सुरेश साबळे - 9850380601
(लोकभाषेची ‘माहूतगिरी’ करणारा महाकवी : वामनदादा कर्डक)
जन्मशताब्दी वर्ष (2021-22)
(15 ऑगस्ट 1922 ते 15 मे 2004)
भारतीय संगीताला एक परंपरा आहे, एक इतिहास आहे. साधारणत: बाराव्या शतकापासून गीत हा वाङ्मयप्रकार खर्या अर्थाने प्रगतिपथावर आला. पंधराव्या आणि सोळाव्या शतकात गीतवाङ्मयाला फारसे चांगले दिवस नव्हते, तर सोळाव्या व सतराव्या शतकात गीतवाङ्मयाने वेगळ्या वळणाने प्रवास केला. या काळात लावणी व पोवाडा हा गीतप्रकार प्रभावी आणि महत्त्वाचा ठरला.
आधुनिक गीतरचनाकारांमध्ये लोककवी वामनदादा कर्डकांचा उल्लेख करण्यात येतो. बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचार समाजमनात पोचवताना समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धांवर प्रहार करणारे गीतलेखन या लोककवीने केले आहे. लोकरंजनासोबत समाजप्रबोधन तथा जनजागृतीचा वसा चालविला. वामनदादा कर्डकांनी समाजप्रबोधनाचे कार्य करताना मरगळ आलेल्या समाजमनात, माणसाच्या समूहात माणुसकीच्या शिकवणीने स्वाभिमानी ज्योत पेटवून विज्ञानवादी दृष्टिकोन मांडताना लोकभाषेचा सक्षमतेने उपयोग केला. सामाजिक बांधिलकी मानणार्या लोककलावंतांच्या परंपरेतील वामनदादा कर्डक एक महत्त्वाचे नाव. अभिजात कलावंत, लोककलेचा निस्सीम उपासक आणि नवोदित कलावंतांचा आश्रयदाता म्हणूनही त्यांचं जनमानसात अद्वितीय असं स्थान आहे. चांगला शब्द, चांगला गळा, चांगला सूर आणि चांगली तालबद्धता यासाठी त्यांची शोधयात्रा चालू होती. समाजातील वाईट रुढी-परंपरांवर आघात ही त्यांच्या गीतांची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. एकाच वेळी ते विविध आशय-विषय घेऊन गीतनिर्मिती करत. सामान्यांच्या अवतीभोवती घडणार्या घटना, त्यांच्या गीतांचे विषय होत. त्याचवेळी ते देशपातळीपर्यंत, तर अनेकदा आंतरराष्ट्रीय समस्या व विषयालाही सहज हात घालणारी गीतनिर्मिती करत.
प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक आघाडीची पताका निष्ठेने आणि खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेऊन तेजस्वी लेखणीने आणि कणखर वाणीने बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मराठी भाषकांसह हिंदी गीतरचनेतून देशाच्या विविध प्रांतांत जात. महाराष्ट्राच्या घराघरांत, वाडी-वस्त्यात, खेड्यापाड्यांत आणि माणसांच्या मनामनांत नेऊन पोचविणारे वामनदादा कर्डक; खर्या अर्थाने एकाच वेळी समाजशिक्षक, लोकशिक्षक आणि प्रागतिक चळवळीचे द्रष्टे भाष्यकार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. इतकेच नाही, तर वामनदादा कर्डक हे सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे ऊर्जाकेंद्र होते. चळवळीचे ऊर्जाकेंद्र बनलेले वामनदादा विचारांची पेटती मशाल होऊन जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पायाला भिंगरी लावून समाजात कायम फिरत राहिले.
