पर्यावरणाचे तीन दूत

अंनिस -

मल्हार इंदुलकर, राधामोहन आणि साबरमती, क्रेग लिसन

5 जून, जागतिक पर्यावरण दिन, त्या निमित्ताने तीन व्यक्तींनी (यात एक पितापुत्रीची जोडी आहे) आपापल्यापरीने पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा परिचय आम्ही अंनिवाच्या वाचकांना करून देत आहोत. यात ‘नित्यता रिव्हर वोटर कॉन्झरव्ह्सी’ संस्थेसोबत पाणमांजराच्या संरक्षणासाठी काम करणारा सावंतवाडीचा तरूण मल्हार इंदुलकर आहे तसेच ओरिसातील नवागढ येथील ‘संभव’ या संस्थेतर्फे नैसर्गिक शेतीच्या कामासाठी या वर्षी पद्मश्री देऊन त्यांच्या पर्यावरणविषयक कामाचा गौरव करण्यात आलेले पितापुत्री राधामोहन आणि साबरमती आहेत त्याचप्रमाणे प्लस्टिकविरोधात आपल्या ‘प्लास्टिक ओशन’ या माहितीपटातून जनजागृती करणार्‍या क्रेग लिसन या ऑस्ट्रेलियातील पत्रकाराची मुलाखत आहे.

दोन खोर्‍यांतले पर्यावरण आणि समाज मल्हार इंदुलकर

सहा वर्षांपूर्वी नित्यता रिव्हर वॉटर कॉनझर्व्हन्सी या बंगळुरुस्थित संस्थेसोबत काम करत असताना, सावंतवाडी तालुक्यातील दाभिळ गावा वरती लिहिलेला ब्लॉग मी वाचला. संस्थेच्या वरिष्ठांनी हा ब्लॉग आग्रहाने वाचायला सांगितला होता. यादरम्यान मी नित्यता संस्थेसोबत कावेरी नदीमधील पाणमांजर या विषयावर चाललेल्या अभ्यासाचा भाग होतो आणि संस्थेसोबत internship करत होतो. ‘नित्यता’ही पाणमांजर आणि नद्या या विषयावर काम करणारी संस्था आहे. कावेरी नदीमध्ये सर्व्हे आणि पाणमांजराला असणारे धोके समजून घेऊन संरक्षणासाठी जनजागृती कार्यक्रमाचे काम चालू होते, आजही आहे.

याचवेळी दाभिळगावाचा विशेष उल्लेख म्हणजे, सावंतवाडी तालुक्यातील या गावामध्ये एक धरण प्रकल्प येऊ घातला होता. यामध्ये दाभिळगाव संपूर्णपणे पाण्याखाली जाणार होते. अगदी धरणाची अर्धवट भिंतदेखील बांधली गेली; फक्त नदीचे मुख्य पात्र अडवणे बाकी राहिले होते. पण या सगळ्या काळात हार न मानता ग्रामस्थांनी व संघटनेने कायदेशीर लढा दिला. या लढाईमध्ये सर्व ग्रामस्थ व गावातील वरिष्ठ, प्रमुखांनी पुढाकार घेतला. यामध्ये उल्लेखनीय काम बजावले ते गावाचे माजी सरपंच बाळकृष्ण (आबा) गवस, उपसरपंच विनय कोरगावकर व पोलीस पाटील भारुदास घाडी. या कामात ग्रामस्थांना साथ लाभली ती मुंबईतील वनशक्ती संस्थेची. अर्थात कोकण उद्ध्वस्त करू पाहणार्‍यांनी येत्या भविष्यात ‘वनशक्ती’चा जोर पाहिलाच. धरणविरोधी बाजूने आपल्या अर्ग्युमेंटमध्ये अनेक गोष्टी मांडल्या होत्या. त्या म्हणजे तिथले जंगल जे धरण बांधकामानंतर पाण्याखाली जाणार होते, तेथील देवराया ज्या समाजासाठी खूप पवित्र ठिकाणे समजली जातात, पाण्याखाली जाणारी शेतजमीन आणि लाभार्थी गावात पाण्याचे कोणतेही दुर्भिक्ष्य नसणे. हा ब्लॉग वाचेपर्यंत हे गाव नेमके कुठे आहे, कसे आहे, याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण एका गोष्टीने आमचे या गावाबद्दल कुतूहल वाढले ते म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये small clawed otter (पाणमांजराची एक जात) याबद्दल विशेष उल्लेख होता. पाणमांजर ज्याला इंग्लिशमध्ये ‘ऑटर’ म्हणतात, एक सस्तन प्राणी आहे. पाणमांजर हे नदीमध्ये प्रामुख्याने बेडूक व मासे खातात, नदीकिनारी बीळ करून, दगड-कपारींमध्ये किंवा झाडांच्या आडोशात ते राहतात. दिसायला अत्यंत देखणा आणि खेळकर असणारा हा प्राणी सामाजिक आहे व दोन ते बाराच्या संख्येत झुंडीमध्ये राहतात. या केसमध्ये धरणविरोधी पक्षाच्या बाजूने असलेली ही सर्वांत महत्त्वाची बाजू ठरली होती. Small clawed otter हा वन्यजीव संरक्षण कायद्यांमध्ये सर्वोच्च श्रेणीमध्ये येतो आणि पट्टेरी वाघ आणि इतर अतिदुर्मिळ प्राण्यांच्या वर्गवारीत बसतो. असे प्राणी जिथे आढळतात, त्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असते. धरणविरोधी लढ्यामध्ये ही बाब कशी व किती महत्त्वाची होती याबद्दल हा ब्लॉग लिहिला होता.

