अनिल चव्हाण -

‘तरुणाईसाठी दाभोलकर’ या प्रा. प. रा. आर्डे यांच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. आर्डेसर वार्तापत्राचे संपादक होते. त्यांनी सुमारे पंधरा वर्षे संपादक पदाची धुरा सांभाळली. अठ्ठावीस वर्षांचा त्यांचा दाभोलकरांशी जवळून संबंध आला आहे. चळवळीत राहून संपादकाच्या नजरेतून त्यांनीच चळवळ तपासली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा भेकड धर्मांध सनातन्यांनी खून पाडला. खुनानंतर डॉक्टरांनी सुरू केलेली चळवळ बंद पडेल, थांबेल; निदान मोडकळीला येईल, ही खुनी बुवाची अपेक्षा होती; झाले उलटेच!
सतत अठरा वर्षे डॉक्टरांची कायद्यासाठी सुरू असलेली धडपड, त्यांचा विवेकी बाणा, समाजसुधारणेचा आग्रह सर्व गोष्टी समाज शांतपणे पाहत होता; पण अशा पृथ्वीमोलाच्या माणसाचा खून झाल्याबरोबर तो चवताळून उठला. त्यांनी प्रतिक्रिया विवेकी दिल्या. शासनाला त्यातील दाहकता समजली. त्यांनी ताबडतोब अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला. सनातन्यांच्या थयथयाटाला ना शासनाने भीक घातली, ना समाज आणि कार्यकर्त्यांनी! संघटनेकडे येणारा कार्यकर्त्यांचा ओघ वाढला. त्यात तरुणांचा टक्का मोठा होता.
या तरुणांना भुरळ घालणारे डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वात नेमके काय असावे, असा प्रश्न तुम्हा-आम्हाला पडतो, तसाच तो आर्डेसरांनाही पडला. त्यातून पुस्तक तयार झाले – ‘तरुणाईसाठी दाभोलकर!’ संघटनेत आणि बाहेर असलेल्या युवकांना याची गरज होतीच.
चळवळ आणि दाभोलकर यांचे हे चरित्र आहे. वाचकांसमोर मांडण्यासाठी लेखकांनी प्रसंग निवडला तो रविवारच्या गप्पांचा! दर रविवारी काही युवक मित्र-मैत्रिणी लेखकांशी चर्चा करतात. चर्चेसाठी काल्पनिक पात्रे निवडली आहेत. अशी पद्धत महात्मा फुलेंनीही स्वीकारली होती. त्यांचे ‘धोंडिबा’ पात्र अमर झाले.
लेखकाने या पुस्तकात तर्कशील, श्रद्धा, स्वरदा, जिज्ञासा, निर्भय, सिद्धांत, चौकसराव, शबाना, आमीर अशी पात्रे कल्पिली आहेत. त्यांचे स्वभाव आणि वर्तनाशी नावांचा काहीसा संबंध आहे. हे सर्व युवक-युवती विवेक परिवाराच्या सभासद! ते प्रत्येक रविवारी चर्चेसाठी जमतात. गप्पांची मैफल जमते. त्यांना छोटा प्रश्न पडतो. गप्पांमधून त्याचे उत्तर शोधले जाते. लेखकाचे महत्त्वाचे कौशल्य दिसते ते एखाद्या प्रश्नाबाबत प्रत्येकाच्या मनात येणार्या विविध शंका, प्रतिक्रिया नोंदवत चर्चा योग्य दिशेने नेणे यामध्ये; विषयांतर टाळून, मांडणी नेमक्या शब्दांत करण्यामध्ये!
विज्ञानाचे अभ्यासक असल्याने मांडणीत नेमकेपणा आहे. कार्यकर्ते असल्याने युवकांच्या प्रश्नांची जाण आहे; प्राध्यापक असल्याने विषयाची मांडणी सोपी करण्याची हातोटी आहे आणि संपादक असल्याने मुद्दा कुठे छाटावा, हे माहीत आहे. पुस्तक वाचताना या बाबी सतत जाणवतात. युवकांच्या गप्पांमध्ये सहजता असल्याने मजकूर वाचनीय बनला आहे. पुढे काय, याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे कौशल्य लेखकांनी दाखवले आहे.
पंचवीसभर प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकाच्या मनोगतात लेखक म्हणतात – “विचार, आचार आणि संघटन या तिन्ही पातळ्यांवरील नरेंद्रने उभ्या केलेल्या संघर्षातील साथीदार म्हणून मी डॉक्टरांना जवळून अनुभवले. या पुस्तकात अतिरंजितता नावालाही नाही, आहे ते प्रखर वास्तवाशी झुंजणार्या एका योध्द्याचे चरित्र.”
दाभोलकरांच्या पत्नी म्हणजेच शैलाताई यांनी त्याना पूर्ण साथ दिली. त्यांच्याबद्दल लेखक म्हणतात, सातार्यातील शैलाताईंच्या दवाखान्यासमोर सोन्याचं एक दुकान आहे. मनात आणलं असतं तर शैलाताईना त्या दुकानातून भरपूर सोनं खरेदी करता आल असतं, पण त्यांनी विवाहनंतर सबंध आयुष्यात एक गुंजभरही सोनं विकत घेतले नाही. नवनव्या भरजरी साड्यांची हौस त्यांनी कधी केली नाही.
चळवळ विविध अंगांनी बहरत असते. त्यात साहित्य-वाङ्मयाचा वाटाही मोठा असतो. लेखक साहित्यनिर्मितीत सुरुवातीपासून सहभाग्ी आहेत. त्यांनी दाभोलकरांसमवेत ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या 1989 मध्ये लिहिलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्तम वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय समितीच्या मुखपत्राचे संपादन केले आहे.
युवकांना विस्मयकारी वाटणार्या गोष्टी म्हणजे भुताचा शोध घेताना बेतलेले जीवावरचे प्रसंग, भानामतीच्या गूढ घटना आणि त्यामागील सत्य शोधताना लागलेला बुद्धीचा कस, ढोंगी बुवांचा पर्दाफाश करताना आलेले कठीण प्रसंग. ते वाचताना त्यांच्या मनातील अंधविश्वासाची जळमटे दूर होतात आणि या रोमहर्षक लढ्यात आपणही सामील व्हावे, ही प्रेरणा मिळते.
पहिल्या प्रकरणात शस्त्रांशिवाय लढली जाणारी लढाई विचाराने कशी लढली जाते, त्याचे महत्त्व आणि इतिहासही विषद केला आहे. त्यामध्ये बाबासाहेब, सावित्रीबाई यांच्यापासून अब्राहम लिंकनपर्यंत आढावा घेतला आहे. त्यात ते म्हणतात – “मुलांनो, दाभोलकर धर्मबुडवे नव्हते, तर ते खरे धार्मिक होते. देव या श्रद्धेला त्यांचा विरोध नव्हताच; त्यांचा विरोध होता देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली प्रचलित केलेला संघर्ष जितका रोमहर्षक तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल काही मंडळींनी गैरसमज पसरवले. एवढ्यावरच हे दुष्ट लोक थांबले नाहीत, तर त्यांनी दाभोलकरांना पुण्यामध्ये पाठीमागून गोळ्या घातल्या.”
पुढच्या प्रकरणात ‘अंनिस’पूर्वीच्या जीवनाचा आढावा घेतला. ते म्हणतात – “…हनुमान उडी घेत प्रतिस्पर्ध्याच्या घेर्यातून बाहेर पडण्याचं त्यांचं कौशल्य सर्वत्र गाजलं. दाभोलकरांच्या कबड्डी कौशल्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना छत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं. ज्या क्षेत्रात पाऊल टाकायचे, तिथे सर्वोच्च यश प्राप्त करायचे, हे दाभोलकरांचे खास वैशिष्ट्य. नंतर त्यांच्या सामाजिक कार्यातही दिसून आलं.”
हीच गोष्ट त्यांच्या इतर भावंडांचीही आहे. भुताचा शोध घेताना डॉक्टरांचा आणि कार्यकर्त्यांचा निर्भयपणा वर्णन केला असून एका भुताच्या शोधापासून सुरू झालेला प्रवास ‘शोध भुताचा, बोध मनाचा’ या कोकण मोहिमेपर्यंत कसा पोचला, हे ध्यानात येते. भूत पाहण्याची लोकांना मोठी उत्सुकता, भुतासंबंधीच्या विविध कल्पना, भूत लागणे, अंगात येण्याचे अनेक प्रसंग आणि त्यामागील विज्ञान या बाबी अगदी सहज गप्पांमधून उलगडत जातात.
पुढे भानामती, जटा निर्मूलन, डाकीण, शनि शिंगणापूर चमत्काराचे आव्हान, आध्यात्मिक बुवांची ढोंगबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाहिनी, धर्मचिकित्सा, पर्यावरणरक्षण, जत्रा-यात्रा, पशुहत्या, जादूटोणाविरोधी कायदा, शिक्षकांची शिबिरे, सत्यशोध प्रज्ञा परीक्षा, छद्मविज्ञान, ‘अंनिस’चे वार्तापत्र, साधना साप्ताहिक, दाभोलकरांची साहित्यसंपदा… अशा विविध घटकांची ओळख अत्यंत सोप्या भाषेमध्ये लेखकाने करून दिली आहे.
डॉक्टरांच्या खुनाचा आघात पचवूनही कार्यकर्ते म्हणताहेत –
घावांनी केले विद्ध, तरी फुलायाची जिद्द॥
जगबदलाचे हे युद्ध, आता हरायचे नाही ॥1॥
घालू हातामध्ये हात, फुलू सारे एकसाथ ।
कितीही घाव पडू देत, कधी तुटायाचे नाही ॥2॥
युद्धाबरोबरच ऐक्याचा संदेश देणार्या या काव्यपंक्तींनी गप्पांचा समारोप होतो. तेव्हा नव्या युवकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही हा संदेश स्वीकारण्याचे महत्त्व लक्षात येते. अजून युद्ध संपलेले नाही, तेव्हा हातात हात घालून साथ देण्याची प्रेरणा हे पुस्तक कार्यकर्त्यांना देईल, याचा विश्वास वाटतो.
साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या या 260 पानी पुस्तकाची किंमत केवळ रु. 250/- ठेवण्यात आलेली आहे.
पुस्तकाचे नाव – तरूणाईसाठी दाभोलकर
लेखक – प्रा. प. रा. आर्डे
प्रकाशक – साधना प्रकाशन, पुणे
किंमत – रूपये 250 पृष्ठे – 256