डॉ. प्रसन्न दाभोलकर -
सळसळत्या वार्याच्या सहजगतीने
पुसट स्पर्श करीत, झपाट्याने मार्ग काढीत
तू तुझी खास हनुमान उडी मारायचास.
पकडायला आडवे आलेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या
खांद्यांना निसटता स्पर्श करीत
त्यांच्या कसलेल्या आक्रमक देहांना उल्लंघून
मध्यरेषा अलगद ओलांडायचास.
त्यांना खाली न दाबता
त्यांच्याच उंचीचा अचूक आधार घेत
चपळाईने निसटायचास तू.
अरे आता हा सापडला
असे समजून श्वास रोखून धरलेले सगळे
केव्हा आनंदाने हर्षोद्गार काढायचे
ते त्या ना तल्लीन प्रेक्षकांना कळायचं
ना पकड घेण्यास पुढे सरसावलेल्या खेळाडूंना.
जिद्दीने, नैसर्गिक कौशल्यावर घेतलेल्या अफाट मेहनतीने
मोकळ्या मनाने, दिलदारपणे, सर्वांना सामावून घेत
तू केवळ डावच नाही खेचून आणायाचास
तर सार्यांचीच, आपल्या प्रतिस्पर्ध्यांचीही मने काबीज करायचास.
तुझ्या चेहर्यातून, तुझ्या नजरेतून ओसंडून वाहणारे
तुझे मुक्त, निरागस हास्य
ते तर देवदुर्लभ.
दुसर्या पार्टीतील मोहर्याला खोडा घालून
घरी बसवणारी कपटी कडू बेणी होतीच की तेव्हाही
मिळवायचास तू त्यांचाही आदर आणि प्रेम.
सारे जीवन रसरसून खेळलास
नीती-नियम काटेकोर जगत
कोणतेही शल्य, कटुता, राग, द्वेष
यांना तीळमात्रही जागा न देत
सार्यांना आपल्या विचाराने, वागणुकीने आणि आपुलकीने आपलेसे करत.
सरळपणे सज्जनता हरत नाही म्हणून
तडफडणारे असतात काही पिसाट
आणि त्या पिसाटांना जाणीवपूर्वक पोसणारे
त्यांचे बकध्यानी पोशिंदे
करून सवरून नामानिराळे राहणारे.
खोटे आरोप, खोटे खटले, खोट्या बातम्या
आटोकाट असत्यातून
सत्य चिरडत नाही हे पाहून
केला अखेर त्यांनी घात
कणखर, कार्यमग्न शरीर शांत झाले.
बाल हनुमानाच्या सूर्यग्रासी झेपेने
भयचकित झाले होते अवघे.
परंतु तुझी अखेरची हनुमान उडी
सर्व दुष्टाव्याला पार करून
बनली एक प्रेममय, प्राणदायक झुळूक.
पसरत आहे ती आता दशदिशांना
आशेचा, विचारांचा, ज्ञानाचा, कृतीचा
तुझा आदर्श अनेकांच्या मनात जागवीत
असंख्यांना प्रेरित करीत
अवघे विश्वच मंगल करीत.
-डॉ.प्रसन्न दाभोलकर, सातारा