2017 साली मी ‘नित्यता’सोबत तिलारी नदीमध्ये पाणमांजरावरती अभ्यास सुरू केला. तिलारी नदी ही महाराष्ट्रातील सर्वांत दक्षिण टोकाची अरबी समुद्राला मिळणारी नदी. या नदीचा उगम हा दोडामार्ग तालुक्याला संलग्न असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेमधून होतो. अर्धा प्रवास करूनही नदी पुढे गोवा राज्यात जाते. तिलारी नदीवरती दोन धरण प्रकल्प उभारले गेले आहेत – एक उन्नयी धरण आणि दुसरे मातीचे मुख्य धरण. हे दोन बांध दोन वेगळ्या उपनद्यांवरती बांधले गेले आहेत. या दोन्ही उपनद्या तिलारी नदीचे मुख्य प्रवाह आहेत. तिलारी हा जलविद्युत केंद्र असल्यामुळे दररोज या धरणांमधून कमी-जास्त प्रमाणात पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत सततचे बदल चालू असतात. अशा नदीकिनारी चालून पाणमांजराच्या खुणा शोधणे तसे अवघड जाते आणि धोक्याचेही असते, पण माझ्या घराजवळच्या वशिष्ठी नदीला जवळून अनुभवल्यामुळे मी आधीपासूनच सतर्क होतो. वशिष्ठी नदीमध्ये कोयनेचे जलविद्युत केंद्राचे पाणी सोडले जाते. अशा मानवी हस्तक्षेप केलेल्या ठिकाणांना इंग्लिशमध्ये heavily modified landscape म्हटले जाते. याचा सर्वांत मोठा परिणाम पर्यावरणामध्ये अर्थातच जलचर जीवांवरती होतो. उदाहरणार्थ माशांचा प्रजनन काळ हा पावसाळ्यात ज्यावेळी नदीचे पाणी वाढते त्यावेळी असतो; पण दररोजच्या पाणीपातळीत आलेल्या चढउतारामुळे माशांच्या प्रजनन काळामध्ये ढवळाढवळ होते. त्याचबरोबर प्रजननकाळात मासे प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करतात. वाटेत असलेले धरण हे माशांसाठी अडथळा निर्माण करते. ही गोष्ट अगदी तशीच आहे की, एखाद्या गरोदर महिलेला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे. पण वाटेत ट्रॅफिक जाम आहे. याच अडचणीला गृहीत धरून लघु व मध्यम प्रकल्पांना fish ladder तयार करण्याची कल्पना समोर आली. fish ladder धरणाच्या भिंतीच्या मुखावर तयार केले जाते व यासाठी उताराची तीव्रता कमी केली जाते. पण तिलारीसारख्या मोठ्या प्रकल्पांना हे करणे शक्य होत नाही, जिथे पर्यावरणीय गरजांना पूर्णपणे दुर्लक्षित करून पाण्याचा प्रवाहच मुळात नियोजित असतो. धरण प्रकल्प होत असताना प्रस्तावित बुडीत क्षेत्राबद्दल जितका विचार होतो तेवढा विचार धरणाच्या खालच्या नदीप्रवाहाबद्दल कधी होत नाही. नदीचा प्रवाह सतत चालू असणे खूप महत्त्वाचे असते. ज्याप्रकारे फिशटँकमध्ये मासे ठेवल्यानंतर टँकमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एअरेटर पाईप सोडला जातो, नदीमध्ये ही ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. नदीप्रवाह चालू असेल तर खळाळत्या पाण्यामुळे ऑक्सिजन पुरवठा चालू असतो. पण प्रवाह बंद झाला तर मात्र नदी छोट्या-छोट्या डोहांपुरती मर्यादित होते. यामुळे ऑक्सिजन पुरवठा तर बंद होतोच; पण अशा संथ पाण्यामध्ये हायसिंथसारखी जलपर्णीदेखील उगवते व असला-नसलेला ऑक्सिजनदेखील संपुष्टात येतो. ऑक्सिजन नसल्याने कालांतराने हे डोह मृत होऊन जातात व तेथील जीवसृष्टी संपुष्टात येते. याशिवाय कोणत्याही लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेलेले जंगल, शेती, गावे ही आलीच. ज्याप्रमाणे मासे स्थलांतर करतात, त्याचप्रमाणे पाणमांजरही अल्प अंतरावर प्रवास आणि स्थलांतर करतात आणि धरणाची भिंत या प्रवासाच्या आड येते.

