‘पप्पा, तुम्ही हे जग सुंदर करून गेलात!’

रुपाली आर्डे-कौरवार -

“पप्पा, तुम्ही दाखवलेल्या विवेकवादाच्या प्रकाशात मी माझ्या जीवनाची वाटचाल पुढे चालू ठेवणार आहे. तुमच्या वैचारिक वारसदारांसोबत मी देखील ‘अंनिस’ची एक कृतिशील कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहणार आहे. याआधी मी या विचारानेच जगत होते आणि जगते आहे; मात्र यापुढे मी चळवळीमध्ये कृतिशील राहणे, ही तुम्हाला खरी आदरांजली ठरेल. तुमच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणे शक्य नाही. तुमच्यापुढे मी म्हणजे सूर्यापुढे पणतीसारखे होईल; पण मी प्रयत्नशील राहीन.”

प्रिय पप्पा,

साधारण दोन आठवड्यांपूर्वी एक वादळ आपल्या आयुष्यात आलं आणि अगदी तीन-चार दिवसांच्या अवकाशात काही कळायच्या आत तुम्हाला आमच्यापासून हिरावून घेऊन गेलं. मन अजूनही सावरलेलं नाही आणि मानायला तयार नाही की, तुम्ही गेलाय, कायमचे. तुमची ‘एक्झिट’ इतकी अनपेक्षित आणि धक्कादायक! अशी ‘एक्झिट’ तुमच्या नाटकातल्या कोणत्याही पात्राने कधी घेतली होती का हो पप्पा? तुम्ही गेलात तेव्हा कदाचित तुम्हालाही कळले नसेल आणि आम्ही मात्र मागे राहिलो probility ची गणितं सोडवत. आपण काय करायला पाहिजे होते आणि काय नाही. तुमचं जाणं पार जिव्हारी लागलंय. अजून किती गोष्टी करायच्या बाकी होत्या? गेल्या पाच वर्षांत तुम्ही तीन पुस्तके लिहून प्रकाशित केलीत. अजून काही पुस्तकांचे प्लॅन्स आणि आयडियाज डोक्यात होत्या. तरुणांना लाजवेल असा तुमचा उत्साह होता. अगदी recently तुम्ही आपल्या घरी सजवून घेतलेली तुमची ही अभ्यासिका; जिथं तुमच्याच खुर्चीमध्ये बसून मी तुम्हाला हे पत्र लिहितेय. ही रूम आज खूप सुनी झाली आहे. या रूमचा उपयोग तुम्ही खूप थोड्या कालावधीसाठी करू शकलात. याचे ‘सेटअप’ करीत असताना तुमचा उत्साह जणू काय सांगत होता…! ” I am not done yet!” पण दुर्दैवाने तब्येतीची गणितं चुकली. प्रकृतीनं साथ दिली असती, तर तुम्ही अजून भरपूर काम केले असते, यात शंका नाही. ही रूम तुमच्या कामाची साक्षीदार आहे. जे काही अमूल्य आणि अपूर्व असं लिखाण तुम्ही इथं बसून केलं आहे त्याची. ही अभ्यासिका मी कायम अशीच राखणार आहे.

तीन-चार दिवसांच्या आजारपणात काहीसे खचला होतात; परंतु मनोबल कणखर राखले होते. ‘मी बरा होणार,’ असेही बोलून दाखवले होते, तरीही मनाची तयारी करत तुमच्या देहदानाच्या संकल्पाची आठवण करून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही तुमचा देह भारती मेडिकल कॉलेजला दिला. वयाच्या पन्नाशीपासून बी. पी.ची व्याधी असताना, ‘ज्या मेडिकल सायन्सनं मला हे आयुष्य दिलं, त्यासाठी मी माझा देह देणार, पुढच्या पिढीच्या उन्नतीसाठी ते आवश्यक आहे,’ असं म्हणायचा. आज जरी तुम्ही रुढार्थाने आमच्यात नाही आहात, तरी तुमच्या कामातून, पुस्तकांतून, भाषणांतून आणि तुम्ही घडवलेल्या माणसांतून (ज्यातील मी पण एक आहे), तुम्ही सदैव आमच्या सोबत असाल.

