कोरोना आपत्तीत राज्यभरातील ‘अंनिस’ कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी

अनिल करवीर - 9823280327

एकीकडे राज्यातील अंनिस शाखा, कार्यकर्ते कोरोनाशी जोमाने लढा देत आहेत व त्यांच्या जोडीला व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ते, हितचिंतकही आपापल्या परीने योगदान देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, कोरोनाविषयी जनजागृती, मुख्यमंत्री निधीला मदत, मानसमैत्र हेल्पलाईनद्वारे मानसिक आधार देण्याचे कार्य करीत आहे. कोरोनाच्या संकटावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व परीने कृतिशील मुकाबला करीत आहे

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस अमेरिका, भारत, युरोप, फान्स, इटलीसह आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. भारतातही याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे आणि महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शासन, डॉक्टर, पोलीस, सरकारी कर्मचारी, स्वयंसेवी संघटना अहोरात्र झटत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुद्धा शाखापातळीवर विविध लोकोपयोगी कार्ये करून कोरोनाशी जोमाने लढा देत आहेत.

मुंबईतील वांद्रे पूर्व शाखेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदतीसह शाखेचे सातत्य राहावे, म्हणून कॉरोनाबाबत ऑनलाईन चर्चा, चळवळीस पूरक भाषणे, सिनेमे आदी पाहणे, यातून कार्यकर्ता घडविणे त्यांच्यातील सुप्त गुण, कौशल्ये आदींना चालना देणे, यासारखे उपक्रम राबविले. दहिसर शाखेने ‘अंनिस’ जाणून घेण्यासाठी शाखेतील कार्यकर्त्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण, विज्ञान या विषयावर आधारित 10 ते 15 वर्षे या गटातील मुलांसाठी विज्ञानाची गट्टी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली. आतापर्यंत महाराष्ट्रातून 60 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला; प्रत्यक्षात फिल्डवर धान्य वाटप करणार्‍यांसाठी संस्थांना आर्थिक मदत केली, कोरोना काळात कार्यकर्त्यांनी रक्तदान केले व रक्तदानाचे आवाहनही केले. गोरेगाव शाखेतर्फे 66000 रुपये देणगी गोळा करण्यात आली. अलर्ट सिटीझन फोरम, युवा संस्था, सम्यक संस्था यांना गरीब लोक, रोजगार करणारे मजूर इत्यादींना जीवनावश्यक गोष्टींचे वाटप करण्यासाठी दिले, काही कार्यकर्त्यांनी रक्तदान केले व दुसर्‍यांना तसे आवाहन करण्यात आले, काही कार्यकर्ते ‘मानसमित्र’ म्हणून सध्याच्या परिस्थितीतील, तणावग्रस्त लोकांना समुपदेशन करत आहेत. दादर शाखेतर्फे एकूण 33 हजार रुपये निधी जमला आणि पारधी वाडा आणि कौलाबंदर या भागातील 100 कुटुंबांतील सदस्यांना प्रत्येकी तांदूळ, डाळ, चणे अशी मदत केली.

पालघर जिल्ह्यातील बोईसर शाखेतर्फे, पालघर शाखेतर्फे कोरोनाविषयी जनजागृतीसाठी ‘या कोरोनाला पळवून लावू सारे…’ या गाण्याची निर्मिती केली गेली, सर्व सोशल मीडियामध्ये व्हायरल केली गेली. ‘मनोबल’ व ‘मानसमित्र’तर्फे चालवल्या जाणार्‍या ऑनलाईन हेल्पलाईनद्वारे आजवर 15 लोकांशी संवाद झाला. तलासारीचे प्रा. सुमित कदम यांनीही स्वतः 20 मुलांचे समुपदेशन केले.

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ शाखेतर्फे अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या 78 कर्मचार्‍यांना अमोल व माधुरी चौगुले यांनी वाटप केले, रेशनधान्यासाठी किसण वराडे यांच्याकडून 30 हजार रुपये देणगी दिली, डोंबिवली, अंबरनाथ व भिवंडी शाखेच्या कार्यकार्त्यांनी देणगी गोळा करून 48 कुटुंबांना 13 जिन्नसांचे किराणा साहित्याचे किट वाटप केले. इतर स्वयंसेवी संस्थांना मदत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी मदतीसाठी संपर्क साधला. शाखा भिवंडीतर्फे रक्तदान, मुख्यमंत्री फंडात मदत, विटभट्टी मजुरांना बिस्कीट वाटप, कोन गावात अन्नधान्य वितरणात मदत, गरजूंना अन्नधान्य पॅकेट वाटप केले. डोंबिवली शाखेतर्फे गरीब, गरजूंच्या मदतीसाठी एकूण 34 जणांनी 40 हजार 690 रुपये जमा केले. त्यातून किट, मास्क; तसेच सॅनिटाझर, अन्नधान्याच्या किटचे वाटप केले. तसेच कार्यकर्त्यांनी रक्तदान करून, शाखेने पोलिसांना चहा आणि बिस्किटांचे वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली. ठाणे शाखेतर्फे ठाणे शहरातील गरजू व घरी खाण्यास बिस्कीट व पाणी यांसारखे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. कल्याण शाखेने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गरजू; विशेषतः आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या मानसिक ताणाच्या व्यवस्थापनासाठी शाखेच्या कार्यकर्त्यांनी ‘मानसमित्र’ बनून लोकांना मानसिक आधार दिला. शाखा कल्याण-टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या गरजू बांधवांना मदत म्हणून 70 जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले.