जन्म आणि बालपण :
यशाच्या उच्च शिखरावर पोचलेल्या बहुतांश व्यक्तींच्या कार्याला बहुधा पूर्वपरंपरेचा वारसा लाभलेला असतो. त्यातही बरीच नावं अशी असतात की, त्यांना त्यांच्या कार्याबाबत कोणताही कौटुंबिक वारसा नसतो. आपल्यातील सुप्त गुणांच्या बळावर आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही ते आपले अंतिम ध्येय गाठत असतात. अशा अपवादात्मक व्यक्तींमध्ये वामनदादा कर्डकांचा उल्लेख करता येईल. त्यांच्या कुटुंबात वामन कर्डकांच्या पूर्वी इतर दुसर्या कोणीही काव्यनिर्मिती केलेली नव्हती. तरीही बदलत्या काळाचा वेध घेणारी काव्यनिर्मिती करून त्यांनी स्वयंप्रयत्नाने आपले व्यक्तिमत्त्व उभे केले. मराठी काव्यप्रांतात आपली प्रतिभा सिद्ध केली. अशा वामनदादा कर्डकांचा जन्म 15 ऑगस्ट, 1922 रोजी तबाजी कर्डक व सईबाई या आई-बापाच्या कुटुंबात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या दुसोंडी या लहानशा खेड्यात झाला. सदाशिव मोठा भाऊ व सावित्री लहान बहीण. 1936 साली वडील तबाजी कर्डकांचे निधन झाले. वयाच्या 14-15 वर्षी भाऊ सदाशिवने आई व भाऊ वामनला मुंबईला हलवले. मोठा भाऊ मुंबईत गिरणीत काम करायचा. गावी दुष्काळी स्थिती असल्याने खायची आबाळ होत होती. मुंबईत तरी कामधंदा करता येईल, म्हणून भावाने यांना मुंबईला नेले. मुंबईत गेल्यानंतर सुरुवातीला सायन परिसरात कोळशाच्या वखारीत कोळसा वेचायचा आणि कुर्ला येथे जाऊन विकायचे. त्यातून येईल त्या पैशात गुजराण करायची. या काळात विविध प्रकारची कामं केली. साधारणत: तो दुसर्या महायुद्धाचा काळ होता. या काळात बॉम्बस्फोट होतो, माणसं मरतात. म्हणून अनेक धनिक लोक आपल्या घरात, परिसरात चर खोदून ठेवत असत. त्यामुळे अणुबॉम्ब टाकला तर सुरक्षितता म्हणून या चरात (खड्ड्यात) थांबता येईल. अशी चर/खड्डे खोदण्याची कामं केली. विविध प्रकारच्या कामात बोर्ड रंगविणे, चिक्की विकणे, मातीकाम, मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी मजुरी केली. यासोबतच ते ज्या परिसरात राहत, तेथील ‘समता सैनिक दला’त जाऊ लागले. त्यामुळे त्यांना सामाजिक मूल्यांची जाण होऊ लागली. काही दिवसांनी वामन कर्डक ‘समता सैनिक दला’त लेझीम व लाठी-काठी शिकल्यामुळे ते ‘लेबर वेलफेअर सेंटर’ (कामगार कल्याण केंद्र) मध्ये लहान मुलांना लेझीम शिकविणारे मास्तर झाले. या काळात ते मुंबईतील बी.डी.डी.च्या तेरा क्रमांकाच्या चाळीत राहत होते. वास्तविकत: वामनदादा कर्डकांचे कोणत्याच प्रकारचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते; म्हणजे त्यांना अक्षरओळखही नव्हती. परंतु मुलांना लेझीम व लाठी-काठी शिकवतात म्हणून परिसरातील लोक त्यांना ‘मास्तर’ म्हणत. एके दिवशी एक अनोळखी माणूस त्यांच्याकडे गावाहून आलेले पत्र घेऊन आला आणि म्हणाला, “मास्तर, एवढं पत्र वाचा!” वामन कर्डकांना लिहिता-वाचता येत नसल्याने त्यांनी त्या माणसाला दम दिला की, “मी काय करतोय, दिसत नाही का?” तो माणूस निघून गेला आणि वामनदादा कर्डक अस्वस्थ झाले. त्यांचे मन मनाला खाऊ लागले. त्यांनी लेझीम शिकविणे थांबवून देहलवी नामक सरांकडे जाऊन बसले. त्यांना खूप वाईट वाटत होतं, डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. देहलवी सरांनी त्यांना समजून घेतले आणि विचारले की, “अरे कर्डक, तुम रो रहे हा?” ते म्हणालो, “हाँ सर, मुझे लिखना-पढना नहीं आता।“ “आठ दिन में आ जाएगा।” देहलवी सरांमुळे त्यांना लिहिता-वाचता येऊ लागले. नंतरच्या काळात दुकानांवरील पाट्या वाचून ते जोडाक्षरं शिकले. अशा प्रकारे वाचन-लेखनांचा सराव वामनदादांनी सुरू केला. त्याचे रूपांतर नंतर छंदात झाले. त्यांनी नंतर ‘लेबर वेलफेअर सेंटर’मध्ये असलेल्या विविध ग्रंथांचे वाचन केले. चौफेर वाचनामुळे त्यांच्या विचारांच्या कक्षा रूंदावल्या. अशा रीतीने आंतरिक इच्छेतून शिक्षण घेत त्यांनी स्वकर्तृत्वाने आयुष्याची धावपळ केली.
