विजय खरात -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बेलापूर (नवी मुंबई) शाखा गेल्या सप्टेंबरपासून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाशी संबंधित दर महिन्याच्या 20 तारखेला सत्यशोधक व्याख्यानमाला ऑनलाईन आयोजित करते. आजवर या मालिकेत सप्टेंबर महिन्यापासून ‘प्रबोधन’कार ठाकरे (नरेंद्र लांजेवार, बुलढाणा), शाहीर अमरशेख (कॉ. सुबोध मोरे, मुंबई), आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा (डॉ. हणमंत भवरी, पुणे), गाडगेबाबा (डॉ. किसन वाघ, बुलढाणा), र. धों. कर्वे (डॉ. प्रदीप पाटील, सांगली) आणि नारायण मेघाजी लोखंडे (डॉ. छाया पवार, कोल्हापूर), महाराज सयाजीराव गायकवाड (डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर), महात्मा बसवण्णा (राजू जुबरे), वामनदादा कर्डक (प्रतिभा अहिरे, औरंगाबाद) यांच्या जीवनकार्यावरील व्याख्याने आयोजित केली गेली आहेत. जून महिन्याचे दहावे पुष्प धर्मानंद कोसंबी यांच्या जीवनकार्यावर रविवारी दि. 20 जून रोजी आयोजित केले होते. हे व्याख्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली भाषा विभाग, बुद्धिस्ट अभ्यास विभाग, डॉ. आंबेडकर विचार विभाग येथे प्राध्यापक व विभागप्रमुख; तसेच विद्यापीठाचे बुद्धिस्ट अभ्यास केंद्र व भारतीय भाषा विभागाचे संचालक डॉ. महेश देवकर, पुणे यांनी ‘बौद्ध तत्त्वचिंतक धर्मानंद कोसंबी : विचार आणि कार्य’ या विषयावर दिले.
आपल्या भाषणात डॉ. देवकर यांनी धर्मानंदांचे जीवन आणि कार्याचा आढावा चार टप्प्यांत घेतला. पहिल्या टप्प्यात आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा सुरुवातीचा जीवनप्रवास सांगितला, तर दुसर्या टप्प्यात त्यांनी बौद्ध धर्माबाबत केलेले कार्य, त्यांचे संशोधन, पाली ग्रंथ, त्यातील पारंपरिक मांडणीला त्यांनी दिलेलं आव्हान, त्यातील मिथकं, दु:ख, तृष्णा, वैयक्तिक – सामाजिक कलह, सम्यक वाणी, संघरचना व त्यातील लोकशाही तत्त्व याचे विवेचन करत धर्मानंद कोसंबी यांनी घेतलेल्या ‘ऐतिहासिक बुद्धाच्या शोधा’चे विवेचन केले.
तिसर्या टप्प्यात त्यांच्या समाजवादी, साम्यवादी विचारांच्या अनुषंगाने सामान्य मजूर व त्यांचे प्रश्न, रशियन राज्यक्रांतीचा आदर्श, समाजवादाचा पुरस्कार आणि भांडवलशाहीने समाजाचे अध:पतन होऊन गरीब सांप्रदायिकतेकडे व श्रीमंत चंगळवादाकडे कसा जातो, यांचे विवेचन केले आणि चौथ्या टप्प्यात धर्मानंदांच्या विचारातील भारतीय संस्कृती आणि अहिंसा, गांधीजींचा सत्याग्रह याबाबत विवेचन करत मानवाचा टोळी ते आधुनिक मानवाची सामूहिक तृष्णा असा प्रवास आणि त्यातील कंगोरे यांचा शोध घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेलापूर शाखेचे संजय उबाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, शाखेचे अध्यक्ष भास्कर पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रेखा देशपांडे यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. पालघरचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा कडलासकर यांच्या हिन्दी गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व शाखेचे सचिव विजय खरात यांनी समारोप केला.
–विजय खरात, बेलापूर