डॉ. नितीन अण्णा -

एप्रिलमध्ये दोन थोर महापुरुष महात्मा जोतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते. या महापुरुषांनी समाजाचा ‘डीएनए’ बदलण्याचा प्रयत्न केला. पुरुषप्रधान संस्कृतीचा ‘डीएनए’; जिथं हजारो वर्षे स्त्रियांना मानवी हक्क नाकारले गेले होते. केवळ भारतात नाही, तर परदेशातही स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलं होतं. केवळ शोभेची बाहुली म्हणून त्यांचं जगणं तिथल्या सभ्य समाजाला मान्य होतं. मात्र ज्ञान-विज्ञान क्षेत्रात त्यांना संधी नाकारली होती. तिथं अनेक महिला शास्त्रज्ञांनी संघर्ष करून आपली जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात रोझलिंड फ्रँकलिनचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल.
रोझलिंड फ्रँकलिनचं नाव पहिल्यांदा ऐकता आहात का? ओके. ‘डीएनए’चे मॉडेल कुणी बनवले? अर्थात, हे अनेकांना माहीत असेल. वॉटसन आणि क्रिकचं ‘डबल हेलिक्स’ मॉडेल. शाळेमध्ये हे शिकवलं होतं. उत्क्रांतीचं रहस्य उलगडणारे ‘डीएनए’. या मॉडेलमुळे वॉटसन, क्रिक आणि मॉरिस विल्किंस यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालं होतं. मात्र तेव्हा या नोबेलवर रोझलिंड फ्रँकलिनचा तेवढाच हक्क होता. या रोझलिंड फ्रँकलिनचा ‘डीएनए’ समजून घेऊया.
रोझलिंड फ्रँकलिन.. तिला ‘रोझी’ म्हटलेले आवडायचे नाही, बरं का. तिच्यावर खार खाऊन असलेल्या सहकार्यांनी तिचे ठेवलेले नाव ‘रोझी.’ त्यामुळे तिचं ते नावडतं नाव. आपण तिला रोजा म्हणू. तर आपली ही रोजा 25 जुलै, 1920 रोजी लंडनमधील अतिशय श्रीमंत आणि पुढारलेल्या ज्यूधर्मीय घरात जन्माला आली. एक मोठा, दोन लहान भाऊ आणि एक लहान बहीण एवढे सख्खे; बाकी आत्या, चुलते असा मोठा गोतावळा. एक चुलता इंग्लंडचा गृहखात्याचा सचिव. यावरून घरातील सुबत्तेची कल्पना यावी.
पण हे कुटुंब केवळ श्रीमंत नव्हते, तर उदार देखील होते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण सुरू झाले आणि ज्यू लोकांचे शरणार्थी तांडे शेजारच्या देशात आसरा शोधायला लागले. या निराधारांना जमेल तेवढी मदत फ्रँकलिन कुटुंब करत होते. दोन निराधार मुले तर घरात ठेवून घेतली. इव्ह नावाची एक मुलगी रोजाच्या खोलीत. लोकांसाठी जगणं हे रोजाच्या ‘डीएनए’मध्ये होतं. रोजाच्या ‘डीएनए’मध्ये अजून एक बाब होती – गणित आणि विज्ञान. मोठमोठी अंकगणितं, कोडी सोडवत बसायचं, नाहीतर ‘मेमरी गेम’मध्ये वेळ घालवायचा तिचा छंद. सहा वर्षांपासून घराजवळील शाळेत जाणारी रोजा जेव्हा अकरा वर्षांची झाली, तेव्हा तिला सेंट पॉल शाळेत टाकलं. त्या काळात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकवल्या जाणार्या मोजक्या कन्याशाळेमध्ये ‘सेंट पॉल’चं नाव घेतलं जायचं.