वामनदादा कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवन जगण्याची पद्धती बघून एक सार्वजनिक सत्य स्वीकारले – व्यक्तिगत दु:खापेक्षा सामाजिक दु:ख हे सर्वव्यापी असते. या जाणिवेतूनच वैयक्तिक सुख-दु:खे निवळतात. हा त्यांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन राहिला. त्यामुळे त्यांनी संसार, धनदौलत याला व्यक्तिगत आयुष्यात फारसे महत्त्व देत बसण्यापेक्षा लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकरंजनास आपल्या जगण्याचे जीवनमूल्य ठरविले. सतत फिरस्तीवर राहून एका निःस्वार्थी सेवकाची भूमिका पार पाडण्याच्या कार्याशी बांधिलकी मानून लोकमनाची मशागत करत समाजजागृतीतून समाजमन चेतवले.
निर्मिती : समाज आणि चळवळ
चिंतनशील स्वभाव, कलासक्त वृत्तीने वाचन, गीत-काव्यलेखन, चित्रपट-नाटक, आंबेडकरी जलसे पाहणे असे मुंबापुरीत त्यांना छंद लागले. त्यातून त्यांनी काही नाटकं, चित्रपटकथा व मराठी सिनेमासाठी गीते लिहिली. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर हिंदी चित्रपट तथा गीतांचा प्रभाव होता. सामाजिक सुधारणा व प्रचारकार्यासाठी मुंबईत मेळ्यासाठी त्यांनी गीतं लिहिली आणि गायलीही. परंतु त्या काळात गीतकार म्हणून नाव लिहिण्याची पद्धत रूढ झालेली नव्हती. 1941-42 साली नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेच्या निमित्ताने झालेले पहिले त्यांचे दर्शन वामनदादांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यातूनच 3 मे, 1943 ला सुप्रसिद्ध हिंदी कवी प्रदीपच्या देशभक्तीपर गीताचे त्यांनी विडंबन केले. मुंबईस्थित शिवडीच्या बी.डी.डी. चाळीतील सभेत गायले आणि येथूनच त्यांचा काव्यगायनाच्या क्षेत्रातील निर्णायक स्वरुपाचा प्रवास सुरू झाला. लोककवी वामनदादा कर्डकांनी ठरविले की, जो समाज माणसाच्या माणूसपणाला नाकारण्यात धन्यता मानतो, त्या समाजातील अनिष्ट प्रथांचे बसलेले चटके, दु:ख, दैन्य, दारिद्य्र, नैराश्य ही मानसिक व शारीरिक कमजोरी नाकारून स्वत:ची ओळख करून देण्याची प्रेरणास्रोत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मानले. कार्याशी स्वत:ला, स्वत:च्या कलेला समर्पित करण्याचा संकल्प केला. यातून पुढे त्यांनी कविता आणि चळवळ परस्परांना पूरक कशी असते, याचा परिपाठ काव्यगीताच्या रुपाने घालून दिला.
कुणी पंडित ग्यानी, फिरे पेरीत वाणी
त्याची ऐकून गाणी, आणि ठेवून ध्यानी
हृदयाच्या आत आम्ही साठवतो ॥1॥
कधी येतात नेते, सभा संदेश देते
मनाला वेधणारे, भले जनतेचे नेते
खेड्या–खेड्यात आम्ही पाठवतो ॥2॥
असा वामन गाणारा, सदा जन जागवणारा
भीमसंदेश देण्या, फिरे होऊन वारा
लोकांना लोक तोच भेटवतो ॥3॥
वामनदादा कर्डकांच्या कवितेचे विषय, ध्येय ते आपल्या काव्यातून सांगतात. कविता, गायन आणि चळवळ इत्यादीच्या समन्वयातून माणसं जोडताना ते व्यक्तिगत सुख-दु:खात फारसे अडकून पडले नाहीत. त्यांनी काव्य आणि गायन कायम माणसाच्या कल्याणाला वाहिले तथा समाज व देशाच्या हितासाठी नाते सांगत आपल्या कार्याशी प्रामाणिक राहिले. दरम्यानच्या काळात त्यांची काही गीतं चित्रपटासाठी घेण्यात आली. चित्रपट निर्माते दत्ता मानेंच्या ‘सांगते ऐका’ या चित्रपटातील त्यांचे गीत –
सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी, सासुरवाडीला!
