डॉ. विजय रणदिवे -

१.
“जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरु होतं” अशा वल्गना करणारे स्वतःवर वाईट वेळ आल्यावर मात्र बरोबर विज्ञानाच्या आश्रयाला जातात.
‘इनर इंजिनिअरिंग’ सारख्या फॅन्सी नावाने आपले कोर्सेस लोकांना लाखो रुपयात विकून अमाप संपत्ती जमा करणारा जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरूंच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. स्वतःला शिवाचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारा हा सद्गुरु आपल्या आत्मकथेत स्वतःचं असं वर्णन करतो जसं काही हा मर्त्य मानव नसून अमर असं ‘शिवतत्त्व’ आहे.
हे सद्गुरू ध्यानधारणेचे फायदे सांगताना अशा काही थापा मारत असतात, ज्या ऐकून लोकांच्या मनात असा समज निर्माण होतो की जणूकाही ध्यान केल्याने तुम्हाला कधीच कोणताही शारीरिक, मानसिक आजारच होणार नाही. ह्या खोट्या प्रचाराला बळी पडून लाखो रुपयात ह्यांचे कोर्सेस करणारे मंदबुद्धी जीव भरपूर आहेत.
आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचे आरोप ह्या सद्गुरुंवर आहेत. पण पैशाच्या बळावर अन् लाखो अनुयायांच्या जोरावर हा तुरुंगात जाण्याऐवजी मोकाट आहे. निव्वळ स्युडोसायंटिफिक गोष्टी ठासून सांगत ह्यानं लाखो अनुयायी मिळवलेत. ह्या देशात तसंही विज्ञान म्हणजे फक्त शाळा, कॉलेजात शिकवल्या जाणारा अन् केवळ परीक्षेत पास होण्यापुरता अभ्यासला जाणारा विषय असल्याने ते वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे काय असतं ह्याच्याशी कुणाला काही घेणंदेणं नाही.
वैज्ञानिक म्हणवून घेणारे इथले एक राष्ट्रपती एका जादूगाराच्या पायाशी लोटांगण घेतात. प्रधानमंत्री एखाद्या धर्मगुरूसारखे वावरत असतात. मुख्यमंत्री आपल्या सरकारी बंगल्यावर बुवा बाबांना बोलावून कर्मकांड करतात, संरक्षणमंत्री लढाऊ विमानांना लिंबू मिरची टांगतात… असं काही बरंच आहे!
गळा फाडून फाडून स्तोत्र, चालीसा पठण करणार्यांची मुलं आजारी पडली म्हणजे मग ते हॉस्पिटलकडं धाव घेतात. विज्ञानाचे उपकार घेऊन बरे होतात अन् बरे झाल्यावर नवस फेडायला परत देवळात जाऊन अंगठाछाप पुरोहितांना दक्षिणा देतात. इतके दांभिक अन् पाखंडी असतात की ह्यांची कृतज्ञता कधीच विज्ञानासाठी नसते. हे स्वतःला विज्ञानापेक्षा सुपिरिअर समजतात. ह्या अंध भक्तांसाठी सध्या अमृतकाळ सुरू आहे. आता ह्यांची पैदास वाढतच जाणार आहे.
बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफी था | हर शाखा पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ता क्या होगा?
२.
बर्याच भक्तांना ह्या सद्गुरूचा अगदी बेसिक परिचय सुद्धा नाही. फक्त पांढरी दाढी अन् रुद्राक्ष माळा पुरेशी असते भक्तांना एखाद्याला डोक्यावर घेण्यासाठी. तर ह्या मराठमोळ्या भक्तांसाठी हा आजचा ‘उतारा.’
