रुपाली आर्डे-कौरवार -

भारताच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासात तमीळनाडूतील ‘द्रविड कळघम’ चळवळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. केवळ तमीळी जनतेतच नव्हे, तर संपूर्ण भारतात पेरियार (आदरणीय वडील) म्हणून गौरवले गेलेले ई. व्ही. रामासामी यांनी या चळवळीचे प्रभावी नेतृत्व केले. जाती आणि वर्ण व्यवस्थेतून समाजात आलेल्या भेदभाव आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी, तसेच स्त्री–पुरुषांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी १९२५ मध्ये पेरियार यांनी ‘सेल्फ रिस्पेक्ट’ चळवळ सुरु केली, जी आता शंभराव्या वर्षात पदार्पण करतेय.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मचिकित्सा हे देखील पहिल्यापासूनच द्रविड कळघमचे महत्वाचे मुद्दे राहिले आहेत. पेरियार यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि त्यांच्या चळवळीचा प्रचंड प्रभाव दक्षिणेतील समाजकारणावर व राजकारणावर पडला आहे. द्रविड कळघमची चळवळ पेरियारच्या पश्चात आजही तितकीच समर्थपणे सुरु आहे. या चळवळीचा गौरवशाली इतिहास आणि तिची आजची परिस्थिती याबद्दलचा ‘आँखो देखा हाल’ वार्तापत्राच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहेत…
“अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ अशा व्यक्तिद्वारेच केले जाऊ शकते, जी अत्यंत दृढ आहे, ज्याचे विचार निःसंशय स्पष्ट आहेत आणि ज्याच्यामध्ये निंदा आणि मृत्यूला सामोरे जाण्याची हिंमत आहे!”
– ई. व्ही. रामासामी पेरियार
(पेरियार यांच्या समाधीवर कोरलेले विचार)
‘आशियाचा सॉक्रेटिस’ ज्यांना म्हटले जाते त्या पेरियार रामासामी यांच्या स्मृतिस्थळावर आम्ही आहोत. येथेच पेरियार यांचा देह विश्रांती घेत आहे. हे ठिकाण म्हणजे पेरियार थिडल. थिडल म्हणजे स्मृतिस्थळ. इग्मोर चेन्नई रेल्वे स्टेशनच्या बाजूला आणि पोलीस कमिशनर ऑफिससमोर चार एकर परिसरात पेरियार यांचे हे ‘पेरियार थिडल’ या नावाने स्मृतिस्थळ आहे.
पेरियार यांच्या समाधी स्थळावरील वरील वाक्य वाचून आम्हाला डॉ. नरेंद्र दाभोलकरांची तीव्रतेने आठवण आली, कारण ७५ वर्षांपूर्वी पेरियार यांनी केलेले हे विधान डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते आणि दाभोलकरांच्या बाबतीत ते खरेही ठरले. पेरियार म्हणतात त्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन तीच व्यक्ती करू शकते, जिला निंदेला आणि मृत्यूला सामोरे जायचे भय नाही.
कसे आहे पेरियार थिडल?
९० वर्षांपूर्वी ‘द्रविड कळघम’ या पेरियार यांनी स्थापन केलेल्या सामाजिक चळवळीचे दक्षिण भारतातील हे ‘पेरियार थिडल’ हे मुख्य केंद्र आहे. तमिळनाडूचे अण्णादुराई हे जेव्हा प्रथम मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी असे जाहीर केले की, “आमच्या सरकारची पुढील सर्व धोरणे ही ‘पेरियार थिडल’ मधून ठरवली जातील.” यावरून या केंद्राचे सामाजिक राजकीय महत्त्व आपल्या लक्षात येईल.
