डॉ. हमीद दाभोलकर -
प्रसिद्ध लेखक, प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर (वाई) यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. शंतनू हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात नियमित लिखाण करायचे. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संपादक मंडळ यांच्या वतीने विनम्र अभिवादन. अभ्यंकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
डॉ. हमीद दाभोलकर यांनी शंतनूच्या जागवलेल्या आठवणी…
पंधरा ऑगस्टला सकाळी डॉ. शंतनू अभ्यंकर या माझ्या ज्येष्ठ मित्राची फुप्फुसाच्या कर्करोगासोबत दोन वर्षे चालू असलेली लढाई थांबली. एका निखळ विज्ञानवादी माणूस, वाचकप्रिय लेखक, ग्रामीण भागात माफक दरात महिलांचे आरोग्य सांभाळणारा डॉक्टर आपल्यामधून गेला. दोन वर्षांच्या पूर्वी त्याला फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. आजाराची पूर्वकल्पना देणारी फारशी लक्षणे देखील त्याला आली नव्हती. निदान झाले तेव्हाच आजार चौथ्या टप्प्यात होता. म्हणजे शरीरभर सर्वत्र पसरला होता. चौथ्या टप्यातील फुप्फुसाचा कर्करोग म्हटल्यावर ही लढाई अवघड असणार आहे, याची त्याला आणि आजूबाजूच्या लोकांना पहिल्या दिवसापासूनच कल्पना होती. असे असताना नव्याने शोधल्या जाणार्या औषधाला त्याच्या शरीराने खूप छान प्रतिसाद दिला, तेव्हा मात्र तो या कर्करोगाला मात देईल, अशी एक मोठी आशा मनात निर्माण झाली होती.
दर दोन-चार वाक्यांनी काही तरी जोक मारायचे आणि समोरचा त्यावर हसायच्या आधी स्वत:च हसायला लागायचे ही वडील शरद अभ्यंकर यांच्याकडून शंतनूला आलेली सवय. हे जोक तो नव्या जोमाने परत करू लागला म्हणजे आता शंतनू चांगला बरा झाला आहे, याचा तो निर्देशांक होता. परत दुप्पट जोमाने तो लेखन, दवाखाना, कार्यक्रम असे सर्व करू लागला होता आणि हे असेच चालू राहील, असे मनाशी धरून चालले असताना सात महिन्यांपूर्वी त्याचा आजार उलटला. नंतरच्या गोष्टी मात्र झपाट्याने घडल्या. बरोबर एक महिन्यापूर्वी १४ जुलै रोजी त्याच्या चार पुस्तकांचा एकदम प्रकाशन समारंभ झाला, त्याच्या थोड्याच आधी मुलाचा साखरपुडा करून घेतला. शांत चित्ताने आप्तस्वकियांचा आणि सुहृदांचा तो निरोप तर घेत नाही आहे ना, असे विचार मनात तरळून गेले होते; पण वास्तव कितीही अवघड असले तर मनाला कुठेतरी खोलवर आशा वाटतच राहते. स्वत: निष्णात डॉक्टर असल्याने त्याला मात्र परिस्थितीचा अंदाज आला होता, असे लक्षात येते. माणसाच्या मेंदूची गंमत अशी आहे की, त्याला कितीही विज्ञानवादी ट्रेनिंग दिले असले, तरी पुरेसा ताण आला तर तो अविवेकी भावनांच्या प्रभावाखाली येऊ शकतो. शंतनू मात्र याला अपवाद ठरला. त्याने कर्करोगाचे निदान होणे, उपचार घेणे आणि मृत्यूला सामोरे जाणे यामध्ये स्वत: आयुष्यभर जपलेली विज्ञाननिष्ठा तसूभरही ढळू दिली नाही. औषधांचा चांगला गुण आल्यावर जेव्हा शंतनू बरा होता, तेव्हा त्याने या प्रक्रियेतून जाण्याचा सगळा अनुभव सविस्तर लिहून काढला. सोशल मीडियावर असंख्य लोकांनी तो एकमेकांना पाठवलेला आणि ‘अनुभव’ मासिकाने छापलेला ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ हा त्याचा लेख स्वत:च्या मृत्यूकडे माणूस किती विज्ञाननिष्ठ पद्धतीने बघू शकतो याचा वस्तुपाठ आहे. कर्करोगाशी लढाई देणार्या हजारो व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबांना त्याने बळ दिले आणि यापुढे देखील देत राहील असे हे लिखाण आहे. हे लिखाण केवळ वैयक्तिक अनुभव म्हणून नसून ते लिहिताना त्याच्यातील विज्ञानशिक्षक सतत दक्ष आहे हे पदोपदी जाणवत राहते. सामान्यपणे अशा स्थितीमधून जाणार्या व्यक्तीचा ज्या प्रश्नांमुळे भावना अस्वस्थ होऊन अवैज्ञानिक गोष्टींच्या बाजूने प्रवास सुरू होतो त्या सर्व गोष्टींना कसे हाताळावे, त्या वेळी कसा विचार करणे हे शास्त्रीय आहे, हे त्याने नर्मविनोदी आणि खुसखुशीत शैलीत