तिलारी नदीवरती सर्व्हेसाठी पाणमांजराचे ठसे, विष्ठा व बीळ शोधत असताना अनेक ठिकाणी जिलेटिन, ब्लीच पावडर व मेटलकॉइल सापडले. जिलेटिनचा स्फोट करून, ब्लीच पावडर पाण्यात टाकून व कधी-कधी शॉक देऊन मासे पकडले जातात. यामुळे मोठ्या माशांसोबत छोटे मासे व इतर सर्व जलचर जीव मरण पावतात. कधी-कधी यात पाणमांजराचाही बळी जातो. झटपट व कमी कष्टात मासे पकडण्यासाठी हे प्रकार केले जातात. तिलारी नदीमध्ये माझे मुख्य काम हे धोके थोपवण्यासाठी प्रयत्न करणे होते. यासाठी विविध माध्यमांमार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचत होतो. या सगळ्यात मला मोलाची साथ लाभली ती दोडामार्गमधल्या पूर्वीपासून काम करणार्‍या निसर्गप्रेमींची. दोन वर्षे तिलारी खोर्‍यात काम केल्यानंतर कामाचा विस्तार तेरेखोल नदीपर्यंत वाढवायचे ठरले. तेरेखोल ही नदी एका अर्थाने मी आतापर्यंत काम केलेल्या इतर नद्यांच्या पेक्षा काहीशी वेगळी. ती वेगळी या अर्थाने की या नदीवर तिलारी, वशिष्ठी किंवा कावेरीसारखे कोणतेही मोठे धरण प्रकल्प अद्याप नाहीत. दोन छोटे बंधारे तिलारी नदीच्या इतर सहाय्यक नद्यांवरती आहेत. पण सह्याद्रीतून उगम पावणार्‍या दोन मुख्य प्रवाहांवरती एकही बांध किंवा धरण प्रकल्प नाही. त्याअर्थी बघायचे झाले तर तेरेखोल नदी उगमापासून समुद्रमुखापर्यंत निरंतर वाहते. ही बाब आवर्जून नमूद करण्याचे कारण म्हणजे कोकणात क्वचित एखादी किंवा इतर महाराष्ट्रात एकही अशी नदी उरलेली नाही, जी उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत निरंतर वाहते. तेरेखोल खोर्‍यात अगदी सगळे आलबेल आहे, असे नाही. एका बाजूला तेरेखोल खोर्‍यात ही बेसुमार जंगलतोड होत आहे आणि त्याची जागा रबरची लागवड घेत आहे. नदी आणि खाडीपात्रामध्ये जोरदार रेती उत्खननही चालू आहे. पण कमी-जास्त फरकाने इतर नद्यांच्या तुलनेत नदी आपल्या मूळ रुपात दिसते असे आपण म्हणू शकतो. कर्नाटकमधली अगनाशिणी नदी ही कर्नाटक राज्यातील एकमेव, एकही धरण प्रकल्प नसलेली नदी आहे. त्यामुळे ही नदी आता विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या आणि अभ्यासकांच्या कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय बनली आहे.