अशा या ‘पेरियार थिडल’ मध्ये काय आहे ते जाणून घेऊ…
पेरियार यांची समाधी

रामासामी पेरियार यांचा मृत्यू २४ डिसेंबर १९७३ रोजी झाल्यानंतर त्यांचा देह याच ठिकाणी पुरला आहे. अत्यंत साधे; पण विचारांनी परिपूर्ण असे हे स्मृतिस्थळ आहे. त्यांच्या पुरलेल्या देहावर साध्या काळ्या रंगाच्या मार्बलचा कठडा उभारून त्यावर त्यांच्या विचाराची दगडी मशाल तेवत ठेवली आहे. ती मशाल आपल्याला पेरियार यांचा विचार जगभर पसरवायचा आहे याची आठवण करून देते. समाधी परिसरात प्रवेश करताना वाटेच्या दुतर्फा पेरियार यांच्या विचारांच्या दगडी शिला कोरून त्याची सजावट केली आहे. प्रत्येक विचारशिलेवर तमिळमध्ये आणि इंग्रजीमध्ये पेरियार यांचे महत्त्वाचे विचार कोरले आहेत. आपण हे विचार वाचतच समाधीकडे जात असतो.
आम्ही नेहमीप्रमाणे समाधीवर जाताना चपला बाजूला काढल्या आणि अनवाणी गेलो, तेव्हा तेथील कार्यकर्त्यांनी आम्हाला हटकले. चपला घालून पेरियार यांच्या समाधीवर जावा, असे तो म्हणाला. पेरियार यांनी आयुष्यभर चपला काढू नका म्हणून सांगितले. पावित्र्य संकल्पनेवर पेरियार यांचा विश्वास नव्हता. “त्यांचे विचार तुमच्या डोक्यात असले म्हणजे झालं, समाधीवर पायात चपला असो अगर नसो” असं तो म्हणाला.
पेरियार यांचे स्मृतिस्थळ अत्यंत साधे आहे. त्यांचे शिष्य असणारे एम. करुणानिधी, अण्णादुराई आणि एमजी रामकृष्ण्न, जयललिता यांची स्मृतिस्थळे करोडो रुपये खर्च करून समुद्रकिनारी बांधली आहेत. तीदेखील आम्ही आदल्या दिवशी पाहिली होती.
पेरियार म्युझियम

म्युझियममध्ये पेरियार यांनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या सर्व वस्तू, त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे ठेवली आहेत. त्यांचे फोटोंचे प्रदर्शन अत्यंत देखणे आहे. या म्युझियममध्ये असणार्या पेरियार यांच्या पलंगासमोरच सध्याचे द्रविड कळघमचे राष्ट्रीय अध्यक्ष के. वीरमणी सर बसतात. त्यांना भेटायला दररोज शेकडो लोक येत असतात. या म्युझियममध्ये असणार्या एका चित्रावर पेरियार यांचा जीवन प्रवास संख्येमध्ये दाखवला आहे. त्यामध्ये खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे- जसे की, पेरियार यांनी आयुष्यभर प्रबोधनासाठी १३ लाख १९ हजार ६६२ किलोमीटर प्रवास केला. तामिळनाडूमध्ये एकही असे गाव नाही, जिथे पेरियार गेले नाहीत. त्यांनी आयुष्यात १०,७०० भाषणे दिली, त्याचे २१,४०० तास होतात. पेरियार म्युझियम पाहून आपण भारावून जातो.

पेरियार रॅशनॅलिस्ट लायब्ररी आणि रिसर्च सेंटर
या ग्रंथालयामध्ये पेरियार यांची द्रविड चळवळीची लाखो पुस्तके जपून ठेवली आहेत. तसेच पेरियार यांनी सुरू केलेली दैनिके, मासिके, साप्ताहिके यांचे सुरुवातीपासूनचे अंक संरक्षित करून ठेवले आहेत. हे सर्व अंक आम्हाला तेथील ग्रंथपालाने अत्यंत आपुलकीने दाखवले. लायब्ररीच्या ऑफिसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो प्रथमदर्शनी लावले आहेत. महाराष्ट्रातील हे महामानव संपूर्ण देशाचे झाले आहेत याचा प्रत्यय येथे आला.

तमिळनाडूतील सामाजिक आणि राजकीय चळवळीचा अभ्यास करण्यासाठी शेकडो संशोधक विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेतात. या ग्रंथालयास राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार मिळाला आहे.
