रुद्राक्षाचे गौडबंगाल

डॉ. प्रदीप पाटील -

रूद्राक्षाच्या चमत्कारासाठी ‘रुद्राक्षाचे मुख’ नावाची एक संकल्पना निर्माण केली गेली. एकमुखी रुद्राक्षाने धैर्यवानता येते, ४ व ६ मुखीने बुद्धिमत्ता वाढते वगैरे अंधश्रद्धा फैलावण्यात आल्या. समजुती घट्ट करण्याची धर्माची व्यवस्था अत्यंत प्रबळ आहे. त्यात देवाचे आणि मंदिर-मशीद-चर्चचे पुजारी सूत्रधार असतात. धर्मग्रंथांचे दाखले आणि पुरावे प्रमाण मानण्यासाठी त्यांचे महत्त्व अबाधित ठेवण्याचे कारस्थान सतत चालविले जाते आणि रूद्राक्ष हे अर्थार्जनासाठी साधन बनते.

कुणाच्या तरी डोळ्यांतून एखादे झाड निर्माण झाल्याचे विज्ञान माहितेय का?

डोळा म्हणजे अक्ष. घाबरविणारा म्हणजे रूद्र. अशा व्यक्तीचा डोळा म्हणजे रूद्राक्ष!

रूद्र, रौद्र.. म्हणजे भयंकर देखील. अशा वेळी जर घाबरविणारा रडू लागला, तर जे अश्रू ओघळतील त्या अश्रूंची फळं किंवा बिया होतात कसे, असा प्रश्न विचारू नये. कारण हे विज्ञान नाही; धर्मशास्त्र आहे.

धर्मशास्त्रात बिया, फळं, झाडं यांचा अभ्यास करायचा नसतो, म्हणूनच ‘ईलिओकार्पस अंगुस्टी फोलियस’ हे लांबलचक नाव… भन्नाट नाव वाटते.

हे धार्मिकांना माहिती असणे शक्यच नाही. कारण या नावाचा जर प्रचार आणि प्रसार झाला असता, तर सारेच भक्त न होता वैज्ञानिक झाले असते!

हे आहे एका झाडाचे नाव. हे झाड भारत, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, फ्रान्स अशा विविध देशांत सापडते. त्या देशात काहीही म्हणत असले, तरी भारतात या झाडाभोवती प्रचंड धार्मिक कथा विणण्यात आल्या आहेत. कारण…

ईलिओकार्पस जेनिट्रस आणि अंगुस्टीफेलिअस या झाडाची जी निळीभोर फळे असतात, त्या फळातील बियांविषयी घनघोर अंधश्रद्धा फैलावल्या आहेत. या झाडाची मुळे दणकट असतात, ज्याला ‘बन्ट्रेस’ म्हणतात, तशाच दणकट समजुती या भूमीत खोलवर रुजल्या आहेत.

या झाडाला लागणारे फळ जेव्हा पिकते तेव्हा ते गर्दनिळ्या रंगाचे असते आणि मग नीलकांती देव असलेल्या शिवाशी ते न जोडले गेल्यास नवलच! एखादी गोष्ट कशी निर्माण होते, त्यामागील विज्ञान काय आहे, हे समजले नाही तर ती गोष्ट देव आणि चमत्काराला नेऊन जोडणे एवढेच उरते. मात्र विज्ञान प्रत्येक गोष्ट खणून काढते. कुणीतरी अज्ञात शक्ती या विश्वात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडवते, असे विज्ञान मानत नाही. म्हणूनच धर्मकथा आणि विज्ञान यात मूलभूत फरक असतो.

ईलिओकार्पस् नेनिट्रस जातीचे झाड हे रूद्राक्ष पैदा करते. या झाडाचे फळ जेव्हा पिकते, तेव्हा ते गर्द निळ्या रंगाचे असते, तेव्हा दोन-तीन वर्षांतच या झाडाच्या फळांच्या बियांचा जन्म होतो; अश्रूतून नव्हे. आज रूद्राक्ष बीचे विज्ञान माहिती झाले असले, तरीही याच फळांतल्या बिया प्रत्येकाच्या गळ्यात, हातात जाऊन विसावतात.