तिथं तिनं जर्मन आणि फ्रेंच भाषा देखील चांगली आत्मसात केली. खेळात पण ती कायम पुढे. क्रिकेट, हॉकीसोबत ट्रेकिंग हा तिचा आवडीचा भाग. सर्व विषयांत रोजा बेस्ट. त्यामुळे अतिशय चांगल्या मार्कांनी मॅट्रिक पास झाली. तिला स्कॉलरशिप मिळाली. मात्र तिच्याऐवजी दुसर्या एखाद्या गरजूला ती मिळावी म्हणून तिच्या वडिलांनी स्कॉलरशिप नाकारली होती. पुढचं शिक्षण घ्यायला ती केंब्रिजला गेली. वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं ठरवलं होतं की, ‘मला शास्त्रज्ञ बनायचे आहे.’ अर्थात, मॅडम मेरी क्युरी यांनी रस्ता मोकळा केला असला तरी अजून संशोधनात महिलांची संख्या वाढली नव्हती. त्यामुळे घरचे अनुकूल नव्हते. मात्र रोजाची जिद्द होती. त्यापुढे घरच्यांचा प्रतिकार कमी पडला. तिथं रसायनशास्त्राचं शिक्षण घेत असताना मेरी क्युरी मॅडमचा शिष्य आंद्रे विल भेटला. त्याच्यासोबत तिची मैत्री छान जमली. फ्रेंच भाषा आणि रसायनशास्त्र या दोन्हींमध्ये त्यानं रोजाला मार्गदर्शन केलं. तिला पुढील संशोधनासाठी फेलोशिप मिळाली. तिला रोनाल्ड नरिषसोबत काम करायचं होतं. स्त्री-पुरुष विषमता तिनं सर्व प्रथम इथं अनुभवली. साध्या गोष्टीसाठी अंगावर खेकसणं तिला सहन झालं नाही आणि राजीनामा देऊन ती मोकळी झाली. त्यावेळी दुसरं महायुध्द अगदी तापलं होतं. रोजानं ‘ब्रिटिश कोळसा वापर संशोधन संस्था’ जॉईन केली, जिथं तिने बनवलेले गॅसमास्क युद्धामध्ये सैनिकांना खूप उपयुक्त ठरले. युद्धात स्वयंसेवक म्हणून देखील तिनं भरपूर काम केलं.
संशोधन संस्थेत तिनं कोळशाच्या सच्छिद्रतेवर काम केलं. उष्णतेनं रेणूंची रचना बदलते, हे तिने शोधून काढलं, ज्याचा उपयोग युद्धात इंधनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी; तसेच गॅसमास्क बनवण्यासाठी झाला. या विषयावर तिनं 1945 मध्ये संशोधन प्रबंध सादर करून पीएच. डी. मिळवली. मधल्या पाच वर्षांत फ्रान्समधील Centre national de la recherche scientifique या संस्थेत रोजाला काम करण्याची संधी मिळाली. जॅकस मेरिंग हे तेथील संशोधनप्रमुख एक्स-रे वापरून स्फटिकांच्या अंतरंगात डोकावूपाहत होते. त्यांच्याकडून मिळणार्या मार्गदर्शनाला रोजाने आपल्या कोळसा अनुभवाची जोड दिली. एक्स-रेचा मारा करून कोळशाचे ग्राफाईटिकरण करण्याबाबत तिचे संशोधन निबंध प्रसिद्ध होऊ लागले आणि या एक्स-रे विघटन क्षेत्रात आता रोजाचं नाव झालं.
1950 साली रोजाला किंग्ज कॉलेज, लंडनमध्ये बोलावण्यात आलं. तिथं संशोधनप्रमुख होते जॉन रँडेल. तोवर ‘डीएनए’मधील रसायनाचा शोध लागला होता. मात्र ‘डीएनए’ची रचना कशी असेल, याचं कोडं उलगडलं नव्हतं. यावर किंग्ज कॉलेजमध्ये मॉरिस विल्किंस यांच्या नेतृत्वाखाली संशोधन सुरू होतं आणि रोजानं त्यांची सहायक म्हणून भूमिका पार पाडायची होती. मात्र रोजा जॉईन झाली, तेव्हा मॉरिस सुट्टीवर गेला होता. रोजाला विनासायास मॉरिसकडे असलेला विषय आणि त्यावर काम करणारा फेलो मिळाला. मॉरिस सुटीवरून आल्यावर बघतो तो काय..! हिनं सगळंच ताब्यात घेतलं आहे.
मॉरिसचा स्वभाव वेगळा. मितभाषी, शांत. मॅनहॅटन रिटर्न (अमेरिकेचा अणुबॉम्ब प्रकल्प) तिथं बसलेल्या धक्क्यातून सावरलेला. रोजा आत्मविश्वासयुक्त, स्वतःच्या मतासाठी आग्रही, फटकळ बोलणारी आणि कामात कुणाची गरज नसणारी; आणि त्यात स्त्री. साहजिक मॉरिसला न्यूनगंड येऊ लागला. मॉरिसने मागवलेलं एक्स-रे यंत्र अधिक चांगल्या प्रकारे वापरून रोजा प्रयोग करत होती. मात्र मॉरिस आणि रोजा एकमेकांना काहीच ‘शेअर’ करत नव्हते. शिवाय रोजाला स्त्री म्हणून देण्यात येणारी वागणूक देखील अंतर वाढवत होती. प्रयोगशाळेतील महिलांनी जेवायला वेगळं बसायचं, असा नियम होता.
