डॉ. नितीन शिंदे - 9860438208
विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या अल्बर्ट आइन्स्टाइन यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, की ‘आजअखेर दोन महायुध्दं झालेली आहेत, तेव्हा तिसरं महायुध्द होईल का? आणि त्या महायुध्दामध्ये शस्त्र म्हणून कशाचा वापर केला जाईल?’ पत्रकाराला; किंबहुना सर्वांनाच उत्तर अपेक्षित होतं की, तिसरं महायुध्द होणारच आणि त्यात शस्त्र म्हणून अणुबाँब, क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचा वापर होणार; पण आइन्स्टाइन यांनी दिलेलं उत्तर सर्वांनाच अचंबित करून गेलं. आइन्स्टाइन म्हणाले की ‘तिसरं महायुध्द होईल की नाही, हे मी सांगू शकत नाही; पण चौथं महायुध्द मात्र नक्की होईल आणि त्या महायुध्दामध्ये शस्त्र म्हणून दगड-गोट्यांचा वापर केला जाईल.’ हे संभाषण आइन्स्टाइन यांच्या बाबतीत प्रत्यक्षात घडलं की नाही, याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही; पण जे उत्तर मिळालं, ते आजही आपणाला विचार करायला लावणारं आहे. आइन्स्टाइन यांच्या म्हणण्यानुसार चौथं महायुध्द होण्यापूर्वी तिसरं महायुध्द होणार, हे स्वाभाविकच आहे आणि या महायुध्दात अणुबाँब, अण्वस्त्र, क्षेपणास्त्र यांचा सर्वत्र वापर होणार. संपूर्ण पृथ्वीवासीय यात ओढले जाणार. संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होणार. एकदा का सर्वनाश झाला की, पुन्हा एकदा डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिध्दांतानुसार एकपेशीय प्राणी, जलचर, माकड, आदिम मानव असा प्रवास सुरू होणार. या प्रवासानुसार सुरुवातीच्या काळात वापरलेली दगडांची हत्यारं येणार आणि याच दगडांच्या हत्यारानिशी चौथं महायुध्द सुरू होणार.
आज निर्माण झालेला गलवान घाटीचा प्रश्न असेल किंवा कायमस्वरुपी टिकून राहिलेला काश्मीरचा प्रश्न; यावर भाष्य करताना ‘एकदाचा अणुबाँब टाकून हा प्रश्न कायमचा मिटवा,’ अशी वल्गना केली जाते. एखाद्या हॉटेलमध्ये वडापाव खात अशा पध्दतीने भाष्य करणार्या महाभागांनी ना ‘हिरोशिमा’ अनुभवलेला आहे, ना त्याची झलक चित्ररूपाने पाहिलेली आहे. शत्रू तुल्यबळ किंवा सरस असेल, तर असं भाष्य होतच नाही, हे सुध्दा सध्याच्या सीमेवर सुरू असणार्या घडामोडींवरून आपण अनुभवत आहोत. चीनचं नाव उच्चारायलासुध्दा न धजावणारा हा वर्ग इतर वेळी मात्र आपली खुमखुमी अणुबाँबच्या रुपात मिरवण्याच्या मस्तीत मश्गुल असतो.
दि. 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी सव्वाआठ वाजता अमेरिकेच्या कर्नल पॉल तिबेट आणि कॅप्टन रॉबर्ट लुईस यांनी ‘इनोला गे’ नावाच्या बाँबर विमानातून ‘लिटिल बॉय’ या गोंडस नावाचा 4.4 किलो वस्तुमान आणि 3 मीटर लांबी असलेला अणुबाँब हिरोशिमावर टाकला आणि विमानासहित परागंदा झाले. जवळपास 63 किलो ‘युरेनियम 235’ या किरणोत्सर्गी मूलद्रव्यापासून तयार केलेल्या 15 किलो टन टीएनटी स्फोटक क्षमतेच्या या ‘छोट्या मुला’ने त्यानंतर जो हल्लकल्लोळ माजवला, त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.