अशा रूद्राक्षाचा महोत्सव भरवला जातो. लाखो लोक तेथे जातात आणि जीव गमावतात. असे घडते कारण यामागे असते समाजाची मानसिकता. अज्ञानातून जेव्हा एखादी गोष्ट निर्माण होते, तेव्हा ती वारंवार पटवून दिली गेली की, खरी वाटू लागते. भारतीय संस्कृतीत अनेक मिथके आणि अंधश्रद्ध कथांची खैरात दिसते. या कथा प्राचीन काळात निर्माण झाल्या. कारण विज्ञानाचा उदय तेव्हा या समाजात झालेला नव्हता. या समाजाचे जे म्होरके समजले गेले, त्यांनी स्वत:च काही कारणे ‘निर्माण’ केली आणि ती खरी वाटण्यासाठी त्याला देव आणि चमत्कारांशी जोडले गेले. रूद्राक्षाचे असेच घडत गेले.

आयुर्वेदात रूद्राक्षामुळे रोग बरे होतात, असे कोणतेही संशोधन न करता सांगितले गेले. ‘शरवक्ष भूतनाशन-दुष्ट पवन नीलकंठश्च हरक्ष’ म्हणत आयुर्वेदाच्या या दाव्यांची सत्यासत्यता पडताळून पाहिली गेली नाही.

विज्ञानामध्ये बॉटनी किंवा वनस्पती विज्ञान हे खात्रीची माहिती देणारे शास्त्र समजले जाते. रूद्राक्षाच्या कथा जेव्हा जन्मल्या, तेव्हा त्यावेळी ‘बॉटनी’ भारतात नव्हती. तेव्हा धर्मकथा प्रमाण मानल्या जात. कारण धर्मपंडितांचे नियंत्रण समाजमानसिकतेच्या आचार-विचारांवर होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून फळा-फुला-झाडांचा अभ्यास जेव्हा सुरू झाला, तरी प्राचीन काळापासून तयार झालेल्या समजुतींच्या परंपरा बनल्या होत्या आणि परंपरांच्या नावाखाली अनेक दंडक तयार झाले. त्यातून या परंपरांना आव्हान देणार्‍यांचा विनाश होतो, ही भीतीदेखील घातली गेली. परिणामी रूद्राक्ष महोत्सवापर्यंत या परंपरा जिवंत राहिल्या आहेत.

खरं तर रूद्राक्ष फळाचा सर्वप्रथम अभ्यास एका जर्मन-डच वैज्ञानिकाने केला. ‘बिज्रा डे’ नावाच्या १८२५ मध्ये लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याने याला ‘फ्रुट स्टोन’ संबोधले. या रूद्राक्षात फ्लेवोनॉईडस्, कायटोस्टेरॉल्स, अल्कलॉईडस्, प्रथिने वगैरे असतात, जी अन्य अनेक बियांमध्येही आढळतात; म्हणजेच इतर बियांप्रमाणेच हे देखील एक सर्वसामान्य बीज होय. हे विज्ञान आजदेखील रूद्राक्ष भक्तांपर्यंत पोचलेले नाही आणि समजा, पोचले तरीही परंपराभिमानामुळे रूद्राक्षाचे सत्य न स्वीकारता खोटे विज्ञान मांडत त्याचे महत्त्व संस्कृतिरक्षणार्थ वाढवले गेले.

रूद्राक्ष हे रक्तदाबापासून ते नपुसंकत्वापर्यंतच्या सर्व व्याधी दुरूस्त करते, असे बेलाशक पसरविण्यात आले. एवढेच नव्हे, तर रूद्राक्षाची माळ गळ्यात, मनगटात वगैरे ठिकाणी घातले की, शरीरव्याधी शमतात, हेही खोटे विज्ञान मांडले गेले.

रूद्राक्षाच्या चमत्कारासाठी ‘रुद्राक्षाचे मुख’ नावाची एक संकल्पना निर्माण केली गेली. एकमुखी रुद्राक्षाने धैर्यवानता येते, ४ व ६ मुखीने बुद्धिमत्ता वाढते वगैरे अंधश्रद्धा फैलावण्यात आल्या.

