फॅन्टम

डॉ. रुपेश पाटकर -

आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हा एमबीबीएसचा प्रत्येक वर्ग दीड वर्षाचा असे. पाहिल्या दीड वर्षाच्या वर्गात आम्हाला तीन विषय शिकवले जात. शरीररचनाशास्त्र (Anatomy) शरीरक्रियाशास्त्र (Physiology) आणि जैवरसायनशास्त्र (Biochemistry). यांच्या अभ्यासासाठी मृतदेहांचा अभ्यास आणि प्राण्यांवर प्रयोग करावे लागत. त्यामुळे ज्या इच्छेने आम्ही मेडिकलला प्रवेश घेतला, ती पेशंट तपासायला शिकण्याची इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्गात जाण्याची वाट पाहावी लागे. पहिल्या वर्गातील विषय जरी खूप रोचक असले तरी त्यात प्रत्यक्ष पेशंटला भेटणे नसे. दुसर्‍या वर्गात लिनिकल पोस्टिंग, म्हणजे वॉर्डमध्ये जाऊन शिकणे सुरू होई. पहिल्या सहा महिन्यांत तीन महिने सर्जरी वॉर्डात आणि तीन महिने मेडिसिन वॉर्डात पोस्टिंग मिळे. मला पहिले पोस्टिंग सर्जरीचे मिळाले. पहिल्या दिवशी मी वॉर्डात जरा लवकर पोचलो. तिथला रेसिडंट डॉटर म्हणाला, “अजून तुझ्या बॅचचे कोणी आलेले नाही. तू माझ्यासोबत ओपीडीत चल.” मी त्याच्यासोबत गेलो.

ओपीडीत गर्दी होती. गर्दीतून वाट काढत आम्ही केबिनमध्ये पोचलो. रेसिडंटने पेशंट बघायला सुरुवात केली. मला फक्त पेशंट काय तक्रार घेऊन आलेत तेवढेच फक्त कळत होते. रेसिडंट कोणते प्रश्न विचारतो, ते का विचारतोय, तो त्यावर कोणता अवयव तपासतोय, हे मला अजिबात कळत नव्हते. तीन-चार पेशंट तपासल्यानंतर दोन माणसांचा आधार घेत साधारण पंचविशीचा तरुण आत आला. त्याला एकच पाय होता. त्याला बघून मला कसेसेच वाटले. तो येऊन रेसिडंटच्या पुढ्यातल्या पेशंट बसण्याच्या स्टूलवर बसला. मी कान देऊन ऐकू लागलो.

तो म्हणाला, “कापलेला पाय दुखतोय.”

रेसिडंट डॉटरने त्याला पेशंट तपासण्याच्या पडद्यामागील टेबलवर झोपायला सांगितले. रेसिडंटने त्याचा तुटलेल्या पायाचा खुंट तपासला. त्याचा उजवा पाय फक्त मांडीपर्यंत होता. खुंटाच्या टोकावर शिवलेल्याची खूण होती. पण जखम पूर्णपणे बरी झाली होती. रेसिडंट म्हणाला, “पाच महिन्यांपूर्वी अपघातात त्याच्या उजव्या पायाचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे गुडघ्याच्या वरपर्यंतचा भाग कापून टाकावा लागला होता. ”

“कुठे दुखतेय?” रेसिडंटने विचारले.

“तुटलेला पाय दुखतोय,” पेशंट म्हणाला.

“या डॉटरना सगळे व्यवस्थित सांगा,” माझ्याकडे बोट दाखवत रेसिडंटने पेशंटला सांगितले आणि तो पुढचा पेशंट बघायला गेला.

मी त्या पेशंटशी बोललो. त्याचे म्हणणे ऐकून मला धक्काच बसला. त्याच्या उजव्या मांडीचा खुंट दुखत नव्हता. जखमेची खूण देखील दुखत नव्हती. तर त्याच्या पायाचा जो भाग तोडून टाकण्यात आला होता, तोच दुखत होता. मी पहिल्यांदा ही तक्रार ऐकली, तेव्हा मला वाटले की मी चुकीचे ऐकले. मी पुन्हा विचारून खात्री करून घेतली आणि त्या पेशंटला घेऊन रेसिडंटकडे गेलो.

रेसिडंट म्हणाला, “काय वाटते? मला वाटते, त्याला शारीरिक नाही; मानसिक त्रास आहे!”

