खाद्य संस्कृती आणि विवेकी आहार

डॉ. विनायक हिंगणे -

वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळी कुझीन आपण चवीने खातो. आपल्याकडेही विविध राज्यांतील लोक काय खातात असे विचारले तर मराठी पारंपरिक जेवण, गुजराती पक्वान्ने, पंजाबी डिश इत्यादी पदार्थांचे प्रकार डोळ्यांसमोर उभे राहतात. त्या प्रदेशातील लोक उपलब्धता, आवडनिवड व संस्कृतीला अनुसरून वेगवेगळे पदार्थ बनवतात. खाण्यापिण्याच्या वेळा, पद्धती व पदार्थ हे सगळेच प्रदेशानुसार काही प्रमाणात बदलतात. यातूनच त्या प्रदेशाची एक खाद्य संस्कृती बनलेली असते. खाद्यपदार्थ सोडून इतरही अनेक बाबी ह्या खाद्यसंस्कृतीचा भाग असतात. काही ठिकाणी घरी बनवलेल्या अन्नावर भर असतो, तर काही भागांमध्ये लोकांचा बाहेर खाण्याकडे कल असतो. काही ठिकाणी आग्रह करून वाढण्याची सवय असते. काही घरांमध्ये जेवण झाल्यावर गोड खाण्याची तर काही ठिकाणी चहा पिण्याची सवय असते. बर्‍याच ठिकाणी जेवणानंतर पान खाण्याची पद्धत असते. काही भागांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात लोकांना फक्त दोन वेळा जेवणाची सवय असते तर शहरी भागात नाश्ता आणि दोन वेळा जेवण अशी दिवसात ३ वेळा खाण्याची सवय असते. आलेल्या पाहुण्याला चहा आणि काहीतरी नाश्ता द्यावा अशी आजकाल एक रीतच झाली आहे. खाण्यापिण्याच्या या सामूहिक सवयींनाच आपण खाद्य संस्कृती म्हणूयात. अनेक छोट्या- मोठ्या सवयी आपल्याला जडतात व आपण खाद्य संस्कृतीमुळे त्या पुढे चालवतो. खाण्यापिण्याच्या या सवयी एवढ्या अंगवळणी पडतात की त्या बदलणे कधी कधी अवघड होऊन बसते. काही सवयींना तर मोठा लोकाश्रय मिळतो. चारचौघांमध्ये असल्यावर अशा सवयी टाळता येत नाहीत. उदाहरणार्थ, मुळीच तिखट न खाणारी एखादी व्यक्ती चार-पाच वर्षे नागपूरला राहायला गेल्यास तिखट खाण्यात तरबेज झाल्यास नवल वाटायला नको! ‘चहाला नाही म्हणू नये!’ अशा पिअरप्रेशर मुळे सुद्धा सवयी बदलणे अवघड होते. आपल्या ह्या सामूहिक सवयी आहाराच्या दृष्टीने कधी कधी खूपच फायद्याच्या असतात. पण आरोग्याला घातक सवयी खाद्य संस्कृतीत मिसळल्या तर समाजात जीवनशैलीच्या आजारांची लाट येऊ शकते. सध्या आपल्याकडे डायबेटिसची लाट आली आहे अगदी तशीच! आपल्या आरोग्याला साधक आणि बाधक अशा सामूहिक सवयींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत.

पारंपरिक खाद्य पदार्थ आणि खाण्याच्या सवयी :

आपल्या जडण घडणीवर खाद्यसंस्कृतीचा मोठा प्रभाव अशा प्रकारे पडत असतो. हा प्रभाव कधी सकारात्मक तर कधी वाईट ठरतो. खाद्य संस्कृतीमधील काही बाबी आरोग्याला खरेच फायद्याच्या ठरतात. वेगवेगळ्या संशोधनात त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. पारंपारिक धान्ये ही त्या त्या प्रदेशात उगवणारी व सहज उपलब्ध होणारी असतात. स्वस्तात व सहजपणे भरपूर पौष्टिक द्रव्ये देण्याचे काम पारंपारिक धान्ये, फळे व भाजीपाला देतात. सणावाराचे पदार्थ सोडले तर बरेचसे पारंपरिक पदार्थ हे कमी प्रक्रिया केलेले असतात. त्यात साखर, गूळ, तेल, तूप ह्यांचे प्रमाण अतिरेकी नसते. असे पदार्थ आरोग्याला फायदेशीर ठरू शकतात. पारंपरिक आहारात जास्त प्रमाणात तेल-तूप व साखरेचा शिरकाव झाल्यास ते हानिकारक ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे. भूमध्य समुद्राच्या भागात जो पारंपरिक आहार आहे त्याचा फायदा आरोग्याला होतो व खासकरून हृदयाच्या आरोग्याला होतो असा निष्कर्ष काही शास्त्रीय अभ्यासांमध्ये दिसला आहे. हे ‘मेडीटेरिनियन डायट’ व इतर भागातील पारंपरिक आहार यात काही समानता आढळतात. भाजीपाला, ताजी फळे, ऑलिव्हचे तेल व तेलबिया, डाळी व कडधान्ये इ. या आहारात मुबलक असतात. मासे, काही दुग्धजन्य पदार्थ व मांस ठरावीक प्रमाणात असते. प्रक्रिया केलेले पदार्थ कमी असतात. आपला भारतीय पारंपरिक आहारसुद्धा ह्याला समांतर असाच आहे. त्यामुळे आहाराच्या काही सवयी फक्त जुन्या म्हणून कुचकामी ठरत नाहीत. अर्थातच या बाबतीत अधिकाधिक संशोधन होऊन आहाराच्या चांगल्या सवयींना शास्त्रीय पुरावा देऊन बळकट करण्याची गरज आहे. ह्याउलट जुने ते सोने म्हणून खाद्यपदार्थ आंधळेपणे कवटाळून घेणे सुद्धा योग्य नाही. आहाराबाबत जे आधुनिक संशोधन होत आहे त्यातून दर वर्षी नवनवीन माहिती समोर येते आणि पारंपरिक आहारातील काय चांगले आणि काय वाईट ह्यांना उलगडा होणे सोपे जाते.