या अणुबाँबचा हवेमध्येच स्फोट होऊन शहराच्या मध्यावर 570 मीटर उंचींवर तीन लाख सेंटिग्रेड तापमानाचा सूर्य एकाएकी अवतरला. त्यातून 180 मीटर व्यासाचा एक अग्निगोळ निघाला आणि त्याने हिरोशिमा शहर अक्षरश: भाजून काढले. (पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरील सूर्याची उष्णता आपण रोज अनुभवत असतो. एवढ्या प्रचंड अंतरावरून सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवरचे सरासरी तापमान 27 अंश सेंटिग्रेडच्या आसपास असते. तापमान 45 अंश सेंटिग्रेडच्या वर गेले तर उष्माघाताने मृत्यू संभवतो, हे लक्षात ठेवा.) सात किलोमीटर शहराची राखरांगोळी झाली. जमिनीचे तापमान 6000 अंश सेंटिग्रेडपर्यंत वाढले. शहरभर आगी लागल्या. पन्नास हजार लोक तात्काळ मरण पावले. काही तासांत त्यात आणखी हजारोंची भर पडली, लाखोंचे अतोनात हाल झाले. जवळपास 2.2 किलोमीटर परिसरातींल लाकडी बांधकाम जळून खाक झाले. स्फोटामुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत सिमेंट काँक्रीटची बांधकामे उद्ध्वस्त झाली. पाच किलोमीटर परिसरातील घरांची पडझड झाली. फुटलेल्या खिडक्या तर वीस किलोमीटरपर्यंत सापडल्या. ज्यांच्या शरीरावर किरणोत्साराने प्रखर आघात केला होता, असे लोक कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाच्या भक्ष्यस्थानी पडून नजीकच्या काळात हालहाल होऊन गेले. सर्व मृतांची संख्या जवळपास अडीच लाख होती. हिरोशिमा शहरातील माणसांची ‘राख’ झाली म्हणण्यापेक्षा ‘वाफ’ झाली, असं खेदानं म्हणावं लागतंय. हा नरसंहार कमी होता की काय, म्हणून केवळ तीनच दिवसांनंतर नागासाकीवर दुसरा प्रयोग करण्यात आला.
हिरोशिमाच्या धक्क्यातून सावरत असतानाच दि. 9 ऑगस्ट 1945 रोजी पहाटे 3.50 वा. पायलट मेजर चार्लस स्वीने याने बोइंग ‘बॉकस्कार’ या विमानाव्दारे ‘फॅटमन’ हा प्ल्युटोनियमपासून तयार केलेला 4.6 किलो वस्तुमानाचा आणि 3.3 मीटर लांबीचा दुसरा अणुबाँब नागासाकीवर टाकला. या अणुबाँबची क्षमता 21 किलोटन टीएनटी होती. ‘लिटिल बॉय’च्या तुलनेत जास्त. या हल्ल्याव्दारे जवळपास 1 लाख 25 हजार लोक मृत्युमुखी पडले. ‘फॅटमन’ची क्षमता जास्त असली तरी नागासाकीची भौगोलिक परिस्थिती आणि असलेल्या पर्वतरांगामुळे हिरोशिमाच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. या दोन हल्ल्यानंतर जपानने दि. 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली. दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि दुसरे महायुध्द समाप्त झाले; प्रचंड मोठी मानवी किंमत मोजून!
