कुर्बानीचे रूप नवे

डॉ. हमीद दाभोलकर -

सर्व चिकित्सांची सुरुवात धर्म चिकित्सेपासून होते’, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या या विधानाप्रमाणे कार्यरत असणारी ‘अंनिस’ ही धर्माचा उच्छेद करण्यासाठी नव्हे, तर धर्माची चिकित्सा करत धर्म सुधारणा करणारी चळवळ आहे.

मुस्लीम धर्मात काही धर्मसुधारक धर्म सुधारण्याची धडपड करत आहेत आणि त्याला अंनिसची कशा प्रकारे साथ मिळत आहे, याचा ऊहापोह करणारा डॉ. हमीद दाभोलकर यांचा हा लेख

नुकतीच देशभरात ‘ईद उल अजहा’ साजरी करण्यात आली. खरे बघायचे झाले तर ‘अजहा’ या शब्दाचा अर्थ ‘अर्पण करणे किंवा कुर्बान करणे’ असा होतो. त्या अर्थाने बघितले तर ‘ईद उल अजहा’चा अर्थ ‘कुर्बानीची ईद’! या दिवशी कुर्बानी म्हणून मुस्लिमांत बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा असल्याने आपल्याकडे हा सण ‘बकरी ईद’ नावाने ओळखला जातो. सर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याचा प्रयत्न करणे, हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी नमूद केलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. याच सूत्राला अनुसरून गेल्या ३५ वर्षांत ‘पर्यावरणपूरक गणपती’, ‘फटाकेमुक्त दिवाळी’, ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, असे अनेक उपक्रम अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले. यातल्या प्रत्येक उपक्रमाला सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध झाला, पण गेल्या काही वर्षांत त्यांना समाजातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी हे उपक्रम तर आता शासनाचे अधिकृत उपक्रम झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेली १४ वर्षे ‘ईद उल अजहा’च्या दिवशी मुस्लीम सत्यशोधक मंडळासह अंनिस ‘कुर्बानीचे रूप नवे’ हे अभियान चालवते.

या अभियानामध्ये बकर्‍याची कुर्बानी देण्याऐवजी, समाजाला उपयोगी पडेल अशा स्वत:च्या प्रिय गोष्टींची कुर्बानी देण्याचे आवाहन केले जाते. त्याचबरोबर बकर्‍याच्या बळीला पर्याय म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते रक्तदान करतात. मुस्लीम समाजातून याला वाढता प्रतिसाद मिळत असून हे अतिशय आश्वासक चित्र आहे. यावर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली गेली. पैगंबर शेखसारखे तरुण कार्यकर्ते मुस्लीम सुधारणा मंडळामार्फत बोकडाची कुर्बानी देण्याऐवजी ‘आर्थिक कुर्बानी’ हा उपक्रम राबवत आहेत आणि त्यातून जमा होणारा पैसा ‘सर्वधर्मीय वंचित मुलांच्या शिक्षणासाठी’ वापरत आहेत. या उपक्रमालादेखील चांगला पाठिंबा मिळत आहे.

‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानामागची भूमिका थोडी विस्ताराने समजून घेऊ या. पहिली बाब म्हणजे, सर्वधर्मीय धर्मभावनांची ‘विधायक, कृतिशील आणि संवादी चिकित्सा’ होण्याची गरज आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे एक महत्त्वाचे वाक्य आहे. ते असे म्हणतात, ‘सर्व चिकित्सांची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते!’ गेल्या शतकात झालेल्या प्रमुख सामाजिक बदलांपैकी स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता निवारण, सती प्रथा बंदीसारख्या गोष्टी या विधायक कृतिशील संवादी धर्मचिकित्सेमधूनच साध्य झाल्या आहेत. पण सध्याच्या कालखंडात केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात धर्म चिकित्सेचा परीघ आक्रसला जावा यासाठी जाणीवपूर्वक संघटित प्रयत्न होताना दिसू लागले आहेत. जगातील बहुतांश देश आणि प्रमुख धर्मांमध्ये हे दिसून येतात. ‘भावनादुखीचा आजार’ कोविडप्रमाणेच सर्वत्र पसरलेला आहे. त्याच्याआड कुठल्याही चिकित्सेला नकार दिला जातो. चिकित्सा करण्याचा आग्रह धरणार्‍या लोकांना धर्मद्रोही आणि देशद्रोही ठरवले जाते. त्यांच्यावर ट्रोल धाडी पडतात. खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि त्याने ते थांबले नाहीत तर त्यांचे खूनदेखील केले जातात. हे सर्व लोकशाहीच्या मुळावर येणारे आहे, हे सांगण्यासाठी कोणा तत्त्ववेत्त्याची गरज नाही. सगळ्यात मोठा अंतर्विरोध असा की वेगवेगळ्या धर्मांतील कट्टरपंथीय लोकांची इतर धर्मांबाबतीत टोकाची विरोधी मते असली, तरी ‘आपल्या धर्माची चिकित्सा होता कामा नये आणि दुसर्‍या धर्माची चिकित्सा व्हायलाच हवी’, यावर मात्र एकमत असते! दुसर्‍या धर्माची चिकित्सा करण्याची मागणी करताना या कट्टरपंथीय लोकांची पद्धत मात्र अजिबात संवादी नसते. नुकतेच महाराष्ट्रात बकरी ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या विरोधानंतर मागे घेतलेला निर्णय, हिजाब आणि भोंगे यांच्याविषयी केली गेलेली भडक आंदोलने हे याचे उदाहरण आहे.

बकरी ईद, हिजाब सक्ती, मशिदीवरचे भोंगे बंद करणे याविषयी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आणि कट्टर निरिश्वरवाद्यांची ‘देव आणि धर्म यांना समूळ नाकारण्याची भूमिका’ या दोन्हीपासून ‘विधायक कृतिशील संवादी धर्मचिकित्सा’ पद्धत वेगळी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यामध्ये चिकित्सेची विधायकता, त्यासाठी कृतिशील असणे आणि त्याचसोबत संवादी असणे या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. त्याचे प्रमुख उद्दिष्ट हे कोणत्याही धर्माला नाकारणे किंवा कमीपणा देणे असे नसून त्या धर्माचे रूप हे अधिक कालसुसंगत व्हावे, अधिक मानवकेंद्री व्हावे अशी आहे. जसे पर्यावरणपूरक गणपतीमध्ये विरोध हा गणपती उत्सवाला नसून तो उत्सव साजरा करताना होणार्‍या पर्यावरणाच्या हानीला आहे. त्याचबरोबर समूहांच्या या स्वरूपाच्या धर्म भावना या अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांना काही शतकांचा इतिहास असतो, त्यामुळे लोकांशी याविषयी सातत्याने संवाद साधणे गरजेचे आहे, याचे सजग भान असते. ज्याला हे मत पटत नसेल सांविधानिक अधिकार मान्य करून त्याचा राग किंवा उपहास न करता संवादी राहणे यामध्ये महत्त्वाचे मानले जाते. तसेच विधायक कृतिशील धर्मचिकित्सेमध्ये रूढी-परंपरांचे अशास्त्रीय पोकळ उदात्तीकरण न करता कालसुसंगत अधिक मानवकेंद्री पर्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ किंवा ‘बोकडाच्या कुर्बानीऐवजी रक्तदान किंवा आर्थिक कुर्बानी’ असे हे स्वरूप आहे.

‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानातील भूमिकेविषयीचा दुसरा भाग हा शाकाहार आणि मांसाहार याच्याशी संबंधित आहे. माणूस हा मिश्रहारी प्राणी असल्याने व्यक्तीने शाकाहार करावा की मांसाहार हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी अंनिसची भूमिका आहे. संघटनेचा विरोध हा मांसाहाराला नसून ‘देवाच्या नावाने बळी देणे’ या संकल्पनेला आहे. ‘जगातील सर्व चराचर हे जर ईश्वर-अल्लाची लेकरे असतील तर आपल्याच लेकरांच्या बळीने तो कसा खूश होईल’, हा गाडगे महाराजांनी उपस्थित केलेला प्रश्न त्या भूमिकेमागे आहे. महाराष्ट्रातील अनेक जत्रा-यात्रांमधील पशुहत्येविषयी अंनिसने केलेले कामदेखील याच भूमिकेचा भाग आहे.

