-

मी आयुष्यभर
डाळ-भात-भाकरीसाठी
देव विकले
माझ्या लॉरीत सजलेल्या
प्रत्येक मूर्तीत वसलेल्या देवाने
स्वप्नात येऊन
रोज मला म्हटले,
‘वत्सा! तुझे भले होईल…!!’
परंतु
कधी डाळ
कधी भात
तर कधी भाकरी मिळाली नाही!
माहीत नाही का बरं?
एक दिवस मी नवरात्रीच्या
पवित्र उत्सवात
पागगढपर्यंत गेलो देव विकण्यास
एक दिवस आणि दोन रात्री
तटस्थ उभा राहिलो देव विकण्यासाठी
पण नाही विकला गेला एकही देव
माझ्या स्टॉलच्या बाजूला
एक माझ्यासारखाच स्टॉलधारक
प्रधानमंत्र्यांचा मुखवटा
आणि फोटो विकत होता मूर्तींच्याच किमतीत
मी त्याला विचारलं,
‘हा माणूस ठग आहे
पंधरा लाखांचे आश्वासन देऊन एक रुपया नाही दिला
तरीही हा इतका विकला जातो?’
तो मोठा व्यापारी म्हणाला,
‘काय, तुझ्या स्वप्नात
येणार्या देवांनी कधी काही केलंय तुझ्यासाठी?
जग ठग आहे
तू पण माझ्याप्रमाणे,
देवाप्रमाणे,
प्रधानमंत्र्यांप्रमाणे
ठग बन!!’
मूळ कविता : स्मृतिशेष गुजराती युवा कवी – जयेश जीवीबेन सोळंकी
अनुवाद : भरत यादव