तेरेखोल नदीचे भविष्य मात्र काहीसे अंधारात दिसते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेमधून उगम पावणार्‍या दोन मुख्य प्रवाहमधला एक प्रवाह म्हणजे दाभिळ नदी, जिचा प्रवाह दाभिळगावातून आहे. नदीचा दुसरा मुख्य प्रवाह किंवा सहायक नदी म्हणजे शिरशिंगे गावातून येणारी नदी. या दोन्ही प्रवाहांवरती प्रस्तावित धरण प्रकल्प आहेत. यामधला दाभिळ प्रकल्प हायकोर्टच्या निर्णयानंतर रद्द झाला. पण ग्रामस्थांना भीती आहे की, कोणत्याही क्षणी कंत्राटी कंपनीचे डोळे पुन्हा त्यावर पडू शकतात. आपल्यावर आलेल्या परिस्थितीतून शहाणपणा घेत ग्रामस्थांनी स्वतःमध्ये जबरदस्त बदल करून घेतले. तसे हे गाव सह्याद्रीतल्या कुशीत असलेले निसर्गसंपन्न आहे. कोनशी या महसुली गावामध्ये या गावाचा समावेश होतो. इथली ग्रामीण संस्कृती ही पर्यावरणाशी संलग्न असलेली. एकट्या दाभिळ गावात तीन देवराई आहेत. असामान्य बाब म्हणजे त्यातील दोन राईंमध्ये नदीचा भाग किंवा मुळात नदीच येते. सातबाय (सातविहिरी) आणि आकीची फाथर (पथर/ दगड) हे नदीच्या आदराप्रीत्यर्थ संबोधलेली दोन पवित्र ठिकाणे आहेत. गणेशकोंड ही तिसरी देवराईदेखील नदीच्याच किनारी आहे. या ठिकाणी मासेमारी बंदी आणि कुर्‍हाड बंदीचे नियम ग्रामस्थांकडून काटेकोरपणे पाळले जातात. गावामध्ये अजून एक समज आहे की, पिण्यासाठी पाणी हे नदी किंवा ओढ्याचेच वापरायचे. विहीर खणली तर विहिरीतील पाणी दूषित होते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होणार नाही, ही काळजी साहजिकच घेतली जाते. गावामध्ये नदीपट्ट्यात पूर्वी बाहेरील लोकांकडून क्वचितप्रसंगी चुकीच्या पद्धतीने मासेमारी व्हायची. यासाठी लोक जिलेटिन स्फोट, केमिकल किंवा विजेचा वापर करत. पण नंतर ग्रामस्थांनी मिळून यावर कडक निर्बंध केले आणि ग्रामपंचायतीत यासंदर्भात चर्चा घडवून आणून ठराव मंजूर केला गेला. याव्यतिरिक्त ग्रामस्थांचा पंचक्रोशीत येऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पावरती देखील ठाम मत व अर्थात विरोधआहे.तसे बघायला गेले तर तिलारी आणि तेरेखोल खोर्‍यातील सगळ्याच गावांमध्ये निसर्गसंलग्न संस्कृती दिसून येते. परंतु ती यशस्वीपणे पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया दाभिळगावात नव्याने सुरू झाली ती धरणाच्या रुपाने धावून आलेल्या संकटातून. इतर गावांमध्ये जिथे बदलाचे वारे वाहू लागलेत त्या ठिकाणी ग्रामीण समाजाला ज्या ठिकाणी लाखो, करोडोंच्या बांधलेल्या इमारतीत अभिमान वाटतो, तेच दाभिळगावातल्या लोकांना अभिमान वाटतो सातबायचा, आकाची फाथर राईचा व तेथील समृद्ध वनसमृद्धीचा. तिलारी व तेरेखोल खोर्‍यात मी गेली तीन वर्षे काम करत आहे. यादरम्यान स्मूथ कोटेड otter प्रजाती अनेक वेळा दिसली. पण प्रामुख्याने निशाचर असणारी डारश्रश्र लश्ररुशव Small clawed otter या प्रजातीची तीन वर्षांत फक्त एकदाच समोरासमोर भेट झाली ती म्हणजे दाभिळला. पर्यावरणप्रेमींच्या भाषेत याला ‘लायफर’ म्हणतात. तो माझा ‘लायफर’ होता.