तुमच्या जाण्यानंतर माझं मन आपल्या आठवणींनी पार ढवळून निघालं आहे. सातार्‍यात गेलेलं माझं बालपण तुमच्या सोबतच्या आठवणींनी भरलेलं आहे. सातारा शहरात तेव्हा एकही बाग शिल्लक नसेल, जिथं तुम्ही मला नेलेलं नाही. पोवई नाक्यापासून राजवाड्यापर्यंत मी तुमचं बोट धरून चालत जायचे. तिथल्या बागेमध्ये मनसोक्त खेळल्यानंतर मग आपण बसने परत यायचो आणि मग माझे बक्षीस असायचे, नाक्यावरच्याच बेकरीमधून घेतलेला मावा केक. माझी कितीतरी छोटी-मोठी आजारपणं झाली असतील. पण कावीळ आणि कांजिण्याच्या वेळेस तुम्ही माझी केवढी काळजी घेतली होती, ते अगदी स्पष्ट आठवतेय. तुम्ही, मी आणि मागे दादा असे कितीतरी वेळा सायकलवर बसलेलो आठवतेय. नंतर मग तुम्ही स्कूटर घेतलीत, तेव्हा दादाच्या जागी आईपण यायला लागली.

वाय. सी. कॉलेजमध्ये तुम्ही बसवलेली नाटके पाहणे म्हणजे एक पर्वणीच असायची! तुमच्या नाटकांच्या तालमींना मी यायचे. एका नाटकात तुम्ही मला छोटासा रोलपण दिला होता, फोनवर बोलण्याचा. मला ते खूप आवडायचे. तुमची नाटकाची आवड आणि कलागुण नंतर तुमच्या खूप गोष्टींमधून दिसून येतात. भास्कर सदाकळेंसोबत केलेले प्रयोग आणि अलिकडचे तुमचे ‘हसत- खेळत विज्ञान’चे प्रयोग असोे; ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ या पुस्तकात देखील संवादपर लेखन करून तुम्ही त्याला नाट्यरूप दिले होते.

सातार्‍यात असताना धाकट्या काकांचे मनाचे दुखणे, ‘छात्रभारती’शी आलेला संबंध, त्यातील सहभाग, यातून तुमचे मनपरिवर्तन सुरू झाले होते. तिथेच तुमचा दाभोलकरांशी परिचय झाला आणि लवकरच तो गहिरा झाला होता. तुमचा ‘अंनिस’च्या विचारधारेकडचा प्रवास सुरू झाला, ज्याचे रूपांतर लवकरच व्याख्याने, शिबिरे यामध्ये होत गेले. तुमची सातार्‍याच्या ‘मुक्तांगण’मध्ये होणारी व्याख्याने मला फार आवडायची; त्यातही भुताटकी आणि अब्राहम कोवूरांवरची भाषणे. त्यातून तुमचे ‘स्टोरीटेलिंग’चे कौशल्य दिसून यायचे. त्याचदरम्यान दाभोलकरांनी ‘महाराष्ट्र अंनिस’चा स्वतंत्र गट स्थापन केला आणि तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहिलात. तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्ही दाभोलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत निष्ठेने राहिलात. ‘महाराष्ट्र अंनिस’चे संस्थापक सदस्य ते ‘अंनिस’ वार्तापत्राचे सल्लागार-संपादक असा तुमचा ३५ वर्षांचा ‘अंनिस’ चळवळीचा प्रवास सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.

सातार्‍यात आपण पोवई नाक्यावर भाड्याने राहत होतो. त्या घराचे मालक मुस्लिम होते. ती जागा अत्यंत मोक्याची अशी होती, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव होता. १९८७ च्या एप्रिल महिन्यात एके दिवशी रात्री अकरा वाजता हारुणभाई नाक्यावर उभे असताना काही समाजकंटकांनी त्यांना चाकूने तीन ठिकाणी भोसकले आणि तिथेच सोडून दिले. आजूबाजूचे लोक आणि दुकानदार देखील पटापट तिथून पळून गेले. एक-दोन जणांनी येऊन आपल्याला ही घटना सांगितली आणि त्याच क्षणी कशाचीही पर्वा न करता तुम्ही पळत गेलात, रिक्षा शोधली आणि त्या वेळेपर्यंत शुद्धीत असलेल्या भाईंना रिक्षात घालून सिव्हिलला घेऊन गेलात. विशेष म्हणजे आम्हा दोघा भावंडांना घरी मागे सोडून आईसुद्धा तुमच्या सोबत गेली होती. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे भाईंना तुम्ही वाचवू शकला नाहीत; पण पप्पा, तुम्ही त्या वेळेस माझ्यासाठी एखाद्या हिंदी सिनेमाच्या हिरोसारखे भासला होतात. आईची सोबत तुम्हाला अशीच कायम राहिली आहे. त्यानंतर वर्षभर आपण त्याच घरी राहिलो आणि त्या घरमालकांच्या कुटुंबाला सहकार्य करत राहिलो.

