डार्विनच्या सिद्धांताची सत्यासत्यता

प्रभाकर नानावटी -

डार्विनने मांडलेला सिद्धांत खरोखरच धोकादायक आहे का, याचीही शहानिशा करावी लागेल. सैद्धांतिक स्वरूपात धोका असल्यास घाबरण्याचे कारण नाही. मुळातच सिद्धांत खरा आहे की नाही यावरून धोका आहे की नाही हे ठरवता येते. या सिद्धांताबद्दल चर्चा, वादविवाद, आक्षेप, आरोप-प्रत्यारोप अजूनही चालू आहेत. आक्षेप घेणार्‍यांमध्ये कडव्या धार्मिकांचीच संख्या जास्त आहे. अमेरिकेतील धर्मांधांचा अजूनही ईश्वरच सृष्टीकर्ता असून त्याच्या इशार्‍यानुसारच जगातील सर्व घडामोडी घडत असतात, यावर गाढ विश्वास आहे. डार्विनचा सिद्धांत शाळेत शिकवण्यास त्यांचा विरोध असतो. विज्ञानातील इतर अनेक निरर्थक सिद्धांताप्रमाणेच हा सिद्धांतही चुकीचा ठरेल याची ते वाट बघत आहेत. टीव्हीसारख्या प्रसारमाध्यमांतून याविषयी खोट्यानाट्या अफवा पसरत आहेत. गंमत म्हणजे प्रेक्षकांचा यावर विश्वासही बसतो.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी जरी डार्विनच्या सिद्धांताविषयी संशयाचे वातावरण असले, तरी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सिद्धांताविषयीच्या पुराव्यांत फार मोठ्या प्रमाणात भर पडली. डीएनएचा शोध मैलाचा दगड ठरला. यामुळे नैसर्गिक निवडीचा हा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत केवळ जीवशास्त्राच्या क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता विज्ञानाच्या इतर अनेक क्षेत्रांशी त्याचा संबंध येऊ लागला. खरे म्हणजे हेच त्याचे वैशिष्ट्य ठरेल. डार्विनचा सिद्धांत म्हणजे केवळ जीवाश्म असलेले पाषाण किंवा जीवाश्म यांचा अभ्यास, एवढेच नव्हे. आनुवंशिक विज्ञानात होत असलेल्या प्रगतीतून नवडार्विनवाद या विद्याशाखेचा प्रारंभ झाला. या शाखेतील हजारो पुराव्यांमुळे सिद्धांताविषयीच्या संशयाचे जाळे दूर झाले. आनुवंशिकता कशी काम करते याची कल्पना येत आहे. जनुकांतील बदलांमुळे सजीवांवर काय परिणाम होऊ शकतात यावर संशोधन चालू आहे. प्रत्येक डीएनए कण नेमका काय करतो, पेशींवर त्याचे काय परिणाम होतात, याचा अभ्यास केला जात आहे. एवढे सर्व पुरावे असतानासुद्धा उत्क्रांतिवाद खोटा आहे असे म्हणणे म्हणजे पृथ्वीभोवती उपग्रहातून अंतरिक्ष प्रदक्षिणा घालून आल्यानंतरसुद्धा पृथ्वी सौरमालिकेचा केंद्रबिंदू आहे असे म्हटल्यासारखे होईल. धर्मांध अजूनही डार्विनच्या सिद्धांताचा स्वीकार करण्यासाठी हे पुरावे पुरेसे नाहीत म्हणून वितंडवाद घालत आहेत. अजूनही ‘बुद्धिमान रचनाकर्ता’ या सिद्धांताचा पाठपुरावा करत आहेत.

धार्मिकांना काय वाटते हा प्रश्न बाजूला ठेवून वैज्ञानिकांचा तरी या सिद्धांतावर विश्वास आहे का? हा प्रश्न विचारल्यास त्यांच्यातील काहींच्या उत्तरात संदिग्धता आहे. कारण, विज्ञानाच्या जगात पुराव्यानिशी सिद्ध झालेले अनेक सिद्धांत काही काळानंतर सपशेल खोटे ठरले आहेत. अशीच गत डार्विनच्या सिद्धांताची होणार नाही हे कशावरून? मुळातच आपल्याला एखादे विधान पूर्णपणे सत्य आहे असे ठामपणे सांगता येईल का? कारण प्रत्येक विधानाविषयी संशयाला जागा असतेच. संशोधकांनासुद्धा याची जाणीव असतेच. कारण काही काळानंतर लागलेल्या एखाद्या अफलातून शोधामुळे सिद्धांताचा मनोरा कोसळतो. सर्व विधानांना वेगळी कलाटणी मिळते. कार्ल पॉपर या ज्ञानमीमांसकाच्या मते (वि)ज्ञानातील विधान आपण कधीच सिद्ध करू शकणार नाही; फार फार तर आपण ते खोटे ठरवू शकतो. हेच खरे असल्यास डार्विनवादासंबंधी वैज्ञानिकांनी केलेली आतापर्यंतची विधाने संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता जास्त आहे.