दुसर्‍या बाजूला शिरशिंगे नदीवरचे धरणाचे काम प्रशासकीय कारणांमुळे गेली वीस वर्षे रखडले आहे. पण प्रकल्पाला कोणताही संघटित विरोध या काळात झाला नाही. आज ना उद्या इथे धरण येणार हे गृहीत असल्याचे वातावरण लोकांसोबत बोलल्यानंतर दिसते. दोन्ही धरणांचं काम हे एकाच टप्प्यावरती थांबले किंवा रोखले गेले आहे. मुख्य प्रवाह अडवण्याचेच काम बाकी आहे. साधारण समाज धरण प्रकल्प येताना असा विचार करतो की, पाण्याखाली जाणार आहे तर जपून ठेवायचे कशाला? शिरशिंगे खोरे तुलनेने दाभिळ खोर्‍यापेक्षा खूप ओसाड दिसते. नदीही उन्हाळ्यात यामुळे पूर्ण आटून जाते. कसेबसेे पाणमंजर इथे तग धरून आहे; पण आहेत मात्र नक्की.

काळाच्या ओघाने आणि विकासाच्या धुंदीत आपण काय हरवतोय, हे आपल्याला कळत नाही. पर्यावरणीय नुकसान असे असते की परत भरून निघत नाही. तिलारी, कोयना, वशिष्ठी नद्यांना परत आपल्या मूळ रुपात आणणे आता अशक्य आहे. पण तेरेखोल नदी ही निरंतर वाहणार्‍या नदीचा एक किंवा आता एकमेव प्रोटोटाईप उरला आहे. काय नुकसान होऊन गेलंय, हे समजणेसुद्धा पर्यावरणीय बुद्धी विकसित झाल्याशिवाय कळणे अवघड असते. त्यामुळे खूप गंभीर गोष्टीचं गांभीर्य सगळ्यांनाच कळेल असे नाही. केरळसारख्या ठिकाणी फिरताना चहाचे मळे बघून तुमच्या कुटुंबीयांना ते आल्हाददायक वाटेल. पण थोडी पर्यावरणीय बुद्धी आली तर आपल्यासाठी तो मानसिक संताप होतो. असो. ऑन अ सॉफ्टर नोट, परिस्थितीतून बदललेले माणसांचे आणि समाजाचे दृष्टिकोन समजणे हे माझ्यासाठी संरक्षण कार्यक्रमात काम करताना महत्त्वाचे वाटते. हीच गोष्ट तुमच्यासोबत ‘शेअर’ करण्याचा हा एक प्रयत्न.

ओरिसातील नयागढ येथील धान्याचे जंगल -राधामोहन आणि साबरमती

या वर्षीच्या पद्मश्री सन्मानार्थींमध्ये ओडिशा राज्यातील नयागढ जिल्ह्यातील ओडागाव येथील राधामोहन आणि साबरमती या पिता-पुत्रीचा समावेश आहे. या ओडागावच्या जवळ खोलवरच्या नांगरटीमुळे जमिनीच्या वरच्या थराची पार वाट लागलेला निकृष्ट जमिनीचा तुकडा होता. ज्या शेतकर्‍यांची तेथे शेती होती, त्यांनी या जमिनीतून काही उपज होईल, याची आशा सोडली होती. अशा परिस्थितीत 30 वर्षांपूर्वी या पिता-पुत्रीने 70 एकर जमीन लिंगभाव आणि पर्यावरण संरक्षण यावर काम करणार्‍या आपल्या ‘संभव’ या संस्थेसाठी विकत घेत पूर्णत: निकालात काढलेल्या जमिनीचे रूपांतर धान्याच्या जंगलात करण्याचे आव्हान स्वीकारले.

आज तीन दशकाच्या अथक प्रयत्नांनंतर तांदळाचे 500 प्रकार, 40 विविध प्रकारची फळे आणि 100 प्रकारचा भाजीपाला या जमिनीवर पिकवला जातो. या उत्पादनांचे दस्तऐवजीकरण करणे आणि बियाणांचा साठा करण्याचे काम आता या उभयतांनी सुरू केले आहे.

