एन.डी. सर .. पुरोगामी चळवळीचे कृतिशील भाष्यकार!

राजीव देशपांडे -

एन. डी. सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून 17 जानेवारीला त्यांचे निधन होईपर्यंत समितीच्या अध्यक्षपदी होते. संसदीय राजकारणात असणारे एखादे व्यक्तिमत्त्व अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या संवेदनशील चळवळीशी इतक्या निकटतेने प्रदीर्घ काळापर्यंत निगडित राहणे तसे अवघडच. कारण अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत आपली मते ठामपणे मांडणे; त्याप्रमाणे सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात आचरण करणे म्हणजे आपल्या मतांवर पाणी सोडणेच होय. पण ‘बिकट वाटेलाच वहिवाट’ मानणार्‍या एन. डी. सरांना त्यात काहीच अवघड वाटत नसावे; आणि नुसते निगडितच नव्हे, तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी असत; मग ते आंदोलन शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर स्त्रियांना प्रवेश देण्याचे असो किंवा जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भातील रस्त्यावरचे आंदोलन, वैधानिक किंवा प्रशासकीय पातळीवरचे असो अथवा डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर शासनाला जाब विचारणारे ‘जबाब दो’ आंदोलन.

एका बाजूला शेतकरी-कामगारांच्या, दलित-वंचितांच्या, शोषणाच्या प्रश्नांसाठीचे राजकीय लढे; त्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, तर दुसर्‍या बाजूला बहुजनांना आधुनिक शिक्षणाने सुसज्ज करणार्‍या ‘रयत’सारख्या विविध शिक्षण संस्थांची उभारणी हे सर्व बहुजन समाजासाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच बहुजन समाजासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या चळवळीची किती गरज आहे, याची जाणीव बहुजन समाजातून आलेल्या, सत्यशोधकी चळवळीचे संस्कार झालेल्या; तसेच मार्क्सवाद-लेनिनवादाचा प्रभाव असलेल्या एन. डी सरांसारख्यांना प्रकर्षाने होती.

आज जागतिकीकरण, खासगीकरणाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित यांच्या जीवनमानावर चहूबाजूंनी हल्ले होत आहेत. एन. डी. सरांनी जागतिकीकरणविरोधी कृती समिती, ‘एसईझेड’विरोधी समिती, ‘एन्रॉन’विरोधी समिती यांसारख्या माध्यमातून आंदोलने उभारली. जनतेला याविरोधात प्रबोधित करण्यासाठी अनेक पुस्तिका लिहिल्या. शेकडो सभा घेतल्या, व्याख्याने दिली. स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे काहीही योगदान नव्हते आणि त्या चळवळीने प्रस्थापित केलेल्या व भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता या मूल्यांशी काही घेणे-देणे नसलेल्या धर्मांध शक्ती आज सत्तेवर आल्या आहेत. त्यांच्या सत्तेवर येण्यामुळे लोकशाहीसमोरील आव्हानांची जाणीव करून देत धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना त्यांनी साथ दिली. देशात धर्मांधांचे, धार्मिक रूढी-कर्मकांडांचे, अंधश्रद्धांचे प्रस्थ वाढत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्षपद त्यांनी केवळ शोभेपुरते कधीच मिरविले नाही, तर प्रत्यक्ष आंदोलनात उतरून त्या चळवळीची धार वाढविली. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे बहुजन समाजाला शिक्षण परवडेनासे होत असताना गरीब, बहुजन समाजाला शैक्षणिक सुविधा कशा मिळतील, यासाठी अविरत प्रयत्न केले.

अशा या आजच्या कसोटीच्या काळात एन. डी. सरांसारखा तत्त्वनिष्ठ, पक्षनिष्ठ, बुद्धिमान मार्गदर्शक, लढाऊ नेता आपल्यातून गेला आहे. परंतु जाताना त्यांनी विवेकी लढाऊपणाचा, अभ्यासूपणाचा, नैतिकतेचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. हा आदर्शांचा वारसा नेटाने पुढे चालवत धर्मांध व साम्राज्यवादी शक्तींना पराभूत करणे हीच एन. डी. सरांना योग्य आदरांजली ठरेल.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]