धर्मांधांपासून प्रा.महमूद यांना वाचवा! ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

रवी आमले - 9325206094

जर तुमचा देश धर्मवेड्या लोकांच्या हाती असेल तर लोकांना साधा ‘कॉमन सेन्स’ वापरायला सांगणेही किती धोक्याचे व त्रासदायक असू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सोमाली प्रा. महमूद जामा अहमद.

33 वर्षांचे प्रा. महमूद हे हर्गेसा विद्यापीठात मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आपले वकिली शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी हर्गेसा विद्यापीठातून शांती आणि संघर्ष अध्ययन या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सामाजिक प्रश्न व सुधारणांच्या बाबतीत ते सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. जमातवाद आणि भेदभाव यांच्या विरोधात 3 विधेयके सोमालियाच्या संसदेत मांडली जावीत, यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यासाठी लोकप्रबोधन करून त्यांनी 5000 सोमालियन नागरिकांच्या सह्या मिळवण्यात यश मिळवले. ही विधेयके संसद सचिवांपुढे सादर करण्यातही ते यशस्वी झाले होते. सोमालियाच्या सद्यःस्थितीवर त्यांनी थहरीं What ­are the Obstacles for Somalis in terms of State Formation and Development आणि Political Islam ही दोन पुस्तके लिहिली आहेत. महमूद यांनी सोमाली विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राचे शिक्षण देण्यासाठी एक अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम पुढे सोमालियाच्या National Ministry of Education (शिक्षण मंत्रालय) ने आपल्या शैक्षणिक धोरणाचा एक भाग बनविला. त्यांच्या या कृतिशीलतेचा परिणाम म्हणून सोमाली समाजात त्यांची एक ओळख निर्माण होऊ लागली. त्यातूनच त्यांनी हर्गेसाच्या महापौरपदासाठी असणार्‍या निवडणुकीत भागही घेतला.

एवढ्या कमी वयात आपल्या देशासाठी एवढे मोठे योगदान देणार्‍या प्रा. महमूद यांना फेब्रुवारी 2019 पासून मात्र त्यांच्याच देशाच्या लोकांकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येणे सुरू झाले. एवढेच नाही, तर ज्या देशाने त्यांचा विचार हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनविला, त्याच देशाने त्यांना तुरुंगात देखील पाठविले आणि त्यामागचं कारण आहे त्यांची एक फेसबुक पोस्ट…

नेमकं काय घडलं?

16 फेब्रुवारी 2019 ला महमूद यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले ज्याचे शीर्षक होते ईश र्धेी ऋीशश? अर्थात ‘तुम्ही मुक्त आहात का?’

त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी 2019 ला प्रा. महमूद यांनी ‘फेसबुक’वर एक साधा प्रश्न विचारला होता,

त्याचा थोडक्यात आशय असा होता,

जर प्रार्थना केल्याने पाऊस पडतो, तर आपल्या (सोमालिया) देशात दरवर्षी दुष्काळ का पडतो?

व युरोपीय देश अशी कोणती प्रार्थना करतात की त्यांच्या देशात चांगला पाऊस पडतो?

पावसाच्या या प्रश्नाचा विचार आपण जरा अधिक वैज्ञानिक पद्धतीने करायला नको का?’

प्रा. महमूद यांची ही पोस्ट ‘व्हायरल’ झाली आणि धर्मांधांच्या भावना दुखावल्या. त्यांनी महमूद यांना जीवे मारायच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. 21 मार्चला प्रा. महमूद यांना ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक झाली आणि कोर्टात त्यांच्यावर केसही चालवली गेली. केस चालू असताना त्यांचा अनेक प्रकारे छळ झाला. ही अटक करताना कुठल्याही न्यायालयीन आदेशाशिवाय त्यांचा मोबाईल, लॅपटॉप जप्त करून त्यांतील ‘डेटा’ तपासण्यात आला. त्यांच्या कस्टडीदरम्यान एके दिवशी तर सुरक्षारक्षकानेच त्यांच्यावर मशीनगन रोखली आणि धमकी दिली की, प्रा. महमूद यांनी त्यांच्या ईशनिंदेच्या पापासाठी तात्काळ प्रायश्चित मागावे; अन्यथा तिथेच त्यांना गोळ्या घालण्यात येतील.

20 एप्रिलला महमूद यांना पहिल्यांदा कोर्टापुढे हजर करण्यात आले. यावेळी महमूद यांनी जामीन मिळावा, म्हणून कोर्टाकडे विनंती केली; पण ती विनंती कोर्टाने फेटाळून लावली. यानंतर मात्र महमूद यांना न्यायालयाकडून असणार्‍या सर्व अपेक्षाच संपल्या. त्यांनी अधिकार्‍यांना कुठलेही सहकार्य व स्वतःचा कुठलाही बचाव न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पवित्र्याने खुद्द न्यायालय चकित झाले. महमूद यांची तपासणी करण्यासाठी न्यायालयाने त्यांना मनोरुग्णालयात पाठविले.

