-
डॉ. दाभोलकरांची आठवण येते,
प्रश्न विचारणारे कुणी उरले नाहीत!
– ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
आज धर्म आणि अंधश्रद्धा यांची सरमिसळ करत विज्ञानावरती बोलत असतानाच एकाचवेळी परस्पर विरोधी कृतींचा वापर केला जातो. तेव्हा दाभोलकरांसारख्या व्यवस्थेला प्रश्न विचारणार्यांची आठवण होते. कारण, हल्ली प्रश्न विचारणारेच उरले नाहीत, असे मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी नागपूर येथे व्यक्त केले.
जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर व राम गणेश गडकरी प्रतिष्ठान, नागपूर यांच्यावतीने डॉ. दाभोलकरांचे कार्य लोक आणि तरुणांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘कसोटी विवेकाची’ हे कला प्रदर्शन २१ ते २४ ऑगस्टपर्यंत मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात एलकुंचवार बोलत होते. यावेळी अंनिसच्या मुक्ता दाभोलकर व गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
एलकुंचवार पुढे म्हणाले, दाभोलकरांची भेट एकदाच झाली. त्यांच्याशी अध्यात्म आणि अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर भरपूर बोलायचे होते. मात्र, ते शक्य झाले नाही. यावेळी डॉ. गिरीश गांधी यांनीही त्यांच्या आयुष्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या घटनांना उजाळा दिला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी १० वर्षे पूर्ण झाली. या हत्येचा तपास आणि खटले सुरू असून मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत. मात्र, ‘माणूस मारता येतो, विचार नाही’ हा दाभोलकरांचा विवेकी विचार कला प्रदर्शनाच्या माध्यमातून जनमानसात पोहचवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे केला जात आहे. डॉ. दाभोलकर व्यक्तिपरिचय, चळवळ, प्रबोधन आणि परिवर्तन या पाच भागांत हे प्रदर्शन विभागले आहे. दाभोलकरांच्या कौटुंबिक छायाचित्रांची, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या चार विचारवंतांची हुबेहूब ‘पोट्रेट’, डॉक्टरांच्या तरुणपणापासूनच्या प्रवासाचे पोट्रेट, त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा ‘बायोस्कोप’, तपासात होणारी दिरंगाई लाल फायलीतून कलेच्या माध्यमाने मांडण्यात आली आहे. मुंबईपासून सुरू झालेल्या या कला प्रदर्शनाचे नागपुरातील हे आठवे प्रदर्शन आहे. दाभोलकर व्यक्ती, कार्य आणि विचार लोकांपर्यंत विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी कला प्रदर्शन हा एक नवीन उपक्रम असल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी दिली.