दैनिक विदुथलाई
पेरियार यांनी सुरू केलेले हे दैनिक गेली ९० वर्षे सातत्यपूर्ण सुरू आहे. त्यांचा विचार तमिळनाडूमध्ये पोहोचवण्यासाठी या दैनिकाचा उपयोग केला जातो. सध्या याचे संपादक के. वीरमणी सर आहेत. याच परिसरात या दैनिकाचा सुसज्ज छापखाना आहे. या दैनिकाच्या दररोज दहा हजार प्रती छापल्या जातात आणि पोस्टाने त्या दररोज तामिळनाडू राज्यामध्ये वितरित केल्या जातात. काही प्रती श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया येथेही पाठवल्या जातात. सामाजिक काम करणारी एखादी संघटना ९० वर्षे आपल्या स्वतःच्या मालकीचे वर्तमानपत्र चालवते ही काही साधी गोष्ट नाही. त्यामागे कार्यकर्त्यांचे किती प्रचंड कष्ट असतील!
या वर्तमानपत्रांमध्ये द्रविड कळघम चळवळीच्या बातम्या, वैज्ञानिक लेख, विवेकवादाचा प्रचार करणारे लेख, अंधश्रद्धा निर्मूलनावर सदर, पेरियार यांचे जुने लेख पुनर्मुुद्रित केले जातात. ९२ वर्षांचे के. वीरमणी सर हे संपादकीय काम पाहतात. आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना दाखवायला उद्याच्या अंकाचे कच्चे प्रिंट कर्मचारी घेऊन आले होते. त्या वाचून के. वीरमणी सर त्यामध्ये दुरुस्त्या लाल शाईने स्वतः लिहून देत होते. दैनिकाचे व्यवस्थापन सांभाळणार्या २० लोकांचा त्यांच्याकडे स्टाफ आहे. काही पूर्ण वेळ कार्यकर्तेही या कामात मदत करतात.

द्रविड कळघम या सामाजिक संघटनेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातून आलोय, ही बातमी आमच्या फोटोसह या दैनिकात काल प्रसिद्ध झाली होती. तो पेपर तेथील व्यवस्थापकाने आम्हास सप्रेम भेट दिला. तमिळ भाषेत लिहिलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य आणि आमचा फोटो पाहून आम्ही खूपच भारावून गेलो.
दैनिकाबरोबरच द्रविड कळघम संघटनेची सर्व प्रकारची पुस्तके येथे छापली जातात. संघटनेचा स्वतःचा छापखाना असल्यामुळे पुस्तकाचा निर्मिती खर्च अत्यंत कमी येतो. त्यामुळे पुस्तकाच्या किमती आम्हाला कमी ठेवता येतात, असे तेथील व्यवस्थापकाने आम्हाला सांगितले. लहान मुलांसाठी ‘पेरियार पिंजू’ हे मासिक दरमहा प्रसिद्ध होते. ४० पानांचे हे मासिक संपूर्ण रंगीत आहे. त्यामध्ये मुलांसाठी लेख, भरपूर चित्रे, कोडी विज्ञानविषयक माहिती दिलेली असते. दर महिन्याला दहा हजार प्रती खपतात.
‘दि मॉडर्न रॅशनॅलिस्ट’ हे इंग्रजी मासिकही येथून प्रकाशित होते त्याच्या कार्यालयाला आम्ही भेट दिली त्याचे कार्यकारी संपादक म्हणून कुमरेसन काम पाहतात. त्याच्याही दर महिन्याला दहा हजार प्रती संपूर्ण जगभर वितरित होतात.
पेरियार टी.व्ही
पेरियार व्हीजन टीव्ही या नावाने द्रविड कळघमचे टीव्ही चॅनेलही आहे. सध्या ते ओटीटी स्वरूपात प्रक्षेपित केले जाते. त्यांचा सुसज्ज स्टुडिओ पाहिला. तेथे पेरियार यांनी केलेल्या भाषणांचे ऑडिओ व्हिडिओचे रेकॉर्डिंगसुद्धा त्यांनी सांभाळून ठेवले आहे.
सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज विभाग
पेरियार यांनी १९२५ पासून सेल्फ रिस्पेक्ट विवाह (स्वाभिमानी विवाह) पद्धती तयार केली. यामध्ये कोणतेही कर्मकांड न करता वधू-वर शपथ घेत, एकमेकांना पुष्पहार घालत विवाह संपन्न होत असतो. असे विवाह करू इच्छिणार्यासाठी द्रविड कळघमची शेकडो केंद्रे तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत. त्यातील मुख्य केंद्र म्हणजे चेन्नईतील हे सेंटर होय. या सेंटरमध्ये अशा विवाहांची नोंदणी केली जाते. त्यानंतर साक्षीदार आणि नातेवाईक यांच्या साक्षीने विवाह लावला जातो. यासाठी संघटनेने फॉर्म तयार केले आहेत. वधू-वरांची पूर्ण कागदपत्रे तपासून हा विवाह संपन्न होतो.

