-

चंद्रकांत उळेकर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता ओळखत नाही, असे बहुधा असणार नाही. कारण अंनिससाठी देणग्या गोळा करणे, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी जाहिरातींचे संकलन करणे, वार्तापत्राचे सभासद नोंदवणे, ही कामे दाभोलकरांच्या शब्दात सांगायचे, ‘नॉन रिवॉर्डिंग’ आहेत. तरीही धाराशिवचे (उस्मानाबाद) चंद्रकांत उळेकर गुरुजी गेली २४ वर्षे ती कामे अखंडपणे करत आले आहेत. अशा या कार्यकर्त्याची जडणघडण कशी झाली आहे, त्यांनी आपल्या जीवनात कसा संघर्ष केला, कोणती विधायक कामे केली, कुटुंबियांनी त्यांना कशी साथ दिली, हे सर्व करताना एक विवेकी व्यक्तिमत्त्व कसे आकाराला आले, हे अंनिवाच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने घेतलेली ही मुलाखत अंनिवाच्या वाचकांना व अंनिसच्या कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी वाटेल.
संवादक : अॅड. देविदास वडगावकर
उळेकर गुरुजी, आपला जन्म, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण याबाबत सांगा.
माझा जन्म आरळी बुद्रुक, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद (आत्ताचे धाराशिव) येथे तीन जून १९७० रोजी शेतकरी कुटुंबात झाला. माझे वडील शंकर उळेकर यांनी भारतीय सैन्यात १९ वर्षे नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी आम्हा भावंडांच्या शिक्षणाकडे प्रामुख्याने लक्ष दिले. माझी आई लक्ष्मीबाई. आईच्या संस्कारात आणि वडिलांच्या शिस्तीत आम्ही भावंडे घडत गेलो. मला दोन भाऊ आणि दोन बहिणी. आमच्या परिवारात भावंडांमध्ये सर्वांत मोठा मी आहे. माझे प्राथमिक शिक्षण माझ्या गावी आरळी बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालय आणि त्याच संस्थेचे कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथे माझे माध्यमिक शिक्षण झाले. सदरची शिक्षण संस्था ही आमच्या जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि माजी आमदार सि. ना. आलूरे गुरुजी यांनी सुरू केली आहे. खर्या अर्थाने माझ्या आयुष्याला चांगली कलाटणी या शाळेतील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे मिळाली. इयत्ता दहावीनंतर माझी बौद्धिक पातळी आणि घरची बेताची आर्थिक परिस्थिती पाहून कुलस्वामिनी विद्यालयातील श्री. शिवमूर्ती कोडले गुरुजी आणि इतर शिक्षकांनी मला डी.एड. कोर्स करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी १९८९ साली तुळजापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने चालवण्यात येणार्या श्री तुळजाभवानी डी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मी १९९२ साली जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यात दोन वर्षे नोकरी केल्यानंतर मी पुन्हा १९९४ साली आमच्या धाराशिव जिल्ह्यात आलो. आत्ता येथेच कार्यरत आहे.
आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, गावपातळीवरची पार्श्वभूमी, जात, धर्म याबाबत कुठली बाब तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करण्याबाबतचा विचार करण्यास कारणीभूत ठरली का? अंनिसमध्ये येण्याचा नेमका काही प्रसंग घडला आहे का?
खरंतर जाती-धर्माचा उल्लेख अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये केला जात नाही. जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, असे मानणारा आणि याच विचाराचा मी समर्थक आहे; पण संस्कारक्षम वयात मी या लिंगायत धर्मात वाढलो. त्या धर्माचा परिणाम, विचाराचा परिणाम माझ्यावर काही प्रमाणात झाला. संत बसवेश्वरांचे विचार माझ्या वाचण्यात, ऐकण्यात आले. त्यातून एक मनोभूमिका तयार झाली. तीच मनोभूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समिती मांडते, असा माझा समज झाल्यानंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे ओढलो आहे. प्रत्यक्षात जुलै २००० मध्ये आमच्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण शिबिर हे राष्ट्र सेवा दल संचालित ‘आपलं घर’ नळदुर्ग, तालुका तुळजापूर येथे संपन्न झाले. या अंनिसच्या शिबिराला मला शाळेमार्फत पाठविण्यात आले होते. या प्रशिक्षणातून माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा चांगली कलाटणी मिळाली. या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी आम्ही ८० शिक्षक उपस्थित होतो. प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी देविदास वडगावकर जे त्यावेळी उस्मानाबाद जिल्हा शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष होते, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक शिक्षकांनी स्वतः वाचनासाठी सुरू करण्याबाबत प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आवाहन केले. त्याप्रमाणे मी पन्नास रुपये भरून वार्तापत्राचा वर्गणीदार झालो. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक पोस्टाने माझ्या घरी येऊ लागले. हे वार्तापत्र नियमित वाचून मला अंनिसबद्दल माहिती मिळत गेली आणि अंनिसचे विचार पटत गेले.

एक वर्षानंतर म्हणजे २००१ मध्ये आरळी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी धोतरकर, संजय पारवे आणि विलास (नाना) उकरंडे यांच्या प्रोत्साहनातून तसेच आरळी बुद्रुक ग्रामस्थांच्या सहकार्यातून गणेशोत्सवात देविदास वडगावकर आणि अॅडव्होकेट राज कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. राज कुलकर्णी यांनी ‘फलज्योतिष हे शास्त्र नाही’ या विषयावर व्याख्यान दिले. वडगावकर साहेब यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी अंनिसची भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांच्या या व्याख्यानाला माझ्या आरळी बुद्रुक गावातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच मला अशी व्याख्याने आमच्या गावात आणि शेजारील गावात आयोजित करण्याचा छंद लागला. त्या निमित्ताने काही समविचारी लोक, मित्र, हितचिंतक यांना वार्तापत्राचे सभासद नोंदणी करीत राहिलो.
