नरेंद्र लांजेवार - 9422180451
![](https://anisvarta.co.in/wp-content/uploads/2021/05/Ek-sanwad.jpg)
1 मे : महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष लेख…!
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे ऐकताना अंगात चैतन्य संचारायचे. कोणी ‘पुरोगामी महाराष्ट्र’ म्हटलं की महाराष्ट्राचा असल्याचा अभिमान वाटायचा. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा…’ असं म्हटलं की स्फुरण चढायचं. ‘कष्टकरी–कामगारांचा, शेतकरी–शेतमजुरांचा, आदिवासी–बहुजनांचा महाराष्ट्र’ म्हटलं की, महाराष्ट्र खरंच ‘आपला’ वाटायचा. सह्याद्री–सातपुड्याची गिरीशिखरे म्हटले की, महाराष्ट्र म्हणजे हा एक भव्य देशच वाटायचा.
“मंगल देशा, पवित्र देशा, माझ्या महाराष्ट्र देशा…. तुला हीरक महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकीकडे आनंद आणि दुसरीकडे मनात दुःख अशी संमिश्र भावना आहे. या संमिश्र भावनेतून तुझ्याशी संवाद साधताना; त्यातही तू साठी पार केली असल्यामुळे तुला जर काही कमी ऐकायला आलेच, तर ‘ध’चा ‘मा’ नको म्हणून हे पत्र लिहीत आहे…”
“माझ्या श्री महाराष्ट्र देशा… संतपरंपरेतून समानतेच्या विचारांची पेरणी झालेल्या तुझ्या या स्फूर्तिदायक, विवेकी भूमीत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख, साने गुरुजी, अण्णा भाऊ साठे, अमर शेख, यशवंतराव चव्हाण अशा दिग्गज रत्नांची कर्मभूमी असणार्या तुझ्या भूमीला वंदन करून मी आज तुझ्याशी संवाद साधतो आहे…
माझ्या कोमल देशा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साठ वर्षांपूर्वी तुझी खरी निर्मिती झाली. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ असे तुझे खरे नामांतर झाले अन् मराठी भाषकांचे एक राज्य व्हावे, ही संकल्पना पूर्णत्वास आली.
मी शाळेत असताना ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा…’ असं कोणी म्हणताच छाती भरून यायची. ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा…’ असं म्हटलं की स्फूर्ती चढायची. ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे ऐकताना अंगात चैतन्य संचारायचे. कोणी ‘पुरोगामी महाराष्ट्र’ म्हटलं की महाराष्ट्राचा असल्याचा अभिमान वाटायचा. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा…’ असं म्हटलं की स्फुरण चढायचं. ‘कष्टकरी-कामगारांचा, शेतकरी-शेतमजुरांचा, आदिवासी-बहुजनांचा महाराष्ट्र’ म्हटलं की, महाराष्ट्र खरंच ‘आपला’ वाटायचा. सह्याद्री-सातपुड्याची गिरीशिखरे म्हटले की, महाराष्ट्र म्हणजे हा एक भव्य देशच वाटायचा. तसा तू जगातील अनेक देशांपेक्षा भौगोलिकदृष्ट्या व लोकसंख्येने सुद्धा मोठा आहेस. महात्मा गांधी तुला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हणायचे. तू किती जनचळवळींना जन्म दिलास! राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असो की, कामगार, उपेक्षितांच्या संघटना; त्या महाराष्ट्रासारख्या बुध्दीच्या देशातच स्थापन झाल्यात. चुकीच्या प्रत्येक रुढी-परंपरेच्या विरुद्ध प्रथम आवाज महाराष्ट्रातूनच उठला. शिक्षण-प्रबोधनाची चळवळ असो अगर संपूर्ण स्वातंत्र्यासाठी रस्त्यावरची लढाई असो; तूच सर्वांत पुढे होतास. देशपातळीवरचे सर्वांत जास्त ‘भारतरत्न’ तूच देशाला दिलेत. तरी आज महाराष्ट्रात विचारवंतांची वानवा दिसते आहे. जो-तो जात-पोटजातीत विभागलेला दिसतोय. महाराष्ट्रहितापेक्षा स्वजात-धर्महित, राजकीयहित आणि स्वप्रतिमेच्या प्रेमात येथील बहुसंख्य लोक दिसतात. यात सर्वच राजकीय पक्षांचे लोक अग्रेसर आहेत. आपला भावभक्तीचा महाराष्ट्र देशात अग्रेसर कसा राहील, याचा आज कुणीच विचार करताना दिसत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
माझ्या राकट देशा, कणखर देशा… अवघ्या साठ वर्षांत इतकी अधोगती कशी रे झाली? ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही आपली शिकवण असताना आपण आपली जबाबदारी विसरून ‘राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या’ असे का म्हणतो? मोठ्या कष्टाने लोकशाही प्राप्त झाली असताना आम्हाला राजेशाहीची स्वप्न का पडावीत?
