अरुण घोडेराव -

दोन-चार कानगोष्टी
आज सांगून ठेवतो तुला
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥धृ॥
कोण कुठला साधू येतो
दाढी, जटा वाढवून,
आयुष्यातले सारे प्रश्न
झटक्यात देतो सोडवून
संन्यासी तो झालाच का
असा प्रश्न विचार त्याला
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥ 1॥
दुसर्यांची ती अंधश्रद्धा,
आपली म्हणे डोळस श्रद्धा
स्वर्ग, नरक, पाप, पुण्य
खरे असते अमृतसुध्दा?
अनुभव कधी आला आहे
यांचा कधी कोणाला?
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥ 2॥
श्रध्देपायी अंध होऊन
घेतात कुणी नरबळी
भ्रष्ट गुरूंच्या नादापायी
बुध्दी होते आंधळी
गुरूने खरे दिले आहे
दान कधी कोणाला?
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥ 3॥
सत्संग की संतसंग?
प्रत्येक मठात असते वादंग
मी म्हणेल तीच पूर्व
मी म्हणेल तोच रंग
खुदपसंत महंताच्या
झळ बसते का खिशाला?
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥ 4॥
यांचा धर्म गंध-टिळा
यांचा धर्म पाद्यपूजा
मान यांची उंच मात्र
धर्म यांचा असतो खुजा
अधर्मालाच ठरवून धर्म
गल्लीबोळात बोलबाला
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥ 5॥
डोळस हो, चालव डोके
माणुसकीला विसरू नको
विज्ञान, नीती, निर्भयतेकडे
पाठ कधी फिरवू नको
लोकशाहीत स्वातंत्र्याचा
मार्ग नेहमी असतो खुला
भाकडकथांवरती विश्वास
ठेवायचा नसतो मुला ॥6॥
–अरुण घोडेराव, सिन्नर