लिहिले आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही असा विनोद मनात जागा ठेवणे, हे अत्यंत अवघड कसब त्याला साधले होते. आपल्याला हा आजार का झाला याचे कारण लिहिताना तो म्हणतो की, “माझ्या आजाराचे कारण माझ्या जनुकीय कुंडलीमधील काही वक्री ग्रह असणार. त्यांनीच माझ्या पेशींना दुराचार करा, असा संदेश दिला असणार!” शंतनूच्या हसत हसत कर्करोगाला सामोरे जाण्याकडे बघून अनेक लोकांनी ‘जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये बाबुमोशाय’ म्हणणार्या ‘आनंद’मधल्या राजेश खन्नाची आठवण काढली, ते अगदी रास्तच होते. पण आनंद आणि शंतनूमध्ये एक खूप मोठा फरक होता. ‘आनंद’ मधल्या राजेश खन्नासाठी ‘जिंदगी की डोर उपरवाले के हाथ में’ होती; पण शंतनू मात्र त्या मागची जनुकांची वक्रदृष्टी समजून घेत होता. एका पातळीवर तो नास्तिक होता, पण जीवनाकडे इतक्या निरपेक्षपणे आणि तटस्थतेने बघणे याला जर आध्यात्मिक गुण म्हटले तर त्या अर्थाने तो आध्यात्मिक होण्याच्या प्रवासात चांगलीच प्रगती साधून होता, असे म्हणायला पाहिजे. विज्ञानवादी आणि त्यात देखील नास्तिक असलेले लोक हे तर्ककर्कश, अरसिक आणि भावनारहित असतात, असा एक सार्वत्रिक समज आहे. शंतनू या सगळ्याच्या एकदम उलट होता. त्याचा तर्ककठोरपणा हा आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय ठाम होता. मृत्यू टाळणे अशय, हे लक्षात आल्यावर आपल्याला कुठलाही लाईफ सपोर्ट देऊन जगवू नये अशी त्याने अत्यंत तर्ककठोर भूमिका घेतली. ती जवळच्या लोकांना पटवूनसुद्धा दिली; पण आपल्या आजाराकडे बघताना आपले जवळचे लोक भावनावश होतात आणि त्यातून अनेक वेळा अवैज्ञानिक किंवा अंधश्रद्धा म्हणावे असे सल्लेही देतात. ते शांतपणे ऐकून हसून सोडून द्यायचे हे कसब त्याला साधले होते. रसिकता तर त्याच्या रक्तात भिनलेली होती.
‘राधिका सांत्वनम’ हे अत्यंत रसाळ आणि प्रणयराधना असलेले नाटक भाषांतर करून त्याचे तो आणि त्याची पत्नी डॉ. रुपाली वाचन करत असत. एका बाजूला कठोर बुद्धिनिष्ठ असूनही दुसर्या बाजूला आपल्यातील माणूस म्हणून असलेले संवेदनशील भावविश्व, तरल विनोदबुद्धी याला देखील आयुष्यात त्याने तितकेच स्थान दिले. वाईमध्ये गेलेले आयुष्य आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पु. रेगे यांचा सहवास हेही त्या मागचे एक कारण असावे असे वाटते. त्याने चांगले ललित साहित्य लिहिले असले, तरी माझ्या मते त्याचा मूळ पिंड समाजाच्या विज्ञान शिक्षकाचा होता. विज्ञानातील अवघड संकल्पना अस्खलित मराठी भाषेत, विनोदाचा तडका मारून सांगणे ही गोष्ट एखादा छंद जोपासावा अशा आवडीने तो करायचा.
त्याचे बाबा डॉ. शरद अभ्यंकर हे कठोर बुद्धिप्रामाण्यवादी. १५ तारखेला जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा अशा प्रसंगात देखील ते पूर्ण स्थिरता राखून होते. भेटल्यावर मला ते पहिले वाक्य म्हणाले की, ‘शंतनूने भारी फाईट दिली.’ शंतनूमध्ये हा धीरोदात्तपणा कुठून आला हे त्यांच्याकडे पाहिले की, सहज समजून यावे. अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतः कितीही विज्ञानवादी असला, तरी त्याच्याजवळच्या लोकांची त्याला साथ मिळणे ते देखील तितकेच मोलाचे असते. शंतनूची दोन्ही मुले अनन्या, मोहित आणि त्याची पत्नी रुपाली यांनी देखील त्याच्या विचाराला तितकीच तोलामोलाची साथ दिली. विज्ञानवादी म्हणून समाजजीवनातील ‘भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी मिळावी’ यासाठी विज्ञानवादी कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. या सगळ्यांमध्ये जीवनातील शास्त्रकाट्याच्या वापराला भावनेची कसोटी लावणे जमलेला शंतनू हा अवलिया होता. विज्ञान/विवेकवादी होण्यासाठी भावना आणि बुद्धी यांचा मेळ. घालत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शंतनूला आपल्या स्मृतीत ठेवणे होय, असे वाटते. हीच त्याला आदरांजली ठरेल.