‘बहु असोत सुंदर संपन्न की महा – एकचि महाराष्ट्र देशा’ ही तुझी गौरवगाथा दुष्काळ, दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीची खाण ठरते आहे. या महंत अशा राष्ट्रात बेसुमार बेरोजगारी वाढली आहे, ‘चिरीमिरी’शिवाय कोणतेच काम होत नाही. शिक्षण तर एवढे महाग झाले की, कॉन्व्हेंटच्या अॅडमिशनलाच पोराच्या बापाला पोराच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र विकावे लागते आहे. सर्व मोठ्या शहरात झोपडपट्ट्या वाढताहेत. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे रोजच संपूर्ण राष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघते आहे. लाचार, स्वाभिमानहीन राजकीय पक्ष वैचारिक कणाहीन; तसेच दिशाहीन झाले आहेत. कधी काळी देशाचे नेतृत्व करणारा तू, आज नेतृत्वहीन झाला आहेस. गेल्या साठ वर्षांत पाण्यासाठी वणवण फिरणार्या राज्यातील 60 टक्के माय-माऊलींच्या डोक्यावरचा हंडा आपण कमी करू शकलो नाही. राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्या थांबू शकल्या नाहीत. विचारवंतांच्या खुनांच्या बाबतीत कोर्ट-कचेरीत फक्त ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. धार्मिक विद्वेषाचे राजकारण करणार्यांना शेतकर्यांच्या, बेरोजगारांच्या आत्महत्या दिसत नाहीत. शेतकरी आत्महत्येत आपण संपूर्ण देशात अव्वल स्थानी असल्यावरही कोणालाच का चिंता वाटत नाही? याचीच चिंता मला सतावत असते.
माझ्या नाजूक देशा, कोमल देशा, 105 हुतात्म्यांचा तेजस्वी त्याग आणि बलिदानाद्वारे तुझी परंपरा उजळली; पण या 105 हुतात्म्यांच्या एकाही कुटुंबातील वारसदाराला याच महाराष्ट्रात साधा आमदार किंवा नामदारही होता आलं नाही, इतका कृतघ्न कसा काय तू असू शकतोस?
फणसवाडीतला मिसरूटही न फुटलेला एक तरुण विद्यार्थी सीताराम बनाजी पवार हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिला हुतात्मा ठरला, ज्याला 21 नोव्हेंबर 1955 ला गोळी लागली. त्याच्यासमवेत त्यादिवशी पंधरा लोक शहीद झालेत. यात विद्यार्थी, युवक मोठ्या प्रमाणावर होते. 105 हुतात्म्यांमध्ये सर्वच जाती-धर्मांचे लोक होते. ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने तुझ्यासाठी लढा देऊन महाराष्ट्राचा मंगलकलश आणला होता, त्याच संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये तुझ्या स्थापनेनंतर अवघ्या दीड महिन्यांत फूट पडली. जो-तो सत्तेचा वाटेकरी होऊ पाहत होता. जात आणि धर्माचे राजकारण पुढे करू पाहणार्यांना सत्ताप्राप्तीसाठी ही फूट आवश्यक वाटत होती. बेळगावसह कारवार, बीदर, भैसदेही, मुलताही, संसर, बर्हाणपूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच नाही, याचे शल्य अनेकांना आजही आहे.
अंजन-कांचन-करवंदीच्या माझ्या महाराष्ट्र देशा… खरं सांगू का? आमचं मराठी भाषाप्रेम बेगडी आहे. मराठीला गेल्या साठ वर्षांत आम्ही ज्ञानभाषा नाही करू शकलो. सध्या तर विनाअनुदानित मराठी भाषिक प्राथमिक शाळा सुरू करायला सुद्धा आमचे सरकार परवानगी देत नाही. मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण देणे जणू गुन्हा ठरू पाहत आहे. एकीकडे, इंग्रजी कॉन्व्हेंटचे भरघोस पीक आले आहे. आता घरात हल्ली मुलंसुद्धा आई-वडिलांना ‘मॉम’ आणि ‘डॅड’ संबोधनं पसंत करतात.
माझ्या बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा… ज्यांचा शब्द प्रमाण मानावा, असा एकही सत्पुरुष आपल्या राज्यात दिसू नये, हे वाईटच. ज्याचे चरण स्पर्श करावेत, असे चरण आपल्या राज्यात नाहीतच आणि नको त्या लोकांना चरणस्पर्श केल्याशिवाय कोणतेच काम होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. संस्थानिक, सहकारसम्राट, शिक्षणसम्राट यांच्या हातात तुझ्या सत्तेची चावी आहे. सरकार कोणाचंही असो, हीच माणसं अदलून-बदलून सत्तेत दिसतात. राजकारणात घराणेशाहीचा रोग जडलाय.