या विवाहास तामिळनाडू सरकारने कायदेशीर मान्यता दिली आहे. पेरियार सेंटरमधून विवाह केलेल्या दाम्पत्यास विवाह प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र म्हणून शासकीय कागदपत्रात वापरता येते. या विवाहाची पुन्हा कोठेही नोंदणी करण्याची गरज नाही.
दर महिन्याला किमान वीस विवाह या केंद्रावर होतात. त्यामध्ये ९० टक्के विवाह हे आंतरजातीय आंतरधर्मीय असतात. या केंद्रासाठी संचालक म्हणून द्रविड कळघमच्या शांतीकुमारी या महिला कार्यकर्त्याची पूर्णवेळ नेमणूक केली आहे. या केंद्रासाठी चळवळीच्या एका महिला कार्यकर्तीच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी सुंदर असा हॉल बांधला आहे. त्यामध्ये शंभर माणसं बसू शकतात.
आम्ही जेव्हा या विवाह केंद्राला भेट दिली, तेव्हा तेथे एका जोडप्याच्या लग्नाची नोंदणी सुरू होती. आमच्या उपस्थितीतच या नवदाम्पत्याचा विवाह संपन्न झाला. आमच्या हस्ते या नवदाम्पत्याला विवाह प्रमाणपत्र दिले गेले.
पेरियार यांनी सुरू केलेला सेल्फ रिस्पेक्ट विवाह सोहळा आम्हास याची डोळा बघता आला, याचा आनंद काय वर्णावा!
पेरियार यांचा भव्य पुतळा
पेरियार थिडल परिसरात प्रवेश करताना बरोबर मध्यभागी पेरियार यांचा अतिशय सुंदर आणि भव्य पुतळा उभा केला आहे. या पुतळ्यावर समोरच्या बाजूला पेरियार यांना युनिस्कोने दिलेले मानपत्र कोरले आहे. पेरियार यांचा गौरव करताना युनिस्को म्हणते की, पेरियार : नवयुगाचे प्रेषित, दक्षिण पूर्व आशियाचे सॉक्रेटिस. सामाजिक सुधारणा चळवळीचे जनक; आणि अज्ञान, अंधश्रद्धा, निरर्थक प्रथा आणि दृष्ट वर्तन यांचे कट्टर शत्रू. (२७.०६.१९७०)

पुतळ्याच्या चौथर्यावर चारी बाजूला त्यांच्या विचारांची वाक्ये कोरली आहेत. त्यामध्ये-
– “जर त्यांनी माझ्यासाठी पुतळा बसवला असेल, तर तो पुतळा घंटा वाजवण्यासाठी नाही; त्याची कोणतीही पूजा केली जाणार नाही. हा पुतळा त्याचा आहे ज्याने जाहीर केले आहे की, जगात देव नाही, देव नाही, देव अजिबात नाही. ज्याने देवाचा शोध लावला तो मूर्ख आहे. ज्याने देवाचा प्रचार केला तो बदमाश आहे. जो देवाची पूजा करतो तो रानटी आहे. हा पुतळा देवावर विश्वास ठेवणार्यांना ‘देव नाही’ हे आठवण करून देण्यासाठी बसवला गेला आहे.”
– “पेरियारची महान सेवा ही केवळ एखाद्या व्यक्तीची चरित्रकथा नाही; ती एक युग, एक कालखंड आणि एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.”- अण्णा दुराई (पहिले मुख्यमंत्री, तामिळनाडू)
– “जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारले, हा पुतळा कोणाचा आहे? तर तो उत्तर देईल, हा पेरियारांचा पुतळा आहे. जर तुम्ही त्याला विचारले, पेरियार कोण आहेत? तर तो उत्तर देईल, तुम्हाला पेरियार माहीत नाहीत का? ते तीच व्यक्ती आहे ज्यांनी देव नाही हे जाहीरपणे सांगितले. आमच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी हा पुतळा प्रेरणादायी ठरेल.”
