स्वामी नित्यानंदाच्या ‘हिंदू राष्ट्र’ स्थापना निमित्ताने

प्रभाकर नानावटी -

धर्म ही मानवी व्यवहारातील अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था असावी. तो समजून घेण्यासाठी, त्याची व्याख्या करण्यासाठी गेली कित्येक शतके अनेक तत्त्वज्ञांनी आपले आयुष्य खर्ची घातलेले आहे. कित्येक टीकाकारांनी आपापल्या परीने धर्माच्या विविध आयामांवर व त्यांच्या समर्थनार्थ व विरोधात विमर्षात्मक टीका-टिप्पणी केल्या आहेत. त्यातल्या त्यात कार्ल मार्क्स यांनी केलेली ‘धर्म ही एक अफू आहे’ ही टिप्पणी धर्माचे नेमके मर्म सांगणारी ठरू शकेल. धर्म ही एक मानवनिर्मित संकल्पना असून देश व त्या देशातील समाजच त्याचे संवर्धन करतात. संपूर्ण मानव जातीलाच उलट्या दिशेला जाण्यास प्रवृत्त करणारी ही एक वैश्विक संकल्पना असून सर्वसामान्यांना कवेत घेणारी, दुःखी-पीडितांचे सांत्वन, त्यांना आधार व त्यांच्या दुःखद प्रसंगात बळ दिल्यासारखी वाटणारी ही अफू आहे, या मार्क्सच्या विधानाला आपण तितक्या सहजतेने नाकारू शकत नाही.

धर्माबद्दलचे, ‘धर्म ही एक अफू आहे’ हे लोकप्रिय विधान खरे पाहता त्याचे संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे करू शकत नाही. दुःखी व पीडितांचे सांत्वन करणार्‍या धर्माच्या या दाव्याचे जास्त खोलात जाऊन विश्लेषणही कदाचित झाले नसेल. सरसकट सर्व मानवी व्यवहारांतील धर्माची लुडबुड, त्याची सर्वव्यापी आक्रमकता लक्षात घेतल्यास 21व्या शतकातील अत्याधुनिक समाजव्यवस्थेत अजून ती का व कशाप्रकारे तग धरून आहे, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. एकीकडे, जागतिक राजकारणातील अमेरिका-इराक तैलयुद्धाच्या वेळी रूढ झालेला मुस्लिम दहशतवाद या धर्मव्यवस्थेच्या अक्राळ-विक्राळ स्वरुपाला अधोरेखित करणारे विधान व दुसरीकडे बाबा-बुवांच्याद्वारे अंधश्रद्धांना मिळत असलेली समाजमान्यता यातील सुसंगती शोधणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे, विशेषकरून आपल्या देशातील अलिकडील बाबा-बुवांच्या आर्थिक व्यवहारांकडे व लैंगिक कारनाम्याकडे पाहता आपण कुठल्या अंधार युगात वावरत आहोत, हा प्रश्न विचारावासा वाटू लागतो.

मानवी आयुष्यातील धर्माच्या विविध भूमिकांचा विचार करत असताना त्याच्या दोन ठळक भूमिका आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. एकीकडे, सत्तालोलुप असलेले पोप, नवाबशाही इमाम व मठाधीश, तर दुसरीकडे सामान्यांच्या दुःखावर फुंकर घालणारे सूफी पंथातील व आपल्याकडील तुकाराम, कबीर, रविदास, बसवेश्वर यांच्यासारखे संत व शरण आहेत. एके काळी पोप-इमाम-राजगुरू-मठाधीश मंडळी सत्तेच्या आसनावरून सामान्यांच्यावर सत्ता गाजवत त्यांचे अनन्वित हाल करत होती किंवा सत्ताधार्‍यांच्या कच्छपि लागून त्यांच्या शोषणाला धार्मिक अधिष्ठान देत होते. परंतु भक्तीच्या आधारे संतांनी मात्र सामान्य माणसांना मानवतेचे, समानतेचे व साध्या जीवनपद्धतीचे धडे देत सामान्यांच्या जीवनाला अर्थ दिला. बदललेल्या जागतिक परिस्थितीत पोप-इमाम-राजगुरू यांचे प्राबल्य कमी झाले असले, तरी अलिकडे उदयास आलेले संत-महंत मात्र धर्माचा गैरवापर करत उच्छाद मांडत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ते कदाचित पोप-इमाम-राजगुरू नसतीलही. परंतु समाजातील श्रीमंत व गरीब या दोन्ही वर्गाचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे कुठलेही (गैर) कृत्य करण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत. तथाकथित आध्यात्मिकतेची व नैतिकतेची भाषा वापरत सर्व संशयास्पद व्यवहारात त्यांचा पूर्ण सहभाग असतो.