भावभक्तीच्या माझ्या महाराष्ट्र देशा… तुझ्या निर्मितीसाठी ज्यांनी रक्त सांडले, हौतात्म्य पत्करले ‘त्या’ 105 हुतात्म्यांचे वर्षातून एकदा नाव घेतले की, आम्ही कृतज्ञ पावतो. पुन्हा वर्षभर हुतात्मा स्मारकाकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्न हजारदा विचारला तरी साधा तवंगही येथील व्यवस्थेवर उमटत नाही, एवढी ती बत्थड झाली आहे. सर्व सरकारी विभाग सत्तेवरील लोकांना पैसे गोळा करून देणारी कुरणे झाली आहेत. समतेचा कितीही उद्घोष केला तरी जातीयता मनातून जात नाही. शहरात अजूनही भाड्याने घर देताना जात, आडनाव पाहूनच दिले जाते. गावात अजूनही मंडपाच्या बाहेरच मागासवर्गीयांच्या पंगती बसविल्या जातात. हीच काय आमची पुरोगामी मानसिकता? ‘कोपर्डी’-‘खैरलांजी’ दिवसाआड घडते आहे. निष्पाप मुलींचा हकनाक जीव जातो आणि आरोपी राजरोसपणे मोकाट फिरत आहेत. राज्यात गावोगावी मंदिरांची संख्या जास्त आणि वर्गखोल्यांची कमतरता आहे. आम्ही मंदिरासाठी भांडत आलो आणि सुसज्ज दवाखान्यासाठी कधी रस्त्यावर उतरलोच नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे खरे मारेकरी अजूनही शोधले जात नाहीत, तरी शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय एकही दिवस आमच्या राज्यकर्त्यांचा जात नाही.
माझ्या प्रिय महाराष्ट्र देशा, कधी काळी तू ‘महंत’ असा महाराष्ट्र होता; पण आता तुला आम्ही फक्त भौगोलिक विस्तारानेच महान ठेवले. प्रादेशिक असमानता प्रचंड वाढत असल्याने उद्या कदाचित विदर्भ व मराठवाडा यांची स्वतंत्र छोटी राज्यं तयार झाली तर वाईट वाटून घेऊ नकोस. तसाही तू दिलदार आहेस. तुझं मन मोठं आहे; पण तुझ्या राज्यातील जनतेची मने दिलदार नाहीत; ती संकुचित, जातीयवादी, धर्मांध, अंधश्रद्धाळू बनत चालली आहेत. तुला पुन्हा महान बनवण्यासाठी तुझी गौरवगीते गाण्यापेक्षा शोकगीतेच आळवण्यात आम्ही धन्यता मानू लागलो आहोत.
शाहिरांच्या देशा, तू आम्हाला माफ कर. तशीही तुझ्या स्वप्नांची राखरांगोळी होताना आम्हाला माफी देण्याशिवाय तुझ्या हाती काहीच उरत नाही, हेही खरं आहे. शंभर वर्षांनंतरचा महाराष्ट्र कसा असावा, यावर आज कोणीच विचार करीत नाही. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र किती मस्त होता! हा विचार करणार्यांना हात जोडून शुभेच्छा देण्याशिवाय माझ्यासारख्याच्या हाती काहीच नाही, हे तितकेच खरे आहे. असो.
मराठी भाषेत एक म्हण आहे, साठी आणि बुद्धी नाठी. साठी गाठल्यावर बुध्दी काम करीत नाही, अस्सं म्हणतात. सरकारसुद्धा साठी गाठलेल्यांना रिटायर्ड करते. त्यामुळे तू आता जास्त विचार करू नको. तसेही खासगीकरणाच्या नावावर आम्ही तुझे गड-किल्ले, समुद्रकिनारे, पठार आणि डोंगर, नद्या विक्रीला काढल्याच आहेत. इतके सारे होऊन आणि होत असूनही मुंबई येथील हुतात्मा स्मारकावरील मशाल कायमस्वरुपी तेवत राहील, येथे गॅस सिलिंडरची कमतरता पडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. शेवटी माणूस जगला काय? आणि मेला काय? स्मारकं जिवंत राहिली पाहिजेत आणि आम्ही महाराष्ट्रीयन माणसं स्मारकाचे पूजक आहोत. त्यामुळे काळजी नसावी. तुझ्या हुतात्मा स्मारकापासून प्रेरणा घेऊन कदाचित पुन्हा नवक्रांतीची सुरुवात होईलही…
कर्त्यांच्या देशा, खरं सांगू का? याच तर दिवसांची मी वाट बघत आहे…”
तुझा चाहता
नरेंद्र लांजेवार
लेखक संपर्क : 9422180451