– “मी द्रविड समाजामध्ये सुधारणा करण्याच्या कार्यात गुंतलो आहे, त्यांना सन्माननीय आणि समजूतदार समाज बनवणे या उद्दिष्टासाठी मी वचनबद्ध आहे.” – पेरियार
पुतळ्याच्या बाजूला ‘द्रविड कळघम’चा काळा आणि त्याला मध्ये लाल गोल असलेला ध्वज उंच फडकत असतो. या पुतळ्याच्या चौथर्यावरही आपल्याला चप्पल घालून प्रवेश करता येतो. पवित्र अपवित्रतेच्या भंपक संकल्पना पेरियार यांना अजिबात मान्य नव्हत्या. म्हणून सर्व जण चप्पल घालून पेरियारांच्या पुतळ्याच्या चौथर्यावर जाऊ शकतात.
पेरियार मनिअम्माई युनिव्हर्सिटी

द्रविड कळघम या सामाजिक संघटनेचे तामिळनाडूमध्ये पेरियार मनिअम्माई युनिव्हर्सिटी नावाचे स्वतंत्र विद्यापीठ आहे. या विद्यापीठाद्वारे मुलींचे इंजिनीअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आणि कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालये चालवली जातात. या विद्यापीठाद्वारे पेरियारांचा विचार पोहोचवण्यासाठी त्यांच्या नावाने ‘पेरियार एज्युकेशन रिसर्च सेंटर’ हे कार्यालय याच परिसरात आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू हे के. वीरमणी आहेत. या रिसर्च सेंटरचे काम के. वीरमणी यांचे चिरंजीव व्ही. अनबुराज हे पाहतात. ते द्रविड कळघम या संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत.
पेरियार पुस्तक विक्री केंद्र
या परिसराच्या सुरुवातीलाच पुस्तक विक्रीचे भव्य दालन आहे. त्यामध्ये हजारो पुस्तके अत्यंत सुंदर पद्धतीने मांडली आहेत.
द्रविडियन चळवळीची आणि इतरही पुस्तके तेथे विक्रीसाठी उपलब्ध असतात. तेथे आम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण पुस्तके तमिळ भाषेमध्ये उपलब्ध दिसली. महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मयदेखील तमिळमध्ये उपलब्ध होते. छत्रपती शाहू महाराजांवरही तमिळमध्ये पुस्तक प्रकाशित झाले आहे. फलज्योतिष, आत्मा, पुनर्जन्म, अंधश्रद्धा निर्मूलन यावरही अनेक पुस्तके तमिळ भाषेत द्रविड कळघमने प्रकाशित केली आहेत.

पूर्ण वातानुकूलित पुस्तक विक्रीचे हे दुकान आहे. राज्यभर येथूनच पुस्तकांची पार्सले चळवळीच्या विविध केंद्रांना पाठवली जातात. सध्या तेथे चार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. दरवर्षी लाखो रुपयांची पुस्तक विक्री होते. पेरियार म्हणत की, “धर्मग्रंथाना जर शह द्यायचा असेल तर, आपण विवेकी पुस्तकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे.” या पेरियारांच्या तत्त्वानुसार संघटनेच्या प्रकाशन विभागाकडून दरवर्षी शेकडो पुस्तके बाजारात आणली जातात. त्यांच्या कित्येक आवृत्ती निघतात. द्रविड कळघमचे कार्यकर्ते पुस्तक विक्रीचे काम आपापल्या शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात करतात. प्रकाशन विभागाची दरवर्षी लाखोंची उलाढाल आहे.
मनिअम्माई हॉस्पिटल
पेरियार स्मृती परिसरात पेरियार यांच्या पत्नी मनिअम्माई यांच्या नावाने धर्मार्थ दवाखाना आहे. या दवाखान्यामध्ये गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. कोरोना काळात हा दवाखाना सर्वांसाठी मोफत खुला होता.
भव्य सभागृह आणि कॉन्फरन्स हॉल
द्रविड कळघम या चळवळीच्या कार्यक्रमासाठी केंद्रामध्ये ५०० लोक बसू शकतील एवढा मोठा एसी हॉल आहे. त्यासोबतच ५० लोक बसू शकतील असा कॉन्फरन्स हॉलही येथे आहे. चळवळीच्या सर्व राज्यस्तरीय बैठका, मेळावे या ठिकाणीच होतात.