अंनिसच्या बैठका, चर्चासत्र या कामात मी आवडीने सहभागी होत असल्यामुळे देविदास वडगावकर, प्रा. किरण सगर, रमेश माने सर हे अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रा. डॉ. महेश मोटे, अॅव्होकेट रवींद्र मैंदाड, पत्रकार रवी केसकर, शेतकरी कामगार पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते उत्तम (नाना) अमृतराव, पंडितराव जगदाळे, अमर (भैया) मगर (नगरसेवक तुळजापूर) तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथील समविचारी अधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतक मित्र उस्मानाबाद येथील शिवानंद साखरे गुरुजी, विजय बांगर साहेब, बाळासाहेब गायकवाड, आनंद बिरादार साहेब हे कार्यकर्ते माझे मनापासून कौतुक करत असत. मला प्रोत्साहन देत असत. त्यामुळे माझ्या अंनिसच्या कामावर चांगला सकारात्मक परिणाम झाला. वार्तापत्र वाचन, अंनिस कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद, अधूनमधून संपर्क, प्रत्यक्ष भेटी यातून मला अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचार मिळत राहिले. ते पुरोगामी विचार माझ्या मनाला पटत गेले व भावत गेले. मे २००२ मध्ये सोमनाथ प्रकल्प जिल्हा चंद्रपूर येथे थोर समाजसेवक बाबा आमटे आणि डॉ. विकास आमटे यांच्या ‘श्रमसंस्कार छावणी’ शिबिरातून मला चांगली प्रेरणा मिळाली. अंनिसच्या कामाची सुरुवात खर्या अर्थाने २००२ मध्ये हमाल भवन, गुलटेकडी, पुणे येथे झाली.

मा. बाबा आढाव आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या उपस्थितीत अंनिसच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी राज्यस्तरीय चमत्कार प्रशिक्षण शिबिर दोन दिवस आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला मी पूर्णवेळ हजर होतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी मुक्त संवाद साधता आला. अंनिसच्या कार्याची गरज किती महत्त्वाची आहे, हे मला मनोमन पटले.
खरंतर यापूर्वी २००१ मध्ये डॉ. दाभोलकर यांचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री. तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे ‘विवेक वाहिनी’ सुरू करण्यासंदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते व्याख्यान देविदास वडगावकर आणि तत्कालीन प्राचार्य डॉ. रमेश दापके सर यांनी आयोजित केले होते. ते व्याख्यान मी लक्षपूर्वक ऐकले. व्याख्यानानंतर डॉक्टरांना व्यक्तिगत भेटून अंनिसचे काम सक्रियपणे करण्याचा मनोदय व्यक्त केला. वार्तापत्राची सदस्य नोंदणी सातत्याने करत असल्याचे मी त्यांना सांगितले. ‘कौतुक आहे’ अशा मोजक्या शब्दात त्यांनी मला प्रोत्साहित केले. समविचारी माणसांच्या संपर्कातून अंनिसचे कार्य वाढवता येईल, अशी सूचनावजा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याच कालावधीमध्ये म्हणजे २००१ ते २००२ या कालावधीत अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर व्याख्यानासाठी सोलापूर येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या शालिनीताई ओक, निशाताई भोसले, अंजली नानल, उषा शहा, दादा चांदणे, डॉ. सचिन जम्मा, डॉ. दिलीप बावस्कर, प्रीती श्रीराम तसेच व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यानासाठी डॉ. अरुण मनगोळी, डॉ. विष्णुपंत गावडे यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांचे व्याख्यान माझ्या गावात आणि आमच्या शेजारील गावात आयोजन करीत असे.
सोलापूर येथील प्रसिद्ध सर्पमित्र भरत छेडा आणि अजितसिंह चौहाण यांना आमच्या गावात सर्प विज्ञान या विषयावर व्याख्यानासाठी बोलावले होते. सातत्याने असे कार्यक्रम चालू असताना एका कार्यक्रमानंतर सोलापूरच्या अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निशाताई भोसले म्हणाल्या.. “गुरुजी, तुम्ही आमचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करीत आहात. तुम्ही स्वतः हे कार्यक्रम घेऊ शकता. आता तुम्हाला स्वतंत्रपणे हे काम करता आले पाहिजे.” नेमके याच दरम्यान ज्येष्ठ शास्त्रज्ञ आनंद घैसास (मुंबई) यांचे पुणे येथील चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण मी घेतले होते. त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की मी २००२ पासून गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात विद्यार्थ्यांसमोर चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम करू लागलो. कधी माझ्यासोबत कोणी मित्र सहकारी असत. कधीकधी एकटाच ‘व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ व्याख्यान आणि ‘चमत्कार सादरीकरण’ करीत असे. व्यसनाने आणि अंधश्रद्धेमुळे माणसाचा मेंदू गहाण पडतो हे डॉ. दाभोलकरांचे विधान मी प्रमाण मानले होते. अंनिसच्या कामाला वर्तमानपत्रातून चांगल्याप्रकारे प्रसिद्धी देण्याचे काम आरळी बु.चे पत्रकार अनिल आगलावे (उपसंपादक दै.सामना), चंद्रसेन देशमुख (आरंभ मराठी) आणि तुळजापूरमधील अनेक पत्रकार बंधू सातत्याने करीत असतात.
