कॅच – 22

प्रभाकर नानावटी -

जोसेफ हेलर या अमेरिकन लेखकाच्या ‘कॅच-22’ या कादंबरीत सैनिकी जीवनातील वैफल्य, तेथे घडत असलेला मूर्खपणा, वगैरेंचं धारदार आणि तिरकस चित्रण केलं आहे. त्याची ‘कॅच-22’ ही कादंबरी रातोरात लोकप्रिय झाली. नंतर ‘कॅच-22’ हा एक परवलीचा शब्द बनला. एखादी अनाकलीय किंवा अतार्किक स्थिती म्हणजे ‘कॅच-22’ असा अर्थ रूढ झाला. उदा. एखाद्या व्यक्तीचा वाचायचा चष्मा घरात हरवला असेल तर ती व्यक्ती चष्मा कसा शोधेल? अशा स्थितीला ‘कॅच-22’ म्हणतात. असंच दुसरं व सतत वापरात असलेलं उदाहरण म्हणजे ‘अनुभव नाही म्हणून नोकरी नाही व नोकरी नाही म्हणून अनुभव नाही’. ‘कॅच-22’ ला शब्दकोषात स्वतंत्र अर्थ नाही. ज्या परिस्थितीत हा शब्द वापरला, त्यावरून याला अर्थ प्राप्त होतो.

मुळात ‘कॅच-22’ हा शब्दप्रयोग जीवनात घडणारा विरोधाभास दर्शविण्यासाठी वापरला जातो.

जोसेफ हेलरच्या कादंबरीतील वैमानिक असलेल्या नायकाला शत्रूच्या प्रदेशावर बाँबवर्षाव करून जीव धोक्यात घालणे आवडत नसते. त्यासाठी नको तितकी कारणं शोधून तो विमानोड्डाण टाळत असे. आजारपणाचे सोंग घेणे, मित्राकरवी उड्डाण रद्द करणे वा आपण ‘क्रेझी’ (विक्षिप्त) आहोत, असे पटवणे इत्यादी प्रकारचे प्रयत्न तो करत असे. मात्र त्याचा वरिष्ठ या गोष्टीकडे लक्ष न देता त्याला मोहिमेवर पाठवित असे. तुम्ही खरोखरच ‘क्रेझी’ असल्यास जीव धोक्यात घालून मोहिमेवर जाता व ‘क्रेझी’ वैमानिकाच्या हातात विमान दिले जाणार नाही, हा नियम असतो. मग हा ‘क्रेझी’पणा सिद्ध कसा करायचा? त्यामुळे तुमचे वरिष्ठ तुम्हाला मोहिमेवर पाठवतात व तुम्ही मोहिमेवरून सहीसलामत परत आल्यास तुम्ही ‘क्रेझी’ नाही, हे सिद्ध होते. मग पुन्हा एकदा जा मोहिमेवर… अशा प्रकारे वेड सुटल्याशिवाय लग्न नाही व लग्न न केल्यास वेड सुटणार नाही, हा तिढा म्हणजेच ‘कॅच-22.’ जॉर्ज ऑर्वेल या इंग्रजी लेखकाच्या ‘नायंटीन एटी फोर’ या जगप्रसिद्ध कादंबरीत अशा विरोधाभासाचे फार सुंदर चित्रण आहे. ‘युद्ध म्हणजे शांती’, ‘स्वातंत्र्य म्हणजे गुलामी’, ‘अज्ञानातच खरी शक्ती’ अशाप्रकारे मूळ शब्दांनाच त्या विरुद्ध अर्थ देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

‘कॅच-22’सारखी स्थिती नियम, कायदे, नियमन, नियंत्रण इत्यादी गोष्टींतून उद्भवत असतात. सामान्य व्यक्तींच्या आकलनापलीकडे या गोष्टी असतात व मुळात ‘असे का?’ हा प्रश्नच विचारू देण्यास आडकाठी असते. एखाद्या नियमाच्या विरोधात लढा द्यायचे ठरविल्यास पहिल्याप्रथम तुम्हाला त्या नियमाप्रमाणे वागण्याची अट घातली जाते. एकदा का त्या नियम-पोटनियमाच्या जंजाळात सापडल्यास त्यातून सुटका नसते. सत्तेवर असलेल्यांचे हितसंबंध जपण्यासाठी अशा प्रकारच्या ‘कॅच-22’ची स्थितीची निर्मिती होते. त्यामुळे सामान्य माणूस वैतागतो व निःसहायक होतो. उदा. एकेकाळी बँकेतून कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला कर्जाची गरज नसणे, ही अट होती. अशा प्रकारचे अंतर्गत विरोधाभास असलेल्या नियमामुळे सत्ताधार्‍यांच्या खुर्चीला थोडासासुद्धा धक्का लागत नाही. परंतु सामान्य माणूस ‘कॅच-22’ च्या चक्रव्यूहात अडकून पडतो व सत्तेवर असलेले मजा बघत ‘कैसा फसाया…!’ म्हणत निर्धोक राहतात.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]