80च्या दशकाच्या शेवटी जेव्हा राधामोहन यांनी आपल्या कामाला सुरुवात केली, तेव्हा पारंपरिक शेतीसंदर्भात धोरणकर्तेआणि अभ्यासक यांच्यात एक सर्वसाधारण अविश्वास होता. वाढत्या लोकसंख्येची गरज पारंपरिक शेती भागवू शकणार नाही, असा तो मतप्रवाह होता. राधामोहन हे ओडिशाचे पहिले माहिती आयुक्त असल्याने त्यांना धोरणकर्ते आणि नोकरशहांच्या मतांची चांगलीच कल्पना होती, तरीही त्यांनी आपल्या मनातील कल्पना राबविण्यासाठी जमिनीचा शोध सुरू केला. ओडिशा सरकारने त्यांना धेनकनाल जिल्ह्यातील ब्राह्मणी नदीकिनारी नैसर्गिक शेतीसाठी जमीन दिली. पण राधामोहन यांना सुपीक जमीन नको होती. कारण मग शेतकर्‍यांवर सुपीक जमिनीवर पारंपरिक पद्धतीने केलेल्या नैसर्गिक शेतीच्या प्रयोगाचा प्रभाव पडला नसता. त्यांना अशीच जमीन हवी होती, जी पूर्णत: ओसाड होती.

जमिनीची धूप नियंत्रित करण्यासठी प्रथम त्यांनी त्या जमिनीवर वाटाणे, चवळी, तुरीची लागवड केली, जी वेगाने जमिनीवर पसरते. कापलेल्या गवताचे थर जमिनीवर पसरवले. त्या खालील जमीन पांढर्‍या मुंग्यांनी भुसभुशीत करेपर्यंत वाट बघितली. भुसभुशीत जमिनीला हवा मिळू लागली, पाणी जमिनीत मुरू लागले. पक्ष्यांनी विखरून सपाट टाकलेल्या बिया रुजायला लागल्या आणि झाडे वाढू लागली. 1990-91 मध्ये पावसाची वृष्टी असाधारण झाली आणि त्यांनी आंब्याची झाडे लावणे सुरू केले, सपाट जमीन लिंबू, फणस, लिची, नारळ अशा बागायतीसाठी वापरात आणली गेली. अडीच एकर केवळ भातासाठी वापरात आणली गेली, आज ‘संभव’ भाताच्या 500 जाती पिकवत आहे. वरची जमीन जंगलवाढीसाठी अस्पर्श राखण्यात आली. जमिनीच्या इतर पट्ट्यावर बियाणे विखरून टाकण्यात आले. त्याचा चांगलाच फायदा झाला. संस्थेच्या विस्तारलेल्या 90 एकरांच्या आवारात आता 1000 प्रकारची झाडे वाढली आहेत. आपल्या यशस्वी करिअरवर पाणी सोडत वडिलांबरोबर सुरुवातीपासून काम करणार्‍या साबरमती सांगत होत्या, ‘ओसाड जमिनीचा वरचा थर पेरणीयोग्य बनविणे हे मोठेच आव्हान होते. आम्ही वाळलेल्या पानांचे आणि धान्याच्या कचर्‍याचे ढीग रचले आणि ते कुजू दिले. हळूहळू जमिनीचा वरचा थर पेरणीयोग्य होऊ लागला. मग बांबू आणि गवत लावत जमिनीचा वरचा थर झाकून टाकला आणि पाण्याचे साठे निर्माण केले गेले. झाडं काही एकाकी राहत नाहीत, त्यांच्या भोवतीने विविध किडे, पक्षी, प्राणी, जलचर प्राणी यांची नुसती रेलचेल उडाली.‘

साबरमतींनी आवारात लावण्यासाठी पारंपारिक जातीचे तांदूळ, पारंपारिक भाज्या आणि फळे यांची बियाणे मिळवणे चालू केले. यामुळे आज ‘संभव’ची 700 प्रकारच्या देशी बियाणांची बँक उभी राहिली आहे. ‘संभव’तर्फे ही बियाणे शेतकर्‍यांना मोफत दिली जातात; अट एकच त्यांनी त्या बियाणांचा प्रसार करीत त्यांना लोकप्रिय करायचे. यापैकी अनेक बियाणे रुक्ष आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी उपयोगी पडत आहेत. पण ‘संभव’ला बियाणांचे म्युझियम बनवायचे नाही. साबरमती सांगतात, ‘बियाणांना जीवन आहे, त्यांची नियमित पेरणी व्हावयास हवी.’