अंनिसमध्ये येण्यापूर्वी २००० साली पुणे येथे वास्तव्यास असलेले माझ्या गावातील माझे मित्र शिवाजी सलगर यांनी मला व्यसन या विषयाबद्दल तळमळीने मार्गदर्शन केले होते. मी व्यसनाच्या अगदी जवळ जाण्याच्या अवस्थेत असताना मला हे विचार ऐकायला मिळाले. तेव्हापासून मी ‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती’ हे माझ्या जीवनाचा भाग्यध्येय आहे, असे समजत गेलो. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आणि व्यसनमुक्तीचाही विचार मांडणे चालू केले. तुळजापूर येथील पत्रकार अॅड. जगदीश कुलकर्णी यांनी याच कालावधीत माझी मुलाखत घेऊन ‘व्यसनमुक्ती कार्यासाठी धडपडणारा ध्येयवेडा शिक्षक’ या शीर्षकाखाली (ठळक मथळा) दैनिक सकाळमध्ये मोठी बातमी दिली. संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांच्या आवृत्तीमध्ये ही बातमी आल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून अनेकांनी माझे अभिनंदन करणारे पत्र मला पाठवले. त्या बातमीमुळे मी व्यसनमुक्ती या कामासाठी अधिक प्रेरित झालो. या कामात मला अनेकांचे मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये प्रामुख्याने देविदास वडगावकर, रमेश माने सर यांच्यासोबत चमत्कार सादरीकरण करीत असे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याविषयी तसेच कोणता मुद्दा ठळकपणे मांडावा याविषयी वडगावकर आणि माने सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. नंतरच्या पुढील काळात प्रा. किरण सगर (उमरगा), प्रा. डॉ. महेश मोटे सर, देविदास पावशेरे गुरुजी, (कलदेव निंबाळा), सुभाष वैरागकर सर (उमरगा) डॉ. सिद्रामप्पा खजुरे (खुदावाडी) यांचेही मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत गेले. तसेच अंनिस कार्यकर्ते सूर्यकांत वडजे आणि लातूरचे दगडूसाहेब पडिले यांना सोबत घेऊन अंनिसचे कार्यक्रम ग्रामीण भागात करीत राहिलो. पडिले यांच्यामुळे भानामती, करणी अशा प्रश्नांची उकल करण्याबद्दल माहिती मिळत गेली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पहिली भेट कधी? कुठे? कशी झाली आठवते का? त्यांचा सहवास कसा असायचा?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पहिली भेट २००१ मध्ये तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथील विवेक वाहिनी सुरू करण्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये झाली. देविदास वडगावकर आणि त्या कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. रमेश दापके सर यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. दाभोलकर यांचा सहवास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी आणि हवाहवासा असायचा. भेटीमध्ये ते नेमकेपणाने पण थोडक्यात आणि महत्त्वाचे सांगायचे. कार्यकर्त्यांनी कसे वागावे, कसे बोलावे, हे आग्रहाने सांगत.”आपण जसे बोलतो तसे वागतो, अशीच कार्यकर्त्यांची ओळख असली पाहिजे” असे ते सांगत.
“आपली संघटना ही अशी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची संघटना आहे”, असे त्यांनी वारंवार सांगितले. कार्यकर्त्यांनी वैचारिक वाचन करावे. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विचारमंथन करून ते प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते सांगत. वेळात वेळ काढून कार्यकर्त्यांना फोन करून, कधी प्रत्यक्ष भेटीत त्यांच्याशी हितगूज साधत, व्यक्तिगत माहिती जाणून घेत, कधी पत्रलेखन करत. त्यांचा हा गुण मला विशेष भावला. पत्रातून कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देत असत. त्यांच्याच संकल्पनेतून आणि राहुल थोरात (व्यवस्थापकीय संपादक) यांच्या पुढाकारातून आणि वार्तापत्राचे तत्कालीन संपादक प्रा. प. रा. आर्डे सर यांच्या प्रोत्साहनातून महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना वार्तापत्राचे शंभर किंवा शंभरहून अधिक वर्गणीदार नोंदणी केल्याबद्दल शतकवीर पुरस्कार २००५ पासून सुरू करण्यात आला. पहिल्या राज्यस्तरीय शतकवीर आणि आधारस्तंभ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन सांगली येथे करण्यात आले होते. २००५ पासून मला हा पुरस्कार मिळत आला आहे. २००५ नंतरच्या पुढील काळात वार्तापत्राच्या वार्षिक अंकासाठी जाहिराती आणि देणग्या मिळवणार्या कार्यकर्त्यांना शाखांना आधारस्तंभ पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही पुरस्कार वितरणाची परंपरा आजपर्यंत चालू आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन वार्तापत्राची संपूर्ण टीम करते.