अहमदनगर शाखेचे प्रमोद भारूळे यांनी कोरोनाशी लढण्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोग केला, नागरिकांचे मास्क जागेवरच जंतू विरहीत करून देणारे मोबाईल उपकरण तयार केले, आणि मोबाईल सॅनिटायझर व्हॅनच्या द्वारे कार्यकर्ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, पोलीस स्टेशन, चौक्या येथे जावून लोकांचे मास्क सॅनिटायीझ करून देत आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल शाखेने अभिनव पद्धतीने उपक्रम राबविले, कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. शाखेच्या वतीने पनवेल महापालिकेच्या वतीने निराधार लोकांसाठी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तेथील सर्वांपर्यंत धान्य वाटप करण्यासाठी 500 किट्स तयार केले. ‘मानसमैत्री’ हेल्पलाईनसाठी पनवेल शाखेच्या 7 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आहे. शाखेच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निधीला व्यक्तिगत पैसे दिले. विशेष म्हणजे सेक्स वर्करर्स आणि ट्रान्सजेंडर यांच्या 90 कुटुंबांना एक महिन्याचा किराणा शाखेने दिला. जिल्हा रायगड पेण शाखेने तालुक्यातील आणि शहरातील दहा गावांचा सर्व्हे करून 53 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, शाखेतील काही सदस्यांनी गरजूंना आर्थिक मदत किंवा वस्तूरुपी मदत केली. म्हसळा शाखेतील कार्यकर्त्यांनी गावोगावी प्रत्यक्ष जाऊन मुंबईहून आलेल्या लोकांना मार्गदर्शन केले. गैरसमज दूर करून योग्य माहिती दिली व त्यांना क्वारंटाइनमध्ये कसे राहावे, याबाबत माहिती दिली. ‘मानसमित्र’ हेल्पलाईनवर मार्गदर्शन केले. ‘हेल्पिंग हँड्स’ या ग्रुप अंतर्गत रत्नागिरी शाखेतर्फे गरजूंना घरपोच अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. आतापर्यंत जवळजवळ 72 हजार रुपयांचे जिन्नस व औषधे घरपोच केली.

वर्धा शाखेने या कालावधीत समितीचे व इतर इच्छुक लोक मिळून पैसे गोळा करून किमान 200 बेरोजगार कुटुंबाना 15 दिवस उदरनिर्वाहास पुरेल असे धान्य, चहा पावडर, साखर, तेल, मीठ दिले. बर्‍याच पोलीस चेकपोस्टवर व ठाण्यात रोज चहाची व्यवस्था करण्यात आली, भाजीविक्रेते हातगाडीवाले व गरजू लोकांना किमान 300 च्या वर मास्क देण्यात आले, चेकपोस्टवर सॅनिटायझरची व्यवस्था करणे, भाजी विक्रत्याचे उचित नियोजन करणे, रोजमजुरी करणारे; पण त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशांना रेशन वा इतर सुविधा मिळाव्यात, याकरिता निवेदन दिले वा त्याचा पाठपुरावा केला.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शाखेने कामगारांना रोज सकाळ-संध्याकाळची जेवण पुरविले, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली, मानस मित्र परिवाराच्या माध्यमातून आठ ते दहा लोकांना मार्गदर्शन केले. बाहेरील कामगार, गरीब व गरजूंना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम उत्तर नागपूर शाखा करीत आहे. शाखेतर्फे नागपुरातील गरजू कुटुंबांना किराणा माल, मास्क यांचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शाखेतर्फे शेतकर्‍यांचा सेंद्रिय भाजीपाला विकत घेऊन तो समाजासाठी काम करणार्‍या पोलिसांना भेट देण्यात आला. 63 सेंद्रिय भाजीपाला किट पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भेट देण्यात आली. या लॉकडाऊनमध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शाखेच्या वतीने 50 बाटल्या रक्तदान आणि 60 गरीब कुटुंबीयांसाठी पंधरा दिवस पुरेल, असे अन्नाचे किट लोकसहभागामधून देण्यात आले. तसेच लातूर शाखेतर्फे ‘मानसमैत्र’ हेल्पलाईनच्या माध्यमातून कार्य आणि रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

नवी मुंबईतील सानपाडा शाखेतर्फे मुख्यमंत्री कोव्हिड रिलिफ फंडास मदत करण्यात आली. कोपर खैरणे शाखेने सुद्धा मुख्यमंत्री निधीसाठी मदत पाठवली.

एकीकडे राज्यातील बहुतेक शाखा, कार्यकर्ते कोरोनाशी जोमाने लढा देत आहेत व त्यांच्या जोडीला व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ते, हितचिंतकही आपापल्या परीने योगदान देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मास्क व सॅनिटायझरचे वाटप, कोरोनाविषयी जनजागृती, मुख्यमंत्री निधीला मदत, मानसमैत्र हेल्पलाईनद्वारे मानसिक आधार देण्याचे कार्य करीत आहे. कोरोनाच्या संकटावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व परीने कृतिशील मुकाबला करीत आहे…

चला, या संकटाचा मुकाबला करूया

या कोरोनाला पळवून लावूया