पेरियार डिजिटल लायब्ररी

या लायब्ररीमध्ये पेरियार यांची सर्व पुस्तके तसेच द्रविडीयन चळवळीची हजारो पुस्तके डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवली आहेत. सध्या या डिजिटल ग्रंथालयाची नवीन इमारत याच परिसरात आहे. याच इमारतीत पेरियार अर्काईव्हही आहे.
ट्रस्ट
वरील सर्व विभागांचा कारभार वेगवेगळ्या या चार ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो. द्रविड कळघम ट्रस्ट, पेरियार सेल्फ रिस्पेक्ट प्रपोगोंडा ट्रस्ट (१९५२), पेरियार पब्लिक प्रेस ट्रस्ट, पेरियार एज्युकेशन ट्रस्ट. पेरियार यांना मानणारे अनेक कार्यकर्ते, उद्योजक, सरकारी नोकरदार, परदेशातील तमिळी लोक या ट्रस्टला दरवर्षी करोडो रुपये देणग्या देत असतात. या देणग्यांचा वापर काटेकोरपणे यांचा विचार पोचवण्यासाठी केला जातो. सर्व ट्रस्टचे चेअरमन हे के. वीरमणी आहेत.
एखाद्या सामाजिक संघटनेचे एवढे सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय आम्ही प्रथमच पाहत होतो. वरील सर्व विभागात मिळून १०० पेक्षा जास्त पगारी कर्मचारी आहेत आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी द्रविड कळघमचे पूर्णवेळ २० कार्यकर्ते आहेत. प्रत्येकी दोघांना एक विभाग वाटून दिला आहे.
पेरियार थिडल परिसर पाहून आम्हास वाटले की, आपल्याही संघटनेचे- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे असे सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे स्मृतिस्थळ असावे.

पुढील पन्नास वर्षांत आपल्या अंनिस चळवळीचे भविष्य काय आहे, असे कोणी आम्हाला विचारले तर, आम्ही त्यांना सध्याचे द्रविड कळघमचे भव्य काम आणि त्यांचे हे पेरियार थिडल दाखवू.
कोण होते पेरियार ई. व्ही. रामासामी

(जन्म १७ सप्टेंबर १८७९ मृत्यू २४ डिसेंबर १९७३)
द्रविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (नोबेल फादर) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक. पूर्ण नाव इरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर. तमिळनाडूतील इरोड येथे कन्नडा नायकर जमातीतील संपन्न कर्मठ वैश्य हिंदू व्यापारी कुटुंबात जन्म झाला. वडील व्यंकटप्पा हे प्रसिद्ध आणि गर्भश्रीमंत व्यापारी होते. आईचे नाव चिन्ना थायाम्मल उर्फ मुथम्मल. कृष्णस्वामी ई. व्ही. हे त्यांचे वडीलबंधू आणि कन्नमल व पुन्नथाई या लहान बहिणी होत्या. शालेय शिक्षण फक्त तीन वर्षेच झाले. एकोणिसाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह नात्यातील नागमल्ल या तरुणीशी झाला. लग्नानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. अत्यंत सचोटीने त्यांनी व्यापार करून आपला व्यवसाय मोठा केला.
पेरियार लहानपणापासूनच परंपरावादी, अंधश्रद्धा व धर्मग्रंथांतून सांगितलेल्या विचारांवर नेहमीच प्रश्न उठवत असत. गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले व त्यांनी धर्मग्रंथांचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली आणि त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराचा प्रसार सुरू केला. १९०५ पासून पेरियार यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. याच काळात इरोडमध्ये प्लेगची साथ पसरली होती. अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले, त्यामुळे अनेक श्रीमंत व्यापार्यांनी इरोडमधून स्थलांतर केले. पण पेरियार यांनी रोग्यांची सेवाशुश्रूषा केली व मृतांवर स्वतः अंत्यसंस्कार केले.
१९१८ मध्ये ते इरोड नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील थोर नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या सल्ल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते तामिळनाडू काँग्रेसचे राज्याध्यक्ष होते. १९२० मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला. या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी स्वतःहून विविध संस्थांत असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदांचा राजीनामा दिला. या असहकार आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. काँग्रेसमधील वरिष्ठवर्णीयांच्या धोरणाबद्दल मनात असंतोष निर्माण होऊन त्यांनी पक्षत्याग केला. तमिळ व उपेक्षित समाजाला ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघटित केले. पददलित समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी १९२५ साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले.