‘पंचाआरती’ या चित्रपटातील–
चल गं हरणे तुरूतुरू
चिमण्या उडती भुरूभुरू
रानमळ्याची वाट धरू!
याशिवाय –
ह्यो ह्यो ह्यो पाव्हणं
सखुचं मेव्हणं
सखूकडं बघून हसतोय गं
काहीतरी घोटाळा दिसतोय गं।
अशा प्रेमसुलभ भावनांची नजाकत असलेल्या गीतांसह बहीण-भावाच्या नात्याची कोवळिकता जपणारी वामन कर्डकांची गीतं त्याकाळी खेड्यापाड्यात विशेष गाजली.
बंधू रं शिपाया तू
दे रं दे रुपया
होळीच्या सणाला रं, चोळीच्या खणाला!
प्रबोधनकारी गीतकार व शाहीर म्हणतानाच वामनदादा कर्डकांचं जगणं हे कष्टकर्यांच्या, प्रागतिक व परिवर्तनाच्या फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील एका समर्पित कार्यकर्त्या कलावंताचं ‘ध्यासपर्व’ म्हणता येईल. निखळ मनुष्यतेचा उद्घोष करणार्या क्रांतिकारी गीतांचा बहुमुखी व बहुश्रृत दुर्लभ आविष्कार म्हणजे वामनदादा कर्डकांचे व्यक्तिमत्त्व म्हणता येईल.
वामनदादा कर्डकांच्या साध्या-सुलभ शब्दरचनांमुळे त्यांचं गाणं जनमानसात लोकप्रिय झाले, म्हणून त्यांची गाणी ‘लोकगीतं’ झाली. अभ्यास, चिंतनाचे अधिष्ठान त्यांच्या गीतरचनेला होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंदोलनं, त्यांचे ग्रंथ; तसेच त्यांच्या भाषणांमधून प्रभावित झालेले, मानवतेचा कैवार घेणारे तत्त्वज्ञान कर्डकांच्या गीताच्या केंद्रस्थानी होते. समान सामाजिक विचारसृष्टीतील परिवर्तनाचा विचार समाजात स्थापित करण्यासाठी वामनदादा कर्डकांनी आपल्या काव्यरचनांमधून सामान्यांच्या मनामनांत रुजविली. समाजाला अन्याय-अत्याचाराविरोधात, न्यायासाठी संघर्षरत करण्याकरिता जागविण्याची कामगिरी केली. या देशात पूर्वापार स्थापित झालेली आर्थिक विषमता, भांडवलशाहीतून, बाजारवादातून सामान्यांचे होणारे शोषण मांडताना वामनदादा कर्डकांनी सहज; पण थेट प्रातिनिधिक स्वरुपात व्यवस्थेला प्रश्न उपस्थित केले.
सांगा आम्हाला बिर्ला, बाटा
टाटा कुठाय हो !
सांगा धनाचा साठा
आमचा वाटा कुठाय हो!!