१९८८ मध्ये तुमची विट्याला बदली झाली. सातार्‍यातून विट्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही नाखूष होतो. पण तुम्ही जरादेखील ढळला नाहीत. ‘संस्थेने बदलीची ऑर्डर काढलीये, मला गेलं पाहिजे,’ ही भूमिका पक्की होती. विट्याला आल्यावरही तुम्ही चळवळीचे काम सुरू ठेवलेत. त्याचवेळेस तुमचे ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकाचे काम सुरू होते. पुस्तक प्रकाशित झाल्या-झाल्याच त्याला शासनाचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार तुम्ही घेऊन आलात, तेव्हा घरी आजी होती. तिच्याकडे तो पुरस्कार देऊन नतमस्तक झालात. आजीने तुमची माया केली आणि सांगितले की, ‘आता मला एक साडी द्या. ती साडी लावून मी आनंदाची गुढी उभारते.’ तुमचे वडील खूप लहानपणी वारले होते. त्यानंतर मोठ्या कष्टाने तिने तुम्हाला वाढवले होते. तिच्या कष्टांचे पांग तुम्ही फेडले होते, हीच तिची त्या वेळची भावना होती.

आजीसोबत बोलताना तुमचा लहानपणापासूनचा शिक्षणाचा प्रवास कसा झाला, ते कळायचे. चोपडी गावचे तुम्ही पहिले मॅट्रिक पास विद्यार्थी होतात. तालुक्यात पहिले आला होतात. आजी दररोज तुम्हाला जेवण देण्यासाठी चालत कोयना नदी पार करून पाटणला यायची. त्या वेळेस हुशार विद्यार्थी म्हणून कित्येक लोकांनी तुमची मदत केली होती. त्यांचे कायम तुम्ही ऋणी राहिलात. उच्च शिक्षण घेताना एक-एक वर्ष ‘ब्रेक’ घेत तुम्ही धाकट्या काकांना पण बी. एस्सी. बी. एड. पर्यंत शिकवलंत आणि तुम्ही एम. एस्सी. केलंत; तेही फिजिक्ससारख्या कठीण विषयात. काकांनीही तुम्हाला नोकरी करून सपोर्ट केला होता. तुम्ही कोयना धरण प्रकल्पावर भूकंप मापन केंद्रामध्ये एक वर्ष नोकरी केलीत, पाटणच्या शाळेमध्ये शिकवलंत, कराडच्या वाय. सी. कॉलेजमध्ये बी. एस्सी.साठी आलात, तेव्हा रूम मिळेपर्यंत शिवाजी हायस्कूलच्या वर्गामध्ये रात्रीचा मुक्काम केलात. हे सारे मला थक्क करून जाते. तुम्ही मला सांगितले होते की, जेव्हा तुम्हाला रयत शिक्षण संस्थेचे नियुक्तीपत्र द्यायला पोस्टमन आला होता, त्या वेळेस तुम्ही शेणखताची गाडी भरत होतात.

एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून तुमची मातीशी जवळीक कायम तशीच राहिली. तुम्ही शिक्षक, वाचक आणि कालांतराने लेखक झालात; मात्र तुमचा शेतकर्‍याचा पिंड शेवटपर्यंत तसाच राहिला. वयाच्या ७६ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल, असे काम करून दाखवलेत. विकत घेतलेल्या शेतीमध्ये चक्क शेततळं मंजूर करून घेतलंत. त्यासाठी किती कागदपत्रे आणि सरकारी ऑफीसमध्ये किती खेटे मारलेत, तुम्हालाच माहीत; परंतु तुम्हे शेततळे बनवून दाखवलेत. पुढे जाऊन त्या शेतीमध्ये काही पिकवण्याचा प्रयत्न काही वेगळ्या कारणांमुळे सोडून द्यावा लागला; पण तरीही तुम्ही केलेल्या डेव्हलपमेंटमुळे त्या शेतजमिनीचे चांगले फायदे तुम्हाला आणि इतरांनाही मिळाले.

३३ वर्षांच्या प्राध्यापकाच्या कारकिर्दीत तुमच्यासाठी ‘प्रमोट’ होणे सहज शक्य होते. रिटायरमेंटनंतर संस्थेमध्ये कोणत्याही पदावर जाऊ शकला असता; पण हितसंबंध जपणे आणि त्याचा वेगळ्या रीतीने फायदा करून घेणे तुमच्या तत्त्वातच नव्हते. तुम्ही ते जाणूनबुजून टाळलात. त्यापेक्षा प्राध्यापकाची नोकरी इमानाने करत चळवळीचे काम करत राहिलात आणि सामाजिक बांधिलकी जपलीत. प्रशासनापेक्षा शिकवण्यात जास्त रमलात.

सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचे कुटुंबाकडे हमखास दुर्लक्ष होते. तुम्ही मात्र याला अपवाद होतात. तुम्ही कुटुंबासाठी अर्थार्जन केलंत, आम्हाला भरपूर आणि योग्य वेळ दिलात, आमची शिक्षणं केलीत; फक्त आम्हा भावंडांचेच नाही, तर तुमच्या भावंडांच्या मुलांच्याही शिक्षणाची जबाबदारी निभावलीत. काकांच्या प्रती तुम्हाला जिव्हाळा होता, तेव्हा त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांची वाताहत होऊ नये, याकडे विशेष लक्ष दिलेत. आमची लग्ने लावून दिलीत. माझे आंतरजातीय लग्न; जे मी माझ्या इच्छेनं जमवलं होते, त्याला हसत-हसत मान्यता दिलीत आणि समाजाला एक संदेशही दिलात. नातवंडांमध्ये खूप रमलात. त्यांच्यातून जणू काही तुम्ही आमचे बालपण पुन्हा एकदा जगला होतात. विट्याला असताना एका गायन स्पर्धेसाठी बेळगावला जाण्याचा मी हट्ट धरून बसले होते. तो माझा बालहट्ट तुम्ही पुरवलात आणि स्वत: तिथं घेऊन गेलात आणि मला तिथं प्रथम पारितोषिक मिळालं, तेव्हा तुमचा आनंद गगनात मावला नव्हता. नंतर कराडला बदली झाल्यावरदेखील माझ्या संगीताच्या आवडीसाठी भरपूर प्रोत्साहन दिलेत. तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी बी.एस्सी. (फिजिक्स) डिस्टिंक्शनमध्ये पास झाले. त्यानंतरच्या माझ्या एम.सी.ए. प्रवेशाची गंमतच झाली होती. प्रत्येक कॉलेजेसच्या एंटरन्सच्या तारखांचा मेळ बसत नव्हता. मला ‘सायबर कोल्हापूर’ या खाजगी कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला होता. तिथे स्टाफ आणि फॅसिलिटीज चांगल्या होत्या; मात्र वार्षिक २० हजार रुपये फी होती. चांगले शिक्षण असल्याने माझा ओढा याच कॉलेजकडे होता. पण इकडे, कराडचे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज अगदी घराशेजारी होते. त्यामुळे आईचा आग्रह होता की, मी तिथेच अ‍ॅडमिशनसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कराड कॉलेजची एंटरन्स परीक्षा शेवटी होती. त्यामुळे ‘सायबर’ला अ‍ॅडमिशन घेऊन ठेवले होते. त्या वेळेस पप्पा तुम्ही मला हळूच ‘एंटरन्स’मध्ये काहीच लिहू नकोस, असे चक्क सुचवले होते. ‘एंटरन्स’मध्ये नापास झालीस, तर इथे अ‍ॅडमिशन मिळणार नाही आणि मग कोल्हापूरला जाण्यासाठी आईला मनवणे सोपे होईल; परंतु मी तसे केले नाही. मला गव्हर्मेंट कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाले आणि आईच्या मनासारखे झाले. मला तुमच्या सोबत तीन वर्षे राहून शिक्षण करता आले आणि तुमचे ६० हजार रुपये वाचवल्याचे समाधानही मिळाले.

माझ्या सॉफ्टवेअर प्रोफेशनमुळे आणि अमेरिकास्थित नवरा मिळाल्यामुळे मी अमेरिकेला गेले आणि तिथे १७ वर्षे वास्तव्य केले. या काळात मी तिथे नोकरी केली, ज्याचे तुम्हाला खूप कौतुक असायचे. तिथे आम्हाला छान दोन मुली झाल्या. दोघींच्या जन्माच्या वेळेस तुम्ही माझी काळजी घ्यायला आलात आणि अगदी तेव्हापासूनच नातींबरोबरचे आजोबाचे एक प्रेमळ नाते निर्माण केलेत. त्यांच्यासाठी काय-काय नाही केलंत? त्यांना अंगाई गात झोपी घालणे, खाऊ घालणे, बाबागाडीतून फिरवून आणणे, गोष्टी सांगणे, त्यांच्यासोबत खेळणे, बागेत फिरवून आणणे. माझ्या नवर्‍याच्या हौशी स्वभावाचा पुरेपूर उपयोग करत आपण विविध स्थळांना भेटी दिल्या. नायगरा धबधब्याचे अजस्त्र रूप पाहून थक्क झालात. तिथल्या ‘सेंटर फॉर इन्क्वायररी’च्या बफेलोस्थित ऑफिसला भेट देताना एखाद्या लहान मुलासारखे आनंदला होतात.