सौरमालिका, विश्वरचना यासंबंधी आतापर्यंत केलेल्या विधानाबद्दल टॉलेमी, कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, हबल इ.इ. च्या विधानांबद्दल वैज्ञानिकांच्या मनात संशय आहे का? हा प्रश्न विचारल्यास विश्वरचनेसंबंधी कुणालाही संशय नाही असेच म्हणावे लागेल. काही वैज्ञानिक विधानांबाबतीत शंभर टक्के नसली, तरी सामान्यपणे आपली सहमती असतेच. त्यातील काही बारीकसारीक तपशिलांची आपल्याला कल्पना नसली, तरी ते वैज्ञानिक विधान स्वीकारार्ह वाटत असते. त्यामुळेच बहुतेक वैज्ञानिक डार्विनच्या सिद्धांताला नाकारण्याच्या मनःस्थितीत नाहीत. गुणसूत्र, जनुक, डीएनए, आरएनए इत्यादी गोष्टींबद्दल संशयास स्थान नाही. डार्विनच्या सिद्धांतातील विधानांविषयी व त्यांच्या पुराव्यांविषयी नाट्यपूर्ण व क्रांतिकारक बदल होण्याची शक्यता असेलही. परंतु त्याला पूर्णपणे अव्हेरून मूळपदावर जाणे, ही कोपर्निकसला अव्हेरून सूर्यकेंद्रित विश्वाऐवजी पृथ्वीकेंद्रित विश्वाकडे जाण्याइतकी अशक्यातली गोष्ट ठरेल. आईनस्टाईनने केलेल्या बदलाप्रमाणे या सिद्धांतातही काही किरकोळ बदल अपेक्षित आहेत.

अशा सिद्धांताविषयी तत्त्वज्ञांची विचार करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. जहाल तत्त्वज्ञ तर अनेक प्रश्न विचारू शकतातः निश्चित निष्कर्षांप्रत पोचणे किंवा एखादी घटना निश्चितपणे तशीच घडली/आहे असे विधान करणे वा अशा विधानावर विश्वास ठेवणे, हे सर्व मनाचे खेळ तर नाहीत ना? खरोखरच जग असे आहे का? आपण अशी कल्पना करत आहोत तसे जग असेल की नाही? हे सर्व जग स्वप्नवत तर नाही ना? एखादा बुद्धिवान माणूस आपल्याला काही विशिष्ट हेतूने फसवत तर नाही ना? इ.इ.

अशा प्रकारच्या प्रश्नांचा ऊहापोह विचारप्रयोगांमध्ये (थॉट एक्सपिरिमेंट) करतात. तत्त्वज्ञांच्या प्रयोगातील विचारमालिका खालीलप्रमाणेसुद्धा असू शकेल. जग कसे आहे त्याचा पुरावा आपल्याला आलेल्या अनुभवातून जाणवत असतो. तसे असल्यास आपण आपल्या अनुभवाच्या कक्षेच्या पलीकडचे विधान कसे काय करू शकतो. त्या गोष्टी खरे आहेत असे का मानतो? उदाहरणार्थ, जीवन हे एक स्वप्न आहे, असे का मानत नाही? कदाचित, आपले सर्व व्यवहार किंवा आपली ही ‘जागृतावस्था’ एखाद्या स्वप्नाचाच भाग असू शकेल! ‘आपल्या पायापाशी बसलेले मांजर खरे आहे हे कशावरून? हे जग मिथ्या आहे. ही सर्व माया आहे. हे सर्व मनाचे खेळ आहेत. एका कुटिल शहाण्या माणसाचे हे कारस्थान आहे. आपण सर्व त्याचे गुलाम आहोत. आपला मेंदू त्याच्या आदेशाप्रमाणे वागतो. तो आपल्याला सतत खेळवतो. खरे काय आहे, हे शोधण्यापासून परावृत्त करतो. आपल्या भोवतालची माणसे रोबो नाहीत, हे कशावरून? आपल्याला रोबोंच्या ज्ञानेंद्रियापर्यंत पोचता येत नाही. त्यांच्या जाणिवांचे आकलन आपण करू शकत नाही.’