इतर स्फोटक बाँब आणि अणुबाँब यामध्ये कमालीचा फरक आहे. अणुबाँबमुळे प्रचंड उष्णता निर्माण होते, त्यापाठोपाठ झंझावाती वादळे, काळा पाऊस आणि सर्वांत धोकादायक ठरणारा किरणोत्सर्ग. नेहमीच्या स्फोटामध्ये फक्त स्फोट घडून येतो; पण अणुबाँबमुळे बाहेर पडणारा हा किरणोत्सर्ग कित्येक वर्षे आपले परिणाम दाखवत राहतो. अणुबाँबमधून बाहेर पडणारे ‘गॅमा’ किरण जीवसृष्टीला अत्यंत धोकादायक ठरतात. गॅमा किरणांची भेदक क्षमता प्रचंड असते. तसेच ते दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करत पेशी नष्ट करत अनेक जनुकीय बदल घडवतात. मोतीबिंदू, रक्ताचा अणि फुफ्फुसाचा कर्करोग, केस गळून पडणे, शरीरावर जागोगाजी ठिपक्यांच्या स्वरुपात रक्तस्त्राव अशा प्रकारच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात. गर्भावर दुष्परिणाम करत विकृत जुळे आणि विविध प्रकारच्या व्यंगांना जन्म देतात. अणुस्फोटात सापडलेल्या व्यक्तींना जपानमध्ये ‘हिबाकुश’ नावाने ओळखले जाते. मार्च 2019 अखेर 6 लाख 50 हजार लोकांची ‘हिबाकुश’ म्हणून नोंद झालेली आहे. त्यापैकी आजअखेर 1 लाख 46 हजार अजूनही जिवंत आहेत. उरलेल्या फक्त 1 टक्के लोकांमध्ये किरणोत्सर्गाचे अंश शिल्लक आहेत, असा जपान सरकारचा दावा आहे.
दुसर्या महायुध्दानंतर अणुबाँबचा प्रत्यक्ष वापर करण्यात आलेला नसला, तरी अधिकाधिक संहारक शक्तींच्या अणुबाँबची भर प्रत्येक देशाने आपापल्या कोठारात करून ठेवलेली आहे. हिरोशिमा बाँबपेक्षा हजारो पटींनी अत्यंत संहारक असे मेगाटन क्षमतेचे शक्तिशाली बाँब उपलब्ध आहेत. अणुबाँबची क्षमता ‘टीएनटी’मध्ये मोजतात. ‘टायनायटोटोल्यून’ हा एक स्फोटक पदार्थ आहे. 25 मेगाटन ‘टीएनटी’चा सर्वांत शक्तिशाली अणुबाँब अमेरिकेकडे आहे. एवढी प्रचंड अण्वस्त्रे उपलब्ध असली, तरी कोणताही देश कोरोनाच्या काळात सुरक्षित राहिलेला नाही, हे वास्तव आहे. नॅनो आकाराच्या कोरोनाने सर्व जगाला अक्षरश: वेठीस धरलेलं आहे. या काळात मेगाटन ‘टीएनटी’ची अण्वस्त्रं उपयुक्त ठरणार नाहीत, तर कोरोनावरील लसीवर होणारे संशोधन उपयुक्त ठरणार आहे, हे मात्र वादातीत आहे.
हिरोशिमाच्या नागरिकांनी शहरात एक सुंदर असे शांतता स्मारक उभारले आहे. दरवर्षी 6 ऑगस्टला नागरिक तिथे एकत्र येतात आणि सार्या जगाला अवण्स्त्रबंदी आणि निःशस्त्रीकरणाचा मन:पूर्वक संदेश देतात. आमच्या वाट्याला आलेली शोकांतिका जगातल्या कुठल्याच शहराच्या वाट्याला येऊ नये, यासाठी मनात कुणाबद्दलही सुडाची भावना, घृणा किंवा अढी न बाळगता आम्ही ‘हिरोशिमा’चा हा वस्तुपाठ सार्या जगाला येती कित्येक शतकं देत राहू, अशी शपथ घेतात. या स्मारकाला हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. युध्दाचे विरोधक होऊन आणि शांततेचे कायमचे पाईक होऊन स्वदेशी परततात. या स्मारकावर एक संदेश कोरण्यात आलेला आहे – Rest in PEACE for We shall not repeat the SIN. विचार करण्यासारखाच हा संदेश आहे. बदल्याची कोणतीही भावना मनात न ठेवता, असं विनाशकारी पाप आपच्या हातून घडणार नाही, याची ग्वाही ते देतात. 1945 मध्ये बेचिराख झालेलं हिरोशिमा आणि जपान आज मात्र जगात ताठ मानेनं उभा आहे, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत. केवळ देशाभिमानाच्या घोषणा आणि धर्माभिमानासाठी वास्तूंची निर्मिती न करता प्रत्येक क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम केल्यचूं जपानवासीयांना हे शक्य झालेलं आहे. आपण असं केव्हा करणार? महत्त्वाची बाब म्हणजे आजतागायत जपानने अणुबाँब तयार केलेला नाही. विकासासाठी आणि संरक्षणासाठी अण्वस्त्रच गरजेचं आहे, या अंधश्रघ्देला तडा देत जपान आज प्रगतिपथावर आहे. अणवस्त्रनिर्मितीमध्ये आता काहीही गुप्त राहिलेले नाही. त्यामुळे ती अनियंत्रित झाली आहे. यापासून कोणतेही संरक्षण शक्य नाही. बचाव यंत्रणाच अस्तित्वात नाही. जगभरातल्या लोकांमधले परस्परसामंजस्य हीच एक आशा आहे आणि लोकांनीच त्यासाठी आग्रह धरला पाहिजे.