डॉ. दाभोलकर यांचा सर्वाधिक सहवास मे २००६ मध्ये बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे सहा दिवस राज्यस्तरीय आणि चिंतन शिबिरात मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख क्रियाशील कार्यकर्त्यांसोबत त्या शिबिरात भेट झाली. तसेच मे २००८ मध्ये बोराडी जिल्हा धुळे येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व्यंकट अण्णा रणधीर यांच्यासोबत डॉ. दाभोलकर यांनी राज्यस्तरीय कार्यकर्ता संघटना बांधणी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी डॉ. दाभोलकर यांना जवळून अनुभवता आले. समाजातील उच्चपदस्थ, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपटातील कलावंत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अशा दिग्गज व्यक्तींना सोबत घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचारपीठावर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, सोनाली कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, सदाशिव अमरापुरकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे समाजप्रबोधनकार सप्तखंजिरी वादक, कीर्तनकार सत्यपाल महाराज अशा नामवंत व्यक्तींच्या संपर्कात फक्त आणि फक्त अंनिसमुळेच मी येऊ शकलो आणि त्यांचे विचार ऐकण्याची अनमोल संधी मला मिळाली. आदर्श गाव हिवरे बाजार जिल्हा अहमदनगर येथे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या माध्यमातून दोन दिवसांची राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. तेथेही मी उपस्थित होतो. २०१३ मध्ये डॉक्टर दाभोलकर यांनी इस्लामपूर येथे अंनिस राज्य कार्यकारणी बैठक घेतली. डॉ. दाभोलकर यांची ही शेवटची अंनिस राज्य कार्यकारिणी बैठक ठरली, हे मला दुःखाने नमूद करावे लागते. या बैठकीला डॉक्टर दाभोलकर यांनी सुप्रसिद्ध लेखक आणि एक अभ्यासू व्यक्तिमतत्त्व मा. श्री. अच्युत गोडबोले यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते अंनिसच्या सक्रिय कार्यकर्त्यांना शतकवीर आणि आधारस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिला तर तो दिलेला शब्द पाळणारे डॉक्टर दाभोलकर हे माहिर होते. त्यांचे एक उदाहरण म्हणजे २००२ मध्ये पुणे येथे चमत्कार प्रशिक्षण शिबिरात समारोपप्रसंगी डॉक्टरांना माझ्या गावी आरळी बुद्रुक येथे व्याख्यानासाठी येण्याबद्दल मी विनंती केली. डॉक्टरांनी तात्काळ होकार दिला. पुढील काळात उस्मानाबादला आल्यानंतर तुझ्या गावी मी नक्की येतो, असे त्यांनी मला आश्वासन दिले. बोलल्याप्रमाणे दिनांक २९ नोव्हेंबर २००३ रोजी ते आरळी बुद्रुक येथे व्याख्यानासाठी आले. त्याचवेळी जवाहर महाविद्यालय अणदुर येथील प्रा. आप्पासाहेब ब्याळे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर खास विनोदी शैलीमध्ये व्याख्यान दिले. त्यानंतर डॉ. दाभोलकर यांचे व्याख्यान झाले. हे व्याख्यान उत्तम प्रकारे पार पडले. त्यांनी घरी मुक्काम केला. सकाळी सर्व आवरून डॉ. दाभोलकर यांना लातूर येथे शाहू महाविद्यालयात व्याख्यानासाठी जायचे नियोजित होते. त्यावेळी त्यांना माझ्या गावातून मोटरसायकलवर तुळजापूर येथे घेऊन आलो. त्यानंतर ते लातूर येथे एसटीने गेले, हा त्यांचा साधेपणा मला खूप भावला. कार्यकर्त्यांच्या घरी राहणे, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सामील होणे, त्यांच्या घरच्यांची विचारपूस करणे हे नेतृत्वगुण मला डॉ. दाभोलकर यांच्यामध्ये निश्चितपणे दिसले. संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरणारा हा माणूस अशाप्रकारे सर्जनशील, संवेदनशील, कुटुंबवत्सल राहू शकतो याचे मला आश्चर्य वाटले, ते आम्ही कोणीही कार्यकर्ता कधीच विसरू शकत नाही.
दाभोलकरांनी सांगितलेला मंत्र म्हणजे ‘आपण करीत असलेले काम हे ‘नॉन रिवार्डिंग जॉब’ आहे, ते काम करीत राहा, फळाची अपेक्षा, सत्काराची किंवा कौतुकाची अपेक्षा करू नका’ हे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मी आयुष्यभर पाळत आलेलो आहे. अंनिसमध्ये येण्यापूर्वी कधीकाळी मी दहा वर्षे कंबरदुखीमुळे त्रस्त झालो होतो. त्यावर डॉ. दाभोलकर यांनी २००५ मध्ये मला योग्य पद्धतीने व्यायाम करण्याचा सल्ला दिला. हा व्यायामप्रकार ते स्वतः करत असत. म्हणजे ‘आधी केले मग सांगितले’ असेच म्हणावे लागेल. त्यांनी सांगितलेल्या व्यायामामुळेच माझी कंबरदुखी कायमची बंद झाली, हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. याबाबतीत तर मी डॉक्टरांचा आयुष्यभर ऋणी आहे, आणि ऋणात राहीन.
अंनिससाठी देणगी गोळा करणे, जाहिराती संकलन करणे, वार्तापत्राचे सदस्य नोंदणी करणे या कामी आपण वेगळे प्रयोग केले आहेत आणि करत आहात त्याबाबत सांगा.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक लोकचळवळ आहे. लोकांच्या पैशावर ती समाज प्रबोधनाचे काम करते. शासकीय अनुदान घेत नाही, हे डॉ. दाभोलकरांच्या सहवासात आल्यानंतर तसेच सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र कार्यालय प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे आणि अंनिससाठी आर्थिक हातभार लावणे हे माझे प्राथमिक कर्तव्य समजून मी २००१ मध्ये प्रत्यक्ष वार्तापत्राची सभासद नोंदणी सातत्याने करणे सुरू केले. माझ्या सोबत वार्तापत्राचे नवे जुने अंक असतात. विशेषतः वार्षिक विशेषांक सोबत ठेवतो. मित्र, नातेवाईक, हितचिंतक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनीयर, विविध क्षेत्रांतील मान्यवर अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे समविचारी कार्यकर्ते यांना प्रत्यक्ष भेटून, कधी फोनवर बोलून त्यांना अंक देतो, हस्ते पर हस्ते त्यांना अंक मिळतील असे पाहतो. या कामी याकरिता माझ्या खिशात खरंतर एक डायरी असते, ज्यामध्ये मित्र, नातेवाईक, दुकानदार तसेच हितचिंतक, शिक्षक, संभाव्य वर्गणीदार, जुने वर्गणीदार यांची नावे लिहिलेले असतात. ठरवून अंक वाचण्यासाठी देतो, वर्गणीचा आग्रह धरतो. वर्गणी लगेच मिळाली तर वार्तापत्राची नोंदणी करून त्यांना पावती देतो. अलीकडच्या काळात फोन पे, गुगल पे यांचा वापर वाढल्यामुळे अनेक जणांना वार्तापत्राबद्दल माहिती व्हॉट्सअॅप पाठवून त्यांना वर्गणी मागतो. त्यांनी वर्गणी पाठवली की त्यांना व्हाट्सअॅपवर नोंदणी केलेली पावती पाठवतो. त्यामुळे हे काम अधिक सोपे झाले आहे असा माझा अनुभव आहे. काही निवडक ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो. मित्रमंडळी नातेवाईक यांना मात्र आग्रह करून नोंदणी करतो. ज्यांना अंनिसचे काम मनापासून आवडते,असे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक लगेच सभासद नोंदणी करतात व वर्गणी देतात. व्याख्यानाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयांत, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात, गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण व शहरी भागात सुट्टीच्या कालावधीत जाण्याची संधी मिळाली की, त्यावेळी वार्तापत्राचे वर्गणीदार होण्याबाबत आग्रहाने विनंती करतो आणि त्यांना नोंदणी करायला भाग पाडतो. वार्तापत्र वाचनातून समाज परिवर्तन होईल, असा पूर्ण विश्वास माझ्या मनात आहे. आपली संघटना ही, समाजाला योग्य दिशा देणारी, न्यायाची, नीतीची आणि लोकांचा विवेक जागृत करणारी जनचळवळ आहे हे लोकांना पटवून देतो आणि ते सतत त्यांच्या कानी कपाळी आदळत राहावे म्हणून वार्तापत्राचा आग्रह धरून त्यांच्याकडे नोंदणी करतो. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेलो की, तो कार्यक्रम ऐकत, पाहत माझे सदस्य नोंदणीचे काम चालू असते.