तिसरा मुद्दा आहे इस्लाममधल्या धर्म सुधारणेच्या प्रयत्नांकडे आपण कसे पाहावे, याविषयी. इस्लाम हा अपरिवर्तनीय धर्म आहे, अशी एक धारणा समाजात मोठ्या प्रमाणात आहे. हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजूंच्या कट्टरपंथीय लोकांसाठी अत्यंत सोयीचे असे हे आकलन आहे. इस्लामी कट्टरपंथीय आपले समर्थक अधिक कट्टर व्हावेत, यासाठी याचा वापर करतात, तर कट्टरपंथीय हिंदू हे इस्लामचे अनुयायी कधीच बदलू शकत नाहीत हे पसरवण्यासाठी याचा वापर करतात. प्रत्यक्षात आपल्या बुद्धीचा वापर करून आपण थोडी जरी चिकित्सा केली तरी आपल्या लक्षात येते की इस्लाममध्येदेखील धार्मिक प्रथा, परंपरांचे विविध अर्थ लावण्याचे प्रवाह आहेत.

सौदी अरेबियामध्ये महिलांवरचे निर्बंध उठवणे, अनेक मुस्लीमबहुल देशांमध्ये अजान आणि बुरखासारख्या गोष्टींवर बंदी येणे ही याची काही सध्याच्या काळातील बोलकी उदाहरणे आहेत. मोरोको या मुस्लीमबहुल देशातील अगदी ताजे उदाहरण सांगता येईल. या वर्षी तिथे गेली तीन वर्षे असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ‘ईद उल अजहा’ दिवशी कुर्बानी म्हणून बोकडाचा बळी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. याचा साधा सोपा अर्थ असा की, परिस्थितीनुसार मानवी हिताचा विचार करून इस्लामचे स्वरूप बदलत आले आहे. कदाचित, हिंदू धर्मातील धर्मचिकित्सेच्या चार्वाकापासून आंबेडकरांपर्यंतच्या परंपरेइतकी ती अजून सशक्त नसेल पण ती परंपरा निश्चित आहे. आपण तिच्याशी जोडून घेणे आणि शक्य असेल तिथे त्याला बळ देणे हे आपले कर्तव्य आहे, अशी अंनिसची भूमिका आहे.

सध्याच्या कालखंडात दोन्ही बाजूच्या कट्टरतावादी लोकांनी एकमेकांशी सतत भांडत राहून देशातील लोकशाही वेठीस धरली आहे आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा रस्ता धूसर झाल्यासारखे वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही धर्मांतील सुधारणावादी लोक, सांविधानिक मूल्ये आणि संवाद यांवर विश्वास असलेले उदारमतवादी आणि मानवतावादी लोक यांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. तातडीने जरी याचे परिणाम दिसले नाहीत तरी मूल्य परिवर्तनाच्या या विवेकी संवादाला आज ना उद्या यश येते, असा आपला सामाजिक इतिहास आहे!

सातारा जिल्ह्यातील गोंदवले गावाचे उदाहरण बोलके आहे. महाराष्ट्र अंनिस किंवा मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांचे कोणीही कार्यकर्ते नसताना गेली अनेक वर्षे गोंदवलेमध्ये कुर्बानीच्या ईद निमिताने बोकडाची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान केले जाते. आज असे प्रयत्न हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत; पण उद्या ते नकीच वाढणार आहेत. अशी स्थिती जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत कट्टरपंथीयांच्या दुष्टचक्रातून लोकशाही बाहेर पडावी अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना हा विधायक कृतिशील संवादी धर्मचिकित्सेचा रस्ता अटळ आहे.

-डॉ. हमीद दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]