डॉ. लागूंचे बालपण शोधताना…

डॉ. ठकसेन गोराणे -

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंनिस’ च्या वार्षिक अंकासाठी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागूंची मुलाखत घेतली होती. त्यांच्या सुविद्य पत्नी आणि नाट्यकलावंत दीपाताईही हजर होत्या. त्यानंतर परत-परत भेटायला या, असा दोघांचाही आग्रह असायचा. मागील वर्षापर्यंत पुण्यात होतो, तेव्हा अधून-मधून भेटलो.

मुलाखतीदरम्यान जेव्हा-जेव्हा डॉ. दाभोलकरांच्या आठवणी जाग्या करणारा प्रसंग यायचा, तेव्हा त्यांना गहिवरून यायचे. ते स्तब्ध व्हायचे, शून्यात बघायचे, चेहरा निराश दिसायचा. हिमालयाच्या उंचीचा हा सिनेनाट्यकलावंत किती हळवा, कोमल मनाचा आहे, हे पाहून मन विनम्र व्हायचं. सामान्य कार्यकर्ता आला, त्याला पाहुणचार मिळण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणारा हा महान कलावंत मी किमान पाच-सात वेळा प्रत्यक्ष पाहिला. निरोप देण्यासाठी बाहेर दरवाजापाशी यायचा. मला खूप संकोचल्यासारखे व्हायचे. जवळ बसवून, मनमोकळेपणाने प्रश्नांची उत्तरं द्यायचे. एखाद्या तिरकस प्रश्नाला त्यांच्या रोखठोक शैलीत उत्तर द्यायचे. त्यावेळी माझ्याकडेही रागाने बघायचे; पण अगदी थोडा वेळ. कोणत्याही प्रकारच्या शोषणावर त्यांचा प्रचंड रोष होता. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता डॉ. लागूंनी तो रोष वेळोवेळी व्यक्त केला होता.

मुलाखतीदरम्यान त्यांनी, त्यांचे पुण्यातील लहानपण ज्या दांडेकर वाड्यात घालविले, तेथील एक प्रसंग, जो अंधश्रद्धेशी निगडित होता, तो सांगितला. मला तो भाग आता बघायचा आहे, अशी तीव्र इच्छा त्यांनी बोलून दाखवली. दीपाताईंशी मी याबाबत बोललो. त्यांनी संमती दिली. एक दिवस आम्ही तिघेजण त्यांच्या घरून निघालो. आमच्या पुणे विद्यार्थिगृहाच्या सदाशिव पेठेतील महाराष्ट्र विद्यालयात आलो. तिथे पूर्वनियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना आणि सहकारी शिक्षक बांधवांना या महान कलावंताशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर नियोजित भेटीच्या स्थळी म्हणजे दांडेकर वाड्याजवळ पोचलो. स्वतःच्या आयुष्यातील किमान पंच्याहत्तर वर्षे मागे वळून पाहताना आणि तेथील खाणाखुणा शोधताना हा सूर्य’ आम्ही पाहत होतो. अर्थातच, वयानुसार फार आठवत नव्हतेच; आणि थोडेफार आठवलेही असते; पण सगळेच आधुनिकतेच्या घोषात लोप पावले होते, तरीही डॉ. लागूंनी काही ठळक खुणा सांगितल्या. तेथे एक दवाखाना होता. त्याचे आता हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले, ते दिसले. एक मंदिर होते, तेही सापडले; पण तेही मुख्य रस्त्यापासून मागे राहिले होते. पुढे लहान-मोठी दुकाने होती. कुठलाही गाजावाजा न करता डॉ. लागू यांना आम्ही तो संपूर्ण परिसर शांतपणे दाखविला. पलिकडे नदीच्या काठी स्मशानभूमीची जागा होती, तेथे प्रेते जळताना वरच्या मजल्यावरून दिसायची, असे डॉ. लागूंनी सांगितले; पण आता तिथून नदी दिसणं, अशक्य होते; पण पंच्याहत्तर वर्षांपूर्वी ते शक्य होतं. मात्र, आपलं बालपण ज्या ठिकाणी गेलं, तेथे ते पुन्हा शोधताना जेव्हा आम्ही हा भला माणूस पाहिला, तेव्हा त्यांच्यापेक्षाही दीपाताईंना आणि मला आश्चर्याने भरून आलं आणि समाधानही मिळालं.

दीपाताईंची काळजी मी पूर्णपणे जाणून होतो. सावलीसारख्या त्या डॉ. लागूसोबत राहून, पूर्ण काळजी घेत होत्या. कोणतंही संरक्षण न घेता, आम्ही या कलाशिरोमणीला, त्यांचे बालपण शोधण्यासाठी प्रत्यक्ष घेऊन गेलो, सुखरूप घरी घेऊन आलो. त्यांचा हट्ट पुरवला. विद्यार्थ्यांशी त्यांची भेट करून, संवाद घडवून आणला, खूप-खूप समाधान मिळाले.

सर्व लागू परिवाराप्रती सहवेदना आणि डॉ. श्रीराम लागूंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]