खाण्याच्या वेळा आणि उपास :

ग्रामीण भागातील रुग्ण बघताना असे आढळले की बरेच लोक फक्त दोन वेळा जेवतात. इतर वेळी काही खात नाहीत. अशा रुग्णांना नाश्ता करणे किंवा तिसर्‍यांदा जेवणे मुळीच रुचत नाही. शहरी विभागात किंवा डॉक्टरांना नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असा जेवणाचा आराखडा जास्त सोयीचा वाटतो. या दोन्हीपैकी कुठलाही प्रकार चुकीचा म्हणता येणार नाही. डायबेटीसच्या रुग्णांना तीन किंवा अधिक वेळा खाण्याचा जो सल्ला दिला जातो तो शुगर खूप कमी होणे टाळण्यासाठी असतो. रुग्णांना रक्तातील शुगर कमी करणारी औषधे दिली जातात. पण खाण्यात जास्त अंतर झाले तर शुगर धोक्याच्या पातळीपर्यंत कमी होऊ शकते. हे टाळण्यासाठी दर काही तासांनी खावे असे सांगितले जाते. पण काहींना फक्त दोन वेळा खाणे किंवा दोन जेवणांच्या मध्ये काहीच न खाणे हे सुद्धा फायद्याचे ठरते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना असा उपवास किंवा इंटरमिटंट फास्टिंग उपयोगी ठरू शकते. क्षिअओयांग आणि सहकार्‍यांनी चीनमध्ये केलेला अभ्यास २०२३ मध्ये प्रकाशित झाला. त्यात इंटरमिटंट फास्टिंग करून लोकांचे वजन कमी झाले तसेच डायबेटीस नियंत्रणात आला असे दिसले. त्यामुळे जेवणाच्या वेळा नियंत्रित करून आरोग्य नियंत्रणात आणणे काही रुग्णांमध्ये शक्य आहे असे दिसते.

आहाराविषयी दृष्टिकोन:

खाद्य संस्कृती जशी विकसित होते त्यानुसार आपला आहाराविषयी दृष्टिकोन सुद्धा बदलत जातो. एखाद्या खाद्य संस्कृतीत वाढलेला माणूस काही पूर्वग्रह ठेवून असतो किंवा काही घटकांबद्दल त्याला जास्त जिव्हाळा किंवा तिरस्कार असू शकतो. वैज्ञानिक शहानिशा किचकट असते. त्यामुळे आपल्याला सोप्या वाटणार्‍या सवयी व ग्रह आपण घट्ट पकडून ठेवतो. अगदी सबळ पुरावा असणारी गोष्टसुद्धा आपल्या सवयीची नसेल तर नकोशी वाटते. आहाराविषयी अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यांचे उत्तर आपल्या खाद्यसंस्कृतीला अनुरूप असेच आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. आपले पूर्वग्रह, आपल्या मित्रांचे किंवा शेजार्‍यांचे मत ह्यांना आपण अधिक महत्त्व देतो. मांसाहार आवडणारी मंडळी मांसाहाराचा पुरस्कार करतात तर शाकाहारी लोक शाकाहारच कसा उत्तम हे सांगतात. पण आहाराविषयी बरीचशी उत्तरे काळी किंवा पांढरी नसतात. त्यांना स्थळ-काळ-व्यति सापेक्षतासुद्धा असते. त्यामुळे आहाराविषयी प्रश्नांची उत्तरे सोपी नसतात. एक उदाहरण बघू या. भात हा काहींसाठी हानिकारक तर काहींना फायदेशीर असतो. काहींना आहारात भात कमी केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. पण त्या व्यक्तीच्या आजूबाजूला सगळे भात खाणारे असतील व ती व्यक्ती स्वतः रोज भात खाऊन मोठी झाली असेल तर ‘भातात काय वाईट?’ असे वाटणे स्वाभाविक आहे. काहींना डॉक्टर चहा टाळण्याचा सल्ला देतात, पण समाजात फिरताना सगळेच चहा पाजतात. त्यांना नाही म्हणणे कठीण जाते. अगदी प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखा अनुभव चहा बंद करताना लोकांना येतो. त्यामुळे चहाचे फायदे सांगितले तर लोकांना लगेच पटतात, पण चहा पिण्याचे तोटे लगेच मान्य होत नाहीत. आपल्या आहारविषयक दृष्टिकोनावर खाद्य संस्कृतीचा असा मोठा पगडा असतो.