याचवेळी अमेरिकेत पाऊलिंग आणि इंग्लंडमध्ये वॉटसन आणि क्रिक ही जोडीदेखील ‘डीएनए’ची रचना शोधून काढायला धडपडत होती. रोजाला मिळालेला फेलो गोस्लिंग याने ‘डीएनए’चे एक्स-रे फोटो काढून दोन प्रकार शोधले. एक ओला असतो त्याचे नाव -.. आणि एक सुका असतो त्याचे नाव इ. रँडेलने दोघांत तह करून दिला की रोजा – वर काम करेल आणि मॉरीस इ वर. याकाळात वॉटसन आणि क्रिकचं किंग्ज कॉलेजमध्यं येणं व्हायचं. त्यांनी ओळखलं की मॉरिसची मदत होऊ शकते. मग त्याच्या पुरुषी अहंकाराला फुंकर घालत गटबाजी सुरू केली.
रोजाचं स्त्रीत्व हे यांचं लक्ष्य असायचं. ते बोलताना मुद्दाम तिच्या शरीराकडे बघायचे आणि नंतर मिटक्या मारत एकमेकांना सांगायचे. (आपण कल्पना करू शकतो, आपल्याकडे अजून चालू आहेच.) त्यात आपली रोजा म्हणजे दुसरा कपिल देवच! एकदम सिंपल राहायची. उगाच नाजूकपण किंवा नखरे दाखवून काम काढून घ्यायची नाही. स्त्री असल्याचं ‘कॅश’ करायची नाही. त्यामुळे यांच्या पुरुषी अहंकाराला आव्हान दिल्यासारखं त्यांना वाटायचं.
वॉटसन आणि क्रिक यांनी केलेल्या आधीच्या मॉडेलमध्ये रोजाने शंभर चुका काढलेल्या. त्यामुळे वॉटसन-क्रिक या जोडीला त्यांच्या बॉसने खूप झापलं होतं. ‘डीएनए’वर काम करणं सोडून द्यायला लागेल, असा अल्टिमेटम दिला होता. इकडे ग्लोस्लिंग आणि रोजाने 100 तास खपून एक फोटो काढला – हाच तो प्रसिद्ध फोटो 51; ज्यात ‘डीएनए’ची रचना स्पष्ट दिसते.. मॉरिसने तो फोटो वॉटसन-क्रिकपर्यंत पोचवला आणि वॉटसन-क्रिक यांच्या अडकलेल्या गाडीला पुढची वाट सापडली. हे सर्व समजल्यावर वैतागून रोजाने किंग्ज कॉलेज सोडलं आणि तंबाखूवरील विषाणूवर संशोधन करायला ती निघून गेली.
फ्रान्समध्ये असतानाच ‘आल्प्स’ पर्वताच्या ‘माउंट ब्लँक’ या सर्वोच्च शिखरावर चढाई करताना रोजाच्या जीवावर बेतलं होतं. जीन नावाच्या मित्राने तेव्हा तिचा जीव वाचवला. ती फ्रान्सच्या प्रेमात पडली होती. तिथल्या संस्कृतीच्या आणि खाण्याच्या (तिथले जीवन आणि जेवण) इंग्लंडमधील ठोकळा चेहर्याची, कोरडी बोलणारी माणसं तिला कधीच भावली नाहीत; कदाचित त्यामुळं तिचं प्रेम, लग्न वगैरे काही जमलं नाही.
तसंही रोजाला मोठं आयुष्य लाभलं नव्हतंच. कोणत्याही धर्माचे पालन न करणारी, अज्ञेयवादी असलेली रोझलिंड तिच्या वडिलांना पत्रामध्ये म्हणते की, विज्ञान आणि रोजचं जीवन वेगळं करता येणार नाही. जीवनात पडणार्या प्रश्नांची उत्तरं मला केवळ विज्ञानातून मिळतात. त्यामुळं मी ईश्वर, स्वर्ग-नरक या कल्पनेवर विश्वास ठेवूशकत नाही. असा कोणी ईश्वर असू शकत नाही आणि असलाच तर या विशाल ब्रह्मांडातील एका पिटुकल्या छोट्या ग्रहावरील घडामोडीत त्याला रस असणं शक्य नाही.