माझ्या बोलण्यावर रेसिडंट गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, “फॅन्टम लिंब सिंड्रोम वाचून ये! फॅन्टम हा शब्द मला ओळखीचा वाटला. अमर चित्रकथा कॉमिसमधील ‘वेताळ’ या पत्राचे इंग्रजी नाव ‘फॅन्टम’ होते. त्यामुळे मला आणखी कुतूहल वाटले. मी लायब्ररीत जाऊन ‘फॅन्टम लिंब सिंड्रोम’ शोधून काढला. मला सकाळी ओपीडीत भेटलेल्या पेशंटला ‘फॅन्टम लिंब सिंड्रोम’ होता. फॅन्टम लिंब म्हणजे एखाद्याचा हात किंवा पाय तुटला तरी तो आहे, असे वाटणे. त्याची संवेदना जाणवणे. तो दुखतोय असे जाणवणे. जर या नावात लिंब म्हणजे हात किंवा पाय, असा उल्लेख असला तरी हा त्रास कापलेल्या हात किंवा पाय यांच्यापुरता मर्यादित नाही. कापलेले स्तन किंवा कापलेल्या लैंगिक अवयवात देखील अशी संवेदना किंवा दुखणे जाणवते. मला हे थक्क करणारे आश्चर्य वाटले. म्हणजे अवयव नाही, पण तो दुखतो. पाय नाही, पण तो दुखतो. हात नाही, पण तो दुखतो. जवळपास ८०- १०० टक्के रुग्णांना आपल्या तुटलेल्या अवयवाची संवेदना जाणवते आणि ही संवेदना असणे कृत्रिम पाय किंवा हात लावण्यासाठी म्हणे खूप उपयोगाची पडते. पूर्वीच्या काळी वारंवार युद्धे होत असत. अशा युद्धांत हात-पाय तुटणे ही सामान्य गोष्ट. अशा वेळेस नाहीशा झालेल्या हाताच्या जागी हात असल्यासारखे एखाद्याला वाटले तर बघणार्‍यांना ही भुताटकीच वाटेल, नाही का? म्हणूनच कदाचित याला ‘फॅन्टम’ हे चमत्कारिक नाव पडले असणार, हे साहजिक आहे. मला जेव्हा फॅन्टम लिंबचा पेशंट रेसिडंटने दाखवला तेव्हा मी अगदीच नवखा होतो. एखाद्या पेशंटची हिस्ट्री कशी घेतात, हे मला ठाऊक नव्हते. त्यामुळे त्याला केव्हापासून संवेदना होते आहे, केव्हापासून त्याचा नसलेला पाय दुखतो आहे. पाय कापल्यापासून आजपर्यंत दुखणे वाढत गेले की कमी होत गेले की कधी कमी-कधी जास्त असे राहिले का, वगैरे मी काहीच विचारले नव्हते. इंटर्नशिपच्या काळात मात्र मला हिस्ट्री घेणे जमू लागले होते. इंटर्नशिपच्या काळात मला एक पेशंट भेटला, ज्याचा पाय तो दहा वर्षांचा असताना कापून टाकण्यात आला होता. त्याच्या डाव्या गुडघ्याच्या हाडांना कॅन्सर झाल्यामुळे त्याचा डावा पाय मांडीतून कापून टाकण्यात आला होता. तो म्हणाला, “ऑपरेशन नंतर जेव्हा मी शुद्धीत आलो, तेव्हा मला माझा पाय हवेत सरळ उंचावल्यासारखा वाटत होता. मी डोळे उघडून पाहू लागलो की काहीच दिसायचे नाही, पण डोळे बंद करताच पाय हवेत उचलून धरलाय, असे वाटायचे. नंतर काही दिवसांनी ‘त्या’ नसलेल्या पायाला सुया टोचल्यासारखी वेदना होई. माझ्या आईवडिलांना वाटे की माझे मानसिक आहे. पाय कापल्यामुळे घाबरून मी तसे सांगतो आहे. चालताना कधी तोल गेला तर तो नसलेला पाय तोल सावरेल, असे वाटायचे. अजूनही मला तो पाय आहे, असे वाटते आणि आता डोळे बंद करून मी त्याला घोट्यातून हलवतो आहे, असे जाणवते. ज्यांना असा अनुभव नाही, त्यांना आमच्या मनाची स्थिती कळणार नाही.”

मला भेटला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता, म्हणजे पंधरा वर्षे होऊन गेली होती. या पंधरा वर्षांत त्याची वेदना नाहीशी झाली होती, पण नसलेल्या पायाची संवेदना अजून टिकून होती. दुसरा एक पेशंट मला भेटला, ज्याने आपला उजवा हात अपघातात गमावला होता. तो म्हणाला, “माझा हात जाऊन चार वर्षेझाली तरी मी विसरतो की मला हात नाहीये. परवाच मी जिना उतरत असताना माझा तोल गेला आणि नसलेला उजवा हात पुढे करून मी मला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तोंडावर पडलो.” त्याच्या चेहर्‍याला झालेल्या जखमेवर ड्रेसिंग करून घ्यायला तो आला होता.