तिथल्या अमेरिकन स्टाफसोबत आणि पॉल कूर्त्झ या त्यांच्या डायरेक्टरसोबत सहजपणे संवाद साधलात. आपण तिथे पूर्वकल्पना न देता गेला होता; पण तुम्ही त्यांच्यावर असा प्रभाव पाडलात की, त्यांनी तुम्हाला चक्क लंचला नेलं आणि भरपूर गप्पा मारल्या. याला कारण होतं तुमचं सफाईदार इंग्लिश. तुमचे इंग्लिश भाषेवरचे प्रभुत्व वादातीत होते. आम्ही आमच्या इंग्लिशचे खापर कित्येकदा तालुक्याच्या शाळेवर आणि मराठी माध्यमांवर फोडतो; मात्र चोपडीसारख्या खेड्यातून १९६० च्या दशकात शिक्षण घेऊनसुद्धा पुढे जाऊन तुम्ही स्वकष्टाने इंग्लिश भाषेवर जे प्रभुत्व मिळवले होते, त्यातून तुमचे पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांचे अफाट वाचन असायचे. त्यामुळेच तुम्ही पाश्चात्य लोकांशी संवाद साधू शकत होता. नायगरा येथे निकोलस टेस्ला या शास्त्रज्ञाचा मोठा पुतळा आहे, ज्याने एडिसनच्याही आधी इलेक्ट्रिसिटीच्या शोधाचे मोठे काम केले होते; मात्र एडिसनच्या ‘बिझनेस’मधील हुशारीमुळे तो त्या वेळेस काहीसा दुर्लक्षित राहिला होता. एका शास्त्रज्ञाचा पुतळा पाहून भारावून गेला होता. ‘आपल्या भारतात फक्त नेत्यांचे आणि राजकारण्यांचेच पुतळे बनतात. हा टेस्लाचा पुतळा म्हणजे अमेरिकेच्या प्रगतीचे आणि विज्ञाननिष्ठेचे द्योतक आहे,’ असे म्हणाला होता. वॉशिंग्टन डी. सी.च्या डाळींहीेपळरप र्चीीर्शीा मध्ये हरवून गेला होतात. तिथल्या अमेरिकेच्या चांद्रमोहिमेच्या प्रदर्शनाकडे पाहताना आणि माहिती घेतानाच कुठेतरी तुमच्या मनामध्ये ‘वेध विश्वाचा-मानवी शौर्याचा’ या तुमच्या पुस्तकाची कल्पना रुजत होती.

२०१८ च्या ट्रीपमध्ये आपण खूप छान वेळ घालवला. मुलींच्या सोबत कॅरम खेळणे, त्यांना ‘छब्बू’ नावाचा पत्त्यांचा गेम शिकवणे, त्यांना स्वीमिंग पूलला घेऊन जाणे, या सगळ्यांचा आनंद घेतलात. पोहणे म्हणजे तुमच्यासाठी पर्वणीच! तिथल्या एका धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आपण पोहण्याचा आणि ज्ञरूरज्ञळपस चा आनंद मनसोक्त आनंद लुटला होता. ज्ञरूरज्ञळपस तुमच्यासाठी ार्रीींशश्रर्श्रेीी शुशिीळशपलश होता. आईसोबत ज्ञूरज्ञळपस मध्ये जाताना तुमची जोडी खूप छान दिसत होती. आई पाण्यात पडेल म्हणून तिची किती काळजी घेत होतात! नंतर एक मज्जा झाली होती. तिथल्या एका उंच कड्यावरून काही अमेरिकन लोक पाण्यात धपाधप उड्या मारत होते आणि एन्जॉय करत होते. ते पाहून शक्तीने तशीच मारण्याचा हट्ट धरला. ती तेव्हा फक्त दहा वर्षांची होती. आम्ही दोघे तिला परावृत्त करत होतो; पण तुम्ही मात्र तिची बाजू घेतली. आम्हाला विश्वास देऊन पाण्यात पोहत जाऊन थांबलात आणि तिला उडी मारायला सांगितले. तिने उडी मारली आणि मग तुम्ही दोघेही सुरक्षित कडेला पोहून आलात. किती सहजगत्या तुम्ही तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केलात आणि तिला प्रोटेक्टही केलेत. तुम्ही पट्टीचे पोहणारे ८० वर्षांचे तरुण आणि आम्ही कमरेइतक्या पाण्यात डुंबून समाधान मानणारे मध्यमवयीन, असा गमतीशीर नजारा होता.