37 वर्षांची असतानाच 1958 मध्ये तिचा कर्करोगाने मृत्यू झाला. कदाचित एक्स-रेमध्ये जास्त काळ काढल्यामुळे तिला बाधा झाली असेल. 1956 मध्येच तिला जाणवलं की, आपल्या पोटात काहीतरी गडबड आहे. तेव्हा दोन गाठी काढल्या. तिनं संशोधनकार्य सुरूच ठेवलं. दोन वर्षांनी कॅन्सरनं पुन्हा निर्णायक डोकं वर काढलं. मरताना ती पोलिओ विषाणूवर काम करत होती. ते काम पुढे नेल्यामुळे तिचा विद्यार्थी क्लग याला नोबेल पारितोषिक मिळालं आहे. चार लोकांना नोबेल भेटण्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
‘डीएनए’, ‘आरएनए’, कोळसा, ग्राफाइट आणि विषाणूवरील रोजाचं संशोधन फारच मोलाचं आहे. पण तिच्या या कामाची पावती मात्र तिला हयातीत मिळाली नाही आणि तिनं केलेल्या संशोधनासाठी नोबेल मात्र इतरांनी पटकावलं. 1962 मध्ये वॉटसन-क्रिक आणि मॉरिस या तिघांना ‘डीएनए’चे मॉडेल तयार केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं; मात्र नोबेल मिळाल्यानंतर करावयाच्या भाषणात या तिघांनी रोजाचा उल्लेख टाळला. एवढंच नाही, तर आपापल्या पुस्तकात जेव्हा रोजाचा विषय येईल, तेव्हा ‘बोअर’ आणि ‘मठ्ठ’ असाच तिचा उल्लेख केला आहे. स्त्रीने दुखावलेले पुरुषी अहंकार ती स्त्री मेल्यावर पण तिचा बदला घेत होते.
एक स्त्री म्हणून तिला तेव्हा जरी दुय्यम वागणूक दिली जात होती, तरी तिच्यावर झालेल्या अन्यायाची आता सर्वांना जाणीव झाली आहे. आज तिचं नाव जगभरात अनेक संस्थांना दिलं आहे. आकाशात सापडलेल्या नव्या ‘स्ट्रॉइड’ला देखील दिलं आहे. यावर्षी ‘नासा’कडून मंगळावर पाठविण्यात येणार्या यानाला तिचं नाव देण्यात आलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, अभियांत्रिकी विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना ‘रॉयल सोसायटी’मार्फत तिच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. 2003 पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांत आजवर झालेल्या 17 विजेत्यांमध्ये एक भारतीय नाव आहे. सुनेत्रा गुप्ता यांना 2009 मध्ये रोझलिंड फ्रँकलिन पुरस्कार मिळाला आहे. काळाने आता रोजाची दखल घेतली आहे. पण अशी दखल जितेपणीच का नाही घेतली जात? कारण आहे मानसिकता आणि आपला ‘डीएनए.’ स्त्री कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करूच शकणार नाही, असं जणू समाजमनावर कोरलं आहे. ‘आम्ही आमच्या मुलीला मुलासारखं वाढवलं,’ यांसारखं छोटं वाक्य सहज म्हणताना देखील आपण मुलाचे विशेषाधिकार ठसवत असतो. यानिमित्तानं आपल्या पंतप्रधानांचं भाषण आठवतं. बांगलादेशात शेख हसीना यांचं कौतुक करताना ते म्हणाले की, ‘स्त्री असून देखील त्यांनी आतंकवाद निपटून काढण्यासाठी कठोर पावले उचलली.’ यातील ‘स्त्री असून पण…’ सर्व काही सांगून जाते. आपल्या ‘डीएनए’चे जाहीर प्रदर्शन करायला सत्ताधार्यांना काहीच वाटत नाही.
थोर महापुरुषांनी समाजाचा ‘डीएनए’ बदलण्याचा प्रयत्न केला. ‘डीएनए’ बदलतो आणि बदलावर आपला विश्वास आहे, म्हणून तर आपण चळवळीत काम करतो. ‘डीएनए’ आजवर बदलत आलाय म्हणूनच उत्क्रांती शक्य झालीय… हा पुरुष वर्चस्ववादी ‘डीएनए’ लवकर बदलावा ही अपेक्षा.. जय समता, जय विज्ञान.
लेखक संपर्क : 89564 45357