विविध शाखा – विविध उपक्रम

-

अमावास्येच्या रात्री वडणगे स्मशानभूमीत अवकाश दर्शन कार्यक्रम

दिनांक १९ एप्रिल रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर व ग्रामपंचायत वडणगे, तालुका करवीर, जि. कोल्हापूर यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत वडणगे स्मशानभूमी येथे अमावास्येच्या रात्री विज्ञानवादी व विवेकवादी विचारांचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम दिनांक १९ रोजी सायंकाळी सात वाजता सुरू झाला. सुरुवातीला विलास पोवार (अंनिस जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर) यांनी चळवळीबाबत आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. आयोजक विशाल लोंढेसाहेब (सहायक आयुक्त-समाजकल्याण, कोल्हापूर) यांनी आपले मनोगत आणि कार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला. ते कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थित होते. त्यानंतर संभाजी यादव यांच्या पाऊण तासाच्या विनोदी कार्यक्रमानंतर बाळासाहेब मुल्ला (गडहिंग्लज) यांनी पाऊण तासात विविध चमत्कार करून बुवाबाजी व अंधश्रद्धेविरुद्ध आपण कसे लढले पाहिजे हे सांगितले. अंनिस राज्य महिला कार्यकर्त्या सीमा पाटील यांनी सुद्धा चमत्काराचे सादरीकरण केले आणि अंनिस चळवळीची महिलांना का गरज आहे हे सांगितले. त्यानंतरच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये रात्री उशिरापर्यंत किरण गवळी, खगोल अभ्यासक, कोल्हापूर यांनी स्लाईड शो मध्ये संपूर्ण जगाचा विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा इतिहास सांगितला. त्यानंतर स्मशानभूमीच्या आणि नदीमधील हिरवळीवर सर्वांना गोलाकार बसवून त्या वेळी आकाशात जे ग्रह, तारका समूह, राशी व नक्षत्र दिसत होते ते समजावून सांगितले. आणि त्यावर आधारित शकून-अपशकून कुंडली. ज्योतिष व वास्तुशास्त्र हे सर्व कसे खोटे आहे हे पुराव्यानिशी सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन पटवून दिले. किरण गवळी यांच्या अवकाश दर्शनच्या १७५ व्या कार्यक्रमाला विशाल लोंढे साहेबांच्या रूपाने प्रथमच राजाश्रय मिळाला. करवीर तालुक्याचे गटविकास अधिकारी व्ही. बी. यादव साहेब यांनी सदर कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. वडणगे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संगीता शहाजी पाटील आणि राजेंद्र भगत, ग्रामसेवक वडणगे हे सुद्धा पूर्ण वेळ उपस्थित होते. वडणगे ग्रामपंचायत आणि समाजकल्याण विभाग, कोल्हापूर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमाला सर्व वयोगटातील सुमारे २५० स्त्री- पुरुष उपस्थित होते.

– किरण गवळी, कोल्हापूर

केसांचा गुंता, सोडवी प्रकृतीची चिंता

सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दोन महिलांच्या जटा निर्मूलन केल्या. अंनिसच्या कार्यकर्त्या वंदना माने, उदय चव्हाण यांनी त्या दोन महिलांचे प्रबोधन करून जटा निर्मूलन केले. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते प्रा. प्रमोदिनी मंडपे, शंकर कणसे, रोहिणी कणसे, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, शशिकांत सुतार, हौसेराव धुमाळ, विलास भांदिर्गे, डॉ. दिपक माने, मोहसीन शेख, प्रकाश खटावकर उपस्थित होते.

नागपूर अंनिसच्या कायदा प्रबोधन यात्रेस प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी महात्मा जोतिबा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करते. त्या अंतर्गत महा. अंनिस नागपूर जिल्ह्याच्या सर्व शाखांच्या विद्यमाने जादूटोणा विरोधी कायदा महा प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मा. विशाल आनंद (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण) यांचे परवानगीने ही प्रबोधन यात्रा तीन टप्प्यांत आयोजित केली होती. पहिला टप्पा दि. १२ एप्रिल २०२३ ला मा. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक उपायुक्त- समाजकल्याण विभाग, नागपूर) तसेच वरिष्ठ सल्लागार जे. एस. सोमकुंवर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. पहिल्या टप्प्यात भिवापूर उमरेड, कुही, दुसरा टप्पा दि.१६ एप्रिल ला खापरखेडा, पारशिवणी, रामटेक व अंतिम टप्पा दि. २३ एप्रिल रोजी सावनेर, नरखेड, काटोल या तालुका पोलीस स्टेशनमध्ये संपन्न झाला. या प्रत्येक पो. स्टे. ठिकाणी तेथील समग्र पोलीस स्टाफ, परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल, होमगार्ड, अंगणवाडी सेविका व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून आधीच आदेश दिले असल्याने प्रत्येक पो. स्टेशनने या प्रबोधन यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी शामियाना अगर सभागृहात केली होती.

