सहजपणात प्रवीण : पन्नालाल सुराणा

देविदास वडगांवकर -

२ डिसेंबर २०२५ रोजी पन्नालाल सुराणा दिवंगत झाले. त्यांनी देहदान केले. कोणतेही संस्कार झाले नाहीत. आयुष्यभर ज्या विचाराने पन्नालाल भाऊ धर्मनिरपेक्षपणे जगले. त्यांनी आयुष्याच्या शेवटी ही धर्मनिरपेक्षपणेच अंत्यसंस्कार करून घेतले. पन्नालाल सुराणा यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘पायपीट समाजवादासाठी’ असे आहे. हे नाव सार्थ कसे होते; हे त्यांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर समजते. काही माणसे अशी असतात की, त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे शिक्षण काय झाले? त्यांना अपत्य किती? मृत्यूनंतर त्यांच्या मागे कोण कोण राहिले? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज पडत नाही. पन्नालाल (भाऊ) अशा व्यक्तिमत्त्वांपैकी. भाऊ सुराणा यांच्या कर्तृत्वाचा मोठा आलेख असल्यामुळे, अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही. तसेच तो कवेत घेणे एका लेखाचे काम नव्हे. तरी देखील पन्नालाल सुराणा ज्या राजकीय सामाजिक, परिस्थितीत दिवंगत झाले, त्यांचे कर्तृत्व ज्या सामाजिक राजकीय परिस्थितीत बहरले. त्याचा विचार करता त्यांच्या काही कामाची नोंद घेणे मला महत्त्वाचे वाटते.        

पन्नालाल भाऊ यांचे निधन झाल्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले. त्यात एक फोन होता, सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकाराचा. हे ज्येष्ठ पत्रकार एका राष्ट्रीय विचारसरणी पसरवणार्‍या साखळी वर्तमानपत्राचे संपादक राहिलेले आहेत. ते सध्या काही जिल्हा वर्तमानपत्रासाठी अग्रलेख लिहिण्याची कामं करतात. त्यांना पन्नालाल सुराणा यांच्यावर जिल्हा वर्तमानपत्रात अग्रलेख लिहावयाचा होता. म्हणून त्यांना काही माहिती, माझ्याकडून हवी होती. त्यांचे नाव मी मुद्दामहून नमूद करत नाही. त्यांनी मला असे विचारले की, पन्नालाल सुराणा त्यांनी कोणतेही काम असे एका रेषेत करून दाखविले नाही. त्यांचे हे विधान काही अंशाने खरे आहे. तरी, मी त्यांना म्हणालो, असे जरी असली, तरी त्यामुळे त्यांचे मोठेपण कमी होत नाही. अनेक कामांत त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय आहे. ही गोष्ट अमान्य करून चालणार नाही. मग मी त्याच्या कामाची यादी त्यांना सांगितल्यावर त्यांना ते काही प्रमाणात पटले. नंतर विषय निघाला तो भाऊ सुराणा यांना झालेल्या शिक्षेचा. पन्नालाल सुराणा यांना दैनिक ‘मराठवाड्या’चे संपादक अनंत भालेराव यांच्यासोबत एका प्रकरणात  शिक्षा झाली. ते प्रकरण असे होते की, महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री होमी तल्यार खान यांनी दाखल केलेले फौजदारी स्वरूपाचे अब्रू नुकसानीचे. मंत्री होमी तल्यार खान यांनी भ्रष्टाचार केला वगैरे मजकूर असलेला एक लेख भाऊ सुराणा यांनी दैनिक मराठवाड्यात छापला. या लेखामुळे आपली बदनामी झाली. असा बदनामीचा फौजदारी खटला या महाशयाने या दोघांवर केला आणि त्या फौजदारी प्रकरणात या दोघांना शिक्षा झाली. दोघांनी शिक्षा भोगली. विशेष म्हणजे, शिक्षेतून बाहेर पडल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक कशासाठी निघाली? याचा तपशील वर नमूद संपादकाकडे नव्हता. त्यांना असे वाटत होते की, भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध न करू शकलेल्या पत्रकार म्हणून म्हणवणार्‍यांना शिक्षा झाली. त्यांची लोकांनी मिरवणूक का काढावी? मी त्याला म्हणालो,” या फौजदारी प्रकरणात ही बातमी तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून, कुणी पुरविलेल्या माहितीवरून दिली. हे सांगा. मी खटला मागे घेतो. पण पत्रकारितेशी निष्ठा म्हणून दोघांनीही ज्या माणसाने त्यांना ही या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती. त्याचे नाव त्यांनी उघड केले नाही. पत्रकारितेचे मोठे तत्त्व पाळले की, आपल्याला जी माणसे माहिती पुरवतात. त्यांचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड करावयाचे नाही. पत्रकारितेचे हे मूल्य त्यांनी पाळले. म्हणून लोकांनी त्यांचा सत्कार केला. त्यांचे मिरवणूक काढली. पत्रकारितेत अनेक वर्ष काढलेल्या या उजव्या विचारसरणीच्या पत्रकाराला मात्र हे मूल्य कसे जपले गेले. याबाबतची कल्पना नव्हती, याचे आश्चर्य वाटले.  आश्चर्य वाटण्यासारखे कारण हे की, उजव्या विचारसरणीच्या लोकांना डाव्या विचारसरणीचे लोक सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने खुपत असतात, पण मृत्यूनंतर असे खुपणे चालू राहावे, याची मला वाईट वाटले. संस्कारित असणारी माणसं अशी वागू लागतात. तेव्हा पन्नालाल सुराणासारखी माणसे समाजात असणं किती महत्त्वाचे आहे; हे अधोरेखित होते.

पन्नालाल सुराणा हे मूळचे बार्शीचे. काही वर्षे त्यांच्या पत्नी, वीणाताई सुराणा यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कालांतराने त्यांनी आपली बार्शीतील सर्व मालमत्ता विकून टाकून परांडा तालुक्यात आसू येथे स्थलांतर केले. शहरी भागातून ग्रामीण भागात जाण्याची त्यांची इच्छा अनेकांना आकर्षित करून गेली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आणि मी त्यांच्या आसू व दुधी येथील कामाला भेट देण्यासाठी गेलो होतो. दुधी या परिसरात त्यांनी सरकारी जमीन विकसित करून तेथे वृक्ष लागवडीचा पट्टा तयार करण्यासाठी घेतली होती. तेथे काही ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ सदृश काम  केले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना सगळे काम पाहायचे होते. आम्ही दोघे त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांचे सर्व काम पाहिले. पन्नालाल सुराणा यांचे संस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर होते. कारण पन्नालाल सुराणा हे आपल्या तरुण वयात म्हणजे डॉक्टरांच्या किशोर वयात डॉक्टरांच्या घरी जात असत डॉक्टरांचे एक भाऊ जे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या दोघांच्या चर्चेतून लोकशाही समाजवादी विचारसरणीचा संस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर झाला होता. ही बाब डॉ. दाभोलकर यांनी अनेक ठिकाणी मान्य केलेली आहे. पन्नालाल सुराणा हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्यासपीठावर वचित आले असतील; पण त्यांची आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वैचारिक नाळ एक होती. 

पन्नालाल सुराणा आणि वीणाताई हे दांपत्य बघताक्षणी कोणाचेही विजोड वाटावे, असेच होते. भाऊ उंच, लठ्ठ, गोबर्‍या गालाचे, गोरेपान होते. वकिलीचे शिक्षण घेतलेले. तर वीणाताई डॉक्टरकी शिकलेल्या आणि अतिशय कमी उंचीच्या होत्या. पण या दोघांनी आपली आपापसात निवड करताना आपल्या दोघांतील वैचारिक साम्य याला महत्त्व दिले. आपल्या दिसण्याला, उंची आधी बाह्य अंगाला महत्त्व दिले नाही. ही गोष्ट सुमारे ७०-८० वर्षांपूर्वीची आहे, त्या काळात अशा प्रकारचे प्रेमविवाह होत असत. प्रेमविवाहात वैचारिक सहसंबंधांना अधिक महत्त्व दिले जात होते. ही गोष्ट आत्ताच्या प्रेमविवाह करणारे लोकांनी लक्षात घेतली पाहिजे असा आदर्श या दांपत्यांनी समाजासमोर ठेवलेला आहे.

पन्नालाल भाऊ सुराणा यांनी ऐन तारुण्यात बिहारमध्ये लोकनायक जयप्रकाश यांच्या मदतीसाठी राहिले होते. बिहारमध्ये जमीन वाटपाचा, फेर वाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यात त्यांनी सहभाग नोंदवला होता. राष्ट्रसेवा दलाचे ते सतत दहा वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणीबाणीला त्यांनी भूमिगत राहून विरोध केला. काही काळ ते दैनिक मराठवाड्याचे संपादकही राहिले. त्यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली. १९९३ मध्ये धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर त्यांनी ‘आपलं घर’ नावाची राष्ट्रसेवा दलाने संचलित केलेली अनाथ मुलांचे वसतिगृह सुरू केले. त्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत पाहिले. ‘आपलं घर’शी त्यांचे नाते इतके दृढ होते की, त्यांनी स्वतःचे घर असूनही नव्हते असे समजले. त्यांची मुलगी प्राध्यापक असून ती धुळे येथे असते. तर मुलगा पुण्यात इंजिनियर आहे. पण दोघांकडे ते न राहता त्यांनी ‘आपलं घर’ राहण्यासाठी निवडले. ‘आपलं घर’ला पंचवीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा असे ठरविले गेले की, ‘आपलं घर’साठी स्थायी स्वरूपाचा निधी उभा करायचा, तो एक कोटीचा असावा. असा संकल्प पन्नालाल भाऊ यांनी सोडला आणि तो पूर्णत्वास नेला. निधी संकलन करण्यासाठी भाऊंनी जवळजवळ एकहाती प्रयत्न केले. त्या वेळेला मी ‘आपलं घर’चा पदाधिकारी होतो. एखादा लाख रुपये मी उभा करू शकलो. पण पन्नालाल भाऊ यांनी स्वतःचे संबंध वापरून एक कोटी अल्पावधीत उभे केले. ही गोष्ट माझ्यासमोर घडलेली आहे. म्हणजे आपले समाजात सहसंबंध निर्माण करायचे आणि आपल्या चांगल्या कामासाठी त्या संबंधाचा वापर करून घ्यायचा. त्यासाठी शब्द टाकायचा. निधी उभा करायचा. ही कामगिरी पन्नालाल भाऊच करून दाखवू शकतात. डॉ. दाभोलकर हे या बाबतीत वारंवार सांगायचे की, आपला संपर्क वाढवा आणि हा संपर्क प्रसंगी वापरून निधी उभा करण्यासाठी किंवा चळवळ पुढे जाण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला पाहिजे, ही गोष्ट मला सुराणा यांच्या आयुष्यातून शिकता आली.

अनेक लोकांना ही गोष्ट माहीत नसेल की,  भाऊ मरताना देखील एका राष्ट्रीय राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ‘सोशालिस्ट फ्रंट’ नावाचा एक पक्ष आहे. पन्नालाल भाऊ यांनी पक्षीय निवडणुकीचे राजकारण केले. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम केले. राजकारण हे त्यांच्या अंगात मुरलेले होते. समाजवादाचा झेंडा हातात व खांद्यावर घेतल्यानंतर तो राजकीय पटलावर तर खूप मागे पडत असताना एखाद्या राजकीय पक्ष समाजवादी विचारावर आधारलेला असावा. असा विचार करणे हीच आजच्या राजकारणात अवास्तव कल्पना मानली जाते. या पार्श्वभूमीवर मी गमतीने त्यांना म्हणालो की, या पक्षाला भवितव्य काय? तर त्यांनी सांगितले की, आपण करत राहायचे भवितव्याचा विचार करायचा नाही. आपल्या आयुष्यात ज्या विचारांसाठी त्यांनी पायपीट सुरू केली. ती पायपीट पायवाट स्वरूपातच होती. तिचा कधीही महामार्ग होण्याची शक्यता नजीकच्या काळात तर दिसत नव्हता. असे असताना देखील आपल्या जीवनाच्या शेवटच्या जीवनात स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानावर इतकी अढळ निष्ठा असणारी माणसं आज अभावाने दिसतात. त्यामुळे पन्नालाल भाऊंचे दिवंगत होणे, हे मनाला चटका लावून जाणारे आहे. म्हणजे व्यतिगत आयुष्याची आयुष्यात सहचारिणी निवडण्यापासून राजकारण करताना सुद्धा ज्या प्रकारचा विचार केला अशी माणसे आज काळाच्या पडद्याआड जात आहेत, ही दुःखद गोष्ट आहे. त्यांचे असणे हे आदर्शवत होते. त्यांचे वागणे हे आदर्श होते. त्यांचे विचार आदर्शवत होते. आता आदर्श लोप पावत चालले आहेत किंवा असे आदर्श समोर येत आहेत की, ज्यांचा स्वीकार करणे शक्य नाही. कालसुसंगत ठरणार नाही. तरी काही  माणसे विचलित न होता आपले काम करत राहतात. भाऊ सुराणाच्या नंतर काही दिवसातच डॉ. बाबा आढाव यांचेही निधन झाले. असाच दुसरा अवलिया गेला. महाराष्ट्राच्या दृष्टीने या दोघांची जाणे ही मोठी हानी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला थेटपणे या लोकांचा किती उपयोग झाला मला माहीत नाही. पण त्यांचे असणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसाठी आश्वासक होते. ते आहेत यावर काम करण्याची ऊर्मी शिल्लक राहात होती. आता अशी व्यक्तिमत्त्वं फार दुर्मीळ झाली आहेत.

भाऊंचे राहणीमान अत्यंत साधे होते. अंगावर खादीचे कपडे, मिळेल ते जेवण, मिळेल ते मुकामाचे ठिकाण, कोणत्याही बाबतीत कसलाही आग्रह नाही. संपर्कासाठी साध्या पोस्ट कार्डाची मदत. सतत आपल्या विचाराशी लोक कसे जोडले जातील याचा कृती कार्यक्रम आखत राहणे. मोठेपण अजिबात न मिळवणे ही भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष वैशिष्ट्ये. असे साधे राहणेसुद्धा कठीण आहे. सध्याच्या बाजारू युगात तर ते आणखीनच दुर्मीळ व कठीण आहे. प्रवीण दवणे एका कवितेत म्हणतात, ‘सहजपणात प्रवीण’ अशा सर्व सहजतेत प्रवीण असलेल्या पण विचाराने अत्यंत प्रगल्भ असलेले एका व्यक्तिमत्त्वाची आपल्यातून कायमच्या प्रवासाला निघून गेले त्यांची उणीव सतत जाणवत राहणार.

त्यांच्या व्यतिमत्त्वास विनम्र अभिवादन.

देविदास वडगांवकर, धाराशिव

मो. ९४२३०७३९११


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]