विवेकी वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगत प्रेम, सहकार, सहानुभूती, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रज्ञा, शील, करुणा या मूल्यांच्या आधारे लढायचा आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]