खाद्य संस्कृती आणि शरीरयष्टी:

खाण्याचा सरळ सरळ संबंध आपल्या शरीरयष्टीशी आहे. कधी काळी दुष्काळ वारंवार पडे आणि त्यात चरबीचा साठा भरपूर असणारे लोक टिकाव धरू शकत असत. त्यामुळे एके काळी जाड म्हणजे निरोगी असा समज होता. आजही शरीरयष्टीविषयी सुद्धा आपले मत आपल्या सभोवताली लोक काय बोलतात यावर ठरते. शहरी भागात विशेषतः लोकांचा बारीक दिसण्याकडे कल असतो, तर खेडे विभागात थोडे जाडजूड दिसणे लोक पसंत करतात असा माझा अनुभव आहे. मस्त भरपेट खावे आणि सुखी रहावे असा दृष्टिकोन असतो. ढेरी दिसणे हे सुखाचे लक्षण समजले जाते. विज्ञानाचा दृष्टिकोन याबद्दल थोडा वेगळा आहे. पुरुषांच्या पोटाचा घेर ९० सेंमी पेक्षा जास्त किंवा स्त्रियांच्या पोटाचा घेर ८० सेंमी पेक्षा जास्त असेल तर त्यांना डायबेटीस, हृदयरोग इत्यादींचा धोका जास्त असतो असे आढळले आहे. पण बर्‍याच ठिकाणी भरपेट खाणे ही एक सामूहिक सवय असते. वजन कमी होणे हे आजारीपणाचे लक्षण समजले जाते. अशा भागांमध्ये आग्रह करून वाढण्याची रीत प्रचलित असते. आपण एखाद्याला जबरदस्ती खाऊ घालून त्याचे आरोग्य सुधारते असा लोकांचा समज असतो. पण प्रत्यक्षात डायबेटीस किंवा हृदयरोगाच्या रुग्णांसाठी ते घातक ठरू शकते. आता ह्याच्या अगदी दुसर्‍या टोकाला बारीक दिसण्याची क्रेझ दिसते. खासकरून शहरी भागात असे आपल्याला दिसते. बारीक दिसण्यामागे काही प्रमाणात आरोग्याला फायदा निश्चित असतो. पण इथेही अतिरेक टाळायला हवा. बरेचदा ‘हेल्थ कॉन्शस’च्या नावाखाली बारीक दिसण्यासाठी अतिरेकी उपाय केलेले दिसतात. वैज्ञानिक आधार नसलेले उपाय, फॅड डायट इत्यादी अनेक प्रकार आपण बघतो. अमुक टाळल्याने वजन कमी होते म्हणून जेवण टाळायचे व त्या ऐवजी डबेबंद फॉर्म्युला घ्यायचा असे प्रकार सर्रास सुरू असलेले आपल्याला दिसतात. निरोगी जीवनशैली पाळून बारीक होण्याऐवजी झटपट बारीक होण्याचा दबाव लोकांवर पडतो. ह्या दोन्ही टोकाच्या भूमिका खरेतर टाळायला हव्यात. वजन वाढवणार्‍या व झपाट्याने वजन कमी करणार्‍या डब्यापेक्षा निरोगी जीवनशैली जास्त महत्त्वाची आहे.

आपल्या खाण्याच्या सामूहिक सवयींचा परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर नकीच होतो आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ. अनेक जीवनशैलीचे आजार आज लाटेसारखे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. आपल्या खाद्य संस्कृतीने कुठेतरी चुकीचे वळण घेतले आहे हे नक्की! आपल्याला आहाराविषयी व निरोगी जीवनशैलीविषयी बरेचसे ज्ञान आहे पण त्याचे रूपांतर आपल्या खाद्य संस्कृतीत व्हायला हवे. कुठल्या सामूहिक सवयी चांगल्या व खाद्य संस्कृतीचे कुठले घटक हानिकारक ह्यांची सतत आणि विवेकपूर्ण शहानिशा होण्याची गरज आज आपल्याला आहे. नवनवीन संशोधन व शास्त्रीय पुरावे आपल्याला नकीच मदत करतील अशी मला आशा आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]