30 एप्रिल 2019 ला केसचा निकाल लागला आणि एका ‘फेसबुक पोस्ट‘साठी त्यांना चक्क अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात झाली. पुन्हा त्यांना फाशीच द्यावी, यासाठी याचिका दाखल केली. पण कोर्टाने थोडा शहाणपणा दाखवत ती नाकारून अडीच वर्षांची शिक्षाच कायम ठेवली.

सोमालियाच्या राष्ट्रपतींनी 27 जानेवारी 2020 ला प्रा. महमूदवर दया दाखवून तुरुंगातून त्यांची सुटका केली. तोपर्यंत प्रा. महमूद यांना तुरुंगात 10 महिने पूर्ण झाले होते. ही सुटका करतांना प्रा. महमूद यांना अशी तंबीही देण्यात आली की, पुढील पाच वर्षे त्यांनी सर्व प्रकारच्या अध्यापन कार्यांपासून व विद्यापीठापासून दूर राहावे.

प्रा. महमूद यांचा तुरुंगवास संपला असला तरी त्यांच्यावरील संकट काही अजून गेलेले नाही. तिथल्या धर्मांधांनी त्यांचाही दाभोलकर करायचे ठरवले आहे. ते प्रा. महमूद यांना व त्यांच्या घरातील लोकांना सतत धमक्या देत आहेत. तिथला स्थानिक इमाम आदम सुन्ना याने शुक्रवारच्या प्रार्थनेत प्रा. महमूद यांना त्यांच्या या ईशनिंदेच्या पापासाठी देवाघरी पाठवण्याचे आवाहन स्थानिकांना केले आहे. असे करताना आपण आपल्याच धर्मबांधवांना एक गंभीर गुन्हा करायला प्रवृत्त करतोय, याची पुसटशी जाणीवही त्यांना नाही; उलट इमामाच्या मते, यात प्रा. महमूद यांचेच भले आहे. कारण त्यांचा मृत्यू जर धर्मरक्षकांच्या हातून झाला, तर मृत्यूनंतरच्या जीवनात त्यांना कमी त्रास होईल.

ईशनिंदा, भावना दुखावणे या नावाखाली स्वतःचे अधिकार सत्ता शाबूत ठेवणे, हे सर्वच धर्मांमध्ये आणि देशांमध्ये आढळते. वस्तुतः सत्याला चिकित्सेची भीती कधीच नसते, असूच शकत नाही; याउलट असत्याला चिकित्सेची प्रचंड भीती असते. कारण त्याला माहीत असते की, चिकित्सेचा थोडाही प्रकाश ‘त्या’ असत्याचे खरे स्वरूप जगापुढे आणू शकतो. म्हणून त्या असत्यासोबत ज्यांचे हितसंबंध जोडलेले आहेत, ते लोक सतत ईशनिंदा, भावना दुखावणे, धर्मरक्षण अशा वेगवेगळ्या नावांखाली चिकित्सेपासून स्वतःला आणि आपल्या असत्याला दूर ठेवतात. मग ते कधी सोमालियात महमूदला तुरुंगात टाकायला सरकारला भाग पाडतात; तर कधी भारतातील दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करतात. यातही सतत संयत भाषा वापरणार्‍या दाभोलकरांचा सरळसरळ खून करणार्‍यांचा धर्म अधिक कट्टर की, एका ‘फेसबुक पोस्ट’साठी महमूदला तुरुंगात टाकणार्‍यांचा धर्म अधिक कट्टर, असा प्रश्न काही लोकांना सतत पडत असतो. ‘आमची नव्हे; त्यांची चिकित्सा आधी करा,’ म्हणणारे लोकही धर्मांधांप्रमाणेच कळत-नकळत असत्याचे चिकित्सेपासून रक्षण करत असतात.

हर्गेसा विद्यापीठात सोमालियाच्या शालेय अभ्यासक्रमात एवढे भरीव योगदान देणार्‍या, जमातवाद आणि भेदभाव यांच्या विरोधात लोकमत तयार करणार्‍या या 33 वर्षांच्या तरुण सोमालियन प्राध्यापकाला त्याच्याच देशात, त्याच्याच लोकांनी दिलेल्या जीवघेण्या धमक्यांमुळे आता अज्ञातवासात जावे लागले आहे.

‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ ही संस्था मानवाधिकारांसाठी खासकरून निधर्मी लोकांच्या मानवाधिकारांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. सोमालिया सरकारने प्रा. महमूद यांचा जीव वाचावा, यासाठी आवश्यक ते सर्व संरक्षण पुरवावे म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर तसा दबाव आणायचा प्रयत्न ही संस्था करत आहे.

या संस्थेने प्रा. महमूदसाठी शक्य त्या सर्व प्रकारे आवाज उठवण्याचे आवाहन जगभरातील सर्व मानवतावादी, विवेकवादी लोकांना केले आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]