वामनदादा कर्डकांच्या रचनांचा आशयाच्या अंगाने विचार करता महामानवांचे जाज्वल्य विचारधन ठळकपणे दिसते. मनाला भावणारी सहज-सुलभ भाषा, लोककलेतील पारंपरिक संगीत, स्वभाव जागवणार्या शब्दांची निर्मिती आणि खड्या आवाजातील गायकी यांचा सुमधुर मेळ साधल्याने त्यांचं गाणं लोकांच्या ओठांवर आपसूकच येत गेलं आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं ऊर्जाबळ ठरलं. त्यांच्या रचनेतील शब्द कबीर व तुकाराम या संतांचा वारसा सांगणारे, तर लोकराजा शिवाजी व राजर्षी शाहूंच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांसह समाजक्रांतिकारक जोतिराव फुल्यांचे सामाजिक सत्यान्वेषण करणारे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक, सामाजिक तत्त्वज्ञान आत्मसात करून समाजात वावरले. म्हणून असेही म्हणावेसे वाटते की, पंढरीचा पांडुरंग मराठी मुलखासह बृहन्महाराष्ट्राच्या शेती-मातीतील माणसांपर्यंत पोचविण्याचे काम जसे संत तुकारामांनी केले, त्याच पद्धतीने महान ज्ञानी पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गावखेड्यात, वाड्या-वस्त्यांत आणि माणसाच्या मनामनांत पोचविण्याचे काम शाहिरी गायनाद्वारे वामनदादा कर्डकांनी नितळ मनाने केले आहे, म्हणून त्यांना आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा चेहरा म्हटले जाते. इतकेच नव्हे, तर लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी चळवळीतील खळाळता प्रवाह, वादळवारा होऊन तुफानातील दिव्यासमान आपल्या काव्यगायनाद्वारे 3 मे, 1943 ते 15 मे, 2004 पर्यंत अखंडितपणे तेवत राहिला, असेही म्हणता येईल.
विविध प्रकारातील बहुमुखी विषय घेऊन आलेली त्यांची कविता ठळकपणे पुढीलप्रमाणे विभागता येईल.
1) चरित्रात्मक कविता, 2) कष्टकरी-प्रागतिक-पुरोगामी सामाजिक चळवळीची कविता, 3) आंबेडकरी चळवळीची कविता, 4) राजकीय कविता, 5) धार्मिक कविता, 6) पारंपरिक लोकगीतसदृश कविता.
अशा विविध प्रकारातील बहुश्रुतपणा घेऊन आलेली 4 ते 5 हजार कवितांची निर्मिती त्यांनी केली. परंतु ही निर्मिती महाराष्ट्राच्या विविध भागात इतस्तत: पसरलेली असून ती एकत्रित होणे काळाची गरज आहे. यवतमाळचे प्रा. डॉ. सागर जाधव यांनी काही खंडांद्वारे या कवितेला संपादित केले, यापुढेही ते करणार असल्याचे ऐकिवात आहे. 1993 मध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या गीतगायनाला 50 वर्षेपूर्ण झाल्यानिमित्ताने बुलडाणा शहरात ‘गीत सुवर्ण महोत्सव’ समारंभ आयोजित करण्यात आला होता. 2001 मध्ये नागरी सत्कार आयोजित करून वामनदादा कर्डकांच्या 95 गीतांचा ‘समग्र वामनदादा कर्डक साहित्य खंड-1’ ला शीर्षकाने गीत संपादित करण्यात आले आहे. त्यांच्या गीतनिर्मितीबाबत असेही म्हणता येईल की, आशय आणि अभिव्यक्ती संबंधाने त्यांची कविता सकस सामाजिक जाणिवा, ध्येयनिष्ठा, परिवर्तनशील भूमिका, आवाहकता, भाषाशैली, गेयता या अंगांनी समृद्ध आहे. ‘माणसाचे गाणे’ गाणार्या वामन कर्डकांची निर्मिती पारंपरिक अभिव्यक्तीच्या पुढे जाणारी असून कष्टकरी, श्रमणार्या शोषितांच्या वेदनांची जिवंत अभिव्यक्ती असल्याने ती लोकमानसात रूजली. मानवी मूल्यांच्या पुरस्कारांकरिता प्रागतिक पुरोगामी चळवळीच्या मार्गाने वामनदादा कर्डकांनी जे अभूतपूर्व सादरीकरण केले ते अवर्णनीय असेच आहे.