पेरियार यांनी आंतरजातीय विवाह व विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच देवदासीप्रथा बंद करण्यासाठीच्या विधेयकास पूर्ण पाठिंबा दिला.
१९३१ मध्ये त्यांनी रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स व स्पेन या देशांचा दौरा केला. १९३३ मध्ये त्यांनी लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना बंदिवास भोगावा लागला.
पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळाच्या काळात १९३७ मध्ये त्यांनी प्रथम हिंदी भाषेविरोधी आंदोलन सुरू केले. त्यासाठीही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
१९४४ साली त्यांनी जुन्या जस्टिस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले. सार्वभौम व वर्णभेदरहित द्रविडनाडूची स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे ध्येय होते. पेरियार यांनी पहिली पत्नी वारल्यानंतर मणिअम्माई या आपल्या २८ वर्षांच्या स्वीय सहायिकेसोबत १९४९ साली दुसरे लग्न केले.
पेरियार यांचे सहकारी आण्णा दुराई यांच्या नेतृत्वाखाली काही अनुयायांनी पेरियार यांचा पक्ष सोडून द्रविड मुन्नेत्र कळघम हा नवा पक्ष स्थापन केला. निवडणुका लढविण्यासाठीच मुख्यतः नवा पक्ष अस्तित्वात आला होता. पक्षात फूट पडली, तरीही पेरियार यांचा तमिळ जनतेवरील वैयक्तिक प्रभाव कमी झाला नव्हता.
पेरियार यांनी १९७१ साली अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन भरवून धर्म, जात व भाषा यांच्या आधारावर होणारा सर्व प्रकारचा पक्षपात दूर करण्याचे सरकारला आवाहन केले, तसेच हिंदी भाषेला विरोध केला.
१९३४ पासूनच त्यांनी सामाजिक क्रांतीसाठी स्वतःला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून वाहून घेतले. हिंदू धर्म हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे व मक्तेदारीचे एक साधन आहे, मनुस्मृती ही अमानुष आहे आणि पुराणे म्हणजे परीकथा आहेत, अशी त्यांची मते होती. वर्णव्यवस्था, बालविवाह, सक्तीचे वैधव्य यांविरुद्ध ते सतत प्रचार करीत. द वर्ल्ड टू कम, व्हाय द राइट्स फॉर कम्यूनल रिझर्व्हेशन, वर्डस् ऑफ फ्रीडम : आयडिया ऑफ नेशन, सच्ची रामायण हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. कुडी अरासु (१९२५), रिव्होल्ट (१९२८), पकुत्तरिवू (१९३४), विदुथलाई या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.
वेल्लोर येथे वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
काशीयात्रेमुळे पेरियार नास्तिक बनले!
रामासामी लहान असताना यांच्या घरी पाहुणचारासाठी आलेल्या तमिळ वैष्णव धर्मगुरूंची पौराणिक कथांवरील प्रवचने ऐकत असत. तेव्हाच त्यांनी द्रविड वंशाला वश करण्यासाठी आर्य वंश, म्हणजेच ब्राह्मणांनी पसरवलेल्या हिंदू देवतांच्या दंतकथांमधील विरोधाभास आणि भ्रमांवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तिथूनच त्यांच्या जहाल क्रांतिकारक विचारांची बीजे रुजायला सुरुवात झाली होती. पुढे जाऊन २४-२५ वर्षांचे असताना त्यांच्या परंपरावादी वडिलांशी झालेल्या टोकाच्या मतभेदांमुळे त्यांनी घर सोडले आणि ते उत्तरेकडे प्रवासाला निघाले. ते प्रथम आंध्र राज्यातील विजयवाडा येथे गेले. त्यानंतर हैदराबाद आणि कोलकाता मार्गे काशीला पोहोचले.