समजुती घट्ट करण्याची धर्माची व्यवस्था अत्यंत प्रबळ आहे. त्यात देवाचे आणि मंदिर-मशीद-चर्चचे पुजारी सूत्रधार असतात. धर्मग्रंथांचे दाखले आणि पुरावे प्रमाण मानण्यासाठी त्यांचे महत्त्व अबाधित ठेवण्याचे कारस्थान सतत चालविले जाते आणि रूद्राक्ष हे अर्थार्जनासाठी साधन बनते.

जग्गी वासुदेव बुवाच्या इरा यांगा सेंटरमध्ये महाशिवरात्रीस प्रसाद म्हणून हेच बी फुकट वाटले गेले. ऑनलाईन रजिस्टर करून. साडेतीन लाख रूद्राक्षांचे वाटप. याचाच अर्थ आंधळेपणा ऑनलाईनही मौजूद आहेच. म्हणून रूद्राक्षाच्या सवयी लावून पुढे सुरू होतो व्यापार! सध्या बाजारात दोन रुपयांपासून साडेतीन रुपयांपर्यंत रूद्राक्षाचे ‘भाव’ आहेत. भक्तिभावाचा ‘भाव’ भाविकांसाठीचा!

१ ते २७ मुखी असलेले रूद्राक्ष एकाच माळेत घालून तयार केलेली माळ ३५ करोड रुपयांना विकली गेलीय! नेपाळमधून रूद्राक्षाचा चालणारा वार्षिक व्यापार आहे दोन दशलक्ष रुपयांचा. एक भारतीय कंपनी रोज २ हजार डॉलर्सचे रूद्राक्ष परदेशात ऑनलाईन विकते.

एवढेच नव्हे, तर ऑनलाईन रूद्राक्ष प्रोफेशनल कोर्स देखील आहेत. यात रूद्राक्षाचे महत्त्व व फायदे, कसे वापरायचे, १ ते २१ मुखी म्हणजे काय? इत्यादी सखोल अंधश्रद्धाविषयक प्रशिक्षण दिले जाते.

भारतीय मानसिकता बहुसंख्येने संकटांना घाबरणारी आहे. ही संकटे इथल्या विस्कळित आणि बेभरवशाच्या प्रशासनातून निर्माण होतात. स्थिर आणि लाभदायी शासनव्यवस्था या देशात कधी आलीच नाही. काही दूरदृष्टीचे नेते लाभले म्हणून निदान थोडाफार विकास या देशात घडला; पण अंधश्रद्धेने ग्रासलेल्या बहुसंख्य समाजात विवेक निर्माण होऊ शकला नाही, त्याची किंमत रूद्राक्ष महोत्सवात दिसते. ती रोज चाललेल्या हजारो कर्मकांडातही दिसते. वायफळ कर्मकांडे आणि परंपरा पालन यातून दैनंदिन नागरी व कौटुंबिक समस्यांकडे डोळेझाक करण्याची वृत्ती तयार होते. म्हणूनच या देशात करोडो लोक यात्रा-जत्रा-महोत्सवाच्या नावाखाली एकत्र येतात; पण भ्रष्टाचार, अत्याचार, शोषण या विरोधात एकत्र येण्यात, त्यांची ही वृत्ती आड येते.

रूद्राक्ष पूर्वीही होता आणि आताही आहे. भारतीय समाज पूर्वी होता, तसाच आजही राहिला आहे. रूद्राक्षाने काहीही कमाल केलेली नाही, हे कळण्याइतकी देखील बुद्धी आता धर्माने शिल्लक ठेवलेली नाही. कारण अंधश्रद्धांचे राज्य या देशात अबाधित आहे आणि आता तर अंधश्रद्धाळूंची सत्ता देखील आहे!

‘जयतु धर्मराष्ट्रम्’ दूर नाही. मात्र, विवेकी-वैज्ञानिक दृष्टिकोनाचे राष्ट्र कधीच नाही- हे खरे नाही – कारण,

विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनच यावर उतारा ठरेल, यात शंका नाही.

डॉ. प्रदीप पाटील

संपर्क : ९८९०८४४४६८


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]