शेतीच्या उत्पादनाच्या विक्रीतून आणि देणग्यातून ‘संभव’साठी निधी जमा केला जातो. 1990 मध्ये जंगल वाचवण्यासाठी पदयात्रा काढणारे राधामोहन म्हणतात, ‘पर्जन्य छायेच्या प्रदेशात ‘ओअ‍ॅसिस’ निर्माण करणे, हा काही या प्रकल्पाचा हेतू नाही. खते आणि कीटकनाशके नसलेली नैसर्गिक शेती आश्चर्यकारक उत्पादन देऊ शकते. अर्थात त्यासाठी अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. राधामोहन म्हणतात, ‘वेगळ्या साठवणूक व्यवस्थेद्वारे नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच नैसर्गिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित व्हावे, यासाठी कृषिशिक्षणात बदल घडवून आणण्यासाठी आपल्य विज्ञानजगताने प्रयत्न करणे जरुरीचे आहे.

(आधारित : ‘द हिंदू’मधील सत्यासुंदर बारीक यांचा लेख)

प्लास्टिकपासून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे त्यावर बंदी घालणे क्रेग लिसन

क्रेग लिसन हे पर्यावरणीय विषयांवर माहितीपट निर्माण करणारे निर्माते आहेत. त्यांच्या ‘प्लास्टिक ओशन’ या माहितीपटास 15 व्या चित्रपट महोत्सवात पारितोषिके मिळाली आहेत आणि जगभरातील 70 देशांत तो प्रदर्शित केला गेला आहे. हा माहितीपट संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेच्या वेळेसही दाखवण्यात आला. माजी पत्रकार असलेल्या क्रेग लिसन यांच्या वृत्तांकनामुळे ऑस्ट्रेलियात पर्यावरण प्रदूषित करणार्‍या अनेक उद्योगांना चाप बसलेला आहे. नुकतेच (फेब्रुवारीमध्ये) ते भारतात आले असताना ‘द हिंदू’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा काही अंश आम्ही येथे देत आहोत.

आपण पर्यावरणीय प्रश्नांकडे कसे आकर्षित झालात?

मी लहानाचा मोठा झालो, ते टास्मानिया नावाच्या सुंदर बेटावर. त्यामुळे समुद्राशी मला अगदी जवळून निगडित होण्याची संधी मिळाली. पण त्या बेटाच्या ज्या बर्नी या शहरात मी राहत होतो, ते अतिशय प्रदूषित होते. पल्प पेपर मिल्स, रंगाचे कारखाने त्या शहरात होते आणि त्या कारखान्यांनी प्रक्रिया न करता समुद्रात सोडलेल्या दूषित पाण्यामुळे किनार्‍यावर पोहणार्‍या लोकांना कातडीच्या रोगांना सामोरे जावे लागे आणि ऑस्ट्रेलियातील सर्वांत जास्त कॅन्सर रुग्ण त्या भागातील होते. पत्रकार म्हणून मी याच्या कारणांचा शोध घेऊ लागलो, तेव्हा माझ्या या कारखान्यांच्या कारवाया लक्षात आल्या. मी त्यावर वृत्तांत तयार केले, त्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आणि त्या कारखान्यावर बंदी घालण्यात आली.

पण त्यामुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या असतील…. हो, सुरुवातीला हे घडले; पण प्रदूषण करणारे हे कारखाने गेले तरी हळूहळू तेथील पर्यटनाला चालना मिळाली; तसेच चीज बनविणारे कारखाने तेथे चालू झाले. एक नवीन अर्थकारण तेथे रुजू लागले.

समुद्र हा तुमच्या कुतुहलाचा विषय असताना प्लास्टिककडे तुमचे कसे लक्ष गेले?

माझ्या एका मित्राने समुद्रावरच्या प्लास्टिकच्या प्रश्नाकडे माझे लक्ष वेधले आणि प्रवास करताना निरीक्षण करण्याचा सल्ला दिला. मी माझ्या कामानिमित्त विविध किनारे, समुद्र, तलाव वगैरेवरून बराच प्रवास करायचो. प्लास्टिकचा वापर त्यावेळेपर्यंत बर्‍यापैकी पसरला होता. पण समस्या म्हणून त्याच्याकडे बघितले जात नव्हते. मलाही तसे वाटत नव्हते. ते इतके माझ्या जीवनाचा भाग बनले होते की, मला त्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. तसे तो प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनलेला असतोच, प्लास्टिकशिवाय राहणेच शक्य नाही…. आपण बनविलेल्या वस्तूंत प्लास्टिक ही सर्वांत टिकाऊ वस्तू आहे, ती नष्टच होत नाही. आपल्या अन्नसाखळीत प्लास्टिकने प्रवेश केलेला आहेच; प्लास्टिक बहुधा त्याच्या सर्व रसायनासह आपल्या शरीराचा भागच बनलेले आहे, जे जे प्लास्टिकने बनविले जाते, त्याचा शेवट एक तर समुद्रात फेकण्यात तरी होतो, नाही तर जमिनीत गाडण्यात. प्लास्टिकपासून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे, त्यावर बंदी घालणे.

