अनिल चव्हाण -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जाणारा महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ कोल्हापुरातील के.आय.टी. कॉलेजमधील प्रा. तेजस्विनी देसाई यांना माननीय कुसुमताई मिठारी यांच्या हस्ते देण्यात आला. प्रमुख वक्ते कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवाजी पेठेतील, शिवाजी मंदिर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलासराव पोवार सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला!
अॅड. अजित चव्हाण यांनी स्वागत करताना तेजस्विनी देसाई या शिवाजी पेठेच्या कन्या आहेत आणि थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक काका देसाई यांच्या सूनबाई आहेत, याची आठवण करून दिली. “देशासाठी तळहातावर शिर घेऊन ब्रिटिशांशी लढणार्या काका देसाईंच्या सुनेला, ब्रिटिशांना मदत करणार्यांची नातवंडे देशभक्तीचे धडे देत आहेत, हा सर्वांत मोठा विनोद आहे.”
हा पुरस्कार देण्यामागची आपली भूमिका प्रास्ताविकामध्ये स्पष्ट करताना संयोजक अनिल चव्हाण म्हणाले, कोल्हापुरात बहुजनांच्या सहा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षिकांना धर्माच्या नावावर टार्गेट करण्यात आले. या शिक्षिका मुस्लीम, ख्रिश्चन व मराठा आहेत. बहुजन आणि अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्थांना बदनाम करण्यासाठी हा प्रयत्न होता. प्रत्येक ठिकाणी प्राचार्य आणि संस्थाचालकांनी सबुरीची भूमिका घेऊन महिलेला माफी मागण्याची सूचना केली. यातील पाच शिक्षिकांनी माफी मागून ही प्रकरणे मिटवली. परंतु प्रा. तेजस्विनी देसाई यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. प्रा. तेजस्विनी देसाई यांनी सनातन्यांच्या धमकीला भीक न घालता ताठपणे उभा राहिल्या, म्हणून सावित्रीबाई फुल्यांचा वारस चालवणार्या प्रा. तेजस्विनी देसाई यांना आम्ही महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देत आहोत.”
मीना चव्हाण तेजस्विनी देसाई यांची ओळख करून देताना म्हणाल्या, “त्या एम. एस्सी. फिजिक्स विषयात शिवाजी विद्यापीठात पहिल्या आल्या असून त्यांनी पीएच. डी. केली आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘नोबेल शलाका’ या पुस्तकात जगभरातील सर्व म्हणजे, २० नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञांची स्फूर्तिदायक चरित्रे लिहिली आहेत, सध्या त्या केआयटी कॉलेजमध्ये कार्यरत आहेत.”
प्रमुख वक्ते कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी कोल्हापुरात अल्पसंख्याक शिक्षकांना धर्मांध सनातन्यांनी टार्गेट केल्याची उदाहरणे सांगितली. गळ्यात भगवे कपडे घालून कॉलेजमध्ये जायचं, उत्तरपत्रिकेवर देवाचे नाव लिहायचं किंवा वर्गात औरंगजेबाच्या नावाने वाद घालायचा, अशा पद्धतीने भांडणे उकरून काढण्यात येतात. कॉलेज बाहेरील मुले आणून दहशत माजवण्यात येते. त्यामुळे उगीच वाद नको म्हणून प्राचार्य तडजोड स्वीकारतात. त्यामुळे धर्माच्या नावावर गुंडगिरी करणे सोपे झाले आहे. पण प्रा. तेजस्विनी देसाई अशा धर्मांध गुंडांना पुरून उरल्या. म्हणून तेजस्विनीताईंना पुरस्कार दिला जात आहे!”
प्राध्यापिका साधना देसाई, कॉ. रमेश वडणगेकर, आनंदराव चौगुले, अमर जाधव, रवी चव्हाण यांनी प्रा. तेजस्विनी देसाई यांच्या कॉलेजमधील पुरोगामी कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर तेजस्विनी देसाई यांचा कुसुमताई मिठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तेजस्विनी देसाई यांनी प्रथम संयोजकांचे आभार मानले त्यानंतर महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रातील उस्मान शेख आणि फातिमा शेख यांच्या मदतीचे महत्त्व स्पष्ट केले व महात्मा फुले यांच्या विचारांची आणि आचारांबद्दल सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विलासराव पोवार सर यांनी सनातनी इतिहास बदलत आहेत, महामानवांची बदनामी करत आहेत, याची उदाहरणे दिली. प्रत्येक घटनेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अर्थ लावण्याचे आवाहन केले. अॅड. अजित चव्हाण यांनी स्वागत, अस्मिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शर्मन पाटील यांनी आभार मानले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबर या कार्यक्रमात आम्ही भारतीय लोकआंदोलन, प्रहार संघटना, आम्ही मांसाहारी, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटना याही सामील झाल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रकांत बागडी, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी, शशांक चव्हाण, चंद्रकांत सूर्यवंशी, छाया पोवार, सुनंदा चव्हाण, छाया यादव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
– अनिल चव्हाण