स्वस्थ बसणे तुम्हाला कधी ठाऊकच नव्हते. एक दिवस नवीन असतानाच कॉलनीमध्ये फिरायला गेलात. बराच वेळ फिरल्यावर तुम्हाला घर सापडेना. सगळी घरे सारखीच दिसत होती आणि जवळ फोनही नव्हता. घराचा नंबरही विसरलात. मग काय, थोडेसे भांबावून गेलात. तिथेच आपापल्या कुत्र्यांना घेऊन फिरायला आलेल्या तीन-चार अमेरिकन आज्या तुम्हाला भेटल्या. त्यांना तुम्ही मदत मागितली. त्या माझ्या ओळखीच्या होत्या; मात्र फक्त चेहर्‍याने, नावाने नाही. त्यामुळे त्यांनाही कळेना. पण त्यांनी तुमची मदत करणे सोडले नाही. त्याही तुमचे घर शोधत जवळजवळ अर्धा तास फिरत होत्या. नंतर बोलता-बोलता जान्हवी, शक्ती आणि लिओचा उल्लेख केलात, तेव्हा मग त्यांना लिंक लागली आणि त्यांनी तुम्हाला घरी आणून सोडले. त्या दिवसानंतर तुम्ही कधी हरवला नाहीत. मात्र त्या तीन-चार जणी आणि तुम्ही घर शोधताना कसे दिसला असाल, असे ‘इमॅजिन’ केलं की, हसायला यायचं; पण नंतरचे तीन महिने ‘त्या’ चौघींशी चांगली मैत्री झाली होती.

तिथल्या माझ्या भारतीय मित्रमैत्रिणींमध्ये देखील स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीत. एक-दोन भेटींमध्येच तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडलीत. मुलींच्या शाळांना भेट देताना तिथल्या फॅसिलिटीज पाहून भारावून गेलात. माझ्या मुलींना मराठी बोलता येते; मात्र लिहिता-वाचता येत नाही. ते मनावर घेऊन दोन महिने त्यांना मराठी शिकवायची जबाबदारी घेतलीत आणि खरोखर कृतीत आणलीत. मुळाक्षरे शिकवताना त्याचे गाणे रचून त्याला इंटरेस्टिंग बनवण्याची कल्पना केवळ तुम्हालाच सुचू शकते. तुमचे वाचन तिथेपण अखंडपणे सुरू असायचे. ‘अमेरिका म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे,’ असे म्हणायचा. ‘अ‍ॅमेझॉन’ किंवा ‘हाफ प्राईस बुक्स’ अशा वेबसाईट्सवरून आपण असंख्य पुस्तके मागविली. प्रयोगाची कित्येक साधनेही विकत घेतली. ते सारे हातात आल्यावर तुमचा आनंद गगनात मावेनासा होई. तुम्ही वाचत असताना आजूबाजूला कितीही गडबड-गोंधळ असला, तरीही तुम्ही विचलित व्हायचा नाहीत, याचे मला कायम आश्चर्य वाटायचे. ती पुस्तकेही गहन विषयाची असायची. कसे जमायचे तुम्हाला, हे एक कोडेच आहे माझ्यासाठी. तिथून परत येताना बॅगेमध्ये फक्त चार कपडे आणि बाकी सारी जागा पुस्तके आणि प्रयोग साधनांसाठी असायची. ‘ते’ चार महिने तुम्ही जितकं ‘एन्जॉय’ केलेत, त्याच्या कितीतरी पट अधिक समाधान आणि आनंद मला तुमच्या सहवासाने मिळाला होता.

आपली ‘शॉर्ट, बट स्वीट’ अशी कॅलिफोर्निया ट्रीप अजूनही आठवते. ॠीळषषळींह जलीर्शीींरीेीूं मधले एुहळलळीीं बघून हरवून गेलात. तिथल्या आयडियाज वापरून आपण काय प्रयोग करू शकतो, याचा विचार सतत सुरू असायचा. आइनस्टाइनच्या पुतळ्यासोबत फोटो काढताना मज्जा आली होती. २००६ च्या ट्रीपमध्ये न्यू यॉर्कला असल्यामुळे आपण ‘अटलांटिक’ महासागर पाहिला होता. यावेळेस माझी अशी इच्छा होती की, तुम्ही ‘पॅसिफिक’ही पाहावा. तिथल्या ‘मालिबु’च्या समुद्रकिनारी गेलो, तेव्हा आपल्या दोघांच्याही मनात कुसुमाग्रजांच्या याच ओळी उमटल्या होत्या…

“अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा…

किनारा तुला पामराला”

