डॉ. दीपक माने -
भोंदू काका महाराजाला बेड्या; सातारा पोलिसांची कारवाई
पैशांचा पाऊस पाडून कोट्यवधी रुपये देतो, वीज पडलेले काश्याचं भांडं कंपनीला देऊन कोट्यवधी रुपये मिळतील, असे सांगून वेळोवेळी तब्बल ३६ लाख रुपये घेऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी कपडे भवानवाडी, ता. पोलादपूर, जि. रायगड येथील भोंदू महाराजास सातारा शहर पोलिसांनी अटक केली. पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज असे त्या संशयिताचे नाव आहे. अमित श्रीरंग शिंदे (वय ४२, रा. नाडे, ता. पाटण.सध्या रा. रविवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार काका महाराजावर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना २०२१ ते २०२३ या कालावधीत वेळोवेळी घडली आहे. अमित शिंदे शेतकरी आहेत. ऊसतोड टोळी आणण्यासाठी ते २०२१ मध्ये पोलादपूर येथे गेले होते. तेथे पंढरीनाथ पवार ऊर्फ काका महाराज याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर काका महाराजाने हातकणंगले येथील एका माणसाकडे वीज पडलेले काश्याचं दुर्मिळ भांडं आहे. त्याचा वापर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये केला जातो. कंपनी अशा भांड्यासाठी ५० ते १०० कोटी रुपये देते. ते भांडे घेण्यासाठी लाखो रुपये लागतील. तू ते पैसे दिले तर ते विकून त्यातून पैसे मिळतील, असे भोंदू महाराजाने सांगितले. या घटनेनंतर काका महाराज आणि अमित यांच्यात वारंवार फोनवर बोलणे होत होते. काश्याच्या भांड्याला गिऱ्हाईक आल्याचे सांगून भोंदू महाराज तक्रारदारांच्या साताऱ्यातील घरी आला होता, तेव्हा त्या काश्याच्या भांड्यावर आलेले जेलीचे आवरण काढण्यासाठी एक विशिष्ट कोट लागतो. तो कोट कंपनीचे लोक भाड्याने घेऊन येतात. आवरण काढल्यानंतर कंपनीचे लोक लगेच ५० कोटी रुपये देतील असे आमिष दाखवले. त्या कोटचे भाडे व कंपनीचे लोक बोलवण्यासाठी १४ लाख रुपये लागतात असे सांगून भोंदूबाबाने पुन्हा पैसे मागितले. यामुळे अमित यांचा भोंदूबाबावर विश्वास बसला व त्यांनी ४ लाख रुपये रोख दिले.
त्यानंतर भोंदूबाबाने पाच वेळा हातकणंगले, पन्हाळा येथे अघोरी पूजा व जादूटोणा एकांतात करावा लागेल, असे सांगून वेळोवेळी एकूण २८ लाख रुपये रोख व ऑनलाईन स्वरुपात घेतले. पैसे लवकरच मिळतील अशी अपेक्षा असताना भोंदूबाबा प्रत्येकवेळी हे भांडे गरम झालं आहे. भांड्यावर साप आले आहेत. शेवटच्यावेळी भांडं गरम होऊन ते भांडं जळाले असल्याचे खोटे सांगितले. यामुळे अमित शिंदे यांनी भोंदूबाबाकडे नोव्हेंबर २०२२ पासून २८ लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लावला.
जानेवारी २०२३ मध्ये काका महाराजाने अमित यांना जुन्या गोल नाण्यावर जादूटोणा करून एक केमिकल टाकलं की, त्याचे आर.पी.कॉईन तयार होतात. त्या कॉईनची कंपन्यांना गरज असते व त्यातून चांगले पैसे मिळतील. ते पैसे मिळाले की, सर्व पैसे परत करतो, असे सांगितले या कॉईनसाठी ४ लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगून पुन्हा पैसे घेतले. महाराजाने काळी बाहुली, मंत्र, लिंबू, अंगारे, हळदी-कुंकू याचा वापर करून जादूटोणा चमत्कार करून क्वॉईन तयार केले. मात्र कंपनीने ते क्वॉईन घेतले नसल्याचे सांगितले. काका महाराजाने वेळोवेळी ३६ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमित यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तपासासाठी गुन्हा प्रकटीकरण विभागाला सांगितले. या पथकाने भोंदू महाराजाला अटक केली आहे. या कारवाईत फौजदार सुधीर भोरे, पोलिस निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला.
सातारा अंनिसचे निवेदन
सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. फसव्या विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हातचलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत.
पैश्याचा पाऊस ही अंधश्रद्धा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा शाखेचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी केले आहे. जादुटोणा विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा अशी मागणी या निमित्ताने अंनिस करत आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख यांना अंनिसचे शिष्टमंडळ भेटून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी जिल्हाव्यापी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत अशी मागणी करणार आहोत.
– डॉ. दीपक माने, सातारा