२००४ मध्ये अॅड. वडगावकर हे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य म्हणून निवडले गेले. व त्यांनी आपल्या या निवडीचे श्रेय संघटनेला दिले. ‘हे पद आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळेच मिळाले,’ असे त्यांनी नम्रपणे सांगितले. नुसते श्रेय दिले नाही तर, गेल्या वीस वर्षांत त्यांनी अंनिसला देणगी रूपाने आर्थिक स्वरूपात आणि विविध प्रकारच्या वैचारिक लेखनातून वार्तापत्राला खूप मोठी मदत केली आहे. अंनिसला दरवर्षी नियमितपणे ते देणगी देतात. दरवर्षी देणगीचा चेक माझ्याकडे देऊन आणि मध्यवर्ती कार्यालय, सातारा येथे पाठविण्यासाठी सांगतात. खरंतर मी चळवळीत येण्यापूर्वीसुद्धा वडगावकर साहेब हे अंनिसच्या कामामध्ये १९९५ पासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात अंनिसच्या कामाची सुरुवात त्यांनीच केली, हे मला अनेकांनी सांगितले आहे. वडगावकर यांनी आणखी एक महत्त्वाचे काम केले. ते येथे सांगायला मला खूप अभिमान वाटतो.
धाराशिव शहरातील अनेक हितचिंतक सदस्य आणि डॉक्टर यांची ओळख त्यांनी मला करून दिली. ज्यामध्ये त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ते म्हणजे रोटरी सदस्य प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ मा. डॉ. विनोद महिंद्रकर, डॉ. सचिन मनोहर देशमुख, डॉ. सुधीर मुळे, अंनिसच्या जेष्ठ कार्यकर्त्या विजयाताई देविदास मेटे, डॉ.संदेश गांधी, डॉ. रवी गरड, मा. श्री. एम. डी. देशमुख सर, माननीय श्री. धर्मवीर कदम साहेब, आर्कि. इंजि. राहुल माकोडे, अॅडव्होकेट रवींद्र मैंदाड, नेत्रतज्ज्ञ डॉ. गोविंद कोकाटे, अक्षय मेटल इंडस्ट्रीजचे मालक रो. संतोष शेटे, अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र जांभळे तुळजापूर यांच्या माध्यमातून कळंब येथील मराठवाडा अॅग्रो कंपनीचे चेअरमन मा. बाळासाहेब गीते साहेब, तुळजापूर येथील डॉ. कार्तिक यादव, डॉ. किरण पवार, डॉ. दिग्विजय कुतवळ, डॉ. किरण प्रवीण रोचकरी, डॉ. राजेश पाटील डॉ. श्रीराम नरवडे, अॅड. गणेश पाटील, डॉ. मलबा, डॉ. अभय घोलकर, डॉ. मकरंद बाराते तसेच सोलापूर येथील डॉ. विजय शिवपुजे (यशोधरा हॉस्पिटल), डॉ. अरुण मनगोळी (मोनार्क हॉस्पिटल), सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विष्णुपंत गावडे, डॉ. नितीन ढेपे तसेच अंनिसचे हितचिंतक आणि कार्यकर्ते राजाराम वेदपाठक, नामदेव चिवडाचे मालक निलेश कोंडेवार, भूम हे येथील विनोद जोगदंड सर यांच्याकडून दरवर्षी अंनिसकरिता देणग्या मिळतात. तसेच येडाई व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळा (ता. कळंब) येथील डॉ. संदीप तांबारे हे एक अंनिसचे चांगले हितचिंतक आणि जाहिरातदार आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना या चोवीस वर्षांच्या काळात मोलाची साथ मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.श्री. नंदकुमार नन्नवरे (मुख्याध्यापक) आणि त्या कॉलेजचे सर्व शिक्षक स्टाफ तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूल, धाराशिव येथील मा.श्री. मनोहर देशमुख सर आणि सर्व शिक्षक स्टाफ यांच्या सहकार्याने या शाळेत फिरते नभांगण, जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात विद्यार्थ्यांसमोर चमत्कार सादरीकरण, व्यसनमुक्ती व्याख्यान आयोजित करण्यात आले. अंनिसच्या बैठका घेण्यासाठी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव येथे हक्काचे ठिकाण आहे. एक प्रकारचे हे धाराशिव शहरातील समविचारी लोकांना एकत्र आणण्याचे परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र आहे, असे मला जाणवते.
मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी जाहिराती आणि देणग्या जमा करण्यासाठी धाराशिव, तुळजापूर, सोलापूर या भागातील डॉक्टर हितचिंतक यांच्याशी संपर्क चालू ठेवला आणि तो आजपर्यंत वाढवत नेला आहे. काही वेळा डॉ. दाभोलकर या भागात आल्यानंतर देणगीदारांना आणि जाहिरातदारांना प्रत्यक्ष भेटीसाठी सोबत घेऊन जात असे. या शहरातील समविचारी लोकांना विशेषतः डॉक्टरमंडळींना, देणगीदारांना थेट डॉ. दाभोलकर यांना फोन करायला सांगत असे. पत्र लिहिण्याबद्दल मी आग्रह करत असे. डॉक्टरांच्या पाठपुराव्यामुळे देणगी आणि जाहिराती मिळणे सोपे व्हायचे. या कामी मी डॉक्टर दाभोलकर यांना खूप त्रास देतो असे वाटायचे; पण त्यांनी ‘या त्रासाचा मला नेहमी आनंद वाटतो’ असे इस्लामपूर येथील अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सगळ्यांसमोर सांगितले. अंनिसमधील कार्याबद्दल प्राणिमित्र विलासभाई शहा यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने ‘राज्यस्तरीय निर्भय कार्यकर्ता पुरस्कार २०१९’ स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी, गांधीवादी कार्यकर्ते एन. सुब्बाराव यांच्या हस्ते रु. ११,०००/- चा पुरस्कार मला दिला गेला. या पुरस्काराची संपूर्ण रक्कम ‘आपलं घर’, नळदूर्ग या संस्थेला दिली. या संस्थेतूनच माझ्या अंनिसच्या कामाची सुरुवात झाली होती.
विद्यार्थी पोतराज प्रथेतून मुक्त केला :

अंनिसचे काम जसे जसे वाढेल अशा लोकांच्या अपेक्षा वाढत राहिल्या याचा मी अनेक वेळा अनुभव घेतला. जवळगा मेसाई तालुका तुळजापूर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत मी शिक्षक म्हणून काम करत होतो. त्याच गावात मेसाई माध्यमिक विद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी दीपक वाघमारे हा जवळच असलेल्या वडगाव देवचा रहिवासी. २००३ साली दहावीच्या वर्गात तो शिकत असताना मेसाई माध्यमिक विद्यालय या शाळेतील त्याचे शिक्षक एके दिवशी दीपकला माझ्याकडे घेऊन आले. दीपकचे काका श्री. अशोक वाघमारे सर यांच्या सूचनेवरून त्याला पोतराज प्रथेतून मुक्त करण्यासाठी दीपकचे मामा धन्यकुमार बनसोडे हे त्यांच्या शिक्षकांसोबत दीपकला घेऊन माझ्याकडे आले. हा विद्यार्थी पोतराज आहे, याला या दुष्टप्रथेतून मुक्त करा, असे त्याचे मामा आणि शिक्षक म्हणाले. दीपकच्या डोक्यावरील केस अनेक वर्षांपासून त्याच्या आजोबांच्या इच्छेनुसार चिवरीच्या देवीला नवस बोलला म्हणून वाढवले होते. नाइलाजाने त्याला वेणी फणी करून डोक्याला बुचडा बांधून व त्यावर टोपी घालून दीपक शाळेत यायचा. त्यामुळे त्याला खरंतर हे टाळता न आल्याने आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. शाळेतील मुलं त्याला ‘बायला’ म्हणून चिडवत असत, तर मुली त्याला खेळायला घेत नसत. अशा विचित्र परिस्थितीत तो असल्याने त्याच्या मामांना आणि त्याच्या काकांना तसेच दीपकच्या शिक्षकांनाही त्यातून मुक्तता अपेक्षित होती; पण त्याचे केस कापल्याशिवाय त्याची पोतराज प्रथेतून मुक्तता होणार नाही, हे मला मनोमन पटलं. म्हणून मी त्या मामांना म्हणालो की, याचे आपण केस कापले तर हा दीपक पोतराज प्रथेतून मुक्त होईल. दिपकच्या मामाने अशी अट घातली की, तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावाच्या महालक्ष्मी आईचे ठाणे देवसिंगा तूळ येथील जंगलात आहे. त्या देवीच्या देवळासमोर जाऊनच याचे केस कापावे लागतील आणि मी ते मान्य केले. मी आणि देविदास वडगावकर तसेच त्याचे मामा दीपकला घेऊन एके दिवशी त्या जंगलात गेलो. मंदिरासमोर जाण्यापर्यंत मोटरसायकलला रस्ता नव्हता म्हणून आम्ही मोटरसायकल लांब ठेवून देवीच्या मंदिरात दीपकला घेऊन गेलो. नेमके याचवेळी दीपकचा मामा कुठे गायब झाला. तो मंदिरात आलाच नाही. त्यावेळेला काय मोबाईलची सोय नव्हती. म्हणून आम्ही दीपकच्या मामाला शोधण्याचा प्रयत्न केला; पण दीपकच्या मामाचे काही देवीसमोर येण्याचे धाडस झाले नाही. मग आम्हीच त्यादिवशी दीपकचे मामा झालो. जावळ हे मामाच्या मांडीवर बसून काढायचं असतं, अशी ग्रामीण भागात समजूत आहे. आम्ही त्याचे मामा झालो आणि आम्ही दीपकला मांडीवर बसवून त्याचे केस कापले. त्याच दिवशी दीपक हा विद्यार्थी पोतराज प्रथेतून मुक्त झाला. आता उच्च शिक्षण घेऊन तो चांगलं जीवन जगत आहे. हे धाडससुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मला दिले, असे माझे नम्रपणे म्हणणे आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या नोंदणीच्या प्रयोगाबद्दल आपण सांगितले. त्याच्या वितरणाबाबतही आपण अनेक प्रयोग केले आहेत त्याबद्दल सांगा.
