डॉ. शशांक कुलकर्णी -
सर्व ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना माझा दुबईहून नमस्कार. कोरोनाच्या या कठीण कालखंडात देखील आपण सर्व आपले कार्य चालू ठेवले आहे, हे आपल्या वेगवेगळ्या ‘आभासी’ मीटिंगमध्ये दिसून आले. त्याबद्दल मला समाधान वाटले आणि म्हणून मी सर्वांचे अभिनंदन करतो.
मला इकडे येऊन एक वर्ष झाले. दुबईमध्ये वैद्यकीय सुविधा अतिशय उत्कृष्ट आहेत, यात शंकाच नाही. मी स्वतः भूलतज्ज्ञ म्हणून इथे एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. परंतु आम्हाला अतिदक्षता विभागाची देखील अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागते. अतिदक्षता विभागाचे आम्हाला खास प्रशिक्षण असते. विशेषकरून रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवास देणे, व्हेंटिलेटरसंबंधी सेवा देणे हे आमचे काम असते.
‘कोविड’ काळात मला इथे बराच चांगला अनुभव मिळाला. खरे तर दोन प्रकारचे अनुभव होते.
1. ‘कोविड’ पॉझिटिव्ह किंवा माहीत नसलेल्या रुग्णाला भूल देणे.
2. ‘कोविड’ पॉझिटिव्ह रुग्ण अत्यवस्थ झाले, तर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासाची व्यवस्था करणे.
1. ‘कोविड’ असो की नसो; नेहमीच्या शस्त्रक्रिया, इमर्जन्सी शस्त्रक्रिया कराव्याच लागतात. नेहमीच्या शस्त्रक्रिया करायला थोडा वेळ मिळतो, ज्यात त्या रुग्णाची ‘कोविड’ टेस्ट करण्याची संधी मिळते. जर पॉझिटिव्ह असेल तर तशी काळजी घेता येते. पण इमर्जन्सी शस्त्रक्रिया असतील तर मात्र अशी संधी मिळतेच, असे नाही. त्यामुळे आम्ही इथे एक नियम बनवून टाकला की शस्त्रक्रिया कोणतीही असो; ‘कोविड’ टेस्ट केलेली असो वा नसो, रुग्ण पॉझिटिव्ह आहे, असे समजूनच काम करायचे. याचे आणखी एक कारण असेही होते की, आमच्या अनेक नर्सेस आणि इतर स्टाफ एकेक करून ‘कोविड’ पॉझिटिव्ह येऊ लागला आणि त्यामुळे विलगीकरण कक्षात भरती होऊ लागला. तेव्हा सकाळी जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करीत असू, त्याच वेळी पीपीए किट घालूनच जावे लागत होते. ऑपरेशन्सची लिस्ट असते. ती संपेपर्यंत ते किट काढता येत नाही. दोन केसेसच्या मध्ये आम्ही बाहेर जाऊन मोकळा श्वास घेऊ लागलो. असे कधी आठ ते बारा तास काम करत आहोत; शिवाय सतत हात धुणे हा उपक्रम आहेच. भूल देताना आम्हाला रुग्णाच्या अगदी तोंडातून श्वासाची नळी टाकावी लागत असते. त्यामुळे त्यासाठी आम्ही एक काचेचा बॉक्स बनवून घेतला, ज्यातून फक्त माझे हात जातील. तो बॉक्स रुग्णाच्या तोंडावर ठेवून फक्त हात आत घालून रुग्णाची श्वासाची यंत्रणा कार्यरत केली जाते.
2. अत्यवस्थ ‘कोविड’ रुग्णाची काळजी मात्र जोखमीची असते. अतिदक्षता कक्षात त्यांच्यासाठी आणखी एक विलगीकरण कक्ष असतो. त्यामुळे तिथे जाताना संपूर्ण झझए किट घालून आत गेले की तासभर सगळी व्यवस्था लावून, पाहणी करून, मॉनिटर्स, व्हेंटिलेटर सर्व ठीकठाक काम करतोय, अशी खात्री करूनच बाहेर यावे लागते; शिवाय आपल्या ड्यूटीमध्ये वारंवार काही ना काही कारणांमुळे जावेच लागते. त्यामुळे पूर्ण 10-12 तास तशा अवस्थेत राहावे लागते. ना पाणी पिता येते, ना नैसर्गिक कॉलसाठी जाता येत! सुरुवातीला खूप त्रास झाला; पण आता सवय झाली.
इथे संयुक्त अरब अमिरातीमध्ये 7 अमिराती आहेत. त्यांची आरोग्य व्यवस्था काहीशी वेगवेगळी असली, तरी एकत्र जोडलेली आहे. मार्च, एप्रिलपासून खूप केसेस वाढल्या; पण जून मध्यानंतर कमी होत आहेत. फारसा लॉकडाऊन नाही. पण लोक मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टनसिंगचे नियम काटेकोर पाळत आहेत.
गेली चार महिने अजून तरी मी कोरोनाबाधित नाही. कदाचित होऊनही गेला असेल मला; पण व्यायामातील सातत्य, हॉस्पिटलमध्ये काटेकोर काळजी, आहार कमी; पण उत्तम प्रतीचा आणि मुख्य म्हणजे ‘अंनिस’ची सकारात्मक विचारसरणी यामुळे फायदा झाला असेल. देवधर्माची दारं जेव्हा या संकटकाळात बंद झाली, तेव्हा वैद्यकीय विज्ञानाच्या सहाय्याने मानवजातीला मदत करता येते आहे, याचा अभिमान वाटतो.