अणुऊर्जेच्या सुत्राचा सूत्रधार अल्बर्ट आइन्स्टाइन
विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी 1905 साली ‘अनॅलन द फिजिक’ या जर्मन नियतकालिकात दर दोन महिन्यांच्या अंतराने भौतिकशास्त्रावरील तीन शोधनिबंध प्रसिध्द केले. या तीन शोधनिबंधांनी ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अक्षरश: क्रांती घडवून आणली आणि भौतिकशास्त्राच्या प्रगतीला मोठी चालना दिली. विशिष्ट सापेक्षतावादाचा सिध्दांत, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आणि बाऊनियन मोशन हे ते तीन शोधनिबंध होत. 14 मार्च 1879 ला जर्मनीतल्या उल्म या गावी जन्मलेलं पौलीन व हरमन या दाम्पत्याचं हे मूल मोठेपणी अॅटमबाँबच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं विज्ञानातील सूत्र ऊर्जा = वस्तुमान x प्रकाशाच्या वेगाचा वर्ग (E = mc2) शोधून काढू शकेलं, असं स्वप्नातही वाटलं नसेल. शाळेतल्या औपचारिक शिक्षणात आइन्स्टाइनचं फारसं लक्ष लागलेलं नव्हतं; पण निसर्गामध्ये घडत असलेल्या घटना व त्यामधील गणिती संबंधाबद्दल मात्र त्याच्या मनात कुतूहल होतं. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झुरिच येथील स्विस नॅशनल पॉलिटेक्निकच्या प्रवेशपरीक्षेमध्ये नापास झालेला हा मुलगा दुसर्या प्रयत्नात पास होऊन पदवी प्राप्त करू शकला. स्वत:च्या पाल्यांना साचेबध्द पध्दतीने पास व्हायला लावणार्या; किंबहुना स्वत:ची महत्त्वाकांक्षा पाल्यावर लादणार्या व नापासांच्या बाबतीत नकारात्मक द़ृष्टिकोन ठेवणार्या सध्याच्या बहुसंख्य पालकांना विचार करायला लावणारी ही घटना आहे. पदवीनंतर 1902 मध्ये बर्न शहरात स्विस पेटंट ऑफीसमध्ये पेटंट तापसणीस; अर्थात क्लार्क म्हणून आइन्स्टाइन नोकरीला लागला. या नोकरीमध्ये मिळालेला बराचसा मोकळा वेळ त्यांनी संशोधनासाठी वापरला होता. याची प्रचीती 1905 मध्ये त्याच्या तीन शोधनिबंधामध्ये दिसून आली.