वार्तापत्राची छपाई सांगली येथे होते आणि तेथून त्यांचे वितरण सांगली येथून होते ज्यांचे नोंदणी झालेले आहे. त्या सर्वांना दर महिन्यात विशिष्ट दिवशी अंक पोस्टाने पाठवले जातात. सांगलीच्या पोस्टातून ते नियमितपणे पाठवले जातात; पण प्रत्यक्षात वर्गणीदारांना काही वेळा पोस्टामार्फत अंक मिळत नाहीत, अशी सार्वत्रिक ओरड आहे, ती खरी आहे. मी अंनिसचे वर्गणीदार नोंदवताना त्यावर त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून घेतो. सामान्यपणे पोस्टाने अंक मिळण्याची तारीख मला माहीत असते. त्या दरम्यान जर पोस्टाने त्या लोकांना अंक मिळाले तर ठीक, नाहीतर त्यांच्याशी संपर्क करून अंक मिळाले की नाही, याबद्दल चौकशी करतो आणि जर अंक मिळाले नसतील तर त्यांना माझ्याकडे कुरियरने मागविलेले अंक स्वतः पोहोच करतो.
सांगली कार्यालयातील वार्तापत्राची टीम राहुल थोरात, सुहास येरोडकर आणि सुहास पवार हे मला दर वेळेला ज्यादा अंक कुरिअरने पाठवतात. ज्याच्यातून अंनिसच्या नियमित आणि नवीन वर्गणीदारांना अंक देणे सहज शक्य होते. कधीकधी पोस्टातून अंक वितरणास टाळाटाळ होते, हे मी पाहिले आहे. वितरणावाचून अंक पोस्टात पडून राहतात. अनेक वेळा ते शेवटी रद्दीत जातात. यावर उपाय म्हणून, मी तुळजापूर येथील सर्वच पोस्टमन यांच्याशी मैत्री केली. त्यांना वाचण्यासाठी वार्तापत्राचे अंक भेट म्हणून दिले. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा फोन येतो,”सर वार्तापत्राचे अंक आलेत घेऊन जा.” पोस्ट ऑफिसमधून अंकाचा गठ्ठा ताब्यात घेऊन मी स्वतः जमेल तेवढे, जमेल त्यावेळी, संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी वार्तापत्राच्या संबंधित वर्गणीदारांना देतो. म्हणजे वार्तापत्राच्या वितरणाची स्वतंत्र व्यवस्थाच जणू मी उभी केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. यात पोस्टाकडील अंक वितरणाचा ताण कमी होतो, आणि मलाही लोकांना भेटता येते, जे मला सातत्याने आवडते. या भेटीत पुन्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबाबतची चर्चा होते. तो पुन्हा प्रचाराचा भाग झाला.
आपण अंधश्रद्धा निर्मूलन चमत्काराची प्रात्यक्षिके करता त्या अनुषंगाने आलेला एखादा विलक्षण अनुभव सांगा.

चमत्काराची प्रात्यक्षिके करताना बहुधा ज्यांच्या समोर मी व्याख्यानासाठी उभा आहे त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. याचा परिणाम असा होतो की, लोकांचा कार्यक्रमातील सहभाग वाढतो. आपलाच माणूस स्टेजवर गेला आहे, त्याने त्यातून एक विश्वास निर्माण होतो आणि त्याची फसगत झाली किंवा तो कशा पद्धतीने फसवला गेला याची उकल झाल्यानंतर मात्र समाधान मिळते ही गोष्ट मला सातत्याने भावते. कधी मंत्राने आरती वेळेवर पेटत नाही, कधी नारळ पेटत नाही.
त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे मंत्र म्हणून तो चमत्काराचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. अनेक ठिकाणी चमत्काराच्या सादरीकरणाचे प्रसंग उशिरा होतात, कारण त्यात असलेली रासायनिक अभिक्रिया वेगाने होत नाही किंवा अनेक दिवस ते साहित्य न वापरल्यामुळे त्यात रासायनिक बदल झालेले असतात. अशा वेळेला वेळ मारून न्यावी लागते. ती कशी न्यायची याची पद्धत शोधली आहे. त्यामुळे चमत्कारांचे प्रात्यक्षिक करताना एक प्रकारचा आनंद येतो. मुख्य म्हणजे आपण चमत्काराची उकल नंतर करून दाखवतो याचे समाधान वाटते.
वार्तापत्राबद्दल एकूण जनमत काय आहे? तुमचा अनुभव काय आहे?
वार्तापत्राबद्दल एकूण जनमत सकारात्मक आहे. लोक खूप भरभरून वार्तापत्राबद्दल बोलतात, चांगल्या प्रतिक्रिया देतात, इतरांना त्याबाबत शिफारस करतात, वर्गणीदार नोंदणीसाठी काही प्रमाणात नावे सुचवतात. वाचक वाढले पाहिजेत असे अनेकांना मनापासून वाटते, त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात; पण एकूण मोबाईलच्या युगात वाचनाकडे लोकांचा कल कमी झालेला आहे, असे सातत्याने जाणवते. त्यामुळे वर्गणीदार झाले असतील तरी आलेला अंक संपूर्णपणे वाचलेलाच असतो असे खात्रीने सांगता येत नाही, असे आता अनुभव येत आहेत. पूर्वी लोक संपूर्ण अंक वाचून त्याबद्दल प्रतिक्रिया देत असत. आता अलीकडे ते घडत नाही.