प्रत्येक पोलीस ठाण्यात तिथले ठाणेदार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर महा. अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, विभूतीचंद्र गजभिये हे अतिथी म्हणून उपस्थित होते. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन आनंद मेश्राम, विजयाताई ठाकरे, शोभा पाटील, देवयानी भगत तर कार्यक्रमाची प्रस्तावना इंजि. गौतम पाटील, डॉ. सुनील भगत यांनी प्रस्तुत केली. त्यानंतर कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे चमत्काराचे सादरीकरण हे उत्तर नागपूरचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे अशा पद्धतीने करायचे की श्रोते आश्चर्याने मंत्रमुग्ध होऊन जायचे. कार्यक्रमाचे शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन, कारणमीमांसा सांगून उकल केली जायची. त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा म्हणजे काय, त्याचे प्रावधान व शिक्षेची तरतूद व अंमलबजावणी यांचे विस्तृत प्रबोधन जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे व सल्लागार विजयकांत पाणबुडे यांनी प्रभावी शैलीत करून यात्रेची सार्थकता सिद्ध केली. या दरम्यान ‘ज्योतिबा का संघर्ष’ हे प्रबोधनात्मक नाटक सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली.

या प्रबोधन यात्रेसंदर्भात आपल्या अध्यक्षीय भाषणात पारशीवणीचे ठाणेदार राहुल सोनवणे हे इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सरपंच व पोलिस पाटलांनी आपापल्या गावी ह्या प्रबोधन यात्रेचे आयोजन करावं व त्यांच्या जाणे-येणेचा प्रवासी खर्च ते वैयक्तिकरीत्या देतील असे जाहीर केले. तर भिवापूर येथील ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एस. भटारकर म्हणाले की, ही प्रबोधन यात्रा एवढी उत्कृष्ट व प्रभावशाली असेल ही कल्पनाच मी केली नव्हती. ही प्रबोधन यात्रा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्यास अंधश्रद्धा निमूलनाचा उद्देश खर्‍या अर्थाने सार्थ होईल. सर्व पोलीस अधिकारी व स्टाफ यांच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया व प्रतिसाद लाभला. सर्व ठिकाणी नाटकाच्या कलावंतांचे विशेष कौतुक करण्यात आले. यात रॉकी घुटके, वर्षा सहारे, अजय रहाटे, आशुतोष टेंभुर्णे, चंद्रशेखर मेश्राम, देवानंद बडगे, चंदा मोटघरे, सुषमा शेवडे, कल्पना पाटील, पिंकी डोंगरे यांच्या भूमिका तर नाटकाचे प्रभावी संचालन शिवानी पाटील, रामभाऊ डोंगरे यांनी केले. सर्व ठिकाणी कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, इंजि. गौतम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांनी आभार मानले.

या प्रसंगी प्रिया गजभिये, शोभा पाटील, इंदू उमरे, नरेश महाजन, चंद्रशेखर मेश्राम, विजया श्रीखंडे, विजया ठाकरे, प्रा. नीता इटनकर, रामदास शामकुंवर, देवयानी भगत, मंगला गाणार, अनुज साखरे, लांजेवार जी., वसंता गेडाम, डॉ. सुनील भगत, विभूतीचंद्र गजभिये, अमित हटवार, विवेक गायकवाड, संजय बारमासे, सुनीता गजभिये, शीला डोंगरे, वसंत मोहिले, भूषण मानकर, अरविंद तायडे, थुलकर, शुभांगी लामसोंगे, तनुजा झिल्पे, वसंत गेडमकर तसेच प्रत्येक पो. स्टे.च्या अखत्यारीत येणार्‍या गावचे पो.पाटील, सरपंच कोतवाल, अंगणवाडी सेविका व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता चळवळीचे गीत व सामूहिक ‘हम होंगे कामयाब’ या गीताने झाली.

चित्तरंजन चौरे, कार्याध्यक्ष, नागपूर जिल्हा अं.नि.स.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]