1990-91 च्या काळात भारत देशात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे (ङझॠ) आगमन झाले. अभ्यासकांमध्ये ‘एलपीजी’च्या आगमनाने भल्या-बुर्या परिणामांची चर्चा होत होती. समर्थक उदात्तीकरणाने चर्चा करत होते, तर जाणकार-अभ्यासक जनतेची बाजू घेऊन अंदाज सांगत होते. आज ‘एलपीजी’ने आपला अक्राळ-विक्राळ पंजा संपूर्ण भारत देशावर पसरला आहे. त्यातून बेरोजगारांच्या फौजा आणि विविध उपक्रमांचे खासगीकरण, त्यातून संपत्तीचे होत असलेले केंद्रीकरण आपण पाहतोच आहोत. परंतु वामनदादा कर्डकांनी 1989-90 मध्ये कर्नाटकातील बीदर येथून आजच्या आर्थिक व सामाजिक भीषणतेविषयी भीती व्यक्त केली होती. ते कवितेत म्हणतात की-
टाटा, बिर्ला तरतील, बाकी सारेच उपाशी मरतील
सुरू होईल सारी स्पर्धा, त्यात मरेल भारत अर्धा
आमच्यातील काही कुपा–कुपाने चरतील
बाकी सारेच उपाशी मरतील!
दूरदृष्टीच्या वामनदादा कर्डकांनी चळवळीतील अनुभवाच्या, अभ्यासकाच्या भूमिकेतून मांडलेला वरील संदेश जसा महत्त्वाचा, तसाच या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार-कष्टकर्यांसाठी काय केले, ही वास्तवत: सांगताना ते आपल्या कवितेत म्हणतात की –
गिरणी मजुरांचे घाम गाळण्याचे
बारा तास होते, आठ तास केले
मजूरमंत्री होता तेव्हा भीम माझा
फर्मान ताजे काढले भीमाने ॥1॥
गुलामीच्या पोटी जन्म पावलेला
गुलामीत वामन होता घावलेला
हेरली भीमाने राष्ट्राची तिजोरी
तिजोरीत वाटे पाडले भीमाने ॥2॥
भारताची एकूण पूर्वापार रचना ही वर्णव्यवस्थेवर उभारलेली असून वर्णानुसार श्रमविभागणी, त्याशिवाय कामाची वाटणीही तशीच होती. परंतु लोकशाही स्वीकारल्यानंतर सामाजिक पुनर्रचनेनुसार माणूस केंद्रस्थानी आला. जशी ज्याची क्षमता, तशी कामाच्या विभागणीची मागणी वाढली, तरीही काही मंडळी माणसाच्या प्रतिष्ठेला न जुमानता धर्म-पंथाच्या आडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवरोध निर्माण करताना दिसतात. अशा वेळी वामनदादा सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहतात आणि आपल्या गीतात म्हणतात की –
माणसा इथे मी तुझे गीत गावे
असे गीत गावे तुझे हित व्हावे॥धृ॥
तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे
तुझे दु:ख सारे गळुनी पडावे॥1॥
एकाने हसावे, लाखाने रडावे
जुने सारे, सारे असे ना उरावे॥2॥
माणसाचे हित जपताना वामनदादा कर्डक माणसाच्या चांगुलपणाला वंदन करतानाच त्यांच्या सुखी व आनंदी जीवनाची कास धरतात व त्यांची लेखणी म्हणून लागते की –
वंदन माणसाला, वंदन माणसाला
दे मायेचे अन्न कायेचे चंदन माणसाला॥ धृ.॥
रणगाड्यांच्या रांगा आणि गडगडणार्या तोफा
सूचित करिती खचित आहे, मानवतेला धोका
असला फौजफाटा, असला शस्त्रसाठा
निर्दाळील, जग जाळील असले इंधन माणसाला॥2॥
कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दास
कष्टकर्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी पाश
वामन ऐक आता सांगे भीमगाथा
नको रुढीचे, जुन्या पिढीचे बंधन माणसाला॥3॥
शरीरशुद्धीसाठी माणूस विविध प्रकारची साबणं, परफ्युम वापरतो. सुगंधी अत्तर, सौंदर्य प्रसाधने वापरतो. शरीरशुद्धीबरोबरच मन:शुद्धी मानवाच्या विकासास कारणीभूत ठरत असते. हे तत्त्व जगणारे बुद्ध, कबीर, फुले या तीन गुरूंचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केले. शिवाय विद्या, स्वाभिमान आणि शील ही दैवतं स्वीकारून ते स्वयंदीप, स्वयंप्रकाशित झाले. वामनदादा आपल्या रचनेत म्हणतात की,
तन उजळे, पण मन उजळावे
सांगून गेले कबीर
पायी त्यांच्या नमे नीत शीर॥1॥