वार्तापत्र वाचल्याने आपल्या वर्तनात बदल झाला, असे तुम्हाला सांगणारे लोक भेटतात. तर त्यापैकी त्यांचे वेगळे अनुभव आहेत का?
वार्तापत्र वाचल्याने आपल्या वागण्यात थोडासा बदल झाला. घरी वार्तापत्र सुरू केल्यामुळे मुले वाचू लागली आणि चिकित्सक झाली, पत्नीच्या अंधश्रद्धेला धक्का पोहोचला. कर्मकांडापासून आम्ही दूर झालो, राहिलो, बुवाबाजीबद्दल सखोल माहिती मिळाली, आरोग्याबाबत जागरूक होण्यास मदत झाली, असे अनेक वाचक लोक सांगतात. काही व्यसन करणारे लोक ‘आपण व्यसनापासून दूर झाल्याचे’ व्यक्तिगतरीत्या भेटून सांगतात. हे ऐकून आपण योग्य दिशेने काम करीत आहोत याचा अनुभव येतो.
वार्तापत्राचे वितरण, देणगी संकलन, जाहिरातींचे संकलन या निमित्ताने आपण अंनिस चळवळीबद्दल लोकांशी सतत बोलत असता. या चळवळीबद्दल लोकांचे मत काय आहे? तुमचे आकलन काय आहे?

ही गोष्ट खरी आहे की, वार्तापत्राच्या नोंदणीच्या निमित्ताने मी सतत लोकांच्या संपर्कात असतो. ज्यांच्या संपर्कात असतो ती माणसे थोड्या प्रमाणात आणि त्यांचा विचार स्वीकारण्याजोगा किंवा मान्य असणारे असतात, त्यामुळे ती लगेच आपल्या चळवळीच्या विविध घडामोडींबाबत विचारत असतात. मी त्यांची मानसिकता ओळखून, वेळ पाहून नेमकेपणाने त्यांना सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणत, “जेवढे काम असते, तेवढे पैसे चळवळीसाठी मिळतात. फक्त तुम्ही लोकांना पैसे मागत राहा.” लोकांशी संवाद साधून, त्यांची मानसिकता ओळखून जाहिरात किंवा देणगीबद्दल नम्रपूर्वक आवाहन केल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळतो. आपल्या कामावर ज्यांचे प्रेम आहे, ज्यांचा विश्वास आहे अशी मंडळी नियमितपणे आपल्याला वर्गणी, देणग्या किंवा जाहिराती देतात, असा माझा गेल्या २३ वर्षातील अनुभव आहे. आपण त्यांच्यापर्यंत त्यांच्या सोयीनुसार पोहोचण्यास कमी पडतो, ही मात्र त्यातील महत्त्वाची बाब आहे. अनेक वेळा चित्र असे दिसते की, कार्यकर्ते म्हणून आपण कमी पडतो. आपापल्या जबाबदार्या सांभाळून आपण हे काम करत असल्यामुळे, ही गोष्ट साहजिक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र याबद्दल लोकांच्या काय अपेक्षा आहेत? त्यांना चळवळीकडून, वार्तापत्राकडून काय अपेक्षित आहे?

अंनिस चळवळीबद्दल अनेक लोकांना आपुलकी वाटते, त्या आपुलकीतून ते सतत प्रश्न विचारतात, चर्चा करतात आणि हे काम अधिक वेगाने वाढविले पाहिजे, तरुण लोकांना या कार्यात आणले पाहिजे असे वयाने ज्येष्ठ असणारे वार्तापत्राचे वाचक सांगतात. शासनाकडून हे काम अधिक प्रभावीपणे व्हायला पाहिजे. शासनाने या कामाला पाठबळ दिले पाहिजे, असेही ते आवर्जून सुचवितात. शासकीय, निमशासकीय पातळीवर तसेच ग्रामीण व शहरी भागात या कामात लोकांचा सहभाग वाढविला पाहिजे, असे त्यांना वाटते. वार्तापत्र प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आणि सार्वजनिक वाचनालयात पोहोचले पाहिजे, त्यातील शैक्षणिक बाबींवर चर्चा व्हायला पाहिजे. लोक शिक्षित झाले आहेत; पण सुशिक्षित आणि चिकित्सक झाले पाहिजेत, असे त्यांना वाटते. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू व्हावे, त्यांनी आधुनिक, पुरोगामी, परिवर्तनवादी विचार वाचून त्यावर विचारमंथन करावे, असे प्रत्येक वैचारिक प्रगल्भता असणार्या नागरिकांना वाटते. समाजातून अंधश्रद्धा समूळ नष्ट झाल्या पाहिजेत, त्यांचे निराकरण व्हायला पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे. वार्तापत्रात वाचकांच्या मनाचे चित्र हवे तेवढे येत नाही, ते यायला हवे, अशी लोकांची अपेक्षा आहे. लोकांचा केवळ वाचक म्हणून वापर करू नये. लोकांना काय पाहिजे, याचा विचार प्रत्येक अंक काढताना करावा. लोकांचा वार्तापत्रात सहभाग वाढविला पाहिजे, कारण ते आता प्रौढ झाले आहेत, असे मला जाणवते. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडलो गेलो, याच्यात माझ्या जीवनाची सार्थकता आहे, असे मला अनेक वेळा वाटत आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी आजन्म सच्चा कार्यकर्ता म्हणून सक्रियपणे कार्यरत राहीन. लोकांना बदलविण्याचा प्रयत्न करत राहीन, हेच माझ्या आयुष्याचे मिशन मी ठरविले आहे.
चंद्रकांत उळेकर गुरुजी
मु.पो.आरळी (बु.), ता.तुळजापूर, जि.धाराशिव
संपर्क : ९८२२२ ५८१२२
– संवादक : अॅड. देविदास वडगावकर
(विधिज्ञ, धाराशिव)
संपर्क : ९४२३० ७३९११