पप्पा, तुम्ही वार्तापत्राची जबाबदारी ३३ वर्षे मन लावून निभावलीत. पहिल्यांदा उपसंपादक, मग मुख्य संपादक आणि शेवटी सल्लागार-संपादक. तुमचा वाचक आणि लेखकाचा पिंड होताच; शिवाय हे तुमच्या आवडीचे काम होते. तसं म्हटलं, तर तुमची प्राध्यापकाची नोकरी देखील ३३ वर्षांचीच होती; १९६८ ते २००१ अशी. त्या नोकरीतून रिटायर झाल्यावर २२ वर्षे तुम्ही या कामात घालवलीत. सतत ‘अ‍ॅक्टिव्ह’ आणि ‘बिझी’ राहिल्याने तब्येत छान राहिली. दरम्यान, आपल्या कुटुंबावरती कितीतरी संकटे आली, त्यावर धैर्याने मात केली. चळवळीने दिलेली ‘विज्ञान, निर्भयता आणि नीती’ ही त्रिसूत्री आमच्याही अंगी बाणवली आणि आम्हालाही ते धैर्य दिलेत. स्वत: विवेकवादाच्या वाटेवर चालत आम्हाला देखील योग्य मार्ग दाखविलात.

रिटायरमेंटनंतर सांगलीला येऊन स्थायिक झालात, ते फक्त आणि फक्त वार्तापत्राच्या कामाच्या ओढीने. रुढार्थाने लोक आपल्या गावी जाऊन स्थायिक होतात. तुम्ही सातारा जिल्हा सोडलात, हे गावच्या लोकांना रुचले नाही. जाणे-येणे जास्त राहिले नाही, त्यामुळे थोडाफार दुरावा निर्माण झाला होता. आईच्या माहेराजवळ येऊन राहिलात, अशीही काहींची धारणा होती; परंतु तो ग्रह मी या लिखाणाच्या निमित्ताने दूर करू इच्छिते की, वार्तापत्राचे काम हेच एकमेव कारण होते. तुमच्यासाठी ते ‘संजीवनी’ समान होते, ज्याने तुम्हाला ‘चिरतरुण’ राखले होते. या दुराव्यातही तुम्ही कुटुंबासाठी बरेच काही केलेत. फक्त आपल्या चौकोनी कुटुंबाची काळजी न वाहता, आपल्या भावांच्या कुटुंबासाठी बरेच काही केलेत. अगदी पहिल्यापासून तुम्ही घरातल्या कर्त्या माणसाची धुरा वाहिलीत. सर्वांचे पालनकर्ते झालात. तुमच्या भाचीने सांगितलेली आठवण आहे… १९७० च्या सुमारास जेव्हा ती गावाकडे दहावी शिकत होती, तिनं तुम्हाला पत्र लिहिलं की, तिच्याकडे पुस्तके घ्यायला पैसे नाहीत. तेव्हा तुम्ही तिला तडकपणे २० रुपयांची मनिऑर्डर केली होती. ती ही आठवण अजूनही विसरू शकलेली नाही; पण त्याच बाळीताईने मी मुंबईत नोकरीसाठी नवीन असताना मला मदतीचा हात दिला. ही सर्व तुमचीच पुण्याई. पहिल्यापासूनच आईच्या नातलगांशीही जिव्हाळ्याचे संबंध राखलेत. त्यांनाही वेळोवेळी मदतीचा हात दिला.

डॉ. दाभोलकरांसोबत लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकानंतर तुम्ही स्वत:ची बरीच पुस्तके लिहिलीत. तुमचे ‘फसवे विज्ञान’ हे पुस्तक २०२० मध्ये प्रसिद्ध झाले. त्यातले तुमचे लिखाण खूप अभ्यासपूर्ण होते. आजकालच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या काळात छद्मविज्ञानाने धुमाकूळ माजवलेला असताना अशा एका मार्गदर्शक पुस्तकाची खरी गरज होती, जी तुम्ही पूर्ण केलीत. या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळेल, असा तुमचा कयास होता; पण तसे झाले नाही. तुमच्या लेखनाची दखल घेतली गेली नाही, याची तुम्हाला खंत होती आणि ती मला जाणवली होती; तुम्ही न बोलता देखील. ‘तरुणाईसाठी दाभोलकर’ हे पुस्तक लिहिताना ‘स्वांत सुखाय’ अशी भावना होती. प्रिय मित्राच्या प्रती केलेलं एक अभिवादन होतं. आताच्या तरुण पिढीला खरे दाभोलकर समजावेत, हाच उद्देश होता. गेल्या वर्षीपासून तुम्ही ज्याच्यासाठी झपाट्याने कामाला लागला होतात, ते तुमचे पुस्तक ‘लढे विवेकवादाचे’ म्हणजे तुमच्या लेखनप्रवासाचा सर्वोच्च बिंदू आहे. केवढे अफाट वाचन तुम्ही या पुस्तकासाठी केले असेल! या पुस्तकासाठी तुम्ही असे झपाटून गेला होतात की, माझ्याकडे पुण्याला चार दिवस येऊन राहणेही तुम्हाला शक्य नाही झाले. या पुस्तकातून तुम्ही वाचकांचे ‘दीपस्तंभ’ बनला आहात आणि त्यांच्यापर्यंत जगभरातील विवेकवाद्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा प्रकाश पोचवला आहात. आता प्रत्येकाच्या हातात आहे, आपण त्यातून किती ग्रहण करायचे.