असे का होते? नसलेला अवयव आहे, असा का वाटते. छे, आहे, असे वाटत नाही. तर तो जाणवतो. नाही, दुखतोदेखील!आपल्या शरीरातील सगळ्या संवेदनांचे अधिष्ठान म्हणजे मेंदू. मेंदू जर अ‍ॅनेस्थेशिया देऊन बधिर केला तर कोणतीच संवेदना जाणवत नाही, पेशंटला कापले तरी दुखत नाही. त्यामुळे कोणत्याही संवेदनेसाठी मेंदू आवश्यक असतो. मेंदूमध्ये संवेदना जाणवणारा भाग असतो. त्याला इंग्रजीत ‘सेंसरी कॉर्टेस’ म्हणतात. या भागात देखील प्रत्येक अवयवाची विशिष्ट जागा असते. ही जागा जर सूक्ष्म विद्युतप्रवाह वापरून चेतवली तर ती जागा ज्या अवयवाचे केंद्र असेल त्या अवयवात संवेदना जाणवते. जसा मेंदूचा संवेदना जाणवणारा भाग म्हणजे ‘सेंसरी कॉर्टेस’ असतो तसा हात-पाय वगैरे अवयवांकडून काम करवून घेणारा ‘मोटर कॉर्टेस’ नावाचा भाग असतो. समजा, एखाद्या फॅन्टम हात जाणवणार्‍या पेशंटला आपण त्या फॅन्टम हाताद्वारे काही कृती कर म्हणून सांगितले आणि त्याच्या मेंदूचा स्कॅन घेतला आणि त्याची तुलना एका दुसर्‍या धडधाकट माणसाला त्याच्या असलेल्या हाताद्वारे तीच कृती करायला सांगितली आणि ती करताना घेतलेल्या स्कॅनशी केली तर दोन्ही माणसांच्या मेंदूचे भाग स्कॅनवर सारखेच क्रियाशील दिसतात. थोडयात काय, तर आपण एखादा अवयव गमावला तरी त्या अवयवाशी संबंधित मेंदूचा भाग शिल्लक असतो आणि तो भाग त्या तुटून दूर झालेल्या भागाची जाणीव देत राहतो; म्हणजे हे काल्पनिक दुखणे नाही, मानसिक दुखणेदेखील नाही. हे शारीरिक दुखणे आहे! जरी असे जाणवणे अडचणीच्या वेळी भ्रम निर्माण करणारे किंवा वेदनांच्या रुपात त्रासदायक असले तरी या संवेदनांमुळे कृत्रिम अवयव वापरणे सोपे होते. गमावलेल्या अवयवाची मेंदूतील प्रतिमा आणि कृत्रिम अवयव हे एकमेकांशी जुळल्यामुळे कृत्रिम अवयवाला जुळवून घेणे सोपे होते.

आपला मेंदू हा किती चमत्कारिक गोष्ट आहे! नसलेल्या अवयवाची वेदना जाणवते आणि कधी खरोखर आघात झालेल्या गोष्टीची वेदना जाणवतच नाही. जसे एखादा लढाईत गुंतला असताना झालेला घाव मेंदूला जाणवतच नाही. मेंदू त्यावेळी त्यापेक्षा महत्त्वाच्या कामात गुंतलेला असतो. ‘फॅन्टम लिंब’विषयी वाचल्यावर माझ्या मनात सर्वांत आधी संत ज्ञानेश्वरांचा विचार आला. जर तुटून दूर झालेल्या अवयवाची जाणीव शरीराला होत असेल तर दुसर्‍याचे दुःख बघून तुमचा मेंदू तुम्हाला कळवळायला नाही का लावू शकणार? ज्ञानू रेड्याच्या पाठीवर मारलेल्या चाबकांची वेदना ज्ञानेश्वरांना स्वतःच्या पाठीवर का नाही जाणवू शकणार? असे अनेक लोक नसतात का, ज्यांना दुसर्‍याचे रक्त बघून चक्कर येते? दुसर्‍याशी, दुसर्‍याच्या सुख-दुःखाशी तादात्म्य पावणारा मेंदूचा विशिष्ट भाग नसेल काय? कदाचित आजकाल आम्ही त्याला वापरत नसल्यामुळे न वापरलेल्या स्नायूंसारखा तो खुरटलेला असेल!

(लेखक हे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असून गोवा येथे मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]