काशी येथे एक विचित्र घटना घडली. प्रवासामध्ये थकलेल्या रामासामींना तिथे असलेल्या एका ब्राह्मणांच्या अन्नछत्रामध्ये काही दिवस प्रवेश मिळाला नाही. बर्याच दिवसाचा उपवास घडल्यामुळे भुकेने कासावीस झालेल्या रामासामींनी अन्नछत्रामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अंगावरती जानव्यासारखा दिसणारा धागा बांधला. तरीपण त्यांच्या मोठ्या मिशा पाहून द्वारपालाने त्यांना दारातच रोखले आणि उद्धटपणे रस्त्यावर ढकलून दिले. आतली मेजवानी संपत आलेली असतानाच पानातच सोडलेले उरलेसुरले अन्न जेव्हा बाहेर रस्त्यावर आणून टाकले गेले, तेव्हा आधीच्या काही दिवसांच्या असह्य उपासमारीमुळे रामासामी यांना त्या पानांमधील टाकलेले अन्न रस्त्यावरील कुत्र्यांना हुसकावित खाणे भाग पडले. ते अन्न खाताना रामासामींची नजर इमारतीच्या पुढच्या भिंतीवर कोरलेल्या अक्षरांकडे गेली. त्यावर लिहिले होते की, केवळ उच्च जातीच्या ब्राह्मणांसाठी ती धर्मशाळा तमिळनाडूतील द्रविड वंशातील एका श्रीमंत व्यापार्यानेच बांधली होती. त्याच वेळेस तरुण रामासामीच्या मनात प्रश्नांची ठिणगी पेटली. ही धर्मशाळा जर एका परोपकारी द्रविड माणसाच्या पैशाने बांधली गेली असेल तर हे ब्राह्मण आम्हा द्रविडांना तिथल्या अन्नछत्रामध्ये जेवण घेण्यास का आणि कसे अडवू शकतात? हे ब्राह्मण धर्मांधतेने द्रविडांशी इतके निर्दयी का वागताहेत? या प्रश्नांवर रामासामीच्या तर्कनिष्ठ मनाला पटवून देणारी कोणतीही न्याय्य उत्तरे मिळाली नाहीत. हिंदूंचे तीर्थक्षेत्र असलेल्या काशी येथे ब्राह्मणांनी त्याच्यावर जराही दया न करता केलेल्या अपमानाने रामासामींच्या हृदयावर खोल घाव केला आणि त्याच्या मनात आर्य वंशाबद्दल आणि त्यांच्या असंख्य देवांच्या निर्मितीबद्दल तीव्र द्वेष उत्पन्न झाला. जरी वाराणसी हे हिंदूंचे सर्वांत ‘पवित्र’ शहर म्हणून ओळखले गेले असले तरी, तेथे चालणारी अनैतिक कृत्ये, वेश्याव्यवसाय, केशवपन करून सोडून दिलेल्या असंख्य विधवा बायका, फसवणूक, लूटमार, भिकार्यांची गर्दी, गंगा नदीवर तरंगणारी प्रेतं या अत्यंत कुरूप दृश्यांनी तरुण रामासामीच्या मनात तिरस्कारच निर्माण झाला. याचा परिणाम म्हणून ते मनाने तमिळनाडूस कौटुंबिक जीवनात परत जाण्यास प्रवृत्त झाले. परत आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी व्यवसायाची संपूर्ण धुरा रामासामी आणि त्यांच्या भावावर सोपवली; परंतु रामासामी यांनी स्वतःला व्यवसायामध्ये अडकवून न घेता समाजासाठी अखंडपणे स्वतःला वाहून घेतले आणि अखेरीस अख्या तमिळ समाजमनाचे पेरियार बनले.
या रिपोर्ताजसाठी द्रविड कळघमचे अनेक कार्यकर्ते, द्रविड कळघमची वेबसाईट, मराठी विश्वकोष आणि पेरियार यांच्यावरील भीमराव सरवदे यांच्या पुस्तकांची मदत झाली आहे. त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत.
– रुपाली आर्डे–कौरवार (७६६६७ ४५४४६)
राहुल थोरात (९४२२४ ११८६२)
प्रा. डॉ. अशोक कदम (९८५०० १२५३०)
जर तुम्हाला ‘शूद्र’ म्हणून ओळखले जाण्याची लाज टाळायची असेल, तर मंदिरात जाणे टाळा, धार्मिक सण साजरे करू नका, कपाळावर धार्मिक चिन्हे लावू नका.! – पेरियार