पप्पा, तुमची प्रतिभा आणि ज्ञान वादातीत होते, ज्याचा मला खूप अभिमान आहे; पण मला सर्वांत जास्त भावायचा तो तुमचा साधेपणा आणि कुणाशीही अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सहज ‘कनेक्ट’ व्हायची तुमची अंगची कला. तुम्ही कधीही कोणत्याही गोष्टीचा बडेजाव मिरवला नाहीत. कायम साधेपणा अंगीकारला. तुमच्या विचारधारेशी सुसंगत असणार्‍या विचारवंतांच्या बैठकीत ऊठबस असतानाच, तुम्ही सभोवताली असणार्‍या प्रत्येकाशी सौजन्याने वागायचा; मग तो पत्ता विचारणारा कोणी वाटसरू का असेना. तुमचे कितीतरी विद्यार्थी तुमच्याशी ‘काँटॅक्ट’ ठेवून होते.

आम्हा दोघा भावंडाखेरीज अशा कितीतरी जणांना तुम्ही वडिलांचे प्रेम दिलेत आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलेत. तुमच्या जाण्यानंतर अशा कित्येक जणांनी आमच्यापाशी आपलेच वडील गेल्याची भावना व्यक्त केलीय. चळवळीतले तुमचे तरुण सहकारी तुमचे वैचारिक वारसदार आहेत आणि ते तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत राहतील, यात शंका नाही. तुमचे मित्र तर अगणित आहेत आणि ते फक्त चळवळीशीच निगडित आहेत, असे नाही. ते विभिन्न विचारसरणींचे आहेत आणि समाजाच्या विविध क्षेत्रांतले आहेत. तुम्ही आणि आईने या सर्वांशी जोडलेले प्रेमाचे आणि सौख्याचे संबंध कायम आहेत आणि राहतील. या सर्वांनी आमची या दु:खाच्या प्रसंगी साथ दिली आहे. त्यांचा हात आमच्या पाठीवर आहे. किती जण भेटून गेले, कित्येकांचे फोन आले. पप्पा, तुम्ही आमच्यासोबत नाही आहात, याचे दु:ख मोजता येणार नाही. मात्र या सर्वांनी सांगितलेल्या तुमच्या आठवणी आणि त्यांचे तुमच्याप्रती असलेले प्रेम माझ्यासाठी बहुमोल आहे. त्यांनी माझ्या दु:खावर फुंकर घातली आहे.

पप्पा, तुम्ही दाखवलेल्या विवेकवादाच्या प्रकाशात मी माझ्या जीवनाची वाटचाल पुढे चालू ठेवणार आहे. तुमच्या वैचारिक वारसदारांसोबत मी देखील ‘अंनिस’ची एक कृतिशील कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहणार आहे. याआधी मी या विचारानेच जगत होते आणि जगते आहे; मात्र यापुढे मी चळवळीमध्ये कृतिशील राहणे, ही तुम्हाला खरी आदरांजली ठरेल. तुमच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून निघणे शक्य नाही. तुमच्यापुढे मी म्हणजे सूर्यापुढे पणतीसारखे होईल; पण मी प्रयत्नशील राहीन.

पप्पा, तुम्ही मला दाखवून दिलंय की, आपले जगणे होते, आपण काय मिळवतो त्यातून… मात्र आपले आयुष्य घडते ते आपण जगाला काय देतो त्यावरून! तुम्ही तुमचे आयुष्य भरभरून जगलात, कुटुंबाचे पांग फेडलेत, समाजाचे देणे देऊन गेलात… पु. ल. देशपांडेंच्या उक्तीनुसार.. पप्पा, तुम्ही हे जग सुंदर करून गेलात!”

तुमची

रुपाली

संपर्क:७६६६७४५४४६


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]