गैरकृत्य केल्यानंतर कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, म्हणून ही मंडळी कुठल्या थराला जाऊ शकतात, याचे एक मासलेवाईक उदाहरण म्हणून स्वामी नित्यानंद यांच्या करामतीकडे पाहता येईल. 13 मार्च 1977 रोजी तमिळनाडू येथील तिरुवनमलाई येथे ए. राजशेखरन् म्हणून जन्माला आलेली ही व्यक्ती भगवे कपडे परिधान करून स्वामी नित्यानंद झाली. वयाच्या 12 व्या वर्षीच त्याला साक्षात्कार झाला होता म्हणे! सुमारे 47 देशांत त्यांचे भक्तगण विखुरलेले आहेत म्हणे! भारतातसुद्धा गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू व उत्तरेतील काही शहरांत त्याचे आश्रम आहेत. ‘नित्यानंद ज्ञानपीठम’ या धार्मिक मठाची स्थापना त्यांनी केली असून त्या मठातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं, गुरुकुले व आश्रम चालवले जातात.

2010 च्या सुमारास त्याच्यावर बलात्कार व खुनाचे आरोप झाल्यामुळे त्याच्या शोधात पोलीस होते. अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडलेल्या इतर बाबा-बुवांप्रमाणे कायद्याच्या ‘लंबे हाथ’मध्ये न सापडता दक्षिण अमेरिकेतील ‘इक्वेडोर’ जवळील एक निर्जन बेटच्या बेटच विकत घेऊन स्वतःचेच कायदे कानून असलेल्या हिंदू राष्ट्राची स्थापना त्याने केली व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन राजरोसपणे तो तेथे वास्तव्य करत आहे. त्या हिंदू राष्ट्राचे ‘कैलासा’ म्हणून नामकरणही केले आहे व या राष्ट्रात हिंदू म्हणवून घेणार्‍यास मुक्त प्रवेशाची परवानगी आहे. या राष्ट्राच्या नागरिकत्वासाठी मात्र जबरदस्त फी आकारली जाते व त्या बदल्यात हे नागरिक तेथे मनसोक्तपणे हिंदू धर्माचे आचरण करू शकतात. या हिंदू राष्ट्राचा स्वतंत्र ध्वज आहे, त्या राष्ट्राची तमिळ-संस्कृत मिश्रित अशी एक राष्ट्रभाषा आहे व राष्ट्राची धुरा वाहणारे मंत्रिमंडळसुद्धा आहे. बेनी हिन्न या ख्रिश्चन मिशनरीचा अपवाद वगळता इतर कुठल्याही धर्मात अशा प्रकारचे स्वामीजी सापडणार नाहीत. मुस्लिम, बौद्ध व क्रिश्चियन मूलतत्त्ववादी संघटना मात्र जगभर कार्यरत असून; विशेषकरून पश्चिम व दक्षिण आशियातील शांतता भंग करण्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

स्वामी नित्यानंदाची बाष्कळ बडबड ऐकण्यासाठी तुम्हाला ‘यू ट्यूब’वरील त्याचे व्हिडिओ पाहावे लागतील. त्याचे अचाट दावे ऐकणे, त्याचे इंग्रजी भाषेतील संभाषण ऐकणे, त्याचे हातवारे बघणे, ही एक मोठी शिक्षाच असू शकेल. प्रवचनाला उशिरा पोचल्यास त्यानेच सूर्याला उशिरा उगवण्याची आज्ञा दिली होती म्हणे! विवेकानंद व अरबिंदो यांचे हिंदू कल्याणाचे स्वप्न हाच पूर्ण करणार आहे! त्याचे सर्व हिंदू भक्त मानव वंशाचे नसून ते एका वेगळ्या वंशाचेच आहेत! त्याच्या काही आध्यात्मिक शक्तीच्या प्रयोगातून प्राणी-पक्ष्यांमध्ये तमिळ व इंग्रजीतून संभाषण करण्याचे कौशल्य तो आणू शकतो! तो कुणालाही लक्षाधीश करू शकतो! या व्हिडिओत बघत असताना अनेक वेळा विनोद, थट्टा, मस्करी वा मनोरंजन म्हणूनही त्याच्या नावाचा उपयोग करत असावेत, असेही वाटू लागते. परंतु या देशात गर्दी खेचण्यासाठी बुवाबाजीसकट काहीही घडू वा होऊ शकते!

