-
प्रेषिताचा अपमान केला म्हणून झुंडीने हात तोडला!
ही सत्यकथा आहे केरळमधील टी. जे. जोसेफ या प्राध्यापकांची. 2010 साली त्यांनी एका प्रश्नपत्रिकेत टाकलेल्या एका प्रश्नावरून ‘आमच्या धर्म संस्थापकांचा अपमान केला,’ अशी हाकाटी पिटून त्यांच्यावर हल्ला करणार्या जमावाने त्यांचा एक हात तोडला. या भयानक अनुभवावर आधारित पुस्तक त्यांनी मल्याळम्मध्ये लिहिले. त्याचे इंग्रजीत भाषांतर श्री. नंदकुमार यांनी केले आहे. त्याच्या प्रकाशनानिमित्त श्री. जोसेफ यांची मुलाखत ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये आली आहे, त्याचा हा अनुवाद.
आपले मूळ पुस्तक 2020मध्ये प्रसिद्ध झाले, ते बरेच गाजले. आता इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध होत आहे. त्याचा किती प्रभाव पडेल?
धार्मिक मूलतत्त्ववाद आणि अतिरेकी विचार ही माझ्यावर हल्ला होण्याची कारणे 11 वर्षांपूर्वी होती. ती आजही प्रचलित आहेत. मला आशा आहे की, धार्मिक अतिरेकाच्या पकडीत सापडलेल्या लोकांना माझी हकिकत कळेल, तेव्हा त्यातल्या थोड्यांना तरी पुन्हा विचार करावा असे वाटेल. आपला काहीही दोष नसताना ज्यांच्यावर खचून जाण्याची वेळ आली आणि जगण्याकरिता संघर्ष करावा लागला, त्यांना माझ्या कहाणीतून थोडे पाठबळ मिळेल.
खरी हकिकत लोकांच्या पुढे यावी असाही आपला उद्देश होता. 2010 मध्ये ही प्रश्नपत्रिका काढली होती, तेव्हापासून मी गुन्हा केला आहे आणि पाखंडी आहे, अशी माझी प्रतिमा रंगवण्यात आली. बी. कॉम. परीक्षेच्या कॉलेज अंतर्गत सत्र परीक्षेत मी ज्या महंमद या नावाचा उल्लेख केला होता, तो लेखक पी. टी. कुंजू महंमद यांना उद्देशून होता. पण काही लोकांनी असा दावा केला की, प्रेषित महंमदांचा अपमान करण्यासाठी मी हे मुद्दाम केले. माझा हात कलम केल्यावर काही लोकांनी सहानुभूती व्यक्त केली, तरी ही अपराधाला शिक्षा झाली, अशीच त्यांची भावना होती. सत्य काय ते जगापुढे मांडायचे होते आणि त्यासाठी आत्मचरित्र हा मला योग्य मार्ग वाटला. धार्मिक कडवेपणामुळे आपले जगणे किती असुरक्षित झाले आहे, हेही मला दाखवायचे होते. अशी परिस्थिती उद्भवल्यास या देशात कोणीच सुरक्षित राहणार नाही. आपल्याला हे समजेल की, आपल्याला नागरिक या नात्याने मिळालेले सर्व अधिकार, धार्मिक एकात्मता आणि सहजीवन, ज्यांचे धृपद आपण नेहमी आळवत असतो, त्या किती तकलादू आणि कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक कल्पना आहेत. तुमच्या पुस्तकात तुम्ही असे म्हणता की, तुमचे कॉलेज आणि चर्च यांनी तुम्हाला जी वागणूक दिली, ती हात कलम केला जाण्यापेक्षाही वाईट होती.
थोडूपुझा न्यूमन कॉलेजचे प्राचार्य आणि आमचे चर्च हे सुरुवातीला माझ्या पाठीशी होते. पण नंतर त्यांनी आपला पवित्रा बदलला. मी निरपराध आहे, हे माहीत असूनही कॉलेजने मला पाखंडी ठरवले. प्रथम सस्पेंड केले आणि नंतर काढून टाकले. चर्चने माझ्या सर्व कुटुंबाला धर्मबहिष्कृत केले. अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी आमच्या घरी येणे बंद केले. कारण त्यांना चर्चची नाराजी नको होती. माझे विरोधक धर्मांध झाले होते. त्यांनी मला हात तोडून फक्त शारीरिक यातना दिल्या; पण माझ्याच धर्मबांधवांनी मला जी वर्तणूक दिली, त्याने मी आणि माझे कुटुंब यांच्यावर झालेला परिणाम जास्त वाईट होता.
तुमचे पुस्तक तुम्ही पत्नी सलोमी हिला अर्पण केले आहे. तिला मानसिक नैराश्याचा त्रास जास्तच होऊ लागला का?
या हल्ल्यानंतर माझ्या कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागला. काही आठवड्यांतच मला कामावरून काढून टाकल्याचे पत्र आले. माझ्यावर पाखंडीपणाचा आणि कॉलेजचे नाव खराब केल्याचा आरोप ठेवला होता. हा आम्हा सर्वांनाच; विशेषत: सलोमीला मोठा धक्का होता. कामावरून काढले गेल्यामुळे आमच्या कुटुंबाची मिळकत बंद झाली होती. कायदेशीर लढ्याचाही आघात होता आणि माझ्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. काही हितचिंतकांच्या मदतीने आमचा निर्वाह चालला होता. याचा सलोमीच्या मनःस्थितीवर परिणाम झाला आणि ती दिवसेंदिवस खालावत चालली. सव्वादोन वर्षांनी माझी धर्मद्रोह आरोपातून सुटका झाली; पण कॉलेजने मला पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे नाकारले. आम्ही चार वर्षेयासाठी झगडा चालू ठेवला होता आणि अखेर तर निराश झालो होतो. कारण माझी निवृत्तीची तारीख जवळ येत होती. सलोमी तर नैराश्याने पार मोडून गेली होती. एका संध्याकाळी आम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडून घरी आलो आणि तिने आत्महत्या केली. या गोष्टीचा आणि त्यानंतर उफाळलेल्या सार्वत्रिक संतापाचा परिणाम म्हणून कॉलेज व्यवस्थापनाने माझी पुनर्नेमणूक केली. त्यानंतर दोन दिवसांनी मी निवृत्त झालो. पत्नीच्या मृत्यूचा तर मला धक्का बसलाच; पण माझी पुन्हा नेमणूक व्हावी, ही तिची तीव्र इच्छा पूर्ण झालेली तिला पाहता आली नाही, याचे मला जास्त वाईट वाटले.
थेट बळी या नात्याने तुम्ही आज प्रचलित असणार्या असहिष्णुतेबद्द्ल काय म्हणाल?
आपल्या घटनेनुसार आपण धर्मनिरपेक्ष आहोत. पण धार्मिक सुसंवाद आहे कुठे? फक्त तात्पुरती तडजोड आहे, युद्धबंदी असल्यासारखी. केव्हाही शत्रुत्व उफाळू शकते.
अनुवाद : डॉ. शरद अभ्यंकर, वाई