अंनिस कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न करते

विजया चंद्रकांत श्रीखंडे -

माझे शिक्षण ग्रामीण भागात बी.ए. पर्यंत झाले. गावामध्ये मुलींच्या शिक्षणाला विशेष महत्त्व पण नव्हते. आमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होते. प्रत्येक सण, उत्सव साजरे करायचे. त्यात वटसावित्री, संतोषीमाता, वैभवलक्ष्मी असे उपवास व व्रत करायचे. त्यावेळी मनामध्ये या उपवास, पूजापाठ याविषयी भीतीयुक्त आदर होता. वयाच्या २१ व्या वर्षी लग्न झाले. माझे पती चंद्रकांत श्रीखंडे यांना पूजेबद्दल अजिबात आस्था नव्हती. सत्यनारायणाच्या पूजेला ते बसले नाही. मी एकटीने ती पूजा केली. वयाच्या ४०-४५ च्या दरम्यान नागपूरमध्ये श्याम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चालायचे. त्यावेळी माझे पती त्यांच्या व्याख्यानाला जायचे. मला मात्र त्यामध्ये विशेष असे काही वाटले नाही.

एकदा वर्धामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे शिबिर घेतले होते. ती बातमी पेपरमध्ये आली. तेव्हा माझे पती आणि मी त्या शिबिराला गेलो. तिथे डॉ. दाभोलकरांचे बोलणे, दुसर्‍याला समजावून सांगण्याची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत आणि शिस्त, कुणालाही न दुखावता समाजातील असलेल्या अंधश्रद्धा यावर केलेले भाष्य यामुळे आम्ही उभयता प्रभावित झालो. आम्ही तेव्हा डॉ. दाभोलकरांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांना विदर्भामध्ये हे काम वाढले पाहिजे, त्याची खंत त्यांची बोलून दाखविली. काही दिवसांनंतर नागपूरमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा निर्माण झाली. अशा प्रकारे मला अंनिसबद्दल माहिती मिळत गेली आणि नकळत मी अंनिसमध्ये सामील झाले.

माझ्या माहेरी संत मंडळी यांचे येणे-जाणे जास्त असायचे. या संत मंडळींसोबत येणारे शिष्यगण, त्यांच्या वागण्याची पद्धत आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो; परंतु डॉ. नरेन्द्र दाभोलकर जेव्हा नागपूरला आले आणि माझ्या पतीने त्यांना स्टेशनवरून आमच्या घरी आणले तेव्हापासूनच त्यांचा, त्यांच्यासोबत येणार्‍या कार्यकर्त्यांचा वावर एवढा सहज असायचा की, मला असा मनापासून आनंद व्हायचा आणि वाटायचे की ‘हेच खरे संत.’ त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जाणे, शिक्षकांचं प्रशिक्षण, चमत्कारांचे सादरीकरण तसेच पूजापाठामध्ये काहीच तथ्य नाही, हे मनाला पटले आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने माझा पूजापाठ हळूहळू सुटत गेला. याला कारण माझे पतीपण आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणे खरोखर अवघड आहे. समाजामध्ये तसेच आपल्या नातेवाईकांमध्ये सर्वत्र पूजापाठ चालतो आणि पूजापाठ करणारा असेल आणि मनाने कितीही वाईट असला तरी, त्याला समाजामध्ये मानाचे स्थान मिळते आणि जो देवच मानत नाही आणि अंधभक्तीवर विश्वात ठेवत नाही त्याची समाजामध्ये अवहेलना केली जाते. हे कटू वास्तव आहे.

नास्तिकता, विवेकवाद, विज्ञानवाद सहज अंगवळणी पडेल आणि विज्ञानवादी माणूसच उत्क्रांत म्हणून ओळखला जाईल, असे समजून अंनिसचे काम पुढे चालू ठेवणे, हाच योग्य मार्ग आहे असे मनाला समजावले. अंनिसमध्ये काम करणे आणि अंनिसमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विशेष त्रास झाला नाही. कारण विभक्त कुटुंब व्यवस्था आणि माझे पती स्वत: अंनिसचे काम करणारे असल्यामुळे सहज सोपे झाले.

अंनिसमध्ये काम करताना समाजाकडून आपल्याबद्दल चांगली भूमिका किंवा दृष्टिकोन राहील अशी अपेक्षाच करू शकत नाही. त्यातही स्त्रियांबद्दल नकारात्मकच भूमिका समाजामध्ये आढळते. अशाही परिस्थितीमध्ये हळूहळू समाजामध्ये बदल दिसतो. डॉक्टरांचा खून झाल्यानंतर लोकांना त्यांच्या कार्याबद्दल अधिक तीव्रतेने जाणीव झाली. विज्ञानात चमत्कार नसतातच. चमत्कार म्हणजे रासायनिक-भौतिक, यांत्रिक करामत असू शकते, असे प्रबोधन लोकांना पटायला लागलेत.

गौतम बुद्ध, महावीर, वारकरी पंथ आणि समाजसुधारक यांची धर्मचिकित्सेची परंपरा ‘अंनिस’ पुढे चालविते. कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न करते. डॉ. दाभोलकरांचे हे विचार त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि त्यांच्या कार्यामधून समाजामध्ये दिसून आले. डॉ. दाभोलकर जेव्हा जेव्हा नागपूरमध्ये यायचे त्या-त्या वेळी आम्ही उभयता त्यांच्यासोबत असायचो. शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांचे कार्यक्रम, तसेच मान्यवरांच्या भेटीगाठी यामध्ये आम्हालासुद्धा खूप आदर मिळायचा. असा चांगला अनुभव मिळायचा.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य जसे शहरामधून होते, तसे खेडेगावातसुद्धा व्हायला पाहिजे. कारण खेड्यांमध्ये अंधश्रद्धा जास्त असतात, त्यासाठी कुणाच्या तरी ओळखीने तिथे कार्यक्रम घ्यायचा तर ते तेव्हा हो म्हणायचे. उत्साह दाखवायचे आणि प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर नकार कळवायचे. आठवड्यामध्ये एकदा मीटिंग घ्यायची तर सकाळपासून माझे पती कमीत कमी १५ ते २० लोकांना फोन करायचे; परंतु मीटिंगला केवळ ३ किंवा ४ लोक हजर असायचे.

आपल्याला अंनिसचे काम स्वयंप्रेरणेने करायचे आहे. या कामात समाजाकडून प्रशंसा कमी आणि हेटाळणी जास्त असा प्रतिसाद मिळतो. समाजात वर्षानुवर्षे असलेला गैरसमज, अज्ञान, मानसिक गुलामीमुळे लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडताना प्रथम प्रखर विरोध मग दुर्लक्ष आणि आपले विचार पटले की, हळूहळू स्वीकार. अशा टप्प्यातून चळवळ रुजते, अंधश्रद्धा निर्मूलन होते. त्यामुळे चळवळ रुजायला खूप वेळ लागतो. आपला संयमीपणा आणि सातत्य यावर समाजबदल अवलंबून असतो.

अंनिसचे काम करताना क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकीची समाजाला गरज असते. हे डॉ. दाभोलकर यांचे वाक्य सतत ध्यानात ठेवायला पाहिजे.

विजया चंद्रकांत श्रीखंडे (नागपूर)

संपर्क : ९५२७५ ८२२०९


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]