या स्वामीच्याच कालखंडात आसारामबापू, गुरुमीत राम रहीम इन्सान या बुवागिरी करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून अतिकष्टाने अटक केली आहे. हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या प्रशासनाने राम रहीम इन्सानला लाखोंची देणगी दिली होती. त्या पक्षाचे संपूर्ण मंत्रिमंडळ राम रहीमच्या आशीर्वादासाठी नतमस्तक झाले होते. आसारामच्या आश्रमालासुद्धा पंतप्रधानांसकट अनेक मान्यवर भेट देत होते. स्वामी नित्यानंदला गुजरातमधील अतिश्रीमंतांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. त्याचप्रमाणे त्याच्यावर श्रद्धा असलेल्या सामान्यांची संख्यासुद्धा कमी नव्हती. यावरून विज्ञान व तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, विज्ञानाने तथाकथित लाखो-करोडो चमत्कारांमागील रहस्यांचा उलगडा केला, नैसर्गिक घटनेमागील कार्यकारणभाव समजून सांगितले असले, तरी आपली मानसिकता अजूनही आदिमानवाच्या काळातलीच आहे.

या बुवा-बाबांच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्यांच्या करुण कथा लाखो आहेत. यासाठी ते वापरत असलेल्या युक्त्या-प्रयुक्त्या मानवी कल्पनेच्या पलिकडच्या आहेत. संपत्ती कमवण्यासाठी त्यांनी वापरलेले मार्ग थक्क करणारे आहेत. काही बुवा-बाबा तर अशा गोष्टीत विशेषज्ञ आहेत. सत्य साईबाबा तर हजारो कोटी संपत्तीत लोळत होता. योगगुरू रामदेव याने या मार्गाने कमविलेल्या संपत्तीतून ‘पतंजली’ उत्पादनाचे जाळे उभे केले आहे. आता अत्यंत श्रीमंत उद्योजक म्हणून तो ओळखला जात आहे. या बुवाबाजीत माँ अमृतमयी व राधेमाँसारख्या महिलाही आघाडीवर आहेत.

आपल्या समाजातील बुवाबाजी फोफावण्याचे नीटपणे विश्लेषण करण्यास समाजशास्त्राच्या अभ्यासकांना फार कष्ट घ्यावे लागतील. स्वामी नित्यानंदसारखी मंडळी प्रसिद्धीच्या झोतात कशी येतात, त्यांच्या आश्वासनांवर अशिक्षित, अर्धशिक्षित व सुशिक्षित सामान्य कसे काय विश्वास ठेवू शकतात, हजारो, नव्हे तर लाखोंनी यांच्यासाठी गर्दी का करतात, घाम गाळून कमावलेले पैसे कसे काय देऊ शकतात, नवश्रीमंत लाखो-लाखोंनी देणग्या देत त्यांच्या मागे का लागतात, राजकारणी त्यांच्या कारनाम्यांच्याकडे कानाडोळा का करतात, यांच्याकडे एवढ्या मोठ्या संपत्तीचा ओघ वाहत असताना या देशाचे कुठलेही कायदे एवढे निष्क्रिय का होतात इत्यादी प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधावी लागतील. स्वामी नित्यानंद, आसारामबापू इत्यादी नावे माध्यमांत चमकत असली, तरी आपल्याला माहीत नसलेले, माध्यमांच्या पुढे न आलेले हजारो बुवा-बाबा समाजात वावरत असतील, लाखोंनी पैसे कमवत असतील व शेकडो स्त्रियांचे लैंगिक शोषण करत त्यांचे बळी घेत असतील व गंमत म्हणजे या सर्व गोष्टी धर्म, परंपरा, श्रद्धा, निष्ठा इत्यादींच्या बुरख्याआड बिनदिक्कतपणे, राजरोसपणे खुलेआम घडत आहेत. मतपेटीला धक्का लागेल म्हणून राजकारणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास धजत नाहीत. त्यामुळे तथाकथित ही आध्यात्मिक शक्ती सर्व गैरकृत्यांना व अनैतिक व्यवहारांना अभय देत आहे व देत राहील. कारण समाजाची मनःशक्तीच लुळी-पांगळी झाली आहे.