प्लास्टिक बंदीचे आर्थिक परिणाम दिसत असताना अशा बंदीचा उपयोग होईल?

जगात रवांडाने सर्वप्रथम प्लास्टिक पिशव्यांवर जबर शिक्षेसहित बंदी घातली. त्यापाठोपाठ युरोप आणि आशियातील अनेक देशांनी बंदी घातली, महाराष्ट्रातही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. पण केवळ कायदा करून उपयोगी नाही; परिणामकारक अंमलबजावणीची गरज आहे. आर्थिक बाबींवर परिणाम होतीलच; नोकर्‍याही जातील. भारतासारख्या विकसनशील देशात हे प्रश्न उपस्थित होतीलच. पण नव्या आव्हानातून नव्या संधी उपलब्ध होऊन नव्या अर्थकारणाच्या दिशेने वाटचाल चालू होईल.

तुम्हाला माहितीपट काढावासा का वाटला?

आधी सांगितल्याप्रमाणे मित्राशी चर्चा झाल्यानंतर मी निरीक्षण करायला लागलो आणि मला सगळीकडे प्लास्टिक नजरेस पडायला लागले. त्यावेळेस मी व्हेल माशाच्या संदर्भात अभ्यास करत होतो. भर महासागरात मध्यभागी जेव्हा आम्ही बोटीतून जायचो, तेव्हा तिथेही प्लास्टिकच्या वस्तू आम्हाला तरंगताना दिसायच्या. बर्‍याच वेळेस आम्हाला मासे प्लास्टिकमध्ये गुंडाळून गेलेले किंवा त्या माशांनी प्लास्टिक खाल्लेले आढळून येत असे. आम्हाला दिसलेल्या प्लास्टिकच्या वस्तूत जाळ्या, खोकी, बाटल्या, बिस्कीटचे पुडे, प्लास्टिकची आवरणे होती. हे अनुभव जगापुढे मांडावेत व त्याद्वारे हा प्लास्टिकचा प्रश्न लोकांपुढे यावा, यासाठीच मी ‘प्लास्टिक ओशन्स’ हा माहितीपट बनवला. एखाद्याच्या व्यक्तिगत कल्पनेतून एखाद्या चळवळीचा, आंदोलनाचा आरंभ होतो, याची जाणीव मला त्या प्लास्टिकवरच्या माहितीपटाचे प्रदर्शन शाळाशाळांतून करायला लागल्यावर होऊ लागली. मग हा माहितीपट केवळ पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांपर्यंतच नव्हे, तर धोरण बनविणारे शासनकर्ते ते सर्वसामान्य जनता; विशेषत: शाळा-महाविद्यालयांतील तरुण, सामाजिक गट यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न केला. शाळातील विद्यार्थ्याकडून माझ्या माहितीपटाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. तेल कंपनीतील एक सीईओ मला एका परिषदेत भेटला. तो मला सांगत होता, त्याच्या मुलाने माझा माहितीपट शाळेत पाहिल्यावर ‘तुम्ही तेल कंपनीत का काम करता,’ असा प्रश्न केला. पर्यावरणाच्या प्रश्नावर तरुण पिढी योग्य आवाज कसा उठवू लागली आहे, याचे उत्तम उदाहरण ग्रेटा थनबर्गसारखी मुलगी आहे. शेवटी हीच पिढी पृथ्वीची वारसदार आहे आणि पुढे भविष्यात तिलाच या सार्‍या परिणामांना तोंड द्यायचे आहे आणि ही पिढी हुशार, चौकस आणि शिक्षित आहे, भविष्य त्यांच्याच हाती आहे. त्यामुळे नवी पिढी निश्चितच प्लास्टिकला पर्याय शोधून काढेल आणि त्यातून नवीन अर्थकारण उभारेल.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]