17 व्या शतकातील न्यूटनच्या संशोधनानुसार वस्तुमान, लांबी व काल हे स्थिर आहेत. ते कोणावरही अवलंबून नाहीत, म्हणजे ते निरपेक्ष आहेत, या सिध्दांताला छेद देत आइन्स्टाइनने वस्तुमान, लांबी व काल हे सुध्दा सापेक्ष आहेत आणि ते वेगावर अवलंबून आहेत, हे प्रतिपादन केले. हाच आइन्स्टाइनचा विशिष्ट सापेक्षतावादाचा सिध्दांत म्हणून रूढ झाला. त्या सिध्दांतानुसार गतीतील वस्तूचे वस्तुमान वाढते, लांबी कमी होते आणि काल मंदावतो. प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर आहे. गतीतील वस्तू प्रकाशाच्या वेगाने निघाली, तर तिचे वस्तुमान अनंत होते, तिची लांबी शून्य होते, तर तिच्यासाठी काल थांबून जातो. विशिष्ट सापेक्षतावादातून निघालेले निष्कर्ष विलक्षण आहेत. आजही सर्वांना आश्चर्यचकित करायला लावणारे आहेत. हे सर्व परिणाम आपल्या रोजच्या जीवनात अनुभवाला येत नाहीत. कारण वेगावर असलेली मर्यादा. आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सूत्रानुसार जर एखादी वस्तू सेकंदाला 2 लाख 60 हजार किलोमीटर वेगाने निघाली तर तिचे वस्तुमान दुप्पट होते, तर लांबी व काल निम्मा होतो.
सापेक्षतावादाच्या सिध्दांतातूनच ऊर्जेसंदर्भातील सूत्राने E = mc2 ने जन्म घेतला आणि वस्तुमान व ऊर्जा यातील व्दैत संपुष्टात आणले. त्या काळात ऊर्जा समस्येने ग्रासलेल्या जगताला एक दिलासा मिळेल, असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात या ऊर्जेचा विध्वसंक कारणासाठी वापर झाला. वस्तू जर प्रकाशगतीच्या वेगाने निघाली तर तिच्यापासून निघणारी ऊर्जा इतकी प्रचंड असते की, जर 1 किलो कोळशाचे पूर्ण ऊर्जेत रूपांतर केले, तर त्या ऊर्जेपासून 100 वॅटचा बल्ब 20 कोटी वर्षे चालू ठेवता येऊ शकतो. संपूर्ण जगाला हादरवणारा अणुबाँबही या समीकरणाचीच निष्पत्ती आहे. पहिल्या महायुध्दामध्ये जर्मनीने घेतलेल्या सहभागाच्या विरोधात आइन्स्टाइनने आवाज उठवला होता आणि धर्माने ज्यू असल्याने हिटलरच्या रोषालाही त्याला सामोरे जावे लागले होते. ते टाळण्यासाठी 1932 मध्ये त्याने जर्मनीला रामराम ठोकला आणि अमेरिकेतील प्रिस्टन येथील Institute for advanced studies मध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाला. हिटलर अणुबाँब बनवण्याच्या प्रयत्नात आहे, याची कुणकुण लागल्यानंतर आइन्स्टाइनने अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांना दि. 2 ऑगस्ट 1939 रोजी पत्र लिहून जर्मनीवर केवळ दबाव म्हणून अणुबाँबनिर्मितीची आवश्यकता प्रतिपादित केली. रूझवेल्टनी लगेच अणुबाँबनिर्मितीसाठी रॉबर्ट ओपनहिमर यांच्या नेतृत्वाखाली ‘मॅनहटन’ योजनेची घोषणा केली. दि. 28 डिसेंबर 1942 ला या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात झाली. रॉबर्ट ओपनहिमर, एडवर्ड टेलर, लिओ शिलार्ड, एनरिको फर्मी यांनी जगातील पहिला अणुबाँब तयार केला. जगातील या पहिल्या अणुबाँबची पहिली अणुचाचणी, जिला ‘ट्रीनीटी अण्वस्त्र अणुचाचणी’ म्हणतात, ती 16 जुलै 1945 ला न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात झाली. त्या अणुचाचणीची विध्वंसकता बघितल्यानंतर ‘मॅनहटन’ योजनेमध्ये सामील असलेले सर्व शास्त्रज्ञ अचंबित झाले. ‘या अणुबाँबचा वापर करू नकाच; पण जर करणारच असाल तर तेथील जनतेला त्याची पूर्वकल्पना द्या,’ अशी आइनस्टाइनने केलेली