शिकवण सारी तथागताची
आली कबिरी होऊन सांची
तशीच वाणी जोतिबाची
देई मनाला धीर॥2॥
वामनदादा कर्डक सत्त्वशील विचारांची पालखी आपल्या समर्थ खांद्यावर वाहून नेणारा आणि आयुष्य झिजवणारा अस्सल लोककवी, गायक! समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्त्व. विचारक, चिंतक, अभ्यासकांना विचारधन पुरवणारा नायक. त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने आणि धारदार वाणीने समाज जागवला, चेतवला आणि पेटवला. ते एक प्रभावी गायक, गीतकार आणि फर्डे प्रबोधनकार म्हणून ख्यातकीर्त होते. केवळ कार्यक्रम सादर करणारे व्यावहारिक गीतकार नव्हते, तर श्रोत्यांच्या मनात ऊर्जा पेरत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य त्यांच्या गीतांत आणि वाणीत होतं. धनाने दरिद्री असलेले वामनदादा कर्डक अक्षरधनाचे कुबेर होते. गीतासाठी अर्थवाही आणि प्रभावी ठरणारी शब्दरचना ते करीत. कुंठीत मनाला समस्त भय-भेदांच्या कोंडमार्यातून मुक्त करणारी, मेंदूला समतेचा ऑक्सिजन पुरविणारी आशयघन गीतसंपदा त्यांनी निर्मिली. येणार्या पिढ्यांसाठी तिचे जाणीवपूर्वक संप्रेषण व्हायला हवे. भावी पिढ्यांसाठी त्यांची काव्यसंपदा जतन होणे गरजेचे आहे. वामनदादा कर्डकांनी आपल्या काव्यलेखनाद्वारे विविध विषयांना हात घालून दंभ-ढोंगांवर प्रहार करत समाजातील वाईटावरही बोट ठेवले.
वामनदादा कर्डकांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे कार्य आणि व्यक्तित्वावर चर्चा करताना 60-62 वर्षेगीतलेखन आणि गायनाला समर्पित करताना त्यांनी भारावलेपणाने कार्य केले. या भारावलेपणात जोष आणि होश सांभाळला. सामाजिक स्तरावर त्यांना मानसन्मान मिळालेही; परंतु शासकीय पातळीवर त्यांच्या कार्याची पाहिजे तेवढी दखल घेतल्याचे दिसत नाही. शब्दांची श्रीमंती लाभलेल्या वामनदादा कर्डकांची आर्थिक स्थिती मात्र शेवटपर्यंत प्रारंभी होती तशीच राहिली. वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाला असे आवाहन करावेसे वाटते की, 2021-22 हे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनाने शासकीय स्तरावर विविध उपक्रम राबवून साजरे करावे. वामनदादा कर्डकांच्या साहित्याचा समावेश विद्यापीठ, शालेय तथा प्राथमिक अभ्यासक्रमात करावा. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्येष्ठ समाजप्रबोधनकार कलावंतास वामनदादा कर्डकांच्या नावे एक पुरस्कार देण्याचे नियोजन करावे. विद्यापीठ स्तरावर वामनदादा कर्डकांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थी व अध्यापकांना वामनदादा कर्डकांचे साहित्य संशोधन अभ्यासता येईल. महाराष्ट्रातील विद्यापीठाने त्यांना मरणोत्तर डी. लिट. ही सन्मानाची पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा. साहित्य संस्कृती मंडळाने ‘समग्र वामनदादा कर्डक साहित्य’ या शीर्षकाने वामनदादा कर्डकांची संपूर्ण गीतं प्रकाशित करावीत. याबाबत शासनाकडे राजकीय व सामाजिक चळवळीने रेटा निर्माण करावा, जेणेकरून त्यांचे कार्य पुढच्या पिढीस प्रेरणादायी ठरू शकेल, नाही तर शेवटी त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास-
जेव्हा केश माझे गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
गोडी मधाची मजला होती जोवरी
लाख चिकटून होते मोहळापरी
अर्क संपता सारे पळू लागले
तेव्हा जीवन मला कळू लागले!
असे होऊ नये. लोककवी वामनदादा कर्डकांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन!
– सुरेश साबळे
संदेश निवास, आनंद नगर, चिखली रोड, बुलडाणा-443001
मो.नं. 9850380598