हिंदू राष्ट्र : कैलासा

देशातून पळून गेलेल्या ‘स्वयंभू बाबा’ नित्यानंद याने आता एक स्वयंघोषित हिंदू राष्ट्र बनवले आहे. बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंदाचा शोध घेण्यात येत होता; पण आता हे माहीत झाले आहे की, तो एका हिंदू राष्ट्राचा प्रमुख झाला आहे. नित्यानंदाच्या देशाचे नाव ‘कैलासा’ असे ठेवले जात आहे. नित्यानंद यांची स्वत:ची घोषित सीमाविरहित हिंदू राष्ट्राची स्वतःची वेबसाइट देखील आहे; ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, हा देश ज्यांनी आपले हक्क गमावले आहेत, त्यांच्यासाठी आहे.

स्वयंभू बाबा नित्यानंद याच्यावर कर्नाटकात बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे; तर गुजरातमध्ये छळाशी संबंधित प्रकरणे आहेत. 22 नोव्हेंबर रोजी गुजरात पोलिसांनी नित्यानंदाच्या अहमदाबाद येथील आश्रमात चौकशी केली होती; परंतु तेथून पोलिसांना कोणताही पुरावा मिळाला नाही. नित्यानंद याचे तथाकथित हिंदू राज्य ‘कैलासा’ जगाच्या कोणत्या कोपर्‍यात आहे, कोणालाही सध्या याची माहिती नाही; परंतु त्याविषयी महत्त्वाची माहिती या देशाच्या वेबसाइटवर इंटरनेटवर उपलब्ध आहे.

हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने वेबसाइटवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या हिंदू राष्ट्राचे ध्येय म्हणजे हिंदुत्व रक्षण करणे आणि लोकांना माणुसकीची जाणीव करणे हे आहे. या संकेतस्थळावर या वेबसाइटचे तपशीलवार वर्णन केले आहे. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, या नित्यानंदाच्या या देशात स्वतःचे पासपोर्ट, ध्वज, सरकारी विभाग, भाषा, शाळा यापेक्षा बरेच काही आहे.

वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार या देशाची लोकसंख्या सुमारे 100 कोटी, म्हणजेच जवळपास 10 कोटी आहे. इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ या देशाच्या भाषा आहेत. परंतु इंग्रजी प्राथमिक भाषेत ठेवली जाते आणि संस्कृत दुसर्‍या, तर तमिळ तिसर्‍या मूळ भाषेच्या रुपात स्वीकारली जाते. हिंदू राष्ट्राच्या राष्ट्रध्वजाला ‘ऋषभ’ असे नाव आहे. या त्रिकोणी आकाराच्या ध्वजावर भगवान परमशिव आणि नंदीबैलाचे चित्र आहे. 25 भगवान आणि परमशिवाचे 50 हात चित्रात दिसत आहेत. कपाळावरील देणगी आणि गळ्यातील हार यावरून असे दिसून येते, की हे भगवान शिवाचे आणखी एक रूप आहे.

वेबसाइटवर नंदीबैलाचे राष्ट्रीय प्राणी असे वर्णन केले आहे. त्याचे चित्रही वेबसाइटवर ‘अपलोड’ करण्यात आले आहे. राष्ट्रीय फूल कमळ आहे, तर वडाचे झाड हे या देशाचे राष्ट्रीय झाड आहे; तर या देशात चार पायांच्या सोन्याच्या पक्ष्याला आपला राष्ट्रीय पक्षी मानले जाते.

सौजन्य – बहुजननामा ऑनलाईन टीम


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]