कळकळीची विनंतीसुध्दा धुडकावून लावत तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी 6 व 9 ऑगस्ट 1945 ला जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकले, प्रचंड मानवी संहार घडवला आणि दुसरे महायुध्द संपुष्टात आणले. या घटनेने आइनस्टाइन खूप दु:खी झाले व त्यांनी आपले उर्वरित आयुष्य शांततेचा प्रसार आणि अण्वस्त्रविरोधी प्रचारामध्ये घालवलं. हिरोशिमा व नागासाकीच्या घटनेनंतर आजतागायत कुठेही अणुबाँबचा वापर झालेला नाही; किंबहूना तसा प्रयत्न कुणी केला तर सर्व जग विनाशाच्या खाईत लोटले जाईल, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. 1952 साली इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष चेमवाईझमन यांच्या मृत्यूनंतर त्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्षपद आइन्स्टाइन यांना बिनविरोध देऊ करण्यात आले होते. इस्त्रायलचे नागरिकत्व नसताना केवळ ज्यू असल्यामुळे हा बहुमान आइन्स्टाइन यांना मिळत होता. परंतु त्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला. यासंदर्भात ते म्हणाले की,
Equations are more important to me than politics, because politics is for the present; but an equation is something for iternity.
थोडक्यात, राजकारण क्षणभंगुर आहे, गणित आणि पर्यायाने विज्ञान शाश्वत आहे. याचा अर्थ राजकारणाला कमी लेखण्याचा नसून विज्ञानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आइनस्टाइनचा दुसरा शोधनिबंध प्रकाश विद्युतीय परिणामाच्या (फोटाइलेक्ट्रिक इफेक्ट) स्पष्टीकरणावर होता. त्याने दाखवून दिले की, विशिष्ट धातूवर प्रकाश टाकला असता त्या धातूपासून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. परंतु त्यासाठी त्या प्रकाशकणांत विशिष्ट अशी कमीत कमी पातळीपर्यंतची ऊर्जा असणे आवश्यक आहे आणि याच संशोधनाबद्दल त्याला 1921 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. सापेक्षतावादाच्या सिध्दांताने जरी खळबळ उडवून दिलेली असली तरी ‘नोबेल’ कमिटी तो स्वीकारण्यामध्ये साशंक होती. त्यामुळे ते संशोधन पारितोषिकाविनाच राहिले.
आइनस्टाइन म्हणतात की, विश्वाबद्दल अनाकलनीय गोष्ट ही आहे की, ते आकलनीय आहे. विश्वातील सर्व घटना या निसर्गनियमाने बध्द असतात, म्हणून सर्व विज्ञान शाखांच्या उगमस्थानांचे धागेदोरे भौतिकशास्त्राच्या कोणत्या ना कोणत्या भागात सापडत असतात. भौतिकशास्त्राची कथा ही मानवी प्रयत्नांची अत्यंत खळबळजनक यशोगाथा आहे. विज्ञानाचे वर्चस्व असलेल्या विसाव्या शतकात प्रतिभा, क्षमता, मानसिक प्रगल्भता व बुध्द्यांक या सर्वच बाबतीत अल्बर्ट आइनस्टाइन महान ठरले. अणुबाँब, अवकाश प्रवास, पुंजवाद, इलेक्ट्रॉनिक्स हे जे आधुनिक युगातील वैज्ञानिक मापदंड मानले जातात, त्यातील प्रत्येकावर आइन्स्टाइन यांनी ठसा उमटवला आहे. विसाव्या शतकात जगाचा जो चेहरामोहरा बदलून गेला, त्याचे श्रेय त्या शतकातील मूलभूत विज्ञानात झालेल्या संशोधनाकडे जाते. कारण या संशोधनामुळेच तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती करता आली आणि या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक होते आइनस्टाइन. अशा या प्रतिभावंताचा 18 एप्रिल 1955 रोजी प्रिन्स्टन येथे मृत्यू झाला आणि जग एक प्रतिभावंत वैज्ञानिकाला मुकले.