जेव्हा ह्या सद्गुरूंना तमिळनाडू बाहेर फारसं कुणी ओळखतही नव्हतं, तेव्हाच मी ह्यांची बायोग्राफी वाचली होती. दोन-तीन पुस्तकं वाचून मी ह्यांचा फॅन झालो होतो. ह्यांना भेटायचं अन् ध्यानलिंग मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं मी ठरवलं. ह्यांच्या ईशा फाउंडेशनच्या कॉल सेंटरवर फोन करून माझी सद्गुरूंना भेटायची इच्छा व्यक्त करतो म्हटलं. तर तिथं कॉल सेंटरवर बसवलेल्या पोरींना मराठी तर सोडा, हिंदी सुद्धा येत नव्हती. “स्पीक ओन्ली तमिल ऑर इंग्लिश सर” असं उद्धट उत्तर मिळालं. मी कसाबसा इंग्रजीत संवाद साधायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं की ते अत्यंत प्रोफेशनल आहेत. सद्गुरू असे कुणालाही भेटत नसल्याचं कळलं. शिवाय त्यांचे कोर्सेस करायचे असतील तरी हजारो पासून ते लाखोंच्या घरात त्यांची फी आहे.
एका आत्मसाक्षात्कारी योगी संताचं दर्शन घेण्याची एका मराठमोळ्या शिवभक्ताची भोळीभाबडी इच्छा त्यांनी धुडकावून लावली. कारण काय तर समोरचा माणूस फुकटात दर्शन घ्यायचं म्हणतोय! सद्गुरूंच्या आत्मकथेत त्यांच्याबद्दल अशा काही भन्नाट चमत्कारी गोष्टी लिहिल्या आहेत की त्या वाचल्यावर वाचकांना सद्गुरू म्हणजे साधारण मनुष्य नसून शिवशंकराची विशेष कृपाप्राप्त असा महान आदियोगी आहे असा भ्रम तयार होतो. एखादं सुपरहिरोईक कॅरेक्टर शोभावं असं वर्णन त्यांचं केलेलं आहे.
हे सद्गुरू तरुण असताना सलग १३ दिवस एका टेकडीवर निश्चल आसन मांडून समाधी अवस्थेत बसला होता. (असा प्रसंग त्या पुस्तकात लिहिला आहे )
हा पूर्वजन्मी शिवाचा निस्सीम भक्त होता. शिवशंकराने ह्याला पृथ्वीवर एक पारद निर्मित (mercury) अद्भुत शिवलिंग (त्याला हे ध्यानलिंग असं नाव देतात.) स्थापित करून त्यात विशेष मंत्राचा आणि विशिष्ट गूढ अशी साधना करुन प्राणप्रतिष्ठा करण्याचा आदेश दिला होता. परंतु ते कार्य अत्यंत अवघड असल्याने मागच्या जन्मात ते काम पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. ते अर्धवट राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी मग त्या योगीपुरुषाला परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. तो पूर्वजन्मीचा योगी म्हणजेच हा सद्गुरू! (असं त्या पुस्तकात लिहिलं आहे.)
त्या ध्यानलिंगाची प्राणप्रतिष्ठा करता करताच ह्याच्या पत्नीच्या शरीरातून प्रचंड दिव्य ऊर्जाप्रवाह प्रवाहित होऊ लागला. तो ऊर्जाप्रवाह इतका तीव्र होता की तो तिला सहन झाला नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. (असं त्या पुस्तकात लिहिलं आहे.)
पत्नीचा मृत्यू झाला, पण तिच्या माहेरच्यांना तिच्या मृत्यूबद्दल अंत्यसंस्कारानंतर कळवण्यात आलं अशा बातम्या सांगतात. तडकाफडकी अंत्यसंस्कार निपटून टाकलेत. नंतर ह्यांच्या सासर्याने ह्यांच्यावर आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप केला होता.
हळूहळू ह्याचं प्रस्थ वाढत गेलं. इंटरनेट युगात मग ह्यांनी तमिळनाडू बाहेरच्या अनुयायांना टार्गेट करत आपलं साम्राज्य वाढवलं. आजघडीला ह्यांची संपत्ती हजारो कोटीत आहे. ह्यांचे अनेक प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु निम्म्याहून अधिक इन्कम हे डोनेशन्समधूनच येतं. ईशा फाउंडेशनला. अर्थातच ही धर्मादाय संस्था म्हणून रजिस्टर असल्याने ८०-जी अंतर्गत सगळं टॅक्स फ्री आहे!
मृतात्म्याशी संपर्क करण्यापासून ते योगिक क्रिया करून चमत्कारिक स्वास्थ्यलाभ प्राप्त करण्यापर्यंत अशा अनेक अद्भुत पारलौकिक घटनांचे उल्लेख ह्यांच्या पुस्तकांत आहेत.
एकंदरीत हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिवतत्त्वात स्थापित असलेला एक महान योगी आहे अशी प्रतिमा ह्यांची तयार केली जाते. मग आता सांगा, अशा महान योगी पुरुषाला मेंदूत रक्तस्राव झाल्यावर डोक्यात प्रश्न येणार नाही का? की बाबा हा दारू पीत नाही, ड्रग्ज घेत नाही, मांस सेवन करत नाही, योग करतो, ऑरगॅनिक अन्न खातो, ध्यान करतो, शिवाच्या आराधनेत लीन असतो, नैतिक आचरण करतो, बीपी शुगरच्या पेशंट्सला मार्गदर्शन करतो तर मग ह्याला असा आजार कसा बरं होऊ शकतो?
तर माझ्या मराठमोळ्या भक्त मित्रांनो, जरा अकल आणि स्वाभिमान शिल्लक असेल तर ती वापरा. तुमच्यासारख्यांना तो जग्गी आपल्या खेटरापाशीही उभं राहू देत नाही. त्यांचा महाशिवरात्रीचा इव्हेंट गरिबांना काय मध्यमवर्गीयांनाही परवडत नाही. २० हजारापासून तिकिटाची सुरुवात होते. शिवशंकर हा भोळा देव म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच त्याला भोलेनाथ म्हणतात. पण त्या भोलेनाथाचं नाव करून हा आलिशान जीवन जगत आहे. २५ लाखाची मोटरसायकल, लाखो रुपये किमतीचे गॉगल्स आणि Luxury राहणीमान असलेला हा भोगी तुम्हाला कोणत्या अँगलने योगी वाटतो? ह्यांच्यावर कितीतरी कोर्ट केसेस सुरू आहेत. आणि ह्याबद्दल जर एखाद्या पत्रकाराने किंवा विद्यार्थी मुलीने प्रश्न विचारला तर हे क्रोधित होऊन उलट प्रश्न विचारणार्यावर केसेस दाखल करण्याची थेट धमकी देतात.
असा असतो जितेंद्रिय योगी..?
दुसर्यांना काम-क्रोधादी विकारांवर विजय प्राप्त करायचं ज्ञान शिकवायचं आणि स्वतःला अनकंफर्टेबल करणारे प्रश्न विचारले तर त्याच्यावर केसेस करायच्या? हाच का योग? हाच का क्रोध, मत्सर इत्यादी विकारांवर विजय? हीच का सहिष्णुता? हीच का क्षमाशीलता? म्हणून म्हणतो, दिखावे पे ना जाओ. अपनी अकल लगाओ.
(यूट्यूबवर ह्यांचं पितळ उघडं करणारे अनेक व्हिडिओज आहेत. जरा कष्ट घेऊन बघून घ्याल आणि मनसोक्त offend व्हाल!)
३.
सद्गुरुवरील हा शेवटचा मजकूर लिहून सांगता करतो आता…
माझ्या मते, आता सद्गुरुंंनी स्वतःच आपल्या हाताने ते पायातलं कडं काढून टाकायला पाहिजे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कडं काढल्यावर जर चाळीस दिवसात त्यांचा मृत्यू झाला तर माझ्यासारखे कितीतरी नास्तिक ‘आस्तिक’ होऊन जातील. लोकांचा देवावर विश्वास वाढेल आणि विवेकवादी, विज्ञानवादी फुरोगाम्यांची तोंडं बंद होतील. इतक्या सार्या सकारात्मक गोष्टी जर साध्य होणार असतील तर सद्गरूंनी लोकांना हे प्रात्यक्षिक करून दाखवलंच पाहिजे. नास्तिक लोकांना ईश्वराभिमुख करण्यासाठी एवढा छोटासा त्याग नाही करू शकत सद्गुरू?
झालं ना, आता भरपूर आयुष्य जगून झालं. तसंही एका जीवनमुक्त सिद्ध योगी पुरुषाला मृत्यूचे काय भय? कशी वाटली कल्पना?