अशा प्रकारे युक्तिवादांना अंत नाही व त्यांतून काहीही निष्पन्न होणार नाही. सिद्धांताचे जहाल टीकाकार सर्व पुरावे निरुपयोगी आहेत, असे म्हणत घणाघाती हल्ला चढवतील. कुठलाही पुरावा सादर केला तरी तो पुरावा निरर्थकच म्हणत असल्यास पुढील चर्चा खुंटते. असाच प्रकार डार्विनच्या सिद्धांताबाबतीतही होत असेल. जनुके, डीएनए किंवा गुणसूत्रे इत्यादी अनेक पुरावे जहाल टीकाकारांसमोर ठेवले तरी हे मुळातच पुरावे असू शकणार नाहीत किंवा हे सर्व कशावरून खरे आहेत असे विधान करून ते लोक पुरावे नाकारू शकतात. आपल्याला येत असलेला अनुभव हा पूर्णपणे मायेचाच प्रकार आहे असे म्हणू लागल्यास चर्चा थांबते व पुढे काय करावे हे सुचत नाही. खरे पाहता तत्त्वज्ञानाचे क्षेत्र अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांच्यापलीकडे जाऊन जाणीवपूर्वक निरीक्षण व अभ्यास करणारे क्षेत्र आहे. विज्ञानातील निश्चित विधाने व जहाल टीकाकारांच्या प्रश्नांची सरबत्ती यातून मार्ग काढण्यासाठी तत्त्वज्ञानाला एखादी वेगळीच व्यवस्था करावी लागेल.

डार्विनवादाचा सिद्धांत आहे तसाच स्वीकारावा की त्याबद्दलचे संशय पूर्ण फिटेपर्यंत वाट पहावी, असाही विचार मनात येऊ शकतो. मग डार्विनचा सिद्धांत शाळेत शिकवावा की नाही, शासनाने त्यावरील संशोधनाला उत्तेजन द्यावे की नाही; आर्थिक तरतूद करावी की नाही, इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पास्कल (१६२३-६२) या थोर तत्त्वज्ञाने शोधलेल्या ‘पास्कल वेजर’ (पास्कलची ‘बेट’, सट्टा!) या तर्कपद्धतीचा आधार घेता येईल. पास्कललासुद्धा त्या काळी ईश्वराचे अस्तित्व व पुनर्जन्म याबद्दल संशय होता. त्यामुळे आपली जीवनपद्धती कशी असावी, हा प्रश्न त्याला पडला होता. तर्काचा वापर करून या जगात ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही याचा शोध घेता येतो, असे त्याला वाटत होते. त्यासाठी त्याने तर्ककोष्टकाची रचना करून त्यातील प्रत्येक विधानाला काही गुण देऊन निष्कर्ष काढले. फक्त तर्काच्या आधारावरून निष्कर्षाप्रत पोचणे हेच, पास्कल वेजरचे वैशिष्ट्य आहे.

विज्ञानातील अनिश्चिततेचा विचार करताना आपल्यासमोर सुसंबद्ध जग वा असंबद्ध जग अशा शक्यता आहेत. त्यासाठी पास्कल वेजरसारखे तर्ककोष्टक तयार करता येईल. उभ्या रकान्यात सुसंबद्ध जग व असंबद्ध जग व आडव्या ओळीत विज्ञानावर व विज्ञानविरोधी कृती, असे नमूद करून त्यातील प्रत्येक विधानाला काही गुण देऊन ताळेबंद काढता येईल.

खालील कोष्टकात नमूद केलेले गुण, तसे पाहिल्यास, कल्पनेतील गुण आहेत. परंतु मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. या कोष्टकावरून विवेकी माणूस काय करणार याचा नक्कीच अंदाज येईल. त्याचा सुसंबद्ध जगावर विश्वास असेल तर तो विज्ञानपर कृती करेल.

डार्विनच्या सिद्धांताचा विचार करताना पद्धतशीरपणे तर्क लढवत राहिल्यास वैज्ञानिक निश्चितीपर्यंत पोचता येते, हे लक्षात येईल. जगाच्या रचनेत सुसंबद्धता असल्यास डार्विनचा सिद्धांत तंतोतंत लागू होईल. परंतु सुसंबद्धता नसल्यास, डार्विनचाच नव्हे, तर इतर कुठलाही सिद्धांत लागू होणार नाही. पुरावे नाकारणे किंवा सिद्धांत खोटा आहे असे विधान करणे, हे विश्वाच्या सुसंबद्धतेलाच आव्हान दिल्यासारखे होईल. वितंडवाद करत राहिल्यास वैज्ञानिक पुराव्यांना काही अर्थ नाही. रिचर्ड डॉकिन्सच्या मते, संस्कृतिरक्षक व ढोंगी यांच्यामध्ये फार फरक नसतो. एखाद्या निष्णात शल्यविशारदापेक्षा रस्त्यावरील वैदूच श्रेष्ठ असे म्हणणार्‍यांपुढे कितीही वैज्ञानिक पुरावे सादर केले तरी पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे होईल!

क्रमशः

संदर्भ ः Human Nature after Darwin by Janet Radcliffe